श्री गणेशाय नमः हा जीव अज्ञानी आहे. आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्यांचे हे अज्ञान नष्ट होते, तेच माझे परम गुरु आपण, माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. असे अग्नीमध्ये तापविल्याने सोन्याचांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते, त्याचप्रमाणे यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्वशक्तीमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परम गुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरू व्हा. सर्व देव, गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली, तरीसुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशाइतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. जसा एखादा अंधळा अंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवितो, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरु बनवितो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रयांचे प्रेरक आहात. आत्मतत्त्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरु केले आहे. अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो, ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररुपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता, त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरू, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हेसुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टीचा त्यांना पत्ताच नाही. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणार्या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशी प्रार्थना करणार्या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्त्वाचा उपदेश केला. भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला 'मत्स्यपुराण' म्हणतात. ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले, तेव्हा भगवंतांनी हायव्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापांतून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रीस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती, त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात
घेऊन केला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्त्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीलामत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा