३१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पहिला

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवन ! सर्व मन्वन्तरे आणि त्यांत अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण केलेले वर्णन मी ऐकले. मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंतांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तोच या प्रकल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केलेत. ब्रह्मण ! आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्र वेगवेगळी वर्णन करा. महाभाग ! हे ऐकण्याची आम्हांला नेहमीच उत्सुकता असते. वैवस्वत मनुच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्रकीर्ती पुरुषांच्या पराक्रमाचे वर्णन करा.
सूत म्हणतात - वेद जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा धर्माचे परम मर्मज्ञ असणारे भगवान श्रीशुकदेव म्हणाले.
            श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता ! मनुवंशाचे वर्णन तू थोडक्यात ऐक. शेकडो वर्षांमध्येसुद्धा त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही. जे परमपुरुष परमात्मा लहान-मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते. त्यावेळी हे विश्व किंवा हा आणखी काहीही नव्हते. महाराज ! त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमलकळी प्रगट झाली. त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवांचा अविर्भाव झाला. ब्रह्मदेवांच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप. त्यांना दक्षकन्या आदितीपासून विवस्वान (सूर्य) हा पुत्र झाला. विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनूचा जन्म झाला. परीक्षिता ! संयमी राजा श्राध्ददेवाला श्रध्देपासून दहा पुत्र झाले. इक्ष्वाकू,नृग, शर्याती, दिष्ट, करूष,नरिष्यंत,पृषध्र,नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती.
            प्रथम वैवस्वत मनूला पुत्र नव्हता. म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वशिष्ठांनी संतानप्राप्तीसाठी त्यांच्याकडून मित्रावरूण देवतेचा यज्ञ करविला होता. फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्धेने, होत्याकडे जाऊन "मला कन्या व्हावी" अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली. तेव्हा अध्वर्युच्या प्रेरणेने 'होता' बनलेल्या ब्राह्मणाने , श्रद्धेने जे सांगितले होते, त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषट्काराचा उच्चार करीत कन्या व्हावी, यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. 'होती' अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली. तिला पाहून मनूला वाईट वाटले आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला. "भगवन ! आपण मन्त्रवेत्ते आहात. आपले कर्म असे विपरीत फळ देणारे कसे झाले ? आहो, हे फार वाईट झाले. वैदिक मंत्रांचे असे विपरीत फळ असता कामा नये. आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे. आपण जितेंद्रिय सुद्धा आहात. त्याचबरोबर तपश्चर्येने निष्पाप झालेले आहात. देवांनी असत्य बोलावे, त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला ?"
            आमचे वृध्द प्रपितामह महर्षी वसिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले की, होत्याने विपरीत संकल्प केला. म्हणून ते वैवस्वत मनूला म्हणाले, "राजन ! तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पूरा झाला नाही. तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईल. "
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हा जीव अज्ञानी आहे. आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्यांचे हे अज्ञान नष्ट होते, तेच माझे परम गुरु आपण, माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. असे अग्नीमध्ये तापविल्याने सोन्याचांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते, त्याचप्रमाणे यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्वशक्तीमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परम गुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरू व्हा. सर्व देव, गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली, तरीसुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशाइतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. जसा एखादा अंधळा अंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवितो, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरु बनवितो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रयांचे प्रेरक आहात. आत्मतत्त्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरु केले आहे. अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो, ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररुपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता, त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरू, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हेसुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टीचा त्यांना पत्ताच नाही. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणार्‍या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशी प्रार्थना करणार्‍या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्त्वाचा उपदेश केला. भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला 'मत्स्यपुराण' म्हणतात. ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले, तेव्हा भगवंतांनी हायव्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापांतून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रीस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती, त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात
घेऊन केला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्त्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीलामत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळुन गेला. तो म्हणाला, "मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात ?" आपण एकाच दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले. एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही. आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी आहात. जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. हे पुरुशोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात, तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की, आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे ? हे कमलनयन प्रभो, जसे देहादी अनात्मपदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणाऱ्या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो, त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होईल होऊ शकत नाही. कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी, परम प्रियतम आणि आत्मा आहात. आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हांला दर्शन दिले आहे, ते अतिशय अद्भुत आहे.
            श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपति मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली, तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर काल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटले.
            श्रीभगवान म्हणाले - सत्यव्रता, आजपासून सातव्या दिवशी भू, भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालाच्या अथांग पाण्यात बुडू लागतील, तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सुक्षम शरीरे घेऊन सप्तर्षीसह त्या नौकेवर चढावेस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहानमोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल, तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध. सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन. त्यावेळी जेव्हा तू प्रश्न विचारशील, तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेने, ज्याचे नाव 'परब्रम्ह' आहे, तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरुप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. एके दिवशी राजाने पाहिले की, प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहेत. पाहाता-पाहाता सर्व पृथ्वी बुडू लागली. तेव्हा राजाला भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली, तेव्हा तो धान्य आणि इतर बीजे घेऊन सप्तर्षीसह तीत बसला. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, "राजा, तू भगवंतांचे ध्यान कर. तेच आम्हांला या संकटातून वाचवतील आणि आमचे कल्याण करतील." त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांचे ध्यान केले. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला चार लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रगट झाला. भगवंतांच्या सांगण्यानुसार ती नाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला.
            सत्यव्रत म्हणाला - जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादि अविद्येमुळे झाकले गेले आहे. याचमुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत. जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात, तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. म्हणून आम्हांला मुक्ती देणारे परम गुरु आपणच आहात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - मुनिवर्य, अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती, त्यांच्या त्या आदिअवताराची कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी, लोकांना न आवडणारे, असाह्य असे हे माशाचे रूप का धारण केले ? भगवन, महात्म्यांना किर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हांला सांगावी.
सुत म्हणतात - जेव्हा परिक्षिताने भगवान श्रीशुकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी, भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! गाई, ब्राह्मण, देव, साधू,वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. ते सर्वशक्तिमान प्रभू वायुप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धीगत गुणांनी ते लहान-मोठे होत नाहीत. कारण ते निर्गुण आहेत. परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्रह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रणयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहाणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला.
परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत्परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राध्ददेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनु बनविले. तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडणे. अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, "राजन, आपण दिनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहित आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडीत आहात ? " स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रुपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती, तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. त्या मासळीचे दिनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्या वेळी मासळी राजाला म्हणाली. आता मोठ्या कष्टानेसुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ. तेथे मी आरामात राहू शकेन. राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवले. परंतु तेथे सोडल्यावर ती मासोळी दोन घटकात तीन हात मोठी झाली. " राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे. म्हणून मला राहाण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे. "परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले. परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले. आणि म्हणाली- "राजन, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहाण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याचा खोल डोहात ठेवावे. " त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयांत सोडले. परंतु जलाशय जेवढा मोठा असे, तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणले. समुद्रात सोडीत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला," हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहातात, त्या मला खाऊन टाकतील. म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये."
