स्कन्ध नववा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्कन्ध नववा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चोविसावा

श्री गणेशाय नमः रोमपादाचा पुत्र बभ्रू, बभ्रूचा कृती, कृतीचा उशिक आणि उशिकाचा चेदी. राजन! या चेदीच्या वंशातच शिशुपाल इत्यादी झाले. क्रथाचा पुत्र झाला कुंती. कुंतीचा धृष्टी. धृष्टीचा निवृत्ती. निवृत्तीचा दशार्ह आणि दशार्हाचा व्योम.

            व्योमाचा जीमूत, जीमूताचा विकृती, विकृतीचा भीमरथ, भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ झाला. दशरथापासून शकुनी, शकुनीपासून करंभी, करभीपासून देवराज, देवरातापासून देवक्षत्र, देवक्षत्रापासून मधू, मधूपासून कुरुवश आणि कुरूवशापासून अनू झाला. अनूपासून पुरुहोत्र, पुरूहोत्रापासून आयू आणि आयूपासून सात्वताचा जन्म झाला. परीक्षिता ! सात्वताला भजमान, भजी, दिव्य,वृण्णी,देवावृध,अंधक आणि महाभोज असे सात पुत्र झाले. भजमानाच्या दोन पत्न्या होत्या. एकीपासून निम्लोची,किंकिण आणि दृष्टी असे तीन पुत्र झाले. दुसऱ्या पत्नीपासूनसुद्धा अजित सहजासहजी आणि आयुक्त शताजित,सहस्त्राजित आणि अयुताजित असे तीन पुत्र झाले. "

            देवावृधाच्या पुत्राचे नाव बभ्रू होते. देवावृध आणि बभ्रू यांच्यासंबंधी असे म्हटले जाते की, " आम्ही लांबून जसे ऐकले होते, तसेच आता जवळून पाहात आहोत. " बभ्रू मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृध देवांच्या समान आहे. कारण बभ्रू आणि देवावृधाकडून उपदेश घेऊन चौदा हजार पासष्ट माणसांनी परमपद प्राप्त करून घेतले आहे. सात्वताच्या पुत्रांमध्ये महाभोजसुद्धा मोठा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले. परीक्षिता ! वृण्णीचे सुमित्र आणि युधाजित असे दोन पुत्र झाले. युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे दोन पुत्र होते. अनमित्रापासून निम्न जन्मला.

            याच सत्यकाचा युयुधान नावाचा पुत्र होता, तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला. सात्यकीचा जय, जयाचा कुणी आणि कुणीचा पुत्र युगंधर झाला. अनमित्राच्या तिसऱ्या पुत्राचे नाव वृण्णी होते. वृण्णीचे श्र्वफल्क आणि चित्ररथ हे दोन पुत्र होते. श्र्वफल्काच्या पत्नीचे नाव गांदिनी होते. तिला सर्वांत जेष्ठ अक्रूराव्यतिरिक्त आसंग, सारमेय, मृदुर,मृदुविद, गिरी, धर्मवृश्र्द, सुकर्मा, क्षेत्रोपेक्ष,अरिमर्दन, शत्रुघ्न, गंधमादन आणि प्रतिबाहू असे बारा पुत्र झाले. त्यांना सुचीरा नावाची एक बहीणसुद्धा होती. अक्रूराचे देवावान आणि उपदेव असे दोन पुत्र होते.श्र्वफल्काचा भाऊ चित्ररथ याला पृथू, विदूरथ इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. ते वृण्णिवंशीय होते.

            सात्वताचा पुत्र अंधक याचे कुकुर, भजमान, शुची आणि कंबलबर्ही असे चार पुत्र होते. त्यांमध्ये कुकुराचा पुत्र वह्ली, वह्लीचा विलोमा, विलोमाचा कपोतरोमा आणि कपोतरोमाचा अनू होता. अनूचा मित्र तुंबुरु. अनूचा पुत्र अंधक.अंधकाचा दुंदुभी, दुंदुभीचा अरिद्योत,अरिद्योताचा पुनर्वसु आणि पुनर्वसूचा आहुक नावाचा एक पुत्र आणि आहुकी नावाची एक कन्या होती. आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे चार पुत्र झाले.

            यांच्या धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवीकी अशा सात बहिणी होत्या. वसुदेवांनी या सर्वांशी विवाह केला होता.

            उग्रसेनाचे कंस, सुनामा, न्यग्रोध,कंक, शंकू,सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि सृष्टीमान असे नऊ पुत्र होते आणि कंसा, कंसावती, कंका,शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा पाच कन्या होत्या. त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवांच्या लहान भावांशी झाला होता.

            विदुरथापासून शूर, शूरापासून भजमान, भजमानापासून शीनी, शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून हृदीक झाले. हृदीकाला देवबाहू, शतधन्यवा आणि कृतवर्मा असे तीन पुत्र झाले. देवमीढाचा पुत्र शूर. याच्या पत्नीचे नाव मारिषा होते. शुराला तिच्यापासून वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आणक, सृंजय, श्यामक,कंक, शमीक, वत्सक आणि वृक असे दहा पुण्यवान पुत्र झाले. वसुदेवांच्या जन्माच्यावेळी देवतांचे नगारे आणि नौबती आपोआप वाजू लागल्या होत्या. म्हणून त्यांचे आनकदुंदुभी असे नाव पडले. तेच भगवान श्रीकृष्णांचे वडील. वसुदेव इत्यादींच्या पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी अशा पाच बहिणी होत्या. वसुदेवाचे वडील शूरसेन. यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता. कुंतिभोज निपुत्रिक होता, म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली.( म्हणून तिचे नाव कुंती.)

            कुंतीने दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली. एके दिवशी त्या विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासाठी तिने पवित्र होऊन (सूर्यमंत्राने) सूर्याचे आवाहन केले. त्याचवेळी सूर्यदेव तेथे आले. त्यांना पाहून कुंतीचे हृदय आश्चर्याने भरून गेले. ती म्हणाली, "भगवन ! मला क्षमा करा. मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता. आता आपण परत जावे. " सूर्यदेव म्हणाले- "देवी ! माझे दर्शन निष्फळ होऊ शकत नाही. म्हणून हे सुंदरी ! आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल. पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही, असे मी करीन. "

            असे म्हणून तिच्या उदरात गर्भ स्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेले. त्याचवेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. कुंतीने लोकनिंदेच्या भीतीने जड अंत:करणाने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडले. तिचा विवाह तुझे पणजोबा पराक्रमी पांडू यांच्याशी झाला.

            श्रुतदेवेचा विवाह करुष देशाचा राजा वृद्धशर्मा याच्याशी झाला. तिला दंतवक्र नावाचा मुलगा झाला. हाच पूर्वजन्मी सनकादिक ऋषींच्या शापामुळे हिरण्याक्ष झाला होता.केकय देशाचा राजा धृष्टकेतू याने श्रुतकीर्तीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला संतर्दन इत्यादी पाच कैकय राजकुमार झाले. राजाधिदेवीचा विवाह जयसेनाशी झाला. त्याला विंद आणि अनुविंद असे दोन पुत्र झाले. ते दोघेही अवंती नगरीचे राजे झाले. चेदिराज दमघोष याने श्रुतश्रवेचे पाणिग्रहण केले. त्याचा पुत्र होता शिशुपाल. याचे वर्णन पूर्वीच केलेले आहे. देवभागाची पत्नी कंसा. हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्वल असे दोन पुत्र झाले. देवश्रवाची पत्नी कंसवती. हिच्यापासून सुधीर आणि इषुमान नावाचे दोन पुत्र झाले. आनकाची पत्नी कंका. हिच्यापासून शत्रुजित आणि पुरुजित असे दोन पुत्र झाले. सृंजयाला पत्नी राष्ट्रपालीपासून वृष, दुर्मर्षण इत्यादी अनेक पुत्र झाले. श्यामकाला शूरभूमी नावाच्या पत्नीपासून हरिकेश आणि हिरण्याक्ष नावाचे दोन पुत्र झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. वृकाला दुर्वार्क्षीपासून तक्ष, पुष्कर, शाल इत्यादी अनेक पुत्र झाले. शमीकाला सुदामिनीपासून सुमित्र, अर्जुनपाल इत्यादी अनेक पुत्र झाले. कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे दोन पुत्र झाले.

            वसुदेवांच्या पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला, देवकी इत्यादी पत्न्या होत्या. त्यांत देवकी मुख्य होती. रोहिणीपासून वसुदेवांना बलराम,गद, सारण, दुर्मद, विपुल,ध्रुव,कृत इत्यादी पुत्र झाले होते.

            पौरवीपासून त्यांना भूत, सुभद्र, भद्रवाह, दूर्मद, भद्र इत्यादी बारा पुत्र झाले. मदिरेपासून नंद, उपनंद, कृतक, शूर इत्यादी पुत्र झाले. कौशल्येला वंशाचा दिवा असा केशी नावाचा एकच पुत्र झाला होता. त्यांना रोचनेपासून हस्त, हेमांगद इत्यादी आणि इलेपासून उरूवल्क इत्यादी प्रधान यदुवंशी पुत्र झाले. परीक्षिता ! धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतिदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत इत्यादी अनेक पुत्र झाले. उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष इत्यादी दहा राजे झाले आणि श्रीदेवेचे वसू, हंस,सुवंश इत्यादी सहा पुत्र झाले. हे राजा ! देवरक्षितेपासून गद इत्यादी नऊ पुत्र झाले. धर्माने जसा आठ वसूंना जन्म दिला, तसा वसुदेवांनी सहदेवेपासून पुरुविश्रुत इत्यादी आठ पुत्रांना जन्म दिला. वसुदेवांना देवकीपासून आठ पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेन, भद्रसेन,ऋजू, संमर्दन, भद्र, शेषावतार श्रीबलराम आणि आठवा पुत्र म्हणजे स्वत: श्रीभगवानच होते. तसेच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा हीसुद्धा वसुदेवांचीच कन्या होती.

            जगात जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि पापाची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. परिक्षिता ! भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेतः त्यांच्या आत्मस्वरूपिणी योगमायेव्यतिरिक्त त्यांचा जन्म किंवा कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही. त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म, स्थिती आणि मृत्यूला कारण आहे; आणि त्यांची कृपाच मायेचा निरास करून आत्मस्वरुप प्राप्त करून देणारी आहे. जेव्हा राजांच्या रूपांतील असूर कित्येक अक्षौहिणी सेना एकत्र करून सगळ्या पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागले, तेव्हा पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामांसह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पनासुद्धा करता येणार नाही, अशी कार्ये केली.

            त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख, शोक आणि अज्ञान नाहीसे करणाऱ्या परम पवित्र यशाचा विस्तार केला. त्यांचे यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आहे. एकदा जरी कानांच्या ओंजळींनी त्याचे आचमन केले, तरी कर्माच्या वासना समूळ नष्ट होतात. भोज,वृष्णी, अंधक, मधु, शुरसेन, दशार्ह, कुरु, सृंजय आणि पांडव नेहमी भगवंताच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करीत असत. त्यांनी आपल्या सर्वांगसुंदर शरीराने, तसेच आपल्या प्रेमळ हास्य, मधुन अंत:करण प्रसादपूर्ण वचन आणि पराक्रमपूर्ण लीलांच्या द्वारा सर्व भूलोकाला आनंदविभोर केले होते. सुंदर कानातील मकराकृती कुंडलांनी चमकणाऱ्या गालांनी शोभणारे आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाला उधाण आणणारे त्यांचे मुख्यकमल कितीही पाहून स्त्रीपुरुष तृप्त होत नसत. ते आनंदित तर होतच, परंतु पापण्यांच्या लवण्यावरही रागावत, भगवान मथुरेमध्ये वासुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले.तेथील कार्य पूर्ण केले. नंतर अनेक शत्रूंचा संहार केला. अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला. त्याचबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या वेदांची लोकांत स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतःच स्वतःचे पूजन केले. त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भाग हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली. तसेच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेनेच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजविला. नंतर उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून ते परम धामाला गेले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेविसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात -अनुला सभानर, चक्षु आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले. सभानगराचा कालनर, कालनगराचा सृजन, सृजनाचा जनमेजय, जनमेजयाचा महाशील, महाशीलाचा पुत्र महामना. महामनाला उशीनर आणि तितीक्षू असे दोन पुत्र झाले. उशीनरला शिबी, वन, शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले. शिबीला वृषादर्भ, सुवीर, मद्र आणि कैकेय असे चार पुत्र झाले. तितिक्षूला रुशद्रथ, रूशद्रथाचा हेम, हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र होता.

            राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग, वंग, कलिंग, सुह्य, पुंड्र आणि अंध्र असे सहा पुत्र उत्पन्न केले. यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसविले. अंगाचा पुत्र झाला खनपान. खनपानाचा दिविरथ, दिविरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ. हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध होता. त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली. शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनीबरोबर झाला. विभांडक ऋषींना हरणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग. रोमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही, तेव्हा गणिकांकरवी नृत्य, संगीत, वाद्ये, हाव-भाव, आलिंगन आणि विविध भेटवस्तूंनी ऋष्यशृंगाला रोमपादाने आणविले, तेव्हा पाऊस पडला. जेव्हा त्यानेच इंद्र-देवतेला उद्देशून यज्ञ केला, तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथानेसुद्धा त्याच्याचकरवी यज्ञ करवून चार पुत्र प्राप्त करून घेतले. रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष.

            पृथुलाक्षाचे बृहद्रथ, बृहत्कर्मा आणि बृहद्भानू असे तीन पुत्र झाले. बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना झाला आणि बृहन्माचा जयद्रथ. जयद्रथाच्या पत्नीचे नाव संभूती होते. तिच्यापासून विजय झाला. विजयाचा धृती, वृत्तीचा धृतव्रत, धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला.

            अधीरथाला संतान नव्हते. एके दिवशी तो गंगातटाकी विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला. कुंतीला तो कुमारी अवस्थेत झाला होता. अधीरथाने त्यालाच आपला पुत्र मानले. त्याच राजा कर्णाच्या पुत्राचे नाव वृषसेन होते. ययातीचा पुत्र द्रुह्यूपासून बभ्रूचा जन्म झाला. बभ्रुचा सेतू, सेतूचा आरब्ध, आरब्धाचा गांधार, गांधाराचा धर्म, धर्माचा धृत,धृताचा दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता होय. प्रचेताला शंभर पुत्र झाले. ते उत्तर दिशेला म्लेंच्छांचे राजे झाले. तुर्वसूचा वह्नी, वह्नीचा भर्ग, भर्गाचा भानुमान, भानुमानाचा त्रिभानू, त्रिभानूचा उदारबुद्धी करंधम आणि करंधमाचा पुत्र मरुत्त होता. मरुत्त निपुत्रिक होता, म्हणून त्याने पुरुवंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानले होते. परंतू दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला. परीक्षिता! आता मी ययातीचा जेष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो.

            यदूचा वंश परम पवित्र आणि मनुष्यांची सर्व पापे नाहीशी करणारा आहे. जो मनुष्य याचे श्रवण करेल, तू सर्व पापांपासून मुक्त होईल. या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला होता. यदूला सहस्त्रजित, क्रोष्टा, नल आणि रिपू असे चार पुत्र होते. सहस्त्रजितापासून शतजित याचा जन्म झाला. शतजिताचे महाहय, वेणुहय आणि हैहय असे तीन पुत्र होते. हैहयाचा धर्म, धर्माचा नेत्र, नेत्राचा कुंती, कुंतीचा सोहंजी, सोहंजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र होता. भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते. धनकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतवर्मा आणि कृतौजा असे चार पुत्र झाले. कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. त्याने भगवंतांचे अंशावतार श्रीदत्तात्रेय यांचेकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. स्पोर्ट टीव्ही वरील कोणताही सम्राट यज्ञ, दान, तपश्चर्या, योग, शास्त्रज्ञान, पराक्रम, विजय, इत्यादी गुणांच्या बाबतीत कार्तवीर्य अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकणार नाही. सहस्त्रबाहू अर्जुन पंचाऐंशी हजार वर्षेपर्यंत सहाही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला. या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही. त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते. त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले. जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु आणि उर्जित.

            जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालजंघ होते. तालजंघाला शंभर पुत्र झाले. त्या तालजंघ नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला. त्या शंभर पुत्रांमध्ये वितीहोत्र सर्वात थोरला होता. वितिहोत्राचा पुत्र मधू. मधूचे शंभर पुत्र होते. त्यातील सर्वात थोरला वृष्णी होता. राजा! ह्याच मधू, वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव, वार्ष्णेय आणि यादव या नावांनी प्रसिद्ध झाला. यदुनंदन क्रोष्टूच्या पुत्राचे नाव वृजिनवान होते. वृजिनवानाचा पुत्र श्वाही, श्र्वाहीचा रुशेकू, रुशेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू होते. तो परम योगी, महान भोगैश्वर्यसंपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता. तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता. परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्न्या होत्या. त्यांपैकी प्रत्येकीला एक एक लाख मुले झाली होती. अशी त्याची शंभर कोटी मुले होती. त्यांपैकी पृथुश्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते. पृथुश्रवाच्या पुत्राचे नाव धर्म होते. धर्माचा पुत्र उशना. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते. उशनाचा पुत्र रुचक. रुचकाला पाच पुत्र झाले. त्यांची नावे ऐक. पुरुजीत, रुक्म, रुक्मेषू, पृथू आणि ज्यामघ. ज्यामघाच्या पतीचे नाव शैब्या असे होते. ज्यामघाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान झाले नाही. परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाहही केला नाही. एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचे अपहरण केले. जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिले, तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली- "कपट्या! माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला बसवून आणले आहेस?" ज्यामघ म्हणाला- "ही तुझी सून आहे." शैब्या हसून पतीला म्हणाली,

            "मी तर पहिल्यापासूनच वांझ आहे आणि मला कोणी सवतही नाही. तर मग मी माझी सून कशी होईल?" ज्यामघ म्हणाला, "राणी! तुला जो पुत्र होईल, त्याची ही पत्नी होईल." राजा ज्यामेघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला. योग्यवेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे नाव विदर्भ ठेवले. त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय बाविसावा

श्री गणेशाय नमः सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला च्यवन. च्यवनाला कृती, कृतीला उपरिचरवसू आणि उपरिचरवसू बृहद्रथ इतयादी अनेक पुत्र झाले. त्यामध्ये बृहद्रथ, कुशांब, मत्स्य, प्रत्यग्र,चेदीप इत्यादी चेदिदेशाचे राजे झाले. बृहद्रथाचा पुत्र कुशाग्र होता‌. कुशाग्राचा ऋषभ,ऋषभाचा सत्यहीत, सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता. बृहद्रथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले.

            अयुताचा क्रोधन, क्रोधनाचा देवातिथी, देवातिथीचा ऋष्य, ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप. प्रतीपाचे देवापी, शंतनू आणि ब्राह्मिक असे तीन पुत्र होते. देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला. म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला. पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभिष असे होते. तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी, तो तरूण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे. याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव 'शंतनू' पडले. एकदा शंतनूच्या राज्यात बारा वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही. यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले, "तो थोरला भाऊ देवापी याच्या अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस, म्हणून तू 'परीवेत्ता' आहेस. यामुळेच तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. आता जर तुला आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे." जेव्हा ब्राह्मणाने शंतनूला असे सांगितले, तेव्हा त्याने वनात जाऊन देवापीला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतु शंतनूचा मंत्री अश्मरात याने अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठवले होते की, ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केले होते. त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला. म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला. आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. देवापी अजूनही योगसाधना करीत कलापग्रामात राहात आहे. जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील. शंतनूचा लहान भाऊ बाल्हीक याला सोमदत्त पुत्र झाला. सोमदत्तला भूरी, भूरिश्रवा आणि शल असे तीन पुत्र झाले. शंतनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला. तो सर्वधर्म जाणणाऱ्यांत अग्रगण्य भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता. तो वीरसमूहांचा अग्रगण्य नेता होता. त्याने आपले गुरु परशुराम यांनासुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाले. चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वाने मारले. शंतनूशी विवाह होण्यापूर्वी याच सत्यवतीपासून पराशरांना भगवंताचे साक्षात कलावतार, वेदसंरक्षक भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनी झाले. मी त्यांच्याकडूनच या श्रीमद्भागवत महापुराणाचे अध्ययन केले, हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे. म्हणून माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत अशा मला शिकविले. शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य याने स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला. विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला. तसेच त्याच्या दासीपासून विदूराला जन्म दिला.

            परीक्षिता! धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला शंभर पुत्र व एक कन्या झाली. त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन. कन्येचे नाव दु:शला होते. पांडूची पत्नी कुंती. शापित पांडू स्त्रीसहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी कुंती हिला यमधर्म, वायु आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे तीन पुत्र झाले. हे तिघेही महारथी होते.

            हे राजा! तुझे हे जनमेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत. तक्षक डसल्यामुळे तुझा मृत्यू झाला, हे समजल्यानंतर जनमेजय क्रोधाने सर्प-यज्ञ करून अग्निकुंडात सर्पाचे हवन करील. तो कावषेय तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करील आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञांच्या द्वारा भगवंताची आराधना करील.

            हे राजा जनमेजयाचा पुत्र शतानीक होईल. तो याज्ञवल्क्य ऋषींपासून तिन्ही वेदांचे आणि कर्मकांडाचे तसेच कृपाचार्याकडून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. शतानीकाचा सहस्त्रानीक, सहस्त्रानीकाचा अश्वमेधज, अश्वमेधजाचा असिमकृष्ण आणि असीमकृष्णाचा पुत्र नेमिचक्र होईल. जेव्हा हस्तीनापुर गंगा नदीत वाहून जाईल, तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमिचक्राचा पुत्र होईल चित्ररथ, चित्ररथाचा कवीरथ, कवीरथाचा वृष्टीमान, वृष्टीमानाचा राजा सुषेन, सुषेणाचा सुनीथ, सुनीथाचा नृचक्षू, नृचक्षूचा सुखीनल, सुखीनलाचा परीप्लव, परिप्लवाचा सुनय, सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपंजय, नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीपासून बृहद्रथ, बृहद्रथापासून सुदास, सुदासापासून शतानीक, शतानीकापासून दुर्दमन, दुर्दमनापासून वहीनर, वहीनरापासून दंडपाणी, दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल. अशाप्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्तिस्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकविले. देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल. आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजांचे वर्णन करून सांगतो.

