स्कन्ध दहावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्कन्ध दहावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मे २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संकट येईल, या भीतीने ते मनोमन भगवंतांना शरण गेले. पूतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती. लहान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते. कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्त्यांमध्ये लहान मुले मारण्यासाठी फिरत असे. जेथील लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण इत्यादी करीत नाहीत, तेथेच राक्षसांचे फावते. आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पुतना इच्छेनुसार रूपे धारण करीत होती. एके दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वत:ला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळात शिरली. तिने अबाड्यावर मोगर्‍याची वेणी माळली होती. सुंदर वस्त्रे परिधान केली होती. जेव्हा तिची कर्णफुले हलत असत, तेव्हा त्यांच्या चमकन्याने तोंडावर आलेले तिचे कुरूळे केस शोभिवंत दिसत होते. तिचे नितंब आणि स्तन उभार होते, तर कंबर बारीक होती. आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती. हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रुपवती रमणीला पाहून गोपींना वाटते की, जणू स्वत: लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली आहे.
            बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधीत सहजपणे नंदांच्या घरात शिरली. तेथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले. परंतु राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो, त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवले होते. चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे, हे जाणून आपले डोळे बंद केले. जसे एखाद्याने नकळत, झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पुतनेने उचलून मांडीवर घेतले.
            मखमली म्यानात लपवलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पुतनेचे हृदय क्रूर होते. परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती. रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले, पण तिच्या सौंदर्यप्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहातच राहिल्या. इकडे तिने त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला. त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष लावलेले होते. तेव्हा भगवंतांनी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणसह तिचे दूध प्राशन केले. तिची सर्व मर्मस्थाने खिळखिळी झाली. "अरे सोड ! सोड ! पुरे कर ! "असे ओरडत वारंवार आपले हात-पाय आपटीत ती रडू लागली. तिने डोळे फिरवले आणि तिचे शरीर घामाने थबथबले. तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरांसह पृथ्वी आणि ग्रहांसह अंतरिक्ष डगमगू लागले. सातही पाताळे आणि दिशा दुमदुमून गेल्या. विजा कोसळतात की काय, या शंकेने पुष्कळसे लोक जमिनीवर कोसळले. परीक्षिता ! अशा प्रकारे पुतनेच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की, ती गतप्राण झाली. ती मूळ रूपाने प्रकट झाली. केस विस्कटले. इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन वृत्रासूर जसा पडला होता, तशीच ती सुद्धा (बाहेर) गोठ्यात हातपाय पसरून पडली.

पूतनेच्या शरीराने खाली पडता पडता सुद्धा सहा कोस अंतरातील झाडे उन्मळून पडली. ही तर मोठीच अद्भुत घटना घडली. पूतनेचे शरीर अत्यंत भयानक होते. तिचे तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते. तिच्या नाकपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते. लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरले होते. डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे खोल, नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर, हात, जांघा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते. तसेच पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होते. पूतनेचे ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले. तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय, कान आणि डोके अगोदरच फुटल्यासारखे झाले होते. जेव्हा गोपींनी पाहिले की, बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत, तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले.
            यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचे शेपूट अंगावरून फिरविणे इत्यादी उपायांनी त्या बाळाचे सर्वप्रकारे (दुष्ट शक्तींपासून) रक्षण केले. त्यांनी प्रथम त्याला गोमुत्राने स्नान घातले. नंतर सर्व अंगाला गायीच्या अंगावरील धूळ लावली आणि त्यानंतर बाराही अंगांना भगवंतांच्या नामांनी शेण लावून पीडाशमन केले. त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करन्यास केले. तसेच बालकाच्या अंगावर बिजन्यास केले.
            गोपी म्हणू लागल्या- "अजन्मा भगवान तुझ्या पायांचे मणिमान गुडघ्यांचे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, हयग्रीव पोटाचे, केशव हृदयाचे, ईश वक्ष:स्थळाचे, सूर्य कंठाचे, विष्णू हातांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करोत. तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहात, गदाधारी श्रीहरी पाठीमागे, धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूंना, शंखधारी उरुगाय चारी कोपऱ्यांमध्ये उपेंद्र वर, गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूंनी रक्षणासाठी राहोत. हृषीकेश इंद्रियाचे आणि नारायण प्राण्यांचे रक्षण करोत. श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत. पृश्निगर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत. खेळताना गोविंद रक्षण करोत, निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत. चालताना वैकुंठ आणि बसलेल्यावेळी श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाचे वेळी तुझे रक्षण करोत. डाकिनी, राक्षसी, कूष्मांडा इत्यादी बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच्च, यक्ष, राक्षस आणि विनायक, कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका इत्यादी, शरीर, प्राण तसेच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद अपस्मार इत्यादी रोग, स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्धग्रह आणि बालग्रह इत्यादी सर्व अनिष्ठ घटक, भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावोत.

