१९ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून, त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. वेद, उपवेद, नियम,यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराणसंहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्मफळ भस्म करून टाकला, ते महात्मे,याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकात पोहोचले होते ते, अशा सर्वांनी भगवंताची चरणांना वंदन केले. भगवंतांच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तीभावाने त्यांची स्तुती केली. परीक्षिता, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय. जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाला, दिव्य सुगंधयुक्‍त उटी, सुगंधित धूप, दीप,लाह्या, अक्षता, फळे, अंकुर, भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जयजयकार, मृत्य, वाद्ये, गाणी, शंखनाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. त्यावेळी ऋक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व देशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली.
            दैत्यांनी पाहिले की, तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणार्‍या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली. त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले." अरे हा सामान्य ब्राह्मण नाही. हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णु आहे. ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले, तेव्हा या शत्रूने ब्रह्मचाऱ्याचा वेष धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर (मात्र) आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत. शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसेच ते ब्राह्मणभक्त असून दयाळू आहेत. म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे, हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे." असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली. परीक्षिता, बलीची इच्छा नसतानासुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल, पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...