२१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने तो म्हणाला.
बली म्हणाला - हे पवित्रकीर्ती देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवितो, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही. दारिद्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही. जितका मी माझ्या अपकीर्तीला भितो. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे. कारण तसा दंड माता, पिता, भाऊ आणि सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परम गुरु आहात. कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता,बल, इत्यादींच्या मदाने आंधळे होतो, तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यांत अंजन घालता. आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात, तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणार्‍या पुष्‍कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे. अशा ज्यांच्या आनंद लीला आहेत, त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरूनपाशाने बांधले. याबद्दल मला लज्जा वाटत नाही की, कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. प्रभो, माझे आजोबा प्रल्हाद यांची किर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्यकशिपू याने त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले. परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली. त्यांनी विचार केला की, हे शरीर घेऊन काय करावयाचे आहे ? हे तर एक-ना-एक दिवस आपली साथ सोडणारच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत, त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे ? पत्नीपासून सुद्धा कोणता लाभ ? ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे. मरणार तर आहोतच; मग घराचा मोह कशाला ? या सर्व वस्तुत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणेच होय. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी, संत श्रेष्ठ प्रल्हाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरणकमलांना शरण गेले. खरे तर, आपण लौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात, हे ते जाणत होते. तसे पाहू गेले असता आपण माझेसुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राजलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले आहे, हे त्याला समजत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रिय भक्त प्रल्हाद तिथे येऊन पोहोचले. बलीने पाहीले की, आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकर्ण आणि हात लांबसडक आहेत. ते सुंदर आणि उंच आहेत. तसेच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पीतांबर धारण केला आहे. बली यावेळी वरूणापाशीमध्ये बांधलेला होता; म्हणून प्रल्हाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे, तशी पूजा करू शकला नाही, म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. लाजून त्याने मान खाली घातली. केवळ मस्तक लववून त्याने त्यांना नमस्कार केला. प्रल्हादांनी पाहिले की, भक्तवत्सल भगवान तेथेच उभे आहेत आणि सुनंद, नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत. प्रल्हादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलंकित झाले, डोळ्यात अश्रू उभे राहिले. आनंदपूर्ण हृदयाने, मस्तक हलवून, ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...