श्रीशुकाचार्य म्हणतात- अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या गोपींनी रक्षामंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दुध पाजून पाळण्यात निजविले. त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुरेहून गोकुळात पोहोचले. तेव्हा पूतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले. ते म्हणू लागले, वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल. किंवा हेही शक्य आहे की, वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील. कारण ते असे म्हणाले होते, तसेच संकट येथे दिसून आले. तोपर्यंत वज्रवासींनी कुर्‍हाडींनी पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेउन एकेक अवयव चितेवर ठेवून जाळून टाकले. कृष्णाने दूध प्याल्यामुळे ज्याची सर्व पापे तात्काळ नष्ट झाली, असा तो तिचा देह जळत असता, त्यातुन धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला. पूतना एक राक्षसी होती. लोकांच्या लहान मुलांना मारणे आणि त्यांचे रक्त पिणे हेच तिचे काम होते. श्रीकृष्णांनासुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेनेच स्तनपान करविले होते. तरीसुद्धा तिला सद्गगती मिळाली. तर मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात, त्यांच्यासंबंधी काय बोलावे ? सर्वांना वंदनीय असणाऱ्या, ब्रह्मदेवादी देवांनासुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणांनी पुतणीचे शरीर दबून, भगवंतांनी तिचे स्तनपान केले होते. जरी ती राक्षसी होती, तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळाली. तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत (ब्रह्मदेवाने वासरे व गोपबालक यांना लपवून ठेवलेल्या वेळी) प्रेमाने प्याले, त्या गाई आणि मातांची गोष्ट काय सांगावी ? पुत्रप्रेमाने आपणहून पाझरणारे ज्यांचे दूध भगवंत भरपूर प्याले, त्यांना भगवान देवकीनंदनांनी मोक्षापर्यंत सर्व काही दिले. राजन ! ज्या गोपी व गाई नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहात होत्या, त्या अज्ञानजनित संसारचक्रात कधीही अडकू शकत नाहीत.
            नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला, तेव्हा, " हे काय आहे ? हा सुगंध कोठून येत आहे ?" असे म्हणत ते व्रजामध्ये पोहोचले. तिथे गोपांनी त्यांना पूतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितला. पूतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे, हे ऐकून ते लोक अतिशय आच्श्रर्यचकित झाले. परीक्षिता ! मृत्युच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला, उदार नंदांनी उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगून ते अतिशय आनंदित झाले. हा 'पूतनामोक्ष' भगवान श्रीकृष्णांची अद्भुत बाल-लीला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे श्रवण करतो, त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय पाचवा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - उदार नंदमहाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले. नंतर वेदवेत्त्या ब्राह्मणांना बोलावून पुण्यावाचन करून आपल्या पुत्राचा जातकर्म-संस्कार केला. त्याजबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली. त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गाई दान दिल्या. तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे सात ढीग दान दिले. कालगतीने (नवीन पाणी, अशुद्ध भूमी इ.) स्नानाने (शरीर इ. ), धुण्याने (वस्त्रे इ.), संस्कारांनी (गर्भ इ.), तपश्चर्येने (इंद्रिये इ.),यज्ञाने ( ब्राह्मण इ.), दानाने (धन, धान्य इ.) आणि संतोषाने (मन इ.)द्रव्ये शुद्ध होतात. आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. त्यावेळी ब्राह्मण, मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक, वंशाचे वर्णन करणारे व स्तुतिपाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले. त्यामध्ये सुगंधित द्रव्ये शिंपडली गेली. त्यांना रंगी-बेरंगी ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानाच्या तोरणांनी सजविले गेले. गाई, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद-तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गेरूने रंगविले. तसेच मोरपंख, फुलांचे हार, तऱ्हेतऱ्हेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. राजा ! सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदांच्या घरी आले.

यशोदेला पुत्र झाला, हे ऐकून गोपींनासुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्रे अलंकार आणि डोळ्यांत काजळ वगैरे घालून त्या नटल्या. गोपींची मूखकमले नुकत्याच लावलेल्या कुंकूरुपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती. मोठमोठे नितंब असलेल्या त्या भेटवस्तू घेऊन लगबगीने यशोदेकडे गेल्या. त्यामुळे त्यावेळी त्यांची वक्ष:स्थळे हलत होती. गोपींच्या कानांमध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडले झगमगत होती. गळ्यामध्ये सुवर्णहार चमचम करीत होते. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुले वाटेत ओघळून पडत होती. हातामध्ये बांगड्या चमकत होत्या. लगबगीमुळे त्यांच्या कानातील कुंडले, वक्ष:स्थळे आणि हार हलत होते. अशा प्रकारे नंदांच्या घरी जाताना त्यांची आगळीच शोभा दिसत होती. त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की, " भगवान याचे दीर्घकाळ रक्षण करो. " असे म्हणून हळद-तेल मिश्रित पाणी आजुबाजुच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या.
            सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजाच्या व्रजामध्ये प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी निरनिराळी मंगल वाद्ये वाजविण्यात येऊ लागली. आनंदाने बेहोष होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गाई दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य इत्यादी कलांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना नंदांनी आनंदाने त्यांनी त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे, असे त्यांना वाटत होते. नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्रे, हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती. परिक्षिता ! त्याच दिवसापासून नंदाच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे तसेच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थळ बनले.
            परीक्षिता ! काही दिवसांनंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या गोपांवर सोपवून नंद कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले. आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे, असे जेव्हा वसुदेवांना समजले, तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वसतिस्थानावर ते गेले. वसुदेवांना पाहाताच नंद ताबडतोब उठून उभे राहिले. जणू काही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले. हे राजा ! नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर-सत्कार केला. ते आरामात बसले, त्यावेळी वासुदेवांचे चित्त आपल्या पुत्रांकडे लागले होते. नंदांनी खुशाली विचारून ते म्हणाले.

(वसुदेव म्हणाले)- " बंधो ! तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झाले नव्हते. एवढेच काय, आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती. पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भेट झाली, ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पुनर्जन्मच समजले पाहिजे. जसे नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांचेसुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहाणे संभवत नाही. हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांसह ज्या महावनात राहातोस, तेथे पाणी, गवत आणि झाडे वेली भरपूर आहेत ना ? ते जनावरांना अंनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहे ना ? बंधो ! माझा मुलगा त्याच्या (रोहिणी) आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहात आहे. त्याचे पालन-पोषण तू आणि यशोदा करीत आहात. म्हणून तो तुम्हांलाच आपले माता-पिता मानीत असेल, तो सुखरूप आहे ना ? ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते, तोच धर्म, अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो, तो धर्म, अर्थ आणि काम हितकारक नाही.
            नंद म्हणाले - कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. शेवटी एक मुलगी वाचली होती, तीसुद्धा स्वर्गाकडे गेली. प्राण्यांचे सुख-दुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते यात काहीही संशय नाही.भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे. जीवनाच्या सुख-दुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो, ते ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही.
            वसुदेव म्हणाले - बंधो ! तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास. आपली भेटही झाली. आता तू येथे अधिक दिवस राहू नकोस. कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत.
            श्रीशुक म्हणतात - वसुदेव जेव्हा असे म्हणाले, तेव्हा नंदादी गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या छकड्यावर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय चौथा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! जेव्हा वसुदेव परत आले, तेव्हा नगरच्या बाहेरील आणि आतील सर्व दरवाजे आपोआपच पहिल्याप्रमाणे बंद झाले. यानंतर बालकांच्या रडण्याचा आवाज ऐकून द्वारपाल उठले. ते ताबडतोब कंसाकडे गेले आणि देवकीला मुल झाल्याचे त्यांनी सांगितले. भयभीत कंस याच गोष्टीची वाट पाहात होता. ते ऐकताच तो ताबडतोब पलंगावरून उठून लगबगीने सुतिकाग्रहाकडे गेला. हा आपल्या काळाचाच जन्म आहे, असे समजून तो व्याकूळ झाला होता आणि यामुळे केस विस्कटलेल्या अवस्थेतच तो अडखळत चालला होता. तेथे येताच सती देवकी दीनवाणी होऊन रडत रडत त्या आपल्या भावाला म्हणाली, "हे माझे हित चिंतिणाऱ्या बंधो ! ही कन्या तुला सूनेप्रमाणे आहे. शिवाय स्त्रीला मारणे मुळीच योग्य नाही. हे बंधो ! तू माझ्या पुष्कळ अग्नीसमान तेजस्वी बालकांना दैववशात मारले आहेसच.निदान आता ही कन्या तरी मला दे. हे राजा, माझी अनेक मुले मारल्यामुळे दुःखी झालेली मी तुझी बिचारी धाकटी बहिण आहे. म्हणून हे बंधो ! मला अभागिनीला हे शेवटचे मूल तरी दे. "
            श्रीशुक म्हणतात - मुलीला कवटाळून देवकीने अत्यंत दिनपणे रडत रडत अशी याचना केली. परंतु दुष्ट कंसाने तिला अपशब्द बोलून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली. आपल्या त्या नवजात भाचीचे पाय पकडून कंसाने तिला जोराने एका खडकावर आपटले. त्याच्या हृदयातील प्रेमाला जणू स्वार्थाने मुळासकट उपटून टाकले होते. परंतु श्रीकृष्णाची ती धाकटी बहिण त्याच्या हातातून निसटून आकाशात ताबडतोब आकाशात गेली आणि तीच आपल्या आठ हातात शस्त्रास्त्रे घेतलेली मोठी देवी झालेली त्याला दिसली. ती दिव्य माळा, वस्त्रे, चंदन आणि रत्नमय अलंकारांनी विभूषित होती. तिच्या हातामध्ये धनुष्य, त्रिशूळ,बाण,ढाल, तलवार, शंख, चक्र आणि गदा ही आठ आयुधे होती. सिद्ध, चारण, गंधर्व,अप्सरा, किन्नर आणि नाग पुष्कळशा भेटवस्तू तिला अर्पण करून तिची स्तुती करीत होते.देवी कंसाला म्हणाली. "अरे मुर्खा ! मला मारून तुला काय मिळणार आहे ? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कोठेतरी जन्मला आला आहे. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नकोस. असे म्हणून भगवती योगमाया तेथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली.

देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याचवेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला. अग ताई ! अहो भावोजी ! अरेरे ! मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो, त्याचप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली.मी इतका दुष्ट आहे की, माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल, बरे ! मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. फक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली ! तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणूनच ते सर्वकाळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही. त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे, हे चालूच असते. परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही.
            जे लोक ते तत्त्व जाणत नाहीत, ते या शरीरालाच आत्मा समजतात यामुळेच पुत्रादी देहांशी सयोग व वियोग होतो, तेव्हा (सुख-दुःखरुपी) संसारातून सुटका होत नाही. म्हणून हे ताई ! मी जरी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस; कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपापल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असे मानतो की, "आपण मरणारा आहे किंवा मारणारा आहे,) तोपर्यंत शरीराच्या जन्म-मृत्यूचा अभिमान धरणारा हा अज्ञानी जीव पीडा देणारा वा पीडा भोगणारा होतो. माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी; कारण तुम्ही सजन असून दिनांचे रक्षण करणारे आहात. असे म्हणून व कंसाने देवकी-वसुदेवांचे पाय धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. यानंतर त्याने योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले. कंसाला पश्चाताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याचवेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले. "हे कंसा ! तू म्हणतोस ते खरे आहे. अज्ञानामुळेच जीव, शरीर इत्यादींना मी असे समजतो. यामुळेच आप-परभाव निर्माण होतो. आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह आणि मदाने लोक आंधळे होतात. आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसऱ्या वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत, याचे त्यांना भान राहात नाही. "

श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपटभावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला. ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि योगमायेने जे सांगितले होते, ते सर्व त्यांना कथन केले. कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते.दैत्य असल्यामुळे स्वभावत:च ते देवांचा द्वेष करीत. आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला म्हणाले. "भोजराज ! असे असेल तर आम्ही आजच शहरे, गावे, गवळ्यांच्या वस्त्या इत्यादी ठिकाणी जेवढी लहान मुले असतील, मग ती दहा दिवसांच्या आतील किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो. रणांगनाला भिणारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत ? ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकूनच नेहमी घाबरलेले असतात. जेव्हा आपण त्यांच्यावर बाणवर्षाव करून त्यांना घायाळ करता, तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव पळू लागतात. काही देव तर आपली शस्त्रास्त्रे जमिनीवर टाकून हात जोडून दिनपणा प्रगट करू लागतात. तर काही जण शेंड्या सोडून व कासोटे फेडून आपल्याला शरण येतात आणि म्हणतात की, " आम्ही भयभीत झालो आहोत. आमचे रक्षण करा. " जे शत्रू शस्त्रास्त्रप्रयोग विसरले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडले आहेत, जे भयभीत झाले आहेत, जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ज्यांची धनुष्ये मोडली आहेत किंवा ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरवली आहे, अशांना आपण मारीत नाही. जेथे भांडण-तंटा नसेल तेथेच देवांचे शौर्य. रणभूमीच्या बाहेरच ते फुशारकी मारतात. ते, तसेच एकांतवासात राहाणारा विष्णू , वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे ? आमचे मत असे आहे की, असे असले तरी देवांची उपेक्षा करता कामा नये; कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट करतो आणि मग असाध्य होतो. किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूची आधी उपेक्षा केली तर तो आपले सामर्थ्य वाढवितो आणि मग त्याचा प्रभाव पराभव करणे अवघड होऊन बसते. देवांचा आधार विष्णू आहे आणि जेथे सनातनधर्म आहे, तिथे तो राहातो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ; ही सनातन धर्माची मुळे होत. म्हणून हे भोजराज ! वेदवेत्ते ब्राह्मण, तपास्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादी हविद्रव्य देणाऱ्या गाईंचा आम्ही संपूर्ण नि:पात करू. ब्राह्मण, गाई, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रियदमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीरे आहेत. तो विष्णुच सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे. परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहातो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे, हाच त्याला मारण्याचा उपाय आहे.
            श्रीशुक म्हणतात - अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला - मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संतपुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला. त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त, विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता; म्हणूनच त्यांनी संताचा द्वेष केला. जे लोक संतांचा अनादर करतात, त्यांचे ते कुकर्म त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, यह-परलोक, आशा-आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय तिसरा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात- नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते, आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे शुभ होते, (त्यावेळी भगवान प्रगट झाले.)
            त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या, नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते, सरोवरांमध्ये कमळे उमलली होती, वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या, त्यांवर पक्षी किलबिल करीत होते, तर कुठे भ्रमर गुणगुणत होते, पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहात होता, ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, ते यावेळी प्रज्वलित झाले.
            असुरांचा नाश इच्छिणाऱ्या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली, तेव्हा स्वर्गामध्ये दैवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया आप्सरांबरोबर नाचू लागल्या. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सोम्य गर्जना करू लागले. जनार्दनांच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र ! सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णु देवरुपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा, तसे प्रगट झाले.
            वसुदेवांनी पाहिले की, त्यांच्यासमोर एक अद्भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात आहेत. त्याने हातांमध्ये शंख, गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर झळकत आहे. मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरुळे केस चमकत आहेत. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता. पुत्राच्या रूपाने स्वत: भगवंतच आले आहेत, असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. श्रीकृष्णांचा अवतार झाला, या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याचवेळी ब्राह्मणांना दहा हजार गाई दान देण्याचा संकल्प केला. परीक्षिता ! भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भीती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले.

आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरूषोत्तम आहात, हे मी जाणले. आपण केवलस्वरूप अनुभवगम्य व आनंदस्वरूप आहात. आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात. आपणच स्वर्गाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच आसूनही नव्याने प्रविष्ट झालात, असे वाटते. जोपर्यंत महत्तत्त्व इत्यादी कारणतत्त्वे वेगवेगळी असतात, तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते, पण जेव्हा ती इंद्रिये इत्यादी सोळा विकारांशी एकरूप होतात, तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यांत ती प्रविष्ट झाली आहेत असे वाटते. परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाहीत. कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे, तीमध्ये ती अगोदरपासूनच असतात. त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही. त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यामध्ये असता, तरीसुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही. कारण आपण सर्व काही आहात, सर्वांच्या अंतर्यामी आणि आत्मस्वरुप आहात. गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही. म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत. तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल ? जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो, तो अज्ञानी होय; कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वाग्विलासाखेरीज दुसरे काहीही नाही, हे सिद्ध होते. विचारांतून ज्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध होत नाही, परंतु जी बाधित होते, तिला खरे समजनारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल ? हे प्रभो ! आपण स्वतः सर्व क्रिया, गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात, असे म्हणतात. ही गोष्ट सर्वसत्ताधीश परब्रह्य अशा आपल्याशी विसंगत नाही. कारण तीन्ही गुणांचे आश्रय आपणच आहात. म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो. आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्त्वमय शुक्लवर्ण (पोषणकारी विष्णूरूप) धारण करता, उत्पत्तीसाठी रज:प्रधान रक्तवर्ण (सृजनकारी ब्रह्मरूप) आणि प्रलयाच्या वेळी तमोगुणप्रधान कृष्णवर्ण (संहारकारी रुद्ररूप) यांचा स्वीकार करता. प्रभो ! आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात. या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या आधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत. आपण त्या सर्वांचा संहार कराल. हे देवाधिदेवा ! दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले. आता त्याचे दूत, तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आताच्या आता हातात शस्त्र घेऊन धावत येईल.
            श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! इकडे देवकीने पाहिले की, आपल्या पत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भीती वाटली. परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली.

देवकी म्हणाली - प्रभो ! वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे, जे ब्रह्म, ज्योति:स्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे, जे अनिर्वचनीय, निष्क्रिय व फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते, बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजेच विष्णू, आपण स्वतः आहात ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य-दोन परार्ध वर्षे-समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात, पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात, कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते, त्यावेळी एकमेव आपणच शेष (शिल्लक) राहता. म्हणूनच आपले नाव "शेष" असेही आहे. हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो ! निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागांत विभागलेला असा जो हा महान काल आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे, ती आपली एक लीला आहे. आपण सर्वशक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात. मी आपणास शरण आले आहे. प्रभो ! हा जीव मृत्यूरूप कराल सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे. परंतु याला कोठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही. आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणारविंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेत आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा याला घाबरून पळून गेला आहे. प्रभो ! आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात; म्हणून आपण भ्यालेल्या आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करावे. आपले हे चतुर्भुज दिव्यरूप ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणार्‍या माणसांसमोर हे प्रगट करू नका. हे मधुसुधना ! तुझा जन्म माझ्यापासून झाला, ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझे धैर्य खचू लागले आहे. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे. हे विश्‍वात्मक ! आपले हे शंख, चक्र, गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. जसे एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परम पुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात, ही आपली अद्भुत मनुष्यलिलाच नाही का ?
            श्रीभगवान म्हणाले- हे माते ! स्वायंभुव मन्वन्तरामध्ये पूर्वजन्मी तू पृश्नी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. जेव्हा ब्रह्मदेवांनी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रियनिग्रह करून तीव्र तपश्चर्या केली. तुम्ही पाऊस, वारा,ऊन, थंडी, उन्हाळा इत्यादी त्या त्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुऊन टाकले. तुम्ही दोघे कधी वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनच राहिलात. माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केलीत. माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्षें निघून गेली. हे पुण्यमयी देवी ! त्या वेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो; कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते. त्या वेळी तुम्हा दोघांची अभिलाशा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो आणि 'वर मागा' म्हणतात तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात. त्या वेळेपर्यंत विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता. तुम्हांला संततीही नव्हती. म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही. माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हांला प्राप्त झाला आणि मी तिथून निघून गेलो. आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले.

या जगात स्वभाव, औदार्य तसेच अन्य कुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी 'पृश्निगर्भ' या नावाने प्रख्यात झालो. नंतर पुढील जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्या वेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो. माझे नाव उपेन्द्र होते. शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणत. हे माते ! तुमच्या या तिसऱ्या जन्मातसुद्धा मी त्याच रुपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो. माझे वचन नेहमी सत्य असते.
            मी तुम्हांला माझे हे रुप यासाठी दाखविले की, तुम्हांला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे. मी जर असे केले नसते. तर केवळ मनुष्यशरीरावरून माझा अवतार ओळखू आला नसता. तुम्ही दोघांनी माझा अवतार ओळखू आला नसता. तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा. अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हांला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल.
            श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता-पिता (त्यांच्याकडे) पाहात असतानाच त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले. तेव्हा वसुदेवांनी भगवंतांच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सूतिकाग्रहाच्या बाहेर निघावे, असे ठरविले. त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली. त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रयांच्या वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते. परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाज्यांजवळ पोहोचले, तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे. त्यावेळी ढग हळू-हळू गर्जना करीत वर्षाव करीत होते. म्हणून शेष आपल्या फणांनी पाऊस अडवित भगवंताच्या पाठोपाठ चालू लागला. त्या दिवसात वारंवार पाऊस पडत होता, त्यामुळे यमुनेचे पाणी वाढले होते. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता. पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता. शेकडो भयानक भोवरे निर्माण झाले होते. तरीही ज्याप्रमाणे सितापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती, त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली. नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहीले की, सगळे गोप गाढ झोपी गेले आहेत. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावर झोपविले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आले. कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरूणावर झोपविले आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. तिकडे नंदपत्नी यशोदेला मुल झाल्याचे समजले. परंतु दमल्यामुळे व योगमायेने मोहित झाल्यामुळे ते मुल पुत्र की कन्या हे समजले नाही.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ मे २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय दुसरा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - बलवान कंसाने जरासंधाच्या साहाय्याने प्रलंबासुर, बकासुर, चाणूर, तृणावर्त, अघासुर, मुष्टिक, अरिष्टासुर, द्विविद, पूतना, केशी,धेनुक, बाणासुर, भौमासुर इत्यादी पुष्कळसे दैत्य व राजे यांना हाताशी धरून तो यादवांचा संहार करू लागला.
            तेव्हा ते भयभीत होऊन कुरु, पंचाल,केकय, शाल्व, विदर्भ निषध, विदेह आणि कौशल या देशांत जाऊन राहिले. काही नातलग वरवर त्याच्या मनासारखे वागून त्याची सेवा करीत राहिले. कंसाने जेव्हा एक-एक करून देवकीची सहा मुले मारली, तेव्हा देवकीच्या सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले. त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भीतीने दुःखही झाले.
            मलाच आपले सर्वस्व मानणारे यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली. "देवी ! कल्याणी ! तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी रोहिणी राहात आहे. त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीने गुप्त जागी राहात आहेत. सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव. हे कल्याणी ! नंतर मी माझ्या सर्व शक्तीसह देवकीचा पुत्र होईल आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. सर्व वर देण्यास समर्थ असणाऱ्या तुला माणसे आपल्या सर्व कामना पूर्ण करणारी समजून धूप, दीप, निवेद्य इत्यादी अर्पण करून तुझी पूजा करतील.लोक पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी तुझी स्थापना करतील आणि तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडीका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका इत्यादी अनेक नावे ठेवतील. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषाला लोक जगात 'संकर्षण' म्हणतील,तो लोकरंजन करणारा असल्याने त्याला 'राम' म्हणतील आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे 'बल' सुद्धा म्हणतील.
            जव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने "जशी आपली आज्ञा" असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ती पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला, तेव्हा तेथील नागरिक दु:खी अंत:करणाने देवकीचा गर्भपात झाला, असे म्हणू लागले.