            सहदेवापासून मार्जारी , मार्जारीपासून श्रुतश्रवा, श्रुतश्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून निरमित्र नावाचा पुत्र होईल. निरमित्राचा सुनक्षत्र,सुनक्षत्राचा बृहत्सेन, बृहत्सेनाचा कर्मजित, कर्मजिताचा सृतंजय, सृतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र शुची असेल. शुचीपासून क्षेम,क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्रापासून शम,शमापासून द्युमत्सेन, द्युमत्सेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा सुनीथ, सुनीथाचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सर्व बृहद्रथवंशाचे राजे होतील. यांचा शासनकाल एक हजार वर्षांचा असेल.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय एकविसावा

श्री गणेशाय नमः गर्गापासून शनी आणि शनीपासून गार्ग्याचा जन्म झाला. गार्ग्य जरी क्षत्रिय होता, तरीसुद्धा त्याच्यापासून ब्राह्मणवंश चालला. महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता. दुरितक्षयाचे त्रय्यारुणी, कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले. हे तिघेही ब्राह्मण झाले. बृहत्क्षत्राचा पुत्र हस्ती झाला, त्यानेच हस्तिनापुर वसविले होते. हस्तीचे अजमीढ, द्धिमीढ आणि पुरूमीढ असे तीन पुत्र होते. अजमीढाच्या पुत्रांपैकी प्रियमेध इत्यादी ब्राह्मण झाले. याच अजमीढाच्या एका पुत्राचे नाव बृहदिषू होते. बृहदिषूचा पुत्र बृहद्धनू झाला. बृहद्धनूचा बृहत्काय आणि बृहत्कायाचा जयद्रथ झाला. जयद्रथाचा पुत्र विशद आणि विशदाचा सेनजित. रुचिराश्र्व, दृढहनू, काश्य आणि वत्स असे चार पुत्र झाले. रुचिराश्र्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथुसेन. पाराच्या दुसऱ्या पुत्राचे नाव नीप असे होते. त्याचे शंभर पुत्र होते. याच निपाने शुक यांची कन्या कृत्वी हिच्याशी विवाह केला होता. तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला. ब्रह्मदत्त योगी होता. त्याला पत्नी सरस्वतीपासून विष्वकसेन नावाचा पुत्र झाला. याच विष्वकसेनाने जैगीषव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली. विष्वकसेनाचा पुत्र उदक्स्वन. उदक्स्वनाचा भल्हाद. हे सर्वजण बृहदिषूचे वंशज झाले.

            द्विमिढाचा पुत्र यविनर होता, यवीनराचा कृतीमान. कृतिमानाचा सत्यधृती, सत्यधृतीचा दृढनेमी आणि दृढनेमीचा पुत्र सुपार्श्व झाला. सुपार्श्वापासून सुमती, सुमतीपासून सन्नतिमान, सन्नतिमानापासून कृती झाला. त्याने हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि "प्राच्यसाम" नावाच्या ऋचांच्या सहा संहिता रचल्या होत्या. कृतीचा पुत्र नीप होता. नीपाचा उग्रायुध,उग्रायुधाचा क्षेम्य, क्षेम्याचा सुवीर युद्ध आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय होता. रिपुंजयाचा पुत्र बहुरथ होता. द्विमीढाचा भाऊ पुरूमीढ. याला काही संतान झाले नाही. अजमीढाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव नलिनी होते. तिच्यापासून नीलाचा जन्म झाला. नीलाचा पुत्र शांती, शांतीचा सुशांती, सुशांतीचा पुरुज, पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भर्म्याश्र्व झाला. भर्म्याश्र्वाचे मुद़ल ,यवीनर, बृहदिषू, कांपिल्य आणि संजय असे पाच पुत्र होते. भर्म्याश्र्व म्हणाला- "हे माझे पाच पुत्र पाच देशाचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत, " म्हणून हे " पंचाल" नावाने प्रसिद्ध झाले. यांच्यापैकी मुद्रलपासुन "मौद़ल्य" भाषण नावाचे ब्राह्मणगोत्र सुरू झाले.

            भर्म्याश्वाचा पुत्र मुद़ल याला जुळे झाले. त्यांपैकी पुत्राचे नाव दिवोदास आणि कन्येचे नाव अहल्या होते. अहल्येचा विवाह गौतमांशी झाला. गौतमाचा पुत्र शतानंद. शतानंदाचा पुत्र सत्यधृती होता. तो धनुर्विद्येमध्ये निपुण होता. सत्यधृतीच्या पुत्राचे नाव शरद्वान होते. एके दिवशी उर्वशीला पाहताच शारद्वानाचे वीर्य गवतावर पडले, त्यापासून एका शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला. तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनूची दृष्टी त्यांच्यावर पडली. दयाळू अंत:करणाने त्याने दोघांनाही उचलून घेतले. त्यांपैकी जो पुत्र होता, त्याचे नाव कृपाचार्य झाले आणि जी कन्या होती, तिचे नाव कृपी झाले. हीच कृपी द्रोनाचार्यांची पत्नी झाली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय विसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात-परीक्षिता! आता मी राजा पूरुच्या वंशाचे वर्णन करीन. याच वंशात तुझा जन्म झाला आहे. याच वंशातील वंशज पुष्कळसे राजर्षी आणि ब्रह्मर्षीसुद्धा झाले आहेत. पूरुचा पुत्र जनमेजय झाला. जनमेजयाचा प्रचीन्वान, प्रचीन्वानाचा प्रवीर, प्रविराचा नमस्यू आणि नमस्यूचा पुत्र चारुपद झाला. चारूपदापासून सुद्यु, सुद्यूपासून बहुगव, बहुगवापासून संयाती, संयातीपासून अहंयाती आणि अहंयातीपासून रौद्राश्व झाला.

            विश्वात्मा असलेल्या प्रधान प्राणापासून जशी दहा इंद्रिये उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे घृताची अप्सरेपासून रौद्राश्वाचे ऋतेयू, कुक्षेयू, स्थंडिलेयू, कृतेयू, जलेयू, संततेयू, धर्मेयू, सत्येयू, व्रतेयू आणि सर्वात लहान वनेयू, असे दहा पुत्र झाले.
            परीक्षिता! त्यांपैकी ऋतेयूचा पुत्र रंतिभार झाला आणि रंतिभाराचे सुमती, ध्रुव आणि अप्रतिरथ असे तीन पुत्र झाले. अप्रतिरथाच्या पुत्राचे नाव कण्व होते. कण्वाचा पुत्र मेधातिथी झाला. याच मेधातिथीपासून प्रस्कण्व इत्यादी ब्राह्मण उत्पन्न झाले. सुमतीचा पुत्र रैभ्य झाला. याच रैभ्याचा पुत्र दुष्यंत होता.

            एकदा दुष्यंत शिकारीसाठी म्हणून काही सैनिकांसह वनात गेला होता. तेथे तो कण्व मुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. त्या आश्रमात देवमायेप्रमाणे मनोहर अशी एक स्त्री बसली होती. तिच्या लक्ष्मीप्रमाणे असणाऱ्या अंगकांतीने तो आश्रम शोभत होता. त्या सुंदरीला पाहताच दुष्यंत मोहीत झाला आणि तिच्याशी वार्तालाप करू लागला. तिला पाहताच त्याला अत्यंत आनंद झाला. त्याच्या मनात कामवासना जागृत झाली. थकवा नाहीसा झाल्यानंतर अत्यंत मधुर वाणीने स्मित हास्य करीत तिला त्याने विचारले, "कमलदलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेल्या हे देवी! तू कोण आहेस आणि कुणाची कन्या आहेस? माझे हृदय आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या हे सुंदरी! या निर्जन वनात तु कशासाठी राहातेस? हे सुंदरी! मला निश्चितपणे असे वाटते की, तू कोणा क्षत्रियाची कन्या आहेस. कारण पुरुवंशीयांचे चित्त कधी अधर्माकडे झुकत नाही."

            शकुंतला म्हणाली- "आपले म्हणणे बरोबर आहे. मी विश्वामित्रांची कन्या आहे. मेनकेने मला वनांमध्ये सोडून दिले होते. महर्षी कण्वांना हे माहित आहे. मी आपली काय सेवा करू? हे कमलनयना! आपण येथे बसावे आणि आमच्याकडून आदरातिथ्य स्वीकारावे. आश्रमात अन्न आहे. आपली इच्छा असेल तर भोजन करावे. आणि योग्य वाटत असेल तर येथेच राहावे.

            "हे सुंदरी ! तू कुशिकवंशात जन्मलेली असल्याकारणाने हे आदरातिथ्य तुझ्या दृष्टीने योग्यच आहे. कारण राजकन्या स्वत:च आपल्याला योग्य असा पती वरतात. " शकुंतलेची संमती मिळाल्यानंतर देश, काल आणि शास्त्र जाणणाऱ्या दुष्यंताने गांधर्वविधीने धर्मानुसार तिच्याशी विवाह केला. अमोघवीर्य दुष्यंताने शकुंतलेशी सहवास केला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तो आपल्या राजधानीकडे परत गेला. योग्यवेळी शकुंतलेला एक पुत्र झाला.

            वनामध्ये कण्वांनी राजकुमाराचे जातकर्मादी संस्कार केले. तो मुलगा लहानपणीच सिंहांना बळजबरीने बांधून त्यांच्याशी खेळत असे.
            भगवंतांचा अंशा अंशांशावतार असलेल्या त्या अमर्याद पराक्रमी मुलाला बरोबर घेऊन रमणीरत्न शकुंतला पतीकडे आली. आपली निर्दोष पत्नी आणि पुत्र याचा दुष्यंताने जेव्हा स्वीकार केला नाही, तेव्हा सर्वांच्या समक्ष आकाशवाणी झाली. "माता केवळ कातडी पिशवीप्रमाणे आहे. वास्तविक पुत्र हा पित्याचाच असतो. कारण पिताच पुत्ररूपाने उत्पन्न होतो; म्हणून दुष्यंता ! तू शकुंतलेचा त्याग करु नकोस. आपल्या पुत्राचे पालन-पोषण कर राजन ! वंशाची वृद्धी करणारा पुत्र पित्याला नरकापासून वाचवतो. शकुंतलेचे म्हणणे खरे आहे. हा गर्भ तुझ्यापासूनच धारण झालेला आहे. "

            दुष्यंताच्या मृत्यूनंतर तो बालक यशस्वी चक्रवर्ती सम्राट झाला. त्याचा जन्म भगवंतांच्या अंशापासून झाला होता. आजसुद्धा पृथ्वीवर त्याची थोरवी गाइली जाते. त्याच्या उजव्या हातावर चक्राचे चिन्ह होते आणि पायांवर कमलपुष्पाचे. महाभिषेकाच्या विधीने राजाधिराजाच्या पदावर त्याला अभिषेक झाला. भरत अतिशय शक्तिशाली राजा होता. ममताचे पुत्र दीर्घतमा मुनींना भरताने पुरोहित म्हणून नेमून गंगातीरावर पंचावन्न आणि यमुनातीरावर अठ्ठ्याहत्तर अश्वमेध यज्ञ केले. या यज्ञांमध्ये त्यांनी अपरंपार धनाचे दान केले. भरताने अग्नीस्थापना अतिशय पवित्र स्थानांमध्ये केली होती. त्या ठिकाणी भरताने एक हजार ब्राह्मणांना प्रत्येकी एक-एक बद्व (१३०८४) गाई दिल्या होत्या. अशा प्रकारे भरताने १३३ यज्ञ करून सर्व राजांना आश्चर्यचकित केले. शेवटी त्याने आत्मज्ञानाने मायेवरही विजय मिळवून श्रीहरींना प्राप्त करून घेतले. यज्ञामध्ये "मष्णार ' नावाचे एक कर्म असते. त्यामध्ये भरताने सुवर्णविभूषित, पांढऱ्या दाताचे आणि काळ्या रंगाचे चौदा लाख हत्ती दान केले. भरताने जे महत्कर्म केले, ते यापूर्वी कोणताही राजा करू शकला नाही किंवा पुढेही कोणी करू शकणार नाही. स्वर्गाला कोणी हात लावू शकतो काय ? भरताने दिग्विजय करतेवेळी किरात, हूण, यवन, अंध्र, कंक,शक, म्लेंच्छ इत्यादी सर्व ब्राह्मणद्रोही राजांना मारून टाकले. पूर्वी बलवान असुरांनी देवांवर विजय मिळवून ते रसातळात राहू लागले होते. त्यावेळी ते देवांगनांना रसातळात घेऊन गेले होते. भरताने त्यांना पुन्हा सोडवून आणले. त्याच्या राज्यामध्ये पृथ्वी आणि आकाश प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण करीत होते. भरताने सत्तावीस हजार वर्षेपर्यंत सर्व देशांचे एकछत्री राज्य केले. शेवटी सर्वभौम सम्राट भरताने लोकपालांचे ऐश्वर्य, सार्वभौम संपत्ती, अखंड साम्राज्य आणि हे जीवनसुद्धा मिथ्या आहे, असा निश्चय करून तो संसारातून निवृत्त झाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय एकोणीसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - अशा प्रकारे स्त्रिला वश होऊन ययाती विषयांचा उपभोग घेत असता एकदा आपला अध:पात त्याच्या लक्षात आला. तेव्हा वैराग्य उत्पन्न होऊन तो देवयानीला म्हणाला. हे भृगुनंदिनी ! पृथ्वीवरील माझ्यासारख्या विषयी लोकांची ही शोकान्तिका ऐक. अशाच गृहस्थांविषयी वनात राहाणार्‍या जितेंद्रिय पुरुषांना खूप वाईट वाटते. एक बोकड होता. तो आपल्याला प्रिय वाटणाऱ्या वस्तू शोधत जंगलात एकटाच फिरत होता. त्याने स्वतःच्या कर्माने एक बकरी विहिरीत पडली आहे, असे पाहिले. तो कामातून बोकड बकरीला विहिरीतून वर कसे काढावे याचा विचार करु लागला. त्याने आपल्या सिंगांनी विहिरीजवळची जमीन खोदून रस्ता तयार केला. जेव्हा ती बकरी विहिरीतून वर आली, तेव्हा तिला तो बोकड आवडला. तो दाढी-मिशावाला बोकड दुष्ट-पुष्ट, तरुण आणि विहार करण्यात कुशल असल्यामुळे बकऱ्यांना अत्यंत प्रिय होता. विहिरीत पडलेल्या बकरीने त्याला प्रियकर म्हणून निवडलेले पाहून त्यांनीही त्याला आपला पती केले. त्या बोकडाच्या डोक्यावर कामरूपी पिशाच्च स्वार झाले होते. तो एकटाच अनेक बकऱ्यांसह रमू लागला आणि आपली शुद्ध हरवून बसला.

            विहिरीतून वर आलेल्या बकरीने जेव्हा पाहिले की, हा बोकड दुसऱ्या बकऱ्यांबरोबर रमत आहे, तेव्हा तिला त्याचे ते कृत्य सहन झाले नाही. तिने विचार केला कि, हा तात्पुरते प्रेम दाखविणारा कामी मित्ररूपी शत्रूच आहे. म्हणून त्या बकरीने त्या इंद्रियलोलुप बोकडाला सोडून दिले आणि दुःखाने ती आपल्या मालकाकडे निघून गेली. तो दिन कामी बोकड तिची मनधरणी करण्यासाठी "बें-बें" करीत तिच्या पाठोपाठ गेला. परंतु वाटेत तो तिची समजूत घालू शकला नाही. त्या बकरीचा मालक एक ब्राह्मण होता. त्याने रागावून बोकडाचा लटकता अंडकोष कापून टाकला. परंतु नंतर त्या बकरीच्या सुखासाठी पुन्हा तो जोडला. त्याला अशाप्रकारचे पुष्कळ उपाय माहीत होते. प्रिये ! अशाप्रकारे अंडकोष जोडल्यानंतर त्या बोकडाने पुन्हा विहिरीतून बाहेर आलेल्या बकरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत विषयभोग घेतले. परंतु अजूनही तो तृप्त झाला नाही. हे सुंदरी ! माझीसुद्धा अशीच दशा झाली आहे. तुझ्या प्रेमपाशात बांधला जाऊन मीसुद्धा अत्यंत दिन झालो आहे. तुझ्या मायेने मोहित होऊन मी स्वतःलाच विसरलो आहे.

             प्रिये ! पृथ्वीवर जितके म्हणून तांदूळ, जव इत्यादी धान्ये, सुवर्ण, पशू आणि स्त्रिया आहेत, ते सर्वही कामनाग्रस्त माणसाला संतुष्ट करू शकत नाहीत. विषय भोगल्याने भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही; जशी तुपाने आग आणखीच भडकते, त्याचप्रमाणे भोगवासनासुद्धा भोग घेतल्यामुळे अधिक वाढतात. जेव्हा मनुष्य कोणत्याही प्राण्याबद्दल द्वेषभाव ठेवीत नाही, तेव्हा तो समदर्शी होतो आणि त्याला सगळीकडे सुखच दिसते. विषयांची इच्छाच दुःखाचे उगमस्थान आहे. अज्ञानी लोकांना तिचा त्याग करणे जमत नाही. शरीर म्हातारे होत जाते, पण इच्छा नाही होत. म्हणून जो आपले कल्याण इच्छितो, त्याने तत्काळ या वासनांचा त्याग केला पाहिजे. आपली आई, बहीण किंवा मुलीबरोबरसुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये. कारण इंद्रिये इतकी बलवान आहेत की, ती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयांकडे ओढून नेतात. विषयाचे वारंवार सेवन करीत करीत माझी एक हजार वर्षे पुरी झाली. तरीसुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा वाढतच चालली आहे. म्हणून मी आता भोगांच्या वासनांचा त्याग करून आपले अंत:करण परमात्म्यात ठेवून शीत-उष्ण, सुखदुःख इत्यादी द्वन्द्वांच्या पलीकडे जाऊन, अहंकारातून मुक्त होऊन, हरिणांसह वनात विहार करीन. इहलोक-परलोकाचे भोग मिथ्या आहेत, असे समजून त्यांचा उपभोग घेऊ नये अगर त्यांचे चिंतनही करू नये. त्याच्या चिंतनानेच जन्म-मृत्यू संसाराची प्राप्ती होऊन आत्मनाश होतो, हे समजून त्यापासून अलिप्त राहणाराच आत्मज्ञानी होय.

            आपल्या पत्नीला असे सांगून ययातीने पुरुला त्याचे तारुण्य परत केले आणि त्याच्याकडून आपले म्हातारपण परत घेतले; कारण आता त्याच्या चित्तामध्ये विषयवासना राहिली नव्हती. यानंतर त्याने अग्निये दिशेकडे द्रुह्यूला, दक्षिणेकडे यदूला, पश्चिमेकडे तुर्वसूला आणि उत्तरेकडे अनुला राज्य दिले. सगळ्या भूमंडलावरील संपत्तीला योग्य अशा पुरुचा आपल्या सिंहासणावर राज्याभिषेक करून तसेच थोरल्या भावांना त्याच्या स्वाधीन करून तो वनामध्ये निघून गेला. ययातीने जरी पुष्कळ वर्षेपर्यंत इंद्रियांद्वारा विषयसुख उपभोगले होते, तरीसुद्धा ज्याप्रमाणे पंख फुटल्यावर पक्षी आपले घरटे सोडून देतो, त्याप्रमाणे त्याने एका क्षणातच सर्व काही सोडून दिले. ययातीने वनात जाऊन सर्व आसक्तीपासून आपली सुटका करून घेतली. आत्मसाक्षात्कारमुळे त्याचे त्रिगुणमय लिंगशरीर नष्ट झाले. निर्मळ अशा परब्रह्य वासुदेवांमध्ये एकरूप होऊन जाऊन, जी भगवंतांच्या भक्तांना प्राप्त होते, ती गती त्याला मिळाली. देवयानीने जेव्हा ही कथा ऐकली, तेव्हा तिला असे वाटले की, हे मला निवृत्ती-मार्गावरून जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत; कारण स्त्रि-पुरुषांमध्ये प्रेमामुळे विरह झाल्यावर दुःख होते, म्हणून मला सावरण्यासाठी यांनी ही कथा थट्टेत सांगितली. पाणपोईवर जसे वाटसरू येतात, त्याप्रमाणे ईश्वराच्या अधीन असणारे बांधव एकत्र येतात. हा भगवंतांच्या मायेचा खेळ असून स्वप्नवत आहे, असे जाणून देवयानीने सर्व पदार्थाच्या आशक्तीचा त्याग केला आणि आपले मन भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून, बंधनाला हेतू असलेल्या लिंगशरीराचा त्याग केला. ती म्हणाली, "सर्व जगाचे निर्माणकर्ते, सर्वान्तर्यामी, सर्वांचे आश्रयस्वरूप, सर्वशक्तिमान भगवान वासुदेवांना नमस्कार असो. जे परम शांत आणि अनंत तत्त्व आहेत, त्यांना मी नमस्कार करते."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अठरावा

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - जशी शरीर धारण करणाऱ्यांची सहा इंद्रिये असतात, तसे नहुषाचे यती, ययाती, संयाती, आयती, वियती, आणि कृती असे सहा पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र येतीला, नहुष राज्य देऊ इच्छित होता, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता. जो राज्यकारभारात प्रवेश करतो, तो आत्मस्वरुपाला विसरतो. जेव्हा इंद्रपत्नी शचीशी सहवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नहुषाला ब्राह्मणांनी इंद्रपदापासून पदच्युत केले आणि त्याला अजगर बनविले, तेव्हा राजसिंहासनावर ययाती बसला. ययातीने आपल्या चार धाकट्या भावांना चार दिशांना नियुक्त केले आणि स्वतः शुक्राचार्याची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून तो पृथ्वीचे रक्षण करू लागला.

            परीक्षिताने विचारले - भगवान शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती क्षत्रिय. तर मग ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय वर असा प्रतिलोम (उलटा) विवाह कसा झाला ?

            श्रीशुक म्हणाले - दानवराज वृषर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या एके दिवशी आपल्या गुरूंची कन्या देवयानी आणि हजारो मैत्रिणीसह आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीच्यामध्ये विहार करीत होती. त्या उद्यानात फुलांनी लहडलेले अनेक वृक्ष होते. त्यामध्ये एक मोठे सरोवर होते. सरोवरात कमळे उमललेली होती आणि त्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यांनी आपापली वस्त्रे घाटावर ठेवली आणि सरोवरात प्रवेश करून त्या एक-दुसरीवर पाणी उडवून खेळू लागल्या.

            त्याच वेळी तिथे पार्वतीसह नंदीवर आरूढ झालेले भगवान शंकर येउन पोहोचले. त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोब वर येऊन त्यांनी आपापली वस्त्रे परिधान केली. शर्मिष्ठाने घाईने नकळत देवयानीचे वस्त्र आपले समजून परिधान केले. यावर देवयानी चिडून म्हणाली. "अग ! पहाणा या दासीचे हे भलतेच धाडस ! कुत्र्याने यज्ञातील हविष्यान्न खावे, त्याप्रमाणे हीने माझे वस्त्र परिधान केले आहे ! ज्या ब्राह्मणांनी आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली, जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत, जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्म्याला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविला, लोकपाल, देवराज, आणि लक्ष्मीदेवीचे आश्रय परमपावन विश्वात्मा भगवानसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची सेवा करतात, त्या ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असे आम्ही भृगुवंशी त्यात तिचा पिता वृषपर्वा आमचा शिष्य. असे असतानाही शूद्राने वेदपठण करावे, त्याप्रमाणे हिने माझी वस्त्रे परिधान केली. " जेव्हा देवयानी अशाप्रकारे अद्वा-तद्वा बोलू लागली, तेव्हा शर्मिष्ठा क्रोधाने, डिवचलेल्या नागिणीप्रमाणे नि:श्वास टाकीत दात-ओठ खात तिला म्हणाली. "ऐ भिकारणी ! स्वतःला न ओळखता तू किती बडबड करतेस ? कावळ्या- कुत्र्याप्रमाणे तू आमच्या घराकडे आशाळभूतपने पाहात नाहीस काय ?" शर्मिष्ठेने अशाप्रकारे अतिशय कडवट शब्दांनी गुरुकन्या देवयानीला फटकारले आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत ढकलून दिले.

             शर्मिष्ठा घरी निघून गेल्यानंतर शिकार करीत योगायोगाने राजा ययाती तेथे येऊन पोहोचला. त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवयानीला त्याने पाहिले. त्यावेळी तिच्या अंगावर वस्त्र नव्हते; म्हणून त्याने आपला शेला तीला दिला आणि दयाळू अंत:करणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढले. अत्यंत प्रेमळ शब्दांत देवयानी वीर ययातीला म्हणाली, "हे वीरशिरोमणे राजन ! आज आपण माझा हात धरलात. आता आपण माझा हात धरला आहे, म्हणून दुसर्‍या कोणीही तो धरू नये. हे वीरश्रेष्ठा ! विहिरीत पडलेल्याकारणाने मला जे अचानकपणे आपले दर्शन झाले, ईश्वराने ठरविलेला सबंध होय, असेच समजले पाहिजे. यामध्ये मनुष्यप्रयत्न नाहीत. हे वीरश्रेष्ठा ! मी यापूर्वी बृहस्पतीचा पुत्र कच याला शाप दिला होता. म्हणून त्यानेसुद्धा मला शाप दिला होता की, ब्राह्मण माझे पाणिग्रहण करणार नाही. " हा सबंध शास्त्रविरुद्ध असल्याने ययातीला मान्य नव्हता. परंतु प्रारब्धानेच आपल्याला ही भेट दिली असून आपले मनसुद्धा हिच्याकडे ओढ घेत आहे, असे पाहून ययातीने तिचे म्हणणे मान्य केले. वीर राजा ययाती जेव्हा निघून गेला. तेव्हा देवयानी रडत पित्याकडे गेली आणि शर्मिष्ठा जे काही म्हणाली, आणि जे तिने केले, ते सर्व तिने त्यांना सांगितले. ते ऐकून भगवान शुक्राचार्यांचेसुद्धा मन उद्विग्न झाले. ते पौरोहित्याची निंदा करू लागले. त्यांनी असा विचार केला की, यापेक्षा कबुतराप्रमाणे धान्य वेचून खाणेसुद्धा चांगले. म्हणून ते कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर पडले. वृषपर्व्याला हे समजले, तेव्हा गुरु शत्रूला जाऊन मिळू नये, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याने रस्त्यातच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. भगवान शुक्राचार्यांचा क्रोध तात्कालिक होता. ते वृषपर्व्याला म्हणाले, "राजन ! मी देवयानीला सोडू शकत नाही. म्हणून तिची जी इच्छा असेल, ती तू पुरी कर. " " ठीक आहे" असे वृषपर्व्याने म्हटल्यावर देवयानीने आपले मनोगत सांगितले. ती म्हणाली, " वडील मला जेथे देतील आणि मी जेथे जेथे जाईन, तेथे शर्मिष्ठा आपल्या सख्यांसह माझ्या सेवेसाठी येऊ दे. "

            आपल्या परिवारावर आलेले संकट आणि त्याच्या कार्याचे महत्त्व पाहून शर्मिष्ठेने देवयानीचे म्हणणे मान्य केले आणि एक हजार सख्यांसह ती दासीप्रमाणे तिची सेवा करू लागली.

            शुक्राचार्यांनी देवयानीचा विवाह ययातीबरोबर लावून दिला आणि शर्मिष्ठेला दासी म्हणून देऊन त्याला सांगितले की, " राजन ! हिला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस. परीक्षिता ! थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली. हे पाहून एक दिवस शर्मीष्ठेने सुद्धा आपल्या ऋतुकाळात देवयानीच्या पतीकडे एकांतात सहवासाची विनंती केली. शर्मिष्ठेने पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे, हे पाहून शुक्राचार्यांचे वचन लक्षात असूनही, धर्मज्ञ ययातीने प्रारब्धावर भरवसा ठेवला. यदु आणि तुर्वसू असे देवयानीला दोन पुत्र झाले आणि शर्मिष्ठेला द्रुह्यू, अनु आणि पूरू असे तीन पुत्र झाले. मानी देवयानीला जेव्हा समजले की, शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता, तेव्हा ती रागाने जळफळत पित्याच्या घरी गेली. कामी ययातीने गोड शब्दांनी, पाय चेपणे इत्यादी पद्धतींनी देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; तिच्या पाठोपाठही तो गेला. परंतु तिचे मन वळवू शकला नाही. शुक्राचार्यसुद्धा क्रोधाने ययातीला म्हणाले, " तु अत्यंत स्त्रिलंपट, मंदबुद्धी आणि खोटारडा आहेस. म्हणून मनुष्याला कुरूप करणारे वृद्धत्व तुला येवो. "

             ययाती म्हणाला- " ब्रह्मण ! आपल्या कन्येबरोबरच्या विषयभोगात अजून मी तृप्त झालो नाही. " यावर शुक्राचार्य म्हणाले "ठीक आहे. जो तुला आपले तारूण्य देईल, त्याला वृद्धत्व देऊन त्या बदल्यात खुशाल तारुण्य घे. " शुक्राचार्यांनी जेव्हा अशी व्यवस्था सांगितली, तेव्हा ययाती आपल्या जेष्ठ यदु नावाच्या पुत्रास म्हणाला. "पुत्रा तू तुझे तारुण्य मला दे आणि तुझ्या आजोबांनी दिलेले हे म्हातारपण तू स्वीकार; कारण हे पुत्रा, मी अजून विषय भोगून तृप्त झालो नाही; म्हणून तुझे आयुष्य घेऊन मी काही वर्ष विषयानंदाचा उपभोग घेईन. "

            यदू म्हणाला - "तात ! आपले हे म्हातारपण अकालीच घेऊन मी जिवंतही राहू इच्छित नाही; कारण कोणताही मनुष्य जोपर्यंत विषयसुखाचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत त्याला त्यापासून वैराग्य प्राप्त होत नाही. " परीक्षिता ! अशा प्रकारे तुर्वसू,द्रुह्यू आणि अनुनेसुद्धा आपल्या पित्याचे म्हणणे मान्य केले नाही. खरे म्हणाल तर त्या मुलांना धर्माचे तत्त्व माहीत नव्हते. या अनित्य शरीरालालाज ते नित्य मानीत होते. शेवटी ययातीने सर्वांत धाकटा परंतु गुणांनी श्रेष्ठ अशा आपल्या पुरू नावाच्या पुत्राला विचारले आणि म्हटले- "पुत्र ! आपल्या मोठ्या भावांप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस. "

            पूरू म्हणाला- 'तात ! ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिले, अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात कोण करू शकेल ? जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र. सांगितल्यानंतर आज्ञापालन करणाऱ्या पुत्राला मध्यम म्हटले जाते. जो आज्ञा केल्यानंतरसुद्धा मानत नसताना तिचे पालन करतो, तो अधम पुत्र होय आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही, त्याला पुत्र म्हणणेच चूक आहे. " परीक्षिता ! असे म्हणून पूरूने मोठ्या आनंदाने आपल्या वडिलांचे म्हातारपण स्वीकारले. राजा ययातीसुद्धा त्याचे तारूण्य घेऊन पूर्वीप्रमाणेच विषयसेवन करू लागला. तो सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. प्रजेचे पुत्रवत पालन करीत होता. आणि आपल्या समर्थ इंद्रियांनी विषयांचा इथेच्छ उपभोग घेत होता. देवयानी त्यांची प्रियतमा पत्नी होती. तीही आपल्या प्रियतमाला आपले मन, वाणी, शरीर आणि वस्तूंच्या द्वारा दिवसेंदिवस एकांतात अधिकाधिक सुख देऊ लागली. राजा ययातीने सर्व वेदांचे प्रतीपाद्य, सर्वदेवस्वरूप यज्ञपुरुष श्रीहरींचे पुष्कळ दक्षिणांनी युक्त यज्ञांनी पूजन केले. जशा आकाशात कधी ढगांच्या झुंडी दिसतात तर कधी दिसत नाहीत, त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरूपात हे जग स्वप्न, माया आणि मनोराज्याप्रमाणे केवळ कल्पनाच आहे. हे कधी अनेक नामे आणि रूपांनी प्रतीत होते, तर कधी नाही. ते परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत. त्यांचे स्वरूप सुक्ष्माहूनही सुक्ष्म आहे. त्या सर्वशक्तिमान, सर्वव्यापी भगवान श्रीनारायणांना आपल्या हृदयात स्थापन करून ययातीने निष्काम भावाने त्यांचे पूजन केले. अशाप्रकारे हजारो वर्षे त्याने आपल्या उच्छृंखल इंद्रियांना मनाच्या अधीन करून त्याचे प्रिय विषय उपभोगले. परंतु एवढ्याने सुद्धा चक्रवर्ती सम्राट ययातीची भोगांच्या बाबतीत तृप्ती होऊ शकली नाही.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सतरावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - पुरूरव्याचा आयू नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले. राजा, आता क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे तीन पुत्र झाले घरात समुदायाचा एक पुत्र झाले.गृत्समदाचा शुनक पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनिवर शौनक झाले.
काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वन्तरी. हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोक्ते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वन्तरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ.
भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्यांचे एक नाव प्रतर्दन असेसुद्धा आहे. हाच द्युमान शत्रूजित,वत्स, ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानाचेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता ! अलर्काखेरीज दुसऱ्या कोणत्याही राज्याने सहासष्ट हजार वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती. संततीचा सुनीथ. सुनीथाचा सुकेतन. सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू.
सत्यकेतूपासून धृष्टकेतू, धृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वीतिहोत्र, वीतिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला.

हे सर्व क्षेत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रंभस, त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून प्रक्रिया चा जन्म झाला अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मणवंश चालू झाला. आता अनेना याचा वंश ऐक. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते.

देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्ह रजीचा मृत्यू झाला, तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार-विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रति, प्रतिपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला. जयापासून कृत, कृतापासून राजा हर्यवन, हर्यवनापासून सहदेव, सहदेवापासून हीन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला. जयसेनाचा संस्कृती, संस्कृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले. आता नहुषवंशाचे वर्णन ऐक.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सोळावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आपल्या पित्याने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामांनी "जशी आपली आज्ञा" म्हणून स्वीकार केला. त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून ते आपल्या आश्रमात परत आले. एकदा रेणुका गंगेवर गेली होती. गंधर्वराज चित्ररथ कमळपुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहेत, असे तिने तेथे पाहिले.ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती. परंतु तेथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळेचा तिला विसर पडला. हवनाची वेळ टळून गेली असे पाहून ती महर्षी जमदग्नि शाप देतील असे वाटून भयभीत झाली. लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली. पत्नीचा मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नी क्रोधाने म्हणाले- "पुत्रांनो ! या पापिणीला ठार करा." परंतु त्यांनी तसे केले नाही. यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले. कारण आपल्या पित्याचे योगसामर्थ्य आणि तपश्चर्येचा प्रभाव ते चांगल्या रीतीने जाणत होते. या कृत्यामुळे सत्यवतीनंदन जमदग्नी प्रसन्न झाले आणि म्हणाले- "पुत्रा ! तुझी इच्छा असेल, तो वर माग. " परशुराम म्हणाले- "तात ! माझी आई आणि सर्व बंधू जिवंत होवोत. तसेच मी त्यांना मारले होते, याची त्यांना आठवण न उरो. " परशुरामांनी असे म्हणताच झोपेतून उठावे ,त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले. परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या आई आणि बंधूंचा वध केला होता.

            परीक्षिता ! सहस्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामांकडून हार खाऊन पळून गेले होते, त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभरसुद्धा चैन पडत नसे. एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेले होते. ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्रबाहूची मुले तेथे येऊन पोहोचली. त्यावेळी जमदग्नी अग्निशाळेमध्ये पवित्रकीर्ती भगवंतांचेच चिंतन करण्यात मग्न होऊन बसले होते. त्याच वेळी त्या पाप्यांनी त्यांना मारले. परशुरामाची माता रेणुका दिनपणे त्यांना प्रार्थना करीत होती, परंतु ते नीच क्षेत्रिय बळजबरीने जमदग्नींचे मस्तक तोडून घेऊन गेले. सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकूळ झाली. ती हातांनी आपली छाती बडवित "रामा ! पुत्रा रामा ! लवकर ये, " अशा हाका मारत जोरजोराने रडू लागली. परशुरामांनी लांबूनच आईचा "हे राम !" असा करूण आक्रोश ऐकला आणि तातडीने आश्रमात येऊन पाहिले तर पित्याला मारले आहे. त्यावेळी परशुरामांना अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर क्रोध, असहिष्णुता, मानसिक व्यथा आणि शोकावेगाने ते दिड्मूढ झाले. " हाय तात ! आपण महात्मे व धर्मनिष्ठ होता. आपण आम्हांला येथे सोडून स्वर्गात का बरे निघून गेलात !" अशाप्रकारे विलाप करुन त्यांनी पित्याचे शरीर आपल्या भावांकडे सोपविले आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय केला.

             परीक्षिता ! परशुरामांनी माहिष्मती नगरीत जाऊन सशस्त्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या (छाटलेल्या) मस्तकांनी नगरीच्या मधोमध एका मोठा पर्वतच उभा केला. त्या नगराची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती, नीच क्षेत्रियांच्यामुळे नष्ट झालीच होती. त्यांच्या रक्ताची एक मोठी भयंकर नदी वाहू लागली. तिला पाहूनच ब्राह्मणद्रोह्यांचे हृदय भयाने कापत असे. भगवंतांनी पाहिले की, सध्या क्षत्रिय अत्याचारी झाले आहेत. म्हणून हे राजन ! त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आणि समंतपंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले. परशुरामांनी आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञांच्याद्वारे सर्वदेवमय आत्मस्वरुप भगवंतांचे पूजन केले. यज्ञामध्ये त्यांनी पूर्वदिशा होत्याला, दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला, पश्चिम दिशा अध्वर्यूला आणि उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्गागात्याला दिली. तसेच आग्नेय इत्यादी उपदिशा ऋत्विजांना दिल्या. कश्यपांना मध्मभूमी दिली. उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिले आणि दुसर्‍या सदस्यांना राहिलेले भूभाग दिले. त्यानंतर यज्ञाचे शेवटचे स्नान करून ते सर्व पापातून मुक्त झाले आणि ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागले. महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली. परशुरामांकडून सन्मानित होऊन ते सप्तऋषींच्या मंडळात सातवे ऋषी झाले. परीक्षिता ! कमललोचन जमदग्नीनंदन भगवान परशुराम पुढील मन्वन्तरामध्ये सप्तषींच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील. ते आजसुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत. तेथे सिद्ध, गंधर्व आणि चारण त्यांच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत असतात. सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशाप्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा अनेक वेळा वध केला.

            प्रज्वलित अग्नीप्रमाणे परम तेजस्वी विश्वामित्र गाधीचे पुत्र झाले. त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग करून ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले. परीक्षिता ! विश्वामित्रांना शंभर पुत्र होते. त्यांपैकी मधल्या पुत्राचे नाव 'मधुच्छंद' होते. म्हणून सर्व पुत्र 'मधुच्छंद' या नावानेच प्रसिद्ध झाले. भृगुवंशी अजीगर्ताचा पुत्र जो शुन्य:शेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचे एक नाव देवराज असेही होते. विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले, " तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा. " जो हरीश्र्चद्राच्या यज्ञामध्ये यज्ञपशु म्हणून विकत आणला होता, तोच हा प्रसिद्ध भृगुवंशी शुन्य:शेप होय. विश्वामित्रांनी प्रजापती, वरूण इत्यादी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडविले. हाच शुनःशेप देवतांच्या यज्ञात देवांनी विश्वामित्रांना दिला होता. म्हणून "देवै: रात: " या व्युत्पत्तीनुसार गाधिवंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला. विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे जेष्ठ होते, त्यांना, शुन:शेपाला मोठा भाऊ मानावा, ही गोष्ट आवडली नाही. यावर विश्वामित्रांनी रागावून त्यांना शाप दिला की, दुष्टांनो ! तुम्ही म्लेंच्छ व्हा, " अशाप्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंच्छ झाले, तेव्हा विश्वामित्रांचा मधला मुलगा मधुच्छंद आपल्या लहान पन्नास भावांसह म्हणाला की,. " तात ! आपण आम्हांला जी आज्ञा कराल, तिचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. " असे म्हणून मधुच्छंदाने मंत्रदृष्ट्या शुन:शापाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारले आणि म्हटले, " आम्ही सर्व तुझे लहान भाऊ आहोत. " तेव्हा विश्वामित्र आपल्या या आज्ञाधारक मुलांना म्हणाले " तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले. म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे. मी तुम्हांला आशीर्वाद देतो की, तुम्हांलासुद्धा सुपुत्र प्राप्त होतील. हा देवराज तुमच्याच गोत्राचा आहे. तुम्ही यांच्या आज्ञेत राहा. " विश्वामित्रांचे अष्टक, जय, क्रतुमान इत्यादी आणखीही पुत्र होते. अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळसे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याकारणाने त्याचे प्रवरही अन्य झाले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हैहयाधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की, आपल्या सेनेतील सैनिक, त्यांचे धनुष्य-बाण, ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशूने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वत: त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन धडकला. त्याने एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले. परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणाऱ्यांत अग्रगण्य होते. त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले. आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार, तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले. त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले. वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिऊन पळून गेले.

            शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली. ती अत्यंत दुःखी होती. त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपविले आणि माहिष्मती नगरीत आपण जे काही केले, ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले. ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाले. "महावीरा परशुरामा ! तू मोठेच पाप केलेस. कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास ! पुत्रा ! आपण ब्राह्मण आहोत ! क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत. एवढेच काय, सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत. क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते. भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात.

            पुत्रा ! सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे.जा ! भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुऊन टाक."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले- त्यावेळेच्या संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की, ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला ?

            श्रीशुक सांगू लागले - त्यावेळी हैहयवंशाचा अधिपती अर्जुन होता. तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता. त्याने अनेक प्रकारे सेवाशुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीर्ती आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतले. तो योगेश्वर झाला होता. आणिमादी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे. एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्त्रबाहु अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता. त्या वेळी मदोन्मत्त होऊन सहस्त्रबाहुने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडविला सहस्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले, ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही. जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली, तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि माहिष्मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर पुलस्त्याच्या सांगण्यावरून सोडून दिले.

            एके दिवशी सहस्त्रबाहु अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. दैववंशात तो जमदग्नीच्या आश्रमात जाऊन पोहोचला. तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनुच्या प्रतापाने सेना, मंत्री आणि वाहनांसह हैहयाधिपतीचे आतिथ्य केले. जमदग्नी मुनींचे ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे असल्याचे पाहून त्याने त्यांच्या आदरसत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचे ठरविले. त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बळेच नेण्याची सेवकांना आज्ञा केली. तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनुला वासरासह बळजबरीने माहिष्मतीपुरीला नेले. तो तेथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीगत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले. ते आपला भयंकर परशू, बाणांचा भाता, ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमानणारा सिंह हत्तीच्या राजाच्या मागे धावतो, त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले.

            अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता, तेवढ्यात त्याने पाहिले की, परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहेत. त्यांनी हातात धनुष्य-बाण आणि परशु घेतला होता, शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणाप्रमाणे चमकत होत्या. त्यांना पाहाताच त्याने गदा, खड्ग, बाण, ऋष्टी, तोफा, शक्ती इत्यादी अयुधांनी सुसज्ज हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षौहिणी फौज पाठविली. भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू यांप्रमाणे होता.बस्स ! ते शत्रूच्या सेनेचा निःपात करीत जात होते. जेथे जेथे ते आपल्या परशुचा प्रहार करीत तेथे तेथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात, मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०९ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात- परीक्षिता ! उर्वशीपासून आयू, श्रुतायू, सत्यायू,रय, विजय आणि जय असे पुरूरव्याला सहा पुत्र झाले.

            श्रुतायूचा पुत्र वसुमान, सत्यायूचा श्रुतंजय,रयाचा एक आणि जयाचा अमित. विजयाचा भीम, भीमाचा कांचन, कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जहृ होता. ज्याने गंगेला आपल्या ओंजळीत घेऊन पिऊन टाकले, तोच हा जहृ होय. जहृचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा अजक.अजकाचा पुत्र कुश. कुशांबू,तनय,वसू आणि कुशनाभ हे कुशाचे चार पुत्र होते. यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता.

            गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते. ऋचीक ऋषींनी तिला मागणी घातली. हा वर कन्येसाठी योग्य नाही, असे वाटून गाधी ऋचीकाला म्हणाला.

            "मुनेश्वर ! आम्ही कुशिक आहोत. आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शिल्करुपाने द्या. त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा. " गाधी असे म्हणाला, तेव्हा ऋचीक मुनींना त्याच्या आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला. एकदा महर्षी ऋचीकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. महर्षी ऋचीकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघीसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजविला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले. सत्यवतीच्या आईला वाटले की, ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजविला असेल, म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला. तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वत: खाल्ला मुनींना ही गोष्ट समजली, तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले, " तू मोठा अनर्थ केलास ! आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल. " सत्यवतीने ऋचीक मुनींना प्रसन्ना करून प्रार्थना केली की, " असे होऊ नये. " तेव्हा ते म्हणाले- "ठीक आहे. पुत्राऐवजी तुझा नातू तसा होईल. " नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला. सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी 'कौशिकी' नदी झाली. रेणू ऋषींची कन्या रेणुका होती. जमदग्नींनी तिचे पाणिग्रहण केले. जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान परशुराम होते. त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात कि, हैहयवंशाचा नाश करण्यासाठी स्वत: भगवंतांनीच हा अशावतार ग्रहण केला होता. त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षेत्रीयहीन केले. क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता, तरीसुद्धा ते क्षेत्रिय दुष्ट, ब्राह्मणांचे द्वेष्टे,रज-तमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते. म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरविला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः बिछान्यावर उर्वशी नाही, असे पाहून राजा खिन्न झाला. त्याचे चित्त उर्वशीकडेच लागले होते. तो तिच्यासाठी शोकविहृल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुक मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले. "प्रिये ! थांब, थांब. हे निष्ठुरे ! निदान आज तरी मला सुखी केल्यावाचून तू जाऊ नकोस. ये. आपण दोघे काही वार्तालाप करू. देवी ! आता या शरीरावर तुझा कृपाप्रसाद राहिलेला नाही, म्हणून तू याला आता लांब फेकून दिले आहेस. म्हणून माझे हे सुंदर शरीर आता येथे पडेल आणि लांडगे व गिधाडे यांना खाऊन टाकतील."

            उर्वशी म्हणाली- "तू पुरुष आहेस. असा मरू नकोस. या लांडग्यांनी तुला खाऊ नये. स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते. स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे ह्रदय अगदी एकसारखे असते. स्त्रिया निर्दय, क्रूर, असहनशील आणि धाडसी कामे आवडणाऱ्या असतात. थोड्याशा स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करुन आपल्या पतीला आणि भावालासुद्धा मारतात. सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते. भोळ्याभाबड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने कुलटा आणि स्वैर बनतात. हे राजा, प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहाशील. तेव्हा तुला आणखीही मुले होतील. "

            उर्वशी गर्भवती आहे, हे जाणून राजा राजधानीकडे परत आला. एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला. तोपर्यंत उर्वशी एका वीर-पुत्राची माता झाली होती. उर्वशीबरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला. पुन्हा विरहदुःखाने अत्यंत दिन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली. "तू या गंधर्वाची स्तुती कर. हे मला तुझ्याकडे सोपवतील. "तेव्हा पुरूरव्याने गंधर्वाची स्तुती केली. परीक्षिता ! पुरूरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले. ही उर्वशी आहे, असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसर्‍या वनात फिरू लागला.

            जेव्हा तो सावध झाला, तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करीत राहिला. अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले, तेव्हा त्याच्या हृदयात तीन्ही वेद प्रगट झाले. नंतर जेथे त्याने अग्नीपात्र टाकले होते, तेथे तो गेला. आता त्या ठिकाणी शमीवृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता, तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी (मंथन करण्याची लाकडे) तयार केल्या. नंतर त्याने उर्वशीलोकांची प्राप्ती व्हावी, या इच्छेने खालील अरणीला उर्वशी, वरच्या अरणीला पुरुरवा आणि मधल्या लाकडाचे पुत्ररूपाने चिंतन करीत अग्नी प्रज्वलित करणाऱ्या मंत्र्यांनी मंथन केले. त्या मंथनामुळे 'जातवेदा' नावाचा अग्नी प्रगट झाला. राजा पुराव्याने अग्नीदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली व त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला. नंतर उर्वशीलोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरूरव्याने त्या तीन अग्नींच्या द्वारे सर्वदेवस्वरूप, इंद्रियातीत, यज्ञपती भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला.

            त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ॐकार हाच वेद होता. सर्व वेद-शास्त्रे त्याच्यात अंतर्भूत होती. देव फक्त नारायणच होता. आणखी कोणी नव्हते. अग्नी एकच होता आणि 'हंस' हा एकच वर्ण होता.
परीक्षिता ! त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरूरव्यापासूनच तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला. पुराव्याने अग्नीचा संतानरूपाने स्वीकार करून गंधर्वलोकांची प्राप्ती करून घेतली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०७ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरूरवा म्हणाला - हे सुंदरी ! तुझे स्वागत असो. बैस. मी तुझी काय सेवा करू ? तू माझ्याबरोबर रममाण हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळापर्यंत चालत राहो.

            उर्वशी म्हणाली - हे सुंदरा ! कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही ? कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तेथून दूर होऊ इच्छित नाही. राजन ! जो पुरुष रूप-गुण इत्यादी कारणांमुळे प्रशंसनीय असतो, तोच स्त्रियांना हवाहवासा वाटतो. म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन. परंतु महाराज ! मी आपल्याकडे माझी ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवीत आहे. आपण यांचे रक्षण करावे.

            हे वीरशिरोमणी ! मी फक्त तूप खाईन आणि मैथुनाव्यातिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला विवस्त्र अवस्थेत दिसता कामा नये. मनस्वी पुरुरव्याने "ठीक आहे" असे म्हणून तिची अट मान्य केली. आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला "पुरुषांना मोहविणारे तुझे हे सौंदर्य अद्भूत आहे. तुझा भावही अलौकिक आहे. तर मग हे देवी ! स्वतःहून आलेल्या तुझा कोणता मनुष्य स्वीकार करणार नाही ?"

            तो पुरुषश्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमध्ये तिच्यासह स्वच्छंदपणे विहार करू लागला. उर्वशीच्या शरीरातुन कमलकेसरासारखा सुगंध येत होता. राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत आनंदविहार केला. तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याची शुद्ध हरपून जात असे. उर्वशी नाही, असे पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठविले. "उर्वशीखेरीज मला हा स्वर्ग सुना सुना वाटतो, " असे तो म्हणाला. मध्यरात्रीच्या घोर अंधाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवले होते, ते त्यांनी चोरले. पुत्रासमान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असता त्यांचे ओरडणे उर्वशीने ऐकले. तेव्हा ती म्हणाली, अरेरे ! स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपुसकासारख्या असणाऱ्या या भित्र्या माणसाला आपला पती केल्यामुळे माझा घात झाला. यांच्यावर विश्वास ठेवल्याकारणाने माझा सर्वनाश झाला. लुटारूंनी माझ्या मुलांना पळवून नेले. पहाना ! हा दिवसा तेवढा मर्द असतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिऊन झोपून राहातो. जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा. त्याचप्रमाणे उर्वशीने आपल्या वागबाणांनी राजाला घायाळ केले. तेव्हा रागाने हातात तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला. तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिले आणि तेव्हाच विजा चमकू लागल्या.राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले. (झाली ! ती लगेच त्याला सोडून निघून गेली.)

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आता मी तुला चंद्राच्या पावन वंशासंबंधी सांगतो. या वंशामध्ये पुरुरवा इत्यादी मोठ-मोठ्या पवित्रकीर्ती राजांचे वर्णन आहे.

हजारो मस्तके असणाऱ्या विराटपुरुष नारायणांच्या नाभिसरोवरातील कमळापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांचे पुत्र अत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते. त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनविले. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला. यामुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने बळजबरीने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. देवगुरु बृहस्पतींनी आपली पत्‍नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली. परंतु तो इतका मस्तवाल झाला होता की, त्याने तिला मुळीच परत दिले नाही. याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले. बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरू अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली. देवराज इंद्रानेसुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली. अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला.

त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली. यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भर्त्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. तेव्हा तारा गर्भवती आहे, असे जाणून बृहस्पती तिला म्हणाले. " दष्टे ! माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भ तू ताबडतोब बाहेर टाक. हे स्त्रिये, मी तुला जाळून टाकणार नाही. कारण एक तर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतानप्राप्तिची इच्छा आहे. पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली. तिने सोन्यासारख्या चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला. त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनीही वाटू लागले की, हा आपल्याला मिळावा. आता ते एकमेकांशी "हा तुझा नाही, माझा आहे. " असे म्हणत जोरजोराने भांडू लागले. ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारले असता, लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या मातेच्या दिखाऊ लज्जेने रागावून बोलक म्हणाला, "दुराचारिणी ! तू बोलत का नाहीस ! मला लवकर सांग तुझे कुकर्म. " त्याचवेळी ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारले. तेव्हा तारा हळूच म्हणाली 'चंद्राचा.' म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले. परीक्षिता ! ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव 'बुध' असे ठेवले. कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला.

परीक्षिता ! बुधापासून इलेला पुरूरवा झाला. याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे. एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरूरव्याचे रूप, गुण, उदारता, शील, संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते. ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरूरव्याकडे आली. उर्वशीला जरी मित्रावरूणांच्या शापामुळेच मृत्युलोकात यावे लागले होते, तरीसुद्धा पुरुषश्रेष्ठ पुरुरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणेच सुंदर आहे, असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली. देवांगना उर्वशीला पाहून पुरूरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले. त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. गोड शब्दांत तो म्हणाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०५ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता ! जनकाचा उदावसू, त्याचा नंदिवर्धन, नंदीवर्धनाचा सुकेतू, त्याचा देवरात, देवराताचा बृहद्रथ,बृहद्रथाचा महावीर्य, महावीर्याचा सुधृती, सुधृतीचा धृष्टकेतू, धृष्टकेतूचा हर्यश्व आणि त्याचा मुरु नावाचा पुत्र झाला. मरूचा अप्रतीपक, प्रतीपकाचा कृतिरथ, कृतिरथाचा देवमीढ, देवमीढाचा विश्रुत आणि विश्रुतापासून महाधृतीचा जन्म झाला. महाधृतीचा कृतीरात, कृतिराताचा महारोमा, महारोमाचा स्वर्णरोमा आणि स्वर्गरोमाचा पुत्र झाला हृस्वरोमा. ह्याच हृस्वरोमाचा पुत्र सीरध्वज होता. तो जेव्हा यज्ञासाठी जमीन खणत होता, तेव्हा त्याच्या सीराचा म्हणजे नांगराचा ध्वज म्हणजे टोक लागून सीता प्रगट झाली. म्हणून त्याचे नाव "सीरध्वज" असे पडले. सीरध्वजाचा कुशध्वज, कुशध्वजाचा धर्मध्वज आणि धर्मध्वजाचे कृतध्वज आणि मितध्वज असे दोन पुत्र झाले. कृतध्वजाचा केशिध्जव आणि मितध्वजाचा खांडिक्य झाला. केशिध्वज आत्मविद्येमध्ये प्रवीण होता.

            खांडीक्य कर्मकांड जाणणारा होता. केशिध्वजाला भिऊन तो पळून गेला. केशिध्वजाचा पुत्र भिनुमान आणि भानूमानाचा शतद्युम्न होता. शतम्नापासून शुची, शुचीपासून सनद्वाज, सनद्वाजापासून ऊर्ध्वकेतू, ऊर्ध्वकेतूपासून अज, अजापासून पुरुजित, पुरुजितापासून अरिष्टनेमी, अरिष्टनेमीपासून श्रुतायू, श्रुतायूपासून सुपार्श्वक, सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिलाधिपती क्षेमधीचा जन्म झाला. क्षेमधीपासून समरथ, समरथापासून सत्यरथ, सत्यरथापासून उपगुरु आणि उपगुरूपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला. हा अग्नीचा अंश होता.

            उपगुप्ताचा वस्वनन्त, वस्वनन्ताचा युयुध, युयुधाचा सुभाषण, सुभाषणाचा श्रुत, श्रुताचा जय, जयाचा विजय आणि विजयाचा ऋत नावाचा पुत्र झाला.
            ऋताचा शुनक, शुनकाचा वीतहव्याचा धृती, धृतीचा बहुलाश्व, बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला ‌.
            परीक्षिता ! मिथिल वंशात उत्पन्न झालेले हे सर्व राजे "मैथिल" म्हणविले जातात. हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि गृहस्थाश्रमी असूनसुद्धा सुख दुःख इत्यादी द्वंद्वांपासून मुक्त होते. कारण त्यांच्यावर योगेश्वरांची कृपा होती.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - १

श्रीशुकाचार्य म्हणतात - इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वशिष्ठ म्हणाले की, "राजा ! इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पाहा. " हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वशिष्ठमुनीही इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेले. विचारी निमिने 'जीवन क्षणभंगुर आहे ' , असे समजून गुरु वशिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या ऋत्विजांकरवी यज्ञाला आरंभ केला. जेव्हा गुरु वशिष्ठ परत आले, तेव्हा त्यांनी मिनीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला कि, "स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो. " निमीनेही धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की, "लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडो. " असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पणजोबा वशिष्ठांनीसुद्धा आपल्या शरीराचा त्याग करुन मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमिराजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला, तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली. " हे देवांनो ! जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल, तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे. " देव म्हणाले - 'तथास्तु. ' त्यावेळी निमी म्हणाला "मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्रीभगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार, या भीतीने ते या शरीराशी कधीही संबंध इच्छित नाहीत. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीरालासुद्धा सगळीकडे मृत्यूच मृत्यू आहे. "

            देव म्हणाले - निमीराजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या इच्छेनुसार राहिल. तो तेथे राहून सूक्ष्मशरीराने भगवंतांचे चिंतन करील. पापण्यांच्या उघडझापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल, असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव 'जनक' झाले.देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे 'वैदेह' आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव 'मिथिल' असे पडले. त्यानेच 'मिथिलापुरी' बसविली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०३ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय बारावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - कुशाचा पुत्र झाला अतिथी, त्याचा निषेध. निषधाचा नभ. नभाचा पुंडरिक आणि पुंडरीकाचा क्षेमधन्वा. क्षेमधन्व्याचा देवानीक, देवानीकाचा अनीह, अनीहाचा पारियात्र, पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र झाला वज्रनाभ. हा सूर्याचा अंश होता.

वज्रनाभापासून खगण, खगणापासून विधृती, विधृतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला. हा जैमिनीचा शिष्य आणि योगाचार्य होता. कोसल-देशनिवासी याज्ञवल्क्य ऋषींनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्मयोगाचे शिक्षण घेतले. तो योग्य हृदयाची अज्ञानग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता.

हिरण्यनाभाचा पुष्य, पुष्याचा ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा सुदर्शन, सुदर्शनाचा अग्निवर्ण, अग्निवर्णाचा शीघ्र आणि शीघ्राचा पुत्र मरु झाला. मरूने योगसाधनेने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्याही कलाप नावाच्या गावात राहतो. कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्याचे पुनरुज्जीवन करील.

मरूपासून प्रसुश्रुत, त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमर्षणाचा जन्म झाला. अमर्षणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसाहृ. विश्वसाहृचा प्रसेनजित, प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद्बल झाला. परीक्षिता ! या बृहद्बबलाला तुझ्या पित्याने अभिमन्यूने मारले.

इक्ष्वाकुवंशाचे इतके राजे होऊन गेले. आता येथून पुढे होणाऱ्यांविषयी ऐक.बृहद्लाचा पुत्र बृहद्रण. बृहद्रणाचा उरुक्रिय, त्याचा वत्सवृद्ध, वत्सवृद्धाचा प्रतिव्योम, प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक. दिवाकाचा वीर सहदेव, सहदेवाचा बृहदक्ष, बृहदश्र्वाचा भानुमान, भानुमानाचा प्रतीकाश्व आणि प्रतीकाश्र्वाचा पुत्र होईल सुप्रतिक. सुप्रतीकाचा मरुदेव, मरुदेवाचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा पुष्कर, पुष्कराचा अंतरिक्ष, अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजित होईल. अमित्रजितापासून बृहद्राज, बृहद्राजापासून बर्ही,बर्हीपासुन कृतंजय, कृतंजयापासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल. संजयाचा शाक्य, त्याचा शुद्धोद, शुद्धोदाचा लांगल, लांगलाचा प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक होईल. क्षुद्रकापासून रणक, रणकापासून सुरथ आणि क्षुरथापासून या वंशातील शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल. हे सर्वजण बृहद्लाचे वंशज होतील. इक्ष्वाकूंचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील. कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होऊन जाईल.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०२ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवान श्रीराम आपल्या भावांबरोबर कसे वागत होते ? तसेच भरतादी भाऊ आणि अयोध्यानिवासी प्रजाजन भगवान श्रीरामांशी कशा रीतीने वागत ?

            श्रीशुक म्हणतात - त्रिभुवनपती महाराज श्रीरामांनी आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा केली आणि स्वतः निजजनांना दर्शन देत आपल्या अनुयायांसह ते अयोध्या नगरीची देखरेख करू लागले. त्यावेळी अयोध्यापुरीतील रस्ते सुगंधित जल आणि हत्तीच्या मदरसाने भिजलेले असत. त्यावेळी असे वाटत होते की, ही नगरी आपले स्वामी आलेले पाहून आनंदाने बेभान झाली आहे. तेथील महाल, गोपुरे, सभाग्रहे, विहार, देवालये इत्यादींवर सुवर्णकलश बसविले होते आणि ठिकठिकाणी पताका फडकत होत्या. ते नगर देठांसह सुपारीचे घोष, केळीचे खांब आणि सुंदर वस्त्रांच्या पताकांनी सजविलेले होते. आरसे, वस्त्रे आणि पुष्पमाळांनी तसेच मंगल चित्रांनी आणि पाना-फुलांच्या तोरणांनी संपूर्ण नगरी झगमगत होती. नगरवासीजन आपल्या हातात निरनिराळ्या भेटवस्तू घेऊन भगवंतांजवळ येत आणि त्यांना प्रार्थना करित की, "महाराज ! पूर्वी आपणास वराहरूपाने पृथ्वीचा उद्धार केला होता. आता आपण तिचे पालन करावे. " पुष्कळ वर्षानंतर महाराज आलेले कळले, तेव्हा सर्व स्त्रि-पुरुष त्यांच्या दर्शनाच्या लालसेने घरदार सोडून गच्यांवर चढून अतृप्त नेत्रांनी कमलनयन पाहात पाहात त्यांच्यावर भगवंतांना फुलांचा वर्षाव करीत.

            अशा प्रकारे प्रजेला दर्शन देऊन श्रीराम पुन्हा पुर्वज राजे राहात असलेल्या आपल्या महालात येत असत. त्यामध्ये सर्व प्रकारचे इतके मोठे खजिने होते की ज्यातील संपत्ती कधी संपत नसे. ते मोठमोठ्या बहुमूल्य अशा पुष्कळशा सामग्रींनी सुसज्ज होते. महालांची उंबराची दारे पोवळ्यांनी मडविलेली होती. खांब वैडूर्य मण्यांचे होते. पाचूच्या मोठमोठ्या सुंदर फरश्या होत्या. तसेच स्फटिकाच्या भिंती चमचम करीत असत. रंगी-बेरंगी माळा, पताका, वस्त्रांची आणि मण्यांची चमक, चैतन्याप्रमाणे उज्ज्वल मोती, सुंदर भोगसामग्री, सुगंधी धूप, दीप, तसेच सुगंधी फुलांचे अलंकार यांनी ते महान अतिशय सजविलेले होते. अलंकार यांनी ते महाल अतिशय सजविलेले होते. अलंकारांना सुद्धा विभूषित करणाऱ्या देवतांप्रमाणे असणारे स्त्री-पुरुष तेथे राहात कसत. आत्माराम जितेंद्रय पुरुषांत अग्रगण्य भगवान श्रीराम त्या महालात आपल्या प्राणप्रिय पत्नी श्रीसीतादेवींसह आनंदात राहात असत. सर्व स्त्री-पुरुष ज्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत असतात, तेच भगवान श्रीराम धर्माच्या मर्यादांचे पालन करीत वेळ-काळानुसार भोगांचा उपभोग घेत पुष्कळ वर्षेपर्यंत राहिले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - २

श्री गणेशाय नमः एकदा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीराम रात्रीच्या वेळी गुप्तपणे फिरत असता त्यांनी कोणाचे तरी बोलणे ऐकले. तो पत्नीला म्हणत होता. तू दुष्ट आणि कुलटा आहेस. तू दुसऱ्याच्या घरी राहून आली आहेस. स्त्रीलोभी राम खुशाल सीतेला ठेवून घेऊ देत, परंतु मी तुला पुन्हा घरात घेणार नाही. मूर्ख लोकांना खूष ठेवणे अवघड आहे. जेव्हा श्रीरामांनी अनेकांच्या तोंडून ही गोष्ट ऐकली, तेव्हा त्यांनी लोकापवादाला भिऊन सीतादेवींचा त्याग केला. तेव्हा त्या वाल्मीकींच्या आश्रमात राहू लागल्या. त्यावेळी त्या गर्भवती होत्या. वेळ येताच त्यांनी दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला. वाल्मीकींनी त्यांचे जातकर्मादी संस्कार करून त्यांना कुश व लव अशी नावे ठेवली. परीक्षिता ! लक्ष्मणाला अगंद आणि चित्रकेतू असे दोन पुत्र आणि भारतालाही तक्ष आणि पुष्कल असे दोन पुत्र होते. तसेच शत्रूघ्नालाही दोन पुत्र झाले - सुबाहू आणि श्रुतसेन. भरताने दिग्विजय करताना कोट्यावधी गंधर्वांचा संहार केला. त्याने त्यांची सर्व संपत्ती म्हणून ती श्रीरामाकडे सोपविली. शत्रुघ्नाने मधुवनामध्ये मधुचा पुत्र लवण नावाच्या राक्षसाला मारून तेथे मथुरा नावाची नगरी वसविली. श्रीरामांनी त्याग केलेल्या सीतादेवींनी पुत्रांना वाल्मिकीच्या हाती सोपविले आणि श्रीरामांच्या चरणकमलांचे ध्यान करीत भूमिप्रवेश केला. ही वार्ता ऐकून श्रीरामांनी बुद्धीपुर:सर शोकावेग आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु सीतेच्या गुणांची आठवण होऊन ते तो आवरू शकले नाहीत. हा स्त्री आणि पुरुषाचा संबंध सगळीकडे असाच दुःखाला कारणीभूत आहे. श्रेष्ठ लोकांनाही तो दुःख देतो, मग गृहासक्त, विषयी पुरुषांच्यासबंधी काय सांगावे ?

            यानंतर श्रीरामांनी ब्रह्मचार्य धारण करून तेरा हजार वर्षेपर्यंत अखंड अग्निहोत्र धारण केले. त्यानंतर आपले स्मरण करणाऱ्या भक्तांच्या हृदयात, दंडकारण्यातील काटे लागलेले आपले कोमल चरण ठेवून ते ज्योतिर्मय आत्मरूपात अंतर्धान पावले.

            भगवंतांच्या सारखा प्रतापशाली दुसरा कोणीही नाही, मग त्यांच्यापेक्षा वरचढ कसा असू शकेल ? देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्यांनी हा अवतार धारण केला होता. अशा स्थितीत श्रीरामांच्या बाबतीत ही काही गौरवाची गोष्ट नाव्हे की, त्यांनी शास्त्रास्त्रांनी राक्षसांना मारले किंवा समुद्रावर सेतू बांधला. तसे पाहाता, शत्रूंना मारण्यासाठी त्यांना वानरांचे साहाय्य घेण्याची तरी काय आवश्यकता होती ? ही सर्व त्यांची लीलाच आहे.

            ज्यांचे निर्मल यश सर्व पाप नाहीसे करणारे असून ते दिग्गजांचे काळे शरीसुद्धा आज उजळ करते, मोठ-मोठे ऋषी राजांच्या सभेमध्ये ज्याचे गायन करतात, स्वर्गातील देवता आणि पृथ्वीवरील राजे आपले किरीट जेथे टिकवतात, त्या श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांना मी शरण जात आहे. ज्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यांना स्पर्श केला, त्यांच्या सहवास घेतला आणि अनुयायित्व स्वीकारले ते सगळे अयोध्यानिवासीसुद्धा त्याच लोकी गेले, जेथे योगी योगसाधनेने जातात. राजा ! जो मनुष्य आपल्या कानांनी श्रीरामांचे चरित्र ऐकतो, त्याला सरळता, कोमलता आदी गुणांची प्राप्ती होते. आणि तो सर्व कर्मबंधनापासून मुक्त होतो.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...