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२७ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः शुक्राचार्य म्हणाले - भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर, यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली आहे, त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील ? कारण मंत्रांचे, अनुष्ठानपद्धतीचे, देश, काल, पात्र आणि वस्तूंविषयाचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात. तथापि अनंता, आपणच जर म्हणत असाल, तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन. कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्यांचे परम कल्याण आहे.
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षीसह, बलीचा यज्ञ पूर्ण केला. परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पीतर, मनू, दक्ष,भृगू, अंगिरा, सनत्कुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी, तसेच सर्व प्राण्यांच्या अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला.
परीक्षिता ! वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष, या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परम कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने, लोकपालांसह वामनांना सर्वाच्या पुढे विमानात बसविले आणि त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेले. इंद्राला एक तर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. ब्रह्मदेव, शंकर, सनत्कुमार, भृगु इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगन, भगवंतांच्या या परम अद्भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली.
परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणाऱ्याची सर्व पापे नष्ट होतात. भगवंतांच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रदृष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की, जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल, असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. अद्भूत लीला करणाऱ्या देवाधिदेव वामनांच्या अवतारचरित्राचे जो श्रवण करतो, त्याला परम गती प्राप्त होते. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे किर्तन होते, ते कर्म सफल होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा सांधूना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. हात जोडून गद्गगद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला.
            बली म्हणाला - प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला, तेव्हा तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते, तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही, ती माझ्यासारख्या असुरावर केलीत.
            श्रीशुक म्हणतात - वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला. अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले; अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वत: उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की, माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली.
            प्रल्हाद म्हणाले - प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्ष्मी आणि शंकरांनासुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला ? अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात, तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. हे शरणागतवत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मत:च दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्णदृष्टी कशी काय वळली ? आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळताखेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता !
            श्रीभगवान म्हणाले - बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जातिबांधवांना सुखी कर. तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहील्याकारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील.
श्रीशुक म्हणतात - राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्धबुद्धी प्रल्हादांनी 'ठीक' असे म्हणून हात जोडून, भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले. ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल, ती आपण पूर्ण करावी. कारण कर्म करण्यात जी उणीव राहाते, ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ५

श्री गणेशाय नमः श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो, त्याचे धन हिरावून घेतो, कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो, तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो, आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्यशरीर प्राप्त करतो, त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही, तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे, असे समजावे. सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणाऱ्या मला जे शरण येतात, ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पादन करणाऱ्या कारणांमुळे मोहित होत नाहीत. हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशांमध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढविणारा आहे अतिशय कठीण आहे. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे, त्यामुळे वर यांनी विजय मिळवला आहे. त्या मायेवर याने विजय मिळविला आहे. तू पाहतच आहेस की, एवढे दुःख भोगूनसुद्धा हा खचला नाही. याचे धन हिरावून घेतले, राजपदावरून याला दूर केले, याची निंदा केली, शत्रूंनी बांधले, बांधव सोडून निघून गेले, इतके याला कष्ट भोगावे लागले. एवढेच काय, गुरुदेवांनी निर्भर्त्सना करून शापसुद्धा दिला. शिवाय मी याला उपहासाने बोललो.पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही. म्हणून मोठमोठ्या दैवतांनासुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही, ते स्थान मी त्याला दिले आहे. सावर्णी मंन्वन्तरामध्ये हा माझा परम भक्त इंद्र होईल. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनविलेल्या सुतल लोकामध्ये राहील. तेथे राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा,ग्लानी, शत्रूकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. महाराज इंद्रसेन, तुझे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह, स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात, त्या सुतल लोकात जा. मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाहीत. मग इतरांची काय कथा ! जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील, त्यांचा माझे चक्र नाश करील. तुझे, तुझ्या अनुयायांचे आणि (तुझ्या) भोगसामग्रीचे सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन. वीर बली, तु मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहाशील. दानव आणि दैत्यांच्या संसार्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल, तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ४

श्री गणेशाय नमः ब्रह्मदेव म्हणाले - समस्त प्राण्यांना जीवन देणारे, त्यांचे स्वामी आणि जगत्स्वरूप देवाधिदेवा, आता आपण याला सोडून द्यावे. आपण याचे सर्वस्व हरण केले आहे. म्हणून आता ह्याला बांधणे योग्य नाही. याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळवलेले स्वर्ग इत्यादी लोक, आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय, असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली. प्रभो, जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्ध्य देतो आणि फक्त दुर्वादलानेसुद्धा आपली खरीखुरी पूजा करतो, त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त होते. असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने, धैर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे. मग ह्याला दुःख का व्हावे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ३

श्री गणेशाय नमःविंध्यावली म्हणाली - प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केले. जे लोक निर्बुद्ध आहेत, तेच स्वतःला याचा स्वामी माणतात. आपणच याचे उत्त्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असूनही तुमच्यामुळेच स्वत:ला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार ? ( असल्यापासून वाचण्यासाठी तिसरे पाऊल ठेवण्याकरता तुमच्‍याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो, हे बलीचे म्हणणे निर्लज्जपणाचे आहे.)
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः प्रल्हाद म्हणाले - प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले, हेच चांगले झाले. ही आपण याच्यावर फार मोठी कृपा केलीत, असेच मला वाटते. आत्म्याला मोहित करणाऱ्या राज्यलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत. लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला चांगल्या तऱ्हेने कोण जाणू शकेल ? सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला- श्रीनारायणदेवांना मी नमस्कार करतो.
        श्रीशुक म्हणतात - राजा, प्रल्हाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवानांना काही सांगू इच्छित होते. हे राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्‍नी विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून, भयभीत होऊन, भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमीनीकडे पाहात ती भगवंतांना म्हणाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने तो म्हणाला.
बली म्हणाला - हे पवित्रकीर्ती देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवितो, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही. दारिद्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही. जितका मी माझ्या अपकीर्तीला भितो. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे. कारण तसा दंड माता, पिता, भाऊ आणि सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परम गुरु आहात. कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता,बल, इत्यादींच्या मदाने आंधळे होतो, तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यांत अंजन घालता. आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात, तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणार्‍या पुष्‍कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे. अशा ज्यांच्या आनंद लीला आहेत, त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरूनपाशाने बांधले. याबद्दल मला लज्जा वाटत नाही की, कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. प्रभो, माझे आजोबा प्रल्हाद यांची किर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्यकशिपू याने त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले. परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली. त्यांनी विचार केला की, हे शरीर घेऊन काय करावयाचे आहे ? हे तर एक-ना-एक दिवस आपली साथ सोडणारच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत, त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे ? पत्नीपासून सुद्धा कोणता लाभ ? ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे. मरणार तर आहोतच; मग घराचा मोह कशाला ? या सर्व वस्तुत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणेच होय. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी, संत श्रेष्ठ प्रल्हाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरणकमलांना शरण गेले. खरे तर, आपण लौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात, हे ते जाणत होते. तसे पाहू गेले असता आपण माझेसुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राजलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले आहे, हे त्याला समजत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रिय भक्त प्रल्हाद तिथे येऊन पोहोचले. बलीने पाहीले की, आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकर्ण आणि हात लांबसडक आहेत. ते सुंदर आणि उंच आहेत. तसेच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पीतांबर धारण केला आहे. बली यावेळी वरूणापाशीमध्ये बांधलेला होता; म्हणून प्रल्हाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे, तशी पूजा करू शकला नाही, म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. लाजून त्याने मान खाली घातली. केवळ मस्तक लववून त्याने त्यांना नमस्कार केला. प्रल्हादांनी पाहिले की, भक्तवत्सल भगवान तेथेच उभे आहेत आणि सुनंद, नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत. प्रल्हादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलंकित झाले, डोळ्यात अश्रू उभे राहिले. आनंदपूर्ण हृदयाने, मस्तक हलवून, ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी पाहिले की, दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत, तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले. नंद, सुनंद, जय,विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष, विष्वकसेन, गरुड, जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत आणि सात्वत हे दहा दहा हजार हत्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले. ते पार्षद आपल्या सैन्यात सैनिकांना मारीत आहेत आणि तेही संतापलेले आहेत, असे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवूण त्यांना युद्धापासून परावृत केले. त्याने विप्रचित्ती, राहू, नेमी, या दैत्यांना संबोधून म्हटले," माझे म्हणणे ऐका. लढाई करू नका. परत फिरा. आम्हांला ही वेळ अनुकूल नाही. दैत्यांनो, जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो, त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे. जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता, तोच भगवान काल आता यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे.बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि साम इत्यादी उपाय, यांपैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही. जेव्हा देव अनुकूल होते, तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते. पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत. दैव अनुकूल झाले, तर आम्हीसुद्धा यांना जिंकू. म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळीची वाट पहा. "
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्यसेनापती रसातळाला निघून गेले. हे गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षिराज गरुडाने वरुणाच्या पाशांणी बलीला बांधले. त्यादिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते. जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले, तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व देशांमध्ये हाहाकार उडाला. जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता, जरी त्याची संपत्ती गेली होती, तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळी भगवान बलीला म्हणाले, "हे असुरा, तू मला तीन पावले जमीन दिली होतीस. दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले, आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर. जीथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात, जीथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात, आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात, तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या अधिपत्याखाली होती. तुझ्यादेखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश व दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वर्लोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे. तू जी प्रतिज्ञा केली होतीस, ती पूरी केल्याकारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल. तुझ्या गुरुची तर या बाबतीत संमती आहेच. म्हणून आता तू नरकात प्रवेश कर.
जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशाप्रकारे त्याला फसवतो, त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात. स्वर्गाची गोष्ट तर दूरच; पण त्याला नरकात पडावे लागते. मी मोठा संपत्तीमान आहे, या गोष्टीचा तुला फार गर्व होता. तू मला 'देतो' म्हणून सांगून फसवलेस. असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षपर्यंत नरकयातना भोग.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून, त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. वेद, उपवेद, नियम,यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराणसंहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्मफळ भस्म करून टाकला, ते महात्मे,याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकात पोहोचले होते ते, अशा सर्वांनी भगवंताची चरणांना वंदन केले. भगवंतांच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तीभावाने त्यांची स्तुती केली. परीक्षिता, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय. जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाला, दिव्य सुगंधयुक्‍त उटी, सुगंधित धूप, दीप,लाह्या, अक्षता, फळे, अंकुर, भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जयजयकार, मृत्य, वाद्ये, गाणी, शंखनाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. त्यावेळी ऋक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व देशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली.
            दैत्यांनी पाहिले की, तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणार्‍या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली. त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले." अरे हा सामान्य ब्राह्मण नाही. हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णु आहे. ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले, तेव्हा या शत्रूने ब्रह्मचाऱ्याचा वेष धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर (मात्र) आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत. शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसेच ते ब्राह्मणभक्त असून दयाळू आहेत. म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे, हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे." असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली. परीक्षिता, बलीची इच्छा नसतानासुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल, पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुनात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशू, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह, त्या समस्त ऐश्वर्याचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंत:करण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंजऱ्यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्ण, वस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी सात समुद्र आणि वक्ष:स्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्ष:स्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यांत सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरूण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हस्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषिगण पाहिले. अशा रीतीने वीर बलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले.
परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांच्यामध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शार्ड्धनुष्य, ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार शंभर चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहीत सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले. त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुकुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्नजडित कमरपट्ट्यसह पितांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर्लोक, आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - २

श्री गणेशाय नमः सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे,परंतु खोटे बोलणाऱ्या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होत नाही. " ब्राह्मणांना बसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो, तेवढा नरकाला, दारिऱ्याला, दुःखाच्या समुद्राला, राजाच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही. मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादि ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात, त्यांच्याद्वारा दान इत्यादी देऊन जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही, तर त्या त्यागापासून काय फायदा ? दधीची, शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करूनसुद्धा प्राण्यांचे भले केले आहे. तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे ? हे ब्रह्मण, यापूर्वी ज्या दैत्यराज्यांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्यांचा इहलोक-परलोक तर काळाने खाऊन टाकला; परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले. गुरुदेव, युध्दात पाठ न दाखविता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत; परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रध्देने दान करतात, असे लोक मात्र दुर्लभ आहेत. जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल, तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मग यांच्यासारख्या ब्रह्मवेत्त्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले ? म्हणून मी या ब्रह्मचाऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करीन. हे महर्षे, वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात, ते वरदानी विष्णूच या रूपाने असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन. माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले, तरीसुद्धा मी यांना विरोध करणार नाही. कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन यांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे. जर हे पवित्रकीर्ती भगवान विष्णूच असतील, तर यश मिळविल्याखेरीज राहाणार नाहीत. युद्धात मला मारूनसुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील, तर युद्धात माझ्याकडून मारले जातील.
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेमुळे सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु श्रद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या शिष्याला शाप दिला. "मूर्खा, तू स्वतःला मोठा पंडित समजतोस ! गर्विष्ठ अशा तु माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस. म्हणून लवकरच तुझे ऐश्वर्य नाहीसे होईल. " आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतरसुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळाला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरविले. त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्नी विंध्यावली तेथे आली. तिने चरणप्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. बलीने मोठ्या आनंदाने स्वतःते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. त्यावेळी आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्याच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले. एकाच वेळी हजारो दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, कींपुरुष आणि किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले, हे केवढे कठीण काम केले बरे !
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - राजन, कुलगुरु शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले, तेव्हा आदर्श गृहस्थ, राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला.
बली म्हणाला - भगवन, आपले म्हणणे खरे आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की, ज्यामुळे अर्थ, काम, यश आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. परंतु गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे. म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे "मी तुला देणार नाही" असे या ब्राह्मणाला कसे सांगू ? या पृथ्वीने म्हटले आहे की, " असत्याहून मोठा असा कोणताच धर्म नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी असे म्हटल्यावर बळीराजाला हसू आले. तो म्हणाला, "ठीक आहे. तुझी इच्छा असेल, तेवढेच घे." असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्यांनी झारी हातात घेतली. ज्ञानी शुक्राचार्यांना सर्वकाही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांना जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले.
शुक्राचार्य म्हणाले- विरोचनकुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. आपले सर्वस्व जाईल, हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचाऱ्याचे रूप घेतले आहे. हे तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि किर्ती, तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. हे विश्वरूप आहेत. तीन पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मुर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल? हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे राहील? प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल; कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. जे दान दिल्यानंतर जीवननिर्वाहासाठी काही उरत नाही, ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाहीत. ज्यांचा जीवन निर्वाह योग्य तऱ्हेने चालतो, तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी, अशा पाच कारणांसाठी विभागतो, तोच इह-परलोकी सुख मिळवितो. हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो, ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे, हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फुल, फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फुल, फळ कसे राहणार? असते हेच शरीररुपी वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तत्काळ नष्ट होईल, यात शंका नाही. "हां, मी देईन" हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणारा होय. याच कारणास्तव, जो पुरुष "हां, मी देईन" असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. तो मागणाऱ्याला सर्वकाही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काहीच शिल्लक ठेवू शकत नाही. याच्या उलट, "मी देणार नाही" हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. स्त्रियांना वश करण्यासाठी, हास्यविनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राण संकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - २

श्री गणेशाय नमः हिरण्यकशिपूने त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. यामुळे चिडून तो आरडाओरडा करू लागला. त्या वीराने पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, पाताळ आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले, परंतु त्याला ते कुठेच दिसले नाहीत. ते कोठेच नाहीत. असे पाहून तो म्हणू लागला, "मी सर्व जग पिंजून काढले, परंतु तो सापडला नाही. माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच, जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही, अशा लोकी निघून गेला असावा. बस ! आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण वैर देहाबरोबरच संपते. क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो. राजा, तुझा पिता प्रल्हादनंदन विरोचन फार मोठा ब्राह्मणभक्त होता. इतका की, त्याचे शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेष घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले. ज्या धर्माचे, गृहस्थ, ब्राह्मण, आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन केले, त्याच धर्माचे तुम्ही आचरण करीत आहात. हे दैत्येंद्रा, मागितलेली वस्तू देणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात. म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तीन पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे. हे राजन, आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात. तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक काही नको. कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकतेइतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही.
बली म्हणाला - ब्राह्मणकुमारा, तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे; परंतु तुझी बुद्धी अजून लहान मुलासारखीच आहे. अजून तू लहान आहेस ना ?म्हणून आपला फायदा-तोटा तुला समजत नाही. मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो. जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त तीन पावले भूमी मागतो, त्याला बुद्धिमान म्हणावे काय ? हे ब्रह्मचारी,जो एक वेळ माझ्याकडे आला, त्याला पुन्हा कधी कोणाकडून ही काही मागण्याची आवश्यकता वाटता कामा नये. म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुला जेवढ्या भुमीची आवश्यकता असेल, तेवढी माझ्याकडुन मागून घे.
श्रीभगवान म्हणाले - राजन, मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल, तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय विषयही त्याच्या कामना पूर्ण करू शकत नाहीत. जो तीन पावले भूमीने संतुष्ट होत नाही, त्याला नऊ वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही; कारण सातही द्वीपे मिळविण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहातेच. मी असे ऐकले आहे की, पृथू, गय इत्यादी राजे सातही द्वीपांचे अधिपती होते. परंतु इतके धन आणि भोग मिळूनसुद्धा त्यांचा लोभ संपला नाही. मिळेल त्यातच संतुष्ट राहाणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो. परंतु इंद्रियांना काबूत न ठेवणारा, तिन्ही लोकांचे राज्य मिळूनसुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो. धन आणि भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकविण्यास कारणीभूत आहे. पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते. जो ब्राह्मण, दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो, त्याच्या तेजाची वृद्धी होते. तो असंतुष्ट राहिला तर असे पाण्यामुळे अग्नी शांत होतो, तसे त्याचे तेज नाहीसे होते. म्हणून वर देणाऱ्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त तीन पावले भूमीच मागतो. तेवढ्यानेच माझे काम भागेल कारण आवश्यकतेइतकेच धन जवळ बाळगावे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते. ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचे अभिनंदन करून म्हटले.
श्रीभगवान म्हणाले - राजन, आपण जे काही म्हणालात, ते आपल्या कुलपरंपरेला अनुरुप, धर्मपूर्ण, यश वाढविणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलोकी हितकर असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रमाण मानता. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परम शांत प्रल्हाद त्यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण म्हणता. आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजूष पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली, असाही कोणी झाला नाही. याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. आपल्या कुळातच हिरण्याक्षासारख्या वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही. जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढीत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळविला. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकूनसुद्धा आपला विजय झाला, असे ते समजत नव्हते.हिरण्यकशिपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. हिरण्यकशिपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे, असे पाहून वेळकाळ जाणणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यु, त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जाईन, तेथे तेथे हा माझा पिच्छा पुरवील. म्हणून आपण ह्याच्या हृदयात प्रवेश करावा. त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही. कारण तो बहिर्मुख आहे. हे असुरशिरोमणे, ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांच्यावर झडप घालीत होता, त्याच वेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनविले आणि ते त्याच्या श्वासांत लपून नाकातून हृदयात जाऊन बसले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - २

श्री गणेशाय नमः त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्‍वमेध यज्ञ करीत आहे, असे ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावलापावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. नर्मदा नदीच्या उत्तर तटावर 'भृगुकच्छ' नावाचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथेच भृगुवंशी ऋत्विज बळीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले, तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला, असे वाटले. परीक्षिता, वामनांच्या तेजाने ऋत्विज, यजमान आणि सभासद असे सगळेच निस्तेज झाले. ते विचार करू लागले की, यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनत्कुमार तर येत नाहीत ना ? शिष्यांसह भृगू याप्रकारे अनेक कल्पना करीत होते, त्याचवेळी हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. त्यांच्या कमरेला मुंजाची मेखला, गळ्यात जानवे, मृगाजिन आणि मस्तकावर जटा होत्या. अशा प्रकारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह, त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले. ते सर्वजण अग्निसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले. भगवंतांच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहानलहान, अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते. त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले. नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पादप्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांनासुद्धा अत्यंत मनोहर वाटणाऱ्या त्यांची पूजा केली. देवाधिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते, तेच अत्यंत मंगल, लोकांचे पाप-ताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले.
बली म्हणाला - हे ब्राह्मणकुमार, आपले स्वागत असो. आपणांस मी नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ? आर्य, असे वाटते की, आज ब्रह्यर्षीची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला. हे ब्राह्मणकुमार, आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली. विधिपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्षाने पृथ्वीही पवित्र झाली. हे सर्वपूज्य ब्राह्मणकुमार, असे वाटते की, आपण काही मागण्यासाठी आला आहात. आपल्याला गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेले घर, पवित्र अन्न, पाणी किंवा ब्राह्मणकन्या, संपत्तींनी भरलेले गाव, घोडे, हत्ती, रथ, असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्यूरहित पीतांबरधारी भगवान अदीतीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्षण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीच झळकत होती. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिहृ, हातांमध्ये कडी, भुजांमध्ये बाजूबंद, मस्तकावर किरीट, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतु एकाच वेळी आपापले गुण प्रकट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पवित्र या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला.
            ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. परीक्षिता, ज्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला होता, तिला "विजयाद्वादशी" असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळी शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुताऱ्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनू, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू-गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्यांच्याबरोबर त्यांनी अदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला.
जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनीसुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून, आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला. भगवान स्वत: अव्यक्त आणि चित्स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते,त्या शरीराने, कश्यप आणि अदितींच्या समोरच जसा नट आपला वेष बदलतो, त्याप्रमाणे बटुवेषधारी ब्रह्मचाऱ्याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे.
            त्या वामन ब्राह्मचाऱ्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार करविले. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला, तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. पृथ्वीने कृष्णाजिन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता अदितीने कौपीन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तऋर्षीनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली. अशा रितीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला, तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती, जगज्जननी, साक्षात भगवती पार्वतीदेवींनी भिक्षा घातली. अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटूवेषधारी भगवंतांचा सन्मान केला, तेव्हा ते ब्रह्मर्षिनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. यानंतर भगवंतांनी, स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सतरावा भाग - २

श्रीभगवान म्हणाले - हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे. तुझी अशी इच्छा आहे की. आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे. तुझी अशीसुद्धा इच्छा आहे की, तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील, तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे. अदिती, तुला असेही वाटते की, तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत. त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. परंतु देवी, त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही, असे मला निश्चितपणे वाटते. कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही. तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे, म्हणून मला यासंबंधी काही-ना-काही विचार करावाच लागेल. कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधीपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुति केली आहेस. म्हणून मी अंशरूपाने कश्यपच्या तपश्र्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानाचे रक्षण करीन. कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पाहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील, तितके ते अधिक सफल होते.
श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत. ही दुर्मिळ गोष्ट जाणुन कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्यदृष्टी कश्यपांनी समाधियोगाने जाणले की, भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायु जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठविलेले तेज अदितीमध्ये स्थापन केले. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत. तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तींच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्राह्मण्यदेवा, त्रिगुणांच्या नियामका, आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो. प्रश्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या, वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभो, आपणच सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे. जीवांच्या अंत:करणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो. प्रभो, आपणच संसाराचे आदि अंत आणि मध्य आहात. म्हणूनच वेद अनंतशक्ती पुरूषाच्या रूपात आपले वर्णन करतात. जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो, त्याप्रमाणे आपणसुद्धा कालरुपाने हे विश्व स्वतः बरोबर वाहून नेता. आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींनासुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवाधिदेवा, जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या दैवतांना केवळ आपलाच आधार आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सतरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरुप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्णरूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रकट झाले. परीक्षिता, त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांना चार हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून अदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेम विवाहृळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. नंतर उठून, हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापु लागले, त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती, लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहात होती. नंतर मोठ्या प्रेमाने, गद्गगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करु लागली.
अदिती म्हणाली - आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तनाचे श्रवणसुद्धा संसार तरुण नेणारे आहे. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो, त्याची सर्व संकटे आपण दूर करता. भगवन, आपण दीनांचे स्वामी आहात. आपण आमचे कल्याण करावे. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात. तसेच विश्वरूपसुद्धा आपणच आहात. अनंत असूनसुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता. आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता. नित्यनिरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहाता. भगवन, मी आपल्याला नमस्कार करते. हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता, तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्यांच्याचसारखे दिव्य शरीर, प्रत्येक इच्छित वस्तू, पुष्कळ धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, योगाच्या सर्व सिद्धि, धर्म, अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते. असे असता शत्रूंवर विजय मिळविणे यासारख्या ज्या लहासहान कामना आहेत, त्यासंबंधी काय सांगावे ?
श्रीशुक म्हणतात - राजन, अदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली. तेव्हा, सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - ३

श्री गणेशाय नमः भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मणभोजन हेही केले पाहिजे. अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवसापर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मणभोजन घालावे.
            फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून तीन वेळा स्नान करावे. खोटे बोलू नये. लहानमोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंतांच्या आराधनेतच एकाग्र असावे. त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या कडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृतस्नान घालावे. त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी. अत्यंत एकाग्र चित्ताने, त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गाई इत्यादी दान करून संतुष्ट करावे. हीसुद्धा भगवंतांचीच आराधना होय.प्रिये, आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा घ्यावी. तसेच अंत्यजादी कोणी आल्यास त्याला किंवा दीनदुबळे, आंधळे-पांगळे यांना अन्न-वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले, असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत्कथा यांच्यायोग्य भगवंतांचे पूजन करावे.
ही भगवंतांची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव "पयोव्रत" असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जसे सांगितले होते. तसेच मी तुला सांगितले. हे भाग्यवंती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून, शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर आणि याद्वारा अविनाशी भगवंतांची आराधना कर. कल्याणी, हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे; म्हणून याचे नाव 'सर्वयज्ञ' आणि 'सर्वव्रत' असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात, तेच खरे नियम होत. तेच उत्तम यम आहेत. तेच वास्तविक तपच्श्रर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तु या व्रताचे अनुष्ठान कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - २

श्री गणेशाय नमः अदितीने विचारले - भगवन, जगदीश्वर भगवंतांची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की, ज्यामुळे ते सत्यसंकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील. हे ब्राह्मणश्रेष्ठ, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे. ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील, तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा.
            कश्यप म्हणाले - संतान असावे असे मला जेव्हा वाटले, तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले, तेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्लपक्षात बारा दिवसापर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि परम भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावास्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. "हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो ! तू माझी पापे नष्ट कर. " यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्त्ती, पूजास्थल, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी पूजा स्थल सूर्य किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. (प्रथम पुढील नऊ मंत्रांनी आवाहन करावे.) हे प्रभो, आपण सर्वशक्तीमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात; म्हणूनच आपणास "वासुदेव" म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सुक्षम आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण चोवीस गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याची प्रायणीय आणि उदयनीय करणे ही दोन कर्मे ही मस्तके आहेत. प्राप्त:काळ मध्याहृकाळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत. चार वेद शिंगे आहेत. गायत्री इत्यादी सात छंद सात हात आहेत, असे तिन्ही वेदांनी सांगितलेले, फल देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्वशक्तिसंपन, सर्व विद्यांचे अधिपती आणि भुतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नर-नारायण ऋषीच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात, आपणास माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात; वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीवमात्राला वरणीय आहात. म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होवोत.भगवान हृषीकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध,धूप इत्यादी अर्पण करून व्दादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी‌. ऐपत असेल तर दुधात शिजविलेल्या आणि तूप-गूळ घातलेल्या साळीच्या तांदळांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे. तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वत: खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंतांचे स्तवन करावे. प्रदक्षिना घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचे पूजन करावे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला, त्यावेळी देवमाता अदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसांनंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली, तेव्हा ते अदितिच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की, तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तिथे जाऊन आसनावर बसले, तेव्हा अदितिने विधिपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले. "कल्याणी, या वेळी जगात ब्राह्मणांवर काही संकट तर आलेले नाही ना ? धर्म बुडाला नाही ना ? स्वच्छंद वागणाऱ्या मृत्यूचे लोकांना भय नाही ना ? प्रिय, जे लोक योगसाधना करू शकत नाहीत, त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणार आहे. त्या गृहस्थाश्रमींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना ? (किंवा) तू कुटुंबाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करता ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील, म्हणून तर तू उदास नाहीस ना ? आलेल्या अतिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊनसुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात, ती घरी निश्चितच कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे आहेत. प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल, म्हणून तू वेळेवर हविष्याने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का ? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंतांचे मूख आहेत. गृहस्थाने जर या दोन्हींचे पूजन केले, तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानिनी, तुझ्या बर्‍याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना ?
आदिती म्हणाली - हे गृहस्थाश्रमी ब्रह्मण ! ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तिस्थान आहे. हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे आग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात, तेव्हा माझ्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही ? हे मरीचीपुत्र ! सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने, तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता. तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहाण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे, अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढली आहे. त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की, माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील.
श्रीशुक म्हणतात - अदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली, तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य ! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यानी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा ? कोणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही ही बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्ताचे दुःख दूर करणाऱ्या, जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ती कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः देवांगनांच्या केसांच्या अंबाड्यातून गळून पडलेल्या ताज्या सुगंधी फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद हवा तेथील रस्त्यांवरून वाहत असते. सोनेरी खिडक्‍यांमधून अगुरूचा सुगंधी सफेद धूर बाहेर पडून तेथील मार्ग झाकोळून टाकतो. त्याच मार्गावरून देवांगना ये-जा करतात. मोत्यांच्या झालरींनी सजविलेले चांदवे जागोजागी लावलेले असतात. सोन्याच्या मणिमय पताका फडकत असतात. गच्च्यांवर अनेक प्रकारचे झेंडे फडकत असतात. मोर, कबुतरे आणि भुंगे गायन करीत असतात. देवांगणा गात असलेल्या मधुर संगीताने तेथे नेहमीच मंगलमय वातावरण असते. मृदंग, शंख, नगारे, ढोल, वीणा, बासरी,टाळ, ऋष्टी, ढोलकी इत्यादी वाद्ये वाजत असतात. वाद्यांच्या साथीवर गंधर्व गायन करतात आणि अप्सरा नाच करतात. त्यामुळे अमरावती जणू सौंदर्यदेवतेलाही जिंकून घेते. अधर्माने वागणारे, दुष्ट, जीवांचा द्रोह करणारे, लबाड, अहंकारी, कामी आणि लोभी त्या नगरीत जाऊ शकत नाहीत. हे दोष ज्यांच्या अंगी असतील तेच तिथे जातात. असुरांचा सेनापती असणाऱ्या बलीने आपल्या सेनेने बाहेरच्या सर्व बाजूंनी अमरावतीला घेरले आणि इंद्रपत्न्यांच्या मनात भीती निर्माण करीत शुक्राचार्यांनी दिलेला प्रचंड आवाजाचा शंक वाजविला.
बलीने युध्दाची मोठी तयारी केली आहे. हे पाहून इंद्र सर्व देवांसह आपले गुरू बृहस्पती यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला. भगवन, माझा जुना शत्रू बली याने यावेळी युद्धाची जय्यत तयारी केली आहे. आम्ही त्याच्याशी सामना करू शकणार नाही, असे मला वाटते. कोणत्या शक्तीमुळे त्याचे सामर्थ्य एवढे वाढले आहे, ते कळत नाही. मला वाटते, यावेळी बलीला कोणीच, कोणत्याही प्रकारे रोखू शकणार नाही. प्रलयकालच्या आगीप्रमाणे तो वाढला आहे.तो तोंडाने हे विश्व गिळून टाकील. जिभांनी दाही दिशा चाटील आणि डोळ्यांतील ज्वालांनी दिशा भस्म करुन टाकील, असे वाटते. माझ्या शत्रूच्या अजिंक्य सामर्थ्याचे कारण काय ? त्याचे शरीर, मन आणि इंद्रिये यांच्यामध्ये इतके बळ आणि इतके तेज कोठून आले आहे की, ज्यामुळे याने एवढी मोठी तयारी करून चढाई केली आहे, ते आपण मला सांगा.
देवगुरु म्हणाले - इंद्रा, तुझ्या शत्रूच्या उन्नतीचे कारण मी जाणतो. ब्रह्मवादी भृगुवंशीयांनी आपला शिष्य असलेल्या बलीला हे तेज दिले आहे. ज्याप्रमाणे सर्वशक्तिमान भगवंतांखेरीज तू किंवा तुझ्यासारखा आणखी कोणीही बलीच्या समोर उभा राहू शकणार नाही. म्हणून शत्रूचे भाग्यचक्र उलटेपर्यंत, तुम्ही स्वर्ग सोडून कुठेतरी लपून बसा आणि अनुकूल वेळेची वाट पाहा. ब्राह्मणांच्या तेजामुळे यावेळी बलीची उत्तरोत्तर वृद्धी होऊ लागली आहे. तो जेव्हा त्याच ब्राह्मणांचा तिरस्कार करीत, तेव्हा परिवारासह नष्ट होईल. देवांचे हित जाणणाऱ्या बृहस्पतीने देवांना जेव्हा हा योग्य सल्ला दिला, तेव्हा ते स्वच्छेनुसार रूप धारण करून स्वर्ग सोडून निघून गेले. देव लपून राहिल्यानंतर वीरोचनपुत्र बलीने अमरावती पुरीवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि तिन्ही लोक जिंकले. बली जेव्हा विश्वविजयी झाला. तेव्हा शिष्यप्रेमी भृगूंनी आपल्या शिष्यांकरवी शंभर अश्वमेध यज्ञ करविले.त्या यज्ञांच्या प्रभावामुळे बलीची तिन्ही लोकांत प्रसिद्ध कीर्ती, दाही दिशांना पसरली आणि तो नक्षत्रांचा राजा चंद्राप्रमाणे शोभू लागला. ब्राह्मणदेवतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या समृद्ध राज्यलक्ष्मीचा तो महात्मा उपभोग घेऊ लागला आणि स्वत:ला कृत्यकृत्य मानू लागला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत; तर मग त्यांनी दरिद्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली ? शिवाय ती मिळाल्यावरसुद्धा त्यांनी बलीला का बांधले ? माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहल आहे. पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले, ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
            श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळविण्याची इच्छा करणार्‍या बलीला त्यांनी महाभिषेकविधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजीत नावाचा यज्ञ करविला. हविर्द्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामुग्री मिळवून त्यांच्याचकरवी स्वस्तिवाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदिक्षणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला. नंतर तो बली, भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून, धनुष्य, तलवार, बाणांचे बाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा, तसा शोभला. त्याच्याबरोबर त्याच्यासारखे ऐश्वर्य,बल आणि सामर्थ्य असणारे दैत्यसेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली.
            अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती. त्यांमध्ये पक्षांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत. कोवळी पालवी आणि फळा-फुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असत. तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत. देवांना प्रिय अशा देवांगणा तेथेच जलक्रीडा करीत असत. ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत. तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिकमण्यांची गोपुरे आहेत. ती मोठमोठे, वेगवेगळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्माने त्या नगरीची निर्मिती केली आहे. संभास्थाने, ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे. दहा कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मढविलेले मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत. तेथील स्त्रिया नेहमी षोडषवर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते. त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळांनी देदीप्यमान दिसतो, तशा दिसतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौदावा

श्री गणेशाय नमः राजाने म्हटले - भगवन, हे मनू इत्यादी आपापल्या मन्वन्तरांमध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात, ते मला सांगा.
            श्रीशुक म्हणाले - परीक्षिता ! मनू, मनुपुत्र, सप्तर्षी, इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत. राजन, भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले, त्यांच्याच प्रेरणेने मनू इत्यादी विश्वाचे व्यवहार चालवतात. चारी युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो, तेव्हा ऋषी आपल्या तपश्र्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात. त्यांच्यामुळेच सनातनधर्माचे रक्षण होते. राजन, भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मन्वन्तरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात. संपूर्ण मन्वन्तरांमध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात. पंचमहायज्ञांत ज्यांचा संबंध आहे, त्यांच्याबरोबर देव त्या त्या मन्वन्तरांमध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात. इंद्र, भगवानांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपयोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पडतो. भगवंत युगा-युगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा, ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात. ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात, राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात. नाम-रूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंतांचा महिमा गातात; परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत.
            मी तुला हा महाकल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला. इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अवांतर कल्पामध्ये चौदा मन्वन्तरे सांगितली आहेत.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी दहावा मनू होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील. भूरिषेण इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान, सुकृती, सत्व, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवाचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल. विश्र्वसृजाची पत्नी विषूचीपासून भगवान विष्वक्सेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील.
अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी अकरावे मनू होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील.
परीक्षिता, रुद्रसावर्णी बारावा मनू होईल. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्या मन्वन्तरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, आग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. सत्यसहाची पत्नी सुनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मन्वन्तराचे पालन करतील.
परम जितेंद्रिय देवसावर्णी तेरावा मनू होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगन होतील. तसेच इंद्राचे नाव दिवस्पती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील. देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवस्पतीला इंद्रपद देतील.
इंद्रसावर्णी चौदावा मनू होईल. उरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी पवित्र, चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. त्या वेळी सत्रायणाची पत्नी वितानापासून बृहध्दानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील.
परीक्षिता, ही चौदा मन्वन्तरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीन्ही कालात चालू असतात. यांच्याच द्वारे एक सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वन्तराचा सातवा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू,नभग,धृष्ट, शर्याती, नरिष्यन्त, नाभाग, दिष्ट, करूष, पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत. राजा, या मन्वन्तरात आदित्य, वसू, रुद्र, विश्वेदेव,मरुद्ण, अश्विनीकुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वन्तरामध्येसुद्धा कशापासून अधितिच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने, भगवान विष्णूंनी अवतार घेतला.
अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वन्तरांचे वर्णन ऐकविले. आता भगवंतांच्या शक्तिने युक्त अशा पुढे होणार्‍या सात मन्वन्तरांचे वर्णन करतो.
परीक्षिता, मी तुला यापूर्वीच (सहाव्या स्कंधामध्ये) सांगितले होते कि, संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्नी होत्या. काही लोक म्हणतात की, त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम,यमी आणि श्राध्ददेव अशी तीन संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनैश्र्चर आणि उपती नावाची कन्या, अशी तीन संताने झाली. तपती संवरणाची पत्नी झाली. वडवेचे पुत्र अश्‍विनीकुमार झाले. आठव्या मन्वन्तरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगन होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल.
तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते, त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचासुद्धा त्याग करून परम सिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्र्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वन्तरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहात आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सर्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील.
हे राजा, वरुणाचा पुत्र दक्षसावर्णी नववा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार,मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वन्तरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वत:ला सोडविले आणि ती वेगाने पळून गेली. शंकरसुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. कामुक हत्तिणीच्या मागे धावणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघवीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले. हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य पृथ्वीवर जिथे जिथे पडले तेथे तेथे सोन्या-चांदीच्या खाणी तयार झाल्या. नद्या, सरोवरे, पर्वत, वने, उपवने. तसेच जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आच्श्रर्य वाटले नाही. कारण भगवंतांच्या शक्तींचा अंत कोणाला लागणार आहे ? भगवंतांनी पाहिले की,भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही, तेव्हा ते पुरूषशरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरुपी मायेने पूर्णपणे मोहीत होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहीत करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांच्या निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरुपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले. " देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तु पाहिलीस ना ? मी सर्व कालांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा ? जेव्हा मी एक हजार वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद त्यांचे वर्णन करू शकत नाहीत.
श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परिक्षिता, ज्यांनी समुद्र-मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ती भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र-मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली, तेव्हा ते गुढपणे हसून शंकरांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - ज्यावेळी अमृतकलश दैत्यांच्या हाती गेला होता, तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी मी ते स्त्रीरूप धारण केले होते. हे महादेवा, आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन. परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावांना उत्तेजित करणारे आहे.
श्रीशुक म्हणतात - असे बोलता बोलताच भगवान तेथेच अंतर्धान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहोकडे पाहात तेथेच बसून राहिले. इतक्यात त्यांना एक उपवन दिसले. त्यामध्ये रंगीबेरंगी फुले आणि लालसर पालवी असलेले वृक्ष होते. त्या उपवनात एक सुंदर स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती. तिने रेशमी पैठणी परिधान केलेली असून तिच्यावर कमरपट्टा शोभत होता. चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्याने तिचे स्तन आणि त्यावरील हार हालत होते. त्यावेळी वाटत होते की, जणू त्यांच्या भाराने मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणिक सावरिती आपली पालवी सावरीत ती आपली पालवीसारखी तांबूस सुकुमार पावले टाकीत आहे. उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे, तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे. त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्ण नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत. कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालांवर झगमगत होते आणि काळे भोर केस त्यांच्यावर भुरभुरत होते. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच शोभत होता. जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत, तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरीत असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटीत असे. अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे. चेंडूने खेळता खेळता किंचित लाजत स्मित हास्य करून तिरप्या नजरेने तिने शंकरांकडे बघितले. अशा तिला पाहताच शिव स्वत:ला विसरले. ते मोहिनीकडे निरखून पाहाता पाहाता तिच्या कटाक्षांनी इतके बेभान झाले की, त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही.मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणांचे तरी भान कोठून असणार ? एकदा मोहिनीच्या हातातुन चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला. तीसुद्धा त्याच्या पाठीमागे धावली. त्यावेळी शंकर पाहात असतानाच वाऱ्याने तिची सळसळणारी साडी कमरपट्ट्यासह वर उडाली. मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयनमनोहर होते. जेथे दृष्टी पडेल, तेथे मन गुंतत असे. मोहिनीसुद्धा आपल्यावर आसक्त आहे, असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले. तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला. तिच्या हावभावांनी ते कामातुर झाले आणि पार्वती समोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्यापाठोपाठ गेले.
शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली. ती एका झाडाआडून दुसऱ्या झाडाआड जाऊन लपत होती आणि हसत होती. परंतु ती एके ठिकाणी थांबत नसे. भगवान शंकरांचे मन त्यांच्या अधीन राहिले नाही. ते कामवश झाले. म्हणून हत्ती हत्तिणीच्या पाठीमागे धावत जातो. त्याप्रमाणे तिच्या मागे मागे ते धावू लागले. वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला व तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले. हत्ती हत्तिणीला आलिंगन देतो, तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले. इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्न केला, तेव्हा तिचे केस विस्कटले.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकदेव म्हणतात - श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर बसून, समस्त भूतगणांना बरोबर घेऊन, जेथे भगवान मधुसूदन होते, तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी-शंकरांचे स्वागत केले. तेसुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले.
श्रीमहादेव म्हणाले - देवाधिदेवा, आपण विश्वव्यापी, जगदीश्वर तसेच जगत्स्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थाचे मूळ कारण, ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी अंत आणि मध्य ज्याच्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरुपाला आदी मध्य आणि अंत नाहीत, ज्यांच्यामध्ये द्रष्टा-दृश्य, भोक्ता-भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य, चिन्मात्र ब्रम्ह आपणच आहात. कल्याणी इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आशक्ती सोडून तसेच सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. आपण अमृतस्वरुप, सर्व प्राकृत गुणांपासून रहित, शोकाच्या सावलीपासूनसुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ आनंदस्वरुप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जिवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणारे आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जिवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. स्वामी, जसे अलंकाररूपाने असणारे सोने आणि मुळ सोने यांमध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत, जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खऱ्या स्वरूपाला लोकांनी न जाणल्याकारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताना गुणांमुळे भेद आहे, असे वाटते. प्रभो, काहीजण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृति आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर माणतात, तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, सत्या, ईशाना आणि अनुग्रह-या नऊ शक्तींनी युक्त परमपुरुष म्हणतात, तर दुसरे काहीजण स्वतंत्र, अविनाशी, महापुरुष माणतात, प्रभो, मी, ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी-जे सत्वगुणी सृष्टीतील आहेत, तेसुद्धा आपण बनविलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत, तर ज्यांचे चित्त मायेने मोहीत आहे, असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार ? प्रभो ! आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात. म्हणून वायुप्रमाणे आकाशात अदृश्य राहूनसुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म तसेच संसाराचे बंद-मोक्ष हे सर्व जणता. आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेला स्त्रीरूप अवतार पाहू इच्छितो. ज्याच्याद्वारे दैत्यांना मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले,ते रुप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हांला ते पाहण्याची उत्कंठा आहे.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले. म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले, तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की, " हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. याला मी वर दिला आहे की, सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ. " ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की, समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही. म्हणून इंद्राने सुकलेला, ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली. गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले, देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी, वरुणादी दुसऱ्या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात, तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले.
नारद म्हणाले - दिवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हांला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभवसंपन्नही झालात. म्हणून आता लढाई बंद करा.
श्रीशुक म्हणतात - देवांनी नारदांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करीत होते. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणाऱ्या बलीला पराजित होउनसुद्धा खेद झाला नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - २

श्री गणेशाय नमः देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमूची,बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले. आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात, त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केली. पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली. नमुचीने, सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात, त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. इंद्र कुठेच दिसत नाही, हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे, समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली. परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे,रथ,ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्राप्त:काळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश आणि पृथ्वी उजळून शोकतो, त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. परीक्षिता, त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली.
परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करू लागला. "इंद्रा, आता तू वाचत नाहीस ! "अशी आरोळी ठोकीत सैन्याच्या घंटा असलेल्या एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूल त्याने इंद्रावर फेकला. परीक्षिता, तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता, तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते, त्या वज्राला नमूचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे, ही मोठीच आच्श्रर्यकारक घटना घडली. वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही, हे पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की, " सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का ?" पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्याफिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत, तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या प्रर्वतांचे पंख तोडून टाकले होते. त्वष्ट्याच्या तपश्र्चर्येचे सार वृत्रासुररूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खरचटतही नसे, अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठविले होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - १

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते, त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागले. ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले, तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले. मुर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातचलाखीने त्यांचे धन उठून नेतो, त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस. जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात, इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरूनसुद्धा खाली ढकलून देतो. अरे मतिमंदा, आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो.
            बली म्हणाला - जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात, त्या सर्वांनाच जयपराजय, यशापयश किंवा मृत्यु क्रमाने प्राप्त होतोच. म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत. हे तुम्हांला माहीत दिसत नाही ! या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही.
            श्रीशुकदेव म्हणतात - वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारले. त्यामुळे तो थोडासा वरमला. तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले. सत्यवादी, देवशत्रू बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला. त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीच चिडला. तो पाणउतारा त्याला सहन झाला नाही. शत्रूंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला. बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासुर, आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणाऱ्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला. सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. त्याचबरोबर त्या महावलीने ऐरावतावरसुद्धा गदेचा एक तडाखा दिला. गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूच्छित होऊन पडला. त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे जुंपलेला रथ घेऊन आला. तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला. दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जळजळीत त्रिशूळ त्याच्यावर फेकला. मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले. तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडवले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...