            भक्तांना अभय देणारे विश्वरूप भगवान वसुदेवांच्या मनामध्ये आपल्या सर्व कलांसह प्रविष्ट झाले. भगवंतांचे तेज धारण केल्यामुळे वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोकांचे डोळे दिपून जात. त्यांना कोणीही जिंकू शकत नव्हते. जगाचे मंगल करणाऱ्या, सर्वात्मक व आत्मरुप भगवंतांच्या अंशाला वसुदेवांनी मनाने प्रदान केल्यानंतर जशी पूर्वदिशा चंद्राला धारण करते, त्याचप्रमाणे देवकीने विशुद्ध मनानेच त्यांना धरण केले. (येथे भौतिक शरीराचा कोणताही संबंध नव्हता.) घड्यांमध्ये बंद केलेल्या दिव्याचा प्रकाश किंवा आपली विद्या दुसऱ्याला न देणाऱ्या गर्विष्ट ज्ञान्याच्या श्रेष्ठ विद्येचा प्रकाश जसा सगळीकडे पसरत नाही, त्याचप्रमाणे कंसाच्या कारागृहात बंद असलेल्या देवकीचासुद्धा प्रभाव जगन्निवास तिच्यामध्ये राहात असूनही लोकांना जाणवला नाही. (हा आनंद बाहेर प्रगट न करता देवकी अंतर्मनातच तो अनुभवत होती.) देवकीच्या अंतरंगात भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चेहऱ्यावर पवित्र हास्य होते; आणि तिच्या शरीराच्या कांतीने काराग्रह झगमगत होते. कंसाने जेव्हा तिला पाहिले, तेव्हा तो मनात म्हणू लागला की, "यावेळी माझे प्राण घेणारे विष्णूच हिच्यात राहिले आहेत. कारण यापूर्वी कधीही देवकी अशी दिसत नव्हती. आता या बाबतीत मला लवकरात लवकर काय केले पाहिजे बरे ? देवकीला मारणे तर उचित होणार नाही. कारण स्वार्थासाठी वीरपुरुष आपला पराक्रम कलंकित करीत नाही. शिवाय ही स्त्री असून, माझी बहीण आहे. तसेच गर्भवती आहे. हिला मारल्याने माझी लक्ष्मी आणि आयुष्य तात्काळ नष्ट होऊन जाईल आणि माझी कायमची अपकीर्ती होईल. जो अत्यंत क्रूरपणे वागतो, तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला शिव्याशाप देतात, इतकेच नव्हे तर तो देहाभिमान्यांसाठी योग्य अशा नरकात निश्चितच जातो. "कंस जरी देवकीला मारू शकत होता, तरीसुद्धा तो स्वतःच या अत्यंत क्रुर विचारांपासून प्ररावृत्त झाला. आता भगवंतांच्याबद्दल दृढ वैरभाव बाळगणारा तो त्यांच्या जन्माची वाट पाहू लागला. (भगवत्सान्निध्यामुळेच त्याचे दुष्ट विचार मावळले.)तो उठता-बसता, खाता-पिता, जागेपणी-झोपेत आणि चालता-फिरताना नेहमी श्रीकृष्णांचाच विचार करीत असे. त्यामुळे त्याला सारे जगच श्रीकृष्णमय दिसत असे.

            भगवान शंकर, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि नारदादी ऋषी तेथे आले आणि श्रीहरींची स्तुती करू लागले. "प्रभो! आपण सत्यसंकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्हीवेळी आपणच सत्य असता.(म्हणून असत्य सृष्टी सत्य वाटते.) पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पाच भासमान सत्यांचे आपणच कारण आहात आणि अंतर्यामीरूपाने त्यांमध्ये विराजमानसुद्धा आहात." आपण या दृश्यमान जगाचे आधार आहात. आपणच मधुर वाणी आणि समदृष्टीचे प्रवर्तक आहात. भगवन! आपण केवळ सत्यस्वरूपच आहात. आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलो आहोत. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे. सुख आणि दुःख ही याला दोन फळे आहेत. सत्त्व, रज आणि तम ही तीन मुळे आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार रस आहेत. कान, त्वचा,नेत्र, जीभ आणि नाक हे याला जाणण्याचे पाच प्रकार आहेत. उत्पन्न होणे, स्थिर असणे, वाढणे, बदलणे, क्षय होणे आणि नष्ट होणे हे याचे सहा स्वभाव आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र अशा सात धातू या वृक्षाच्या साली आहेत. पंचमहाभूते, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ फांद्या आहेत. याला मुख, डोळे, कान, नाक, गुद, शिश्न अशी नऊ दारे म्हणजे ढोली आहेत. प्राण,अपान,व्यान, उदान, समान, नाग, कूर्म,कृकल, देवदत्त आणि धनंजय हे दहा प्राण ही याची दहा पाने आहेत. या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे दोन पक्षी आहेत. या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र आपणच आहात. आपल्यामध्येच याचा प्रलय होतो आणि आपल्या कृपेनेच याचे रक्षणसुद्धा होते. ज्यांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेले आहे, तेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादी देवांना अनेक रूपांत पाहतात, ज्ञानी नव्हेत. आपण ज्ञानस्वरूप आत्मा असून चराचर जगाच्या कल्याणासाठीच अनेक रूपे धारण करता. आपली ती रूपे विशुद्ध सत्त्वमय असून ती संतांना सुख देणारी व दुष्टांचे अकल्याण करणारी असतात.

            हे कमलनेत्र! सर्व पदार्थ आणि प्राण्यांच्या आश्रयस्वरूप आपल्या रूपात पूर्ण एकाग्रतेने आपले चित्त लावू शकणारे आणि आपल्या चरणकमलरुपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसारसागराला, वासराच्या खुराने पडलेला खड्डा ओलांडावा तसे, सहजपणे पार करणारे लोक विरळच होत. संतांनी हाच मार्ग पत्करला आहे. हे प्रकाशरुप परमात्मन! आपले भक्त जगाचे खरे हितैषी असतात. ते स्वतः तर या भयंकर आणि कष्टाने पार करता येण्यासारख्या संसारसागराला आपल्या चरणकमलांच्या नौकेने पार करतातच; परंतु इतरांच्या कल्याणासाठी ती येथेच ठेवतात. कारण आपण भक्तांवर अनुग्रह करणारेच आहात. हे कमलनयन! जे लोक आपल्या चरणकमलांना शरण येत नाहीत, तसेच आपल्याबद्दल ज्यांच्या मनात भक्ती नाही, त्यांची बुद्धीसुद्धा शुद्ध होत नाही. ते स्वतःला खोटे-खोटेच आपण मुक्त आहोत असे मानतात. त्यामुळे उत्तम कुळ, तपश्चर्या, ज्ञान इत्यादी साधने प्राप्त होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारे का होईना, मोक्षपदाच्या जवळ पोहोचले तरी तेथून त्यांचे पतन होते. परंतु हे माधवा! ज्यांचे आपल्या चरणांवर निस्सीम प्रेम आहे, असे आपले भक्त कधीही मोक्षाच्या मार्गापासून ढळत नाहीत. कारण हे प्रभो! आपण त्यांचे रक्षण करत असल्यामुळे ते विघ्नकर्त्याच्या डोक्यावर ठेवून निर्भयपणे विहार करतात. आपण जगाच्या स्थितीसाठी, सर्व प्राण्यांचे कल्याण करणारे विशुद्ध सत्त्वमय, मंगलरूप धारण करता. ते रूप प्रगट होण्यानेच आपल्या भक्तांना वेद, कर्मकांड, अष्टांगयोग, तपश्चर्या, समाधी इत्यादी साधनांनी त्या रूपाचा आधार घेऊन आपली आराधना करता येते. हे प्रभो! आपले हे विशुद्ध सत्त्वमय निजस्वरूप जर नसेल, तर अज्ञान आणि त्यामुळे उत्पन्न होणारी भेदबुद्धी नष्ट करणारे प्रत्यक्ष ज्ञान कोणालाही होणार नाही. तीन गुणही आपलेच आहेत आणि आपल्यामुळेच प्रकाशित होतात, परंतु या गुणांच्या प्रकाशात आपल्या स्वरूपाचे फक्त अनुमानच बांधता येते.

            हे भगवन ! मन आणि वेदवाणी यांच्या योगाने आपल्या स्वरूपाचे केवळ अनुमान करता येते.कारण आपण त्यांचे साक्षी आहात.म्हणून आपले गुण,जन्म आणि कर्म यांमुळे आपल्या नाम आणि रुपाचे निरूपण करता येत नाही.तरीसुद्धा आपले भक्त उपासनेने आपला साक्षात्कार करून घेतात. जो मनुष्य आपल्या मंगल नामांचे आणि रूपांचे श्रवण, कीर्तन,स्मरण आणि ध्यान करतो,तसेच आपल्या चरणकमलातच आपले चित्त गुंतवून ठेवतो,त्याला पुन्हा जन्माला यावे लागत नाही.हे हरे ! आमच्या भाग्यामुळे सर्वेश्र्वर अशा आपल्या अवताराने आपल्या चरणरूप पृथ्वीच्या भार नाहीसा झाला.प्रभो ! आम्हांला आपल्या सुंदर चरणकमलांनी विभूषित झालेली पृथ्वी पाहायला मिळणार आणि आपल्या कृपेने स्वर्गलोकही कृतार्थ झालेला पाहायला मिळणार,हे आमचे केवढे सौभाग्य ! हे प्रभो ! आपण अजन्मा असून जन्म घेता, याचे कारण ही आपली एक लीला आहे,असेच आम्हांला वाटते.कारण, हे नित्यमुक्त ! जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात. प्रभो ! आपण जसे अनेक वेळा मत्स्य,हयग्रीव,कूर्म, नृसिंह,वराह,हंस, राम, परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि तिन्ही लोकांचे रक्षण केलेत, त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा. हे यदुश्रेष्ठ ! आम्ही आपल्या चरणांना वंदन करीत आहोत. हे देवकीमाते ! आपल्या उदरामध्ये आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वत: भगवान पुरूषोत्तम आपल्या शक्तिंसह आले आहेत, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.आता आपण मृत्यूच्या दारी असलेल्या कंसाला अजिबात भिऊ नका. आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करील.
            श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! ब्रह्यदेवादी देवांनी ज्यांच्याविषयी निश्र्चितपणे काही सांगता येत नाही, अशा भगवंतांची अशी स्तुती केली आणि ते स्वर्गाकडे गेले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय पहिला

श्री गणेशाय नमः राजा परीक्षिताने विचारले - भगवन ! आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशांच्या राजांची अत्यंत अद्भुत चरित्रे, तसेच धर्मप्रेमी यदूंचेसुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात, आपला अंश असलेल्या श्रीबलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आम्हांला ऐकवावे. प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या, त्या विस्ताराने आम्हांला सांगा. अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात,जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आह्लाद देणारे आहे अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला, आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल ? युद्धात देवांनासुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिरथीरुपी प्रचंड मासे ज्यात होते, असा कौरसेनेचा अपार सागर, माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने, वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे, तसा पार केला. कौरव आणि पांडव या दोन्ही वंशांचे बीज, असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते, त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली. तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले. हे विद्वन ! सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आत आत्मरूपाने राहून अमृतत्वाचे आणि बाहेर कालरुपाने राहून मृत्यूचे दान करणार्‍या आणि मनुष्यरूपाने प्रगट होणार्‍या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे.

            आपण आताच सांगितले की, बलराम रोहिणीचे पुत्र होते. त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्येसुद्धा आपण त्यांची गणना केलीत. दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसे शक्य आहे ? भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून वज्रभूमीकडे का गेले ? तसेच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कोठे कोठे निवास केला ? केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या ? तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले ? मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्षे निवास केला ? आणि त्यांना किती पत्न्या होत्या ? हे सर्वज्ञ मुनिवर ! श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्या या व इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात. आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या, भगवंतांच्या अमृतकथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणाऱ्या मला असह्य अशी ही तहानभूक मुळीच सतावीत नाही.

            सुत म्हणतात - शौनका ! भगवंतांच्या भक्तात आग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवांनी परिक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले आणि कलीमलांना नाहीसे करणाऱ्या श्रीकृष्णचरित्राचे वर्णन करण्यास प्रारंभ केला. श्रीशुकाचार्य म्हणाले- हे श्रेष्ठ राजर्षें ! तू जो काही निश्चय केला आहेस, तो अतिशय सुंदर आहे ; कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो.

            त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती ब्रह्मदेवांना शरण गेली. त्यावेळी तिने गाईचे रूप धारण केले होते. तिच्या डोळ्यांतून आसवे वाहात होती. ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती. ब्रह्मदेवांच्याकडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले. ब्रह्मदेवांनी ते ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर व अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुषसुक्ताने जगत्पालक, सर्वांतर्यामी, देवाधिदेव श्रीविष्णूंची स्तुती केली. त्यांनी समाधी-अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली. त्यानंतर ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवांनो ! भगवंतांची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा. वेळ लावू नका. पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर रहातील, तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरुपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनानीही जन्म घ्यावा.

            स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा, जे भगवंताची कला असल्याकारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्र मुखे आहेत, ते भगवंतांचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे, ती भगवंतांची ऐश्वर्यशालिनी योगमायासुद्धा, त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीलाकार्य संपन्न करण्यासाठी, अंशरूपाने अवतार घेईल.

            श्रीशुक म्हणतात- प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवांनी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परम धामाकडे गेले. पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरानगरीत राहून माथुर आणि शूरसेन या देशांवर राज्य करीत होता. त्या वेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती. भगवान श्रीहरी नेहमी तेथे विराजमान असतात. एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणीत पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत बहीण देवकी हिला खूष करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले. देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते, म्हणून तिला सासरी पाठवितेवेळी त्याने तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले चारशे हत्ती, पंधरा हजार घोडे, अठराशे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित दोनशे सुकुमार दासी हुंड्याचा रुपाने दिल्या. निघण्याच्या वेळी वर-वधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदंग आणि दुंदुभी वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवत होता, त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की, अरे मुर्खा! जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेस, तिचा आठवा पुत्र तुला मारील.

            कंस अत्यंत पापी व दुष्ट होता, तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर, निर्लज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले.

            वसुदेव म्हणाले- तू भोजवंशाची कीर्ती वाढविणारा आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात. असे असता एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास? हे वीरा! जे जन्म घेतात, त्यांच्या शरीराबरोबर मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा शंभर वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. जेव्हा शरीराचा अंत होतो, तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते. ज्याप्रमाणे चालतेवेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो, किंवा जशी अळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून आणि इंद्रादिकांचे ऐश्वर्य ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो. त्याचबरोबर आपले मूळ रूप विसरतो. देहांताच्यावेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीरांकडे धावता-धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते, तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे सूर्य-चंद्रादी वस्तू पाणी, तेल इत्यादी द्रव पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने दवपदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात, त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर प्रेम करून ते आपणच आहे, असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या-जाण्याला आपले येणे-जाणे मानू लागतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते, त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये. कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील, त्याला या जीवनात शत्रुकडून आणि जीवनानंतर परलोकापासून भय असतेच. ही तुझी धाकटी बहिण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी झाली आहे. म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने ह्या बिचारीचा वध करणे बरे नव्हे!

श्रीशुक म्हणतात-परीक्षिता! वसुदेवांनी अशाप्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजाविले. परंतु तो क्रूर, राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की, कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टाळली पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरविले की, "जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे, तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही जर तो टळला नाही, तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काही दोष नाही. म्हणून या मृत्युरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे. जर मला पुत्र झाले, आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर (निदान ही तरी वाचेल.) न जाणो, उलटेही होईल. कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेलासुद्धा परत येतो. ज्या वेळी जंगलात आग लागते, त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही, या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही. त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण कळणे अत्यंत अवघड आहे." आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवांनी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली