श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरींच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षीसह, बलीचा यज्ञ पूर्ण केला. परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले. यानंतर प्रजापतींचे स्वामी ब्रह्मदेवांनी देवर्षी, पीतर, मनू, दक्ष,भृगू, अंगिरा, सनत्कुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि अदिती यांच्या प्रसन्नतेसाठी, तसेच सर्व प्राण्यांच्या अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला.
परीक्षिता ! वेद, सर्व देवता, धर्म, यश, लक्ष्मी, मंगल, व्रत, स्वर्ग आणि मोक्ष, या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परम कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले. त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवांच्या संमतीने, लोकपालांसह वामनांना सर्वाच्या पुढे विमानात बसविले आणि त्यांना आपल्याबरोबर स्वर्गात नेले. इंद्राला एक तर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्रांच्या शौर्याची जोड मिळाली. सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यलक्ष्मी त्याची सेवा करू लागली. यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला. ब्रह्मदेव, शंकर, सनत्कुमार, भृगु इत्यादी मुनी, पितर, सर्व चराचर, सिद्ध आणि विमानातील देवगन, भगवंतांच्या या परम अद्भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत आपापल्या लोकी गेले आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली.
परीक्षिता, मी तुला भगवंतांची ही सर्व लीला ऐकविली. ही ऐकणाऱ्याची सर्व पापे नष्ट होतात. भगवंतांच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे. जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो, तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो. भगवंतांच्या संबंधी मंत्रदृष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदांमध्ये म्हटले आहे की, जो भगवंतांच्या महिम्याचा अंत जाणू शकेल, असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. अद्भूत लीला करणाऱ्या देवाधिदेव वामनांच्या अवतारचरित्राचे जो श्रवण करतो, त्याला परम गती प्राप्त होते. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जेथे जेथे भगवंतांच्या या लीलेचे किर्तन होते, ते कर्म सफल होते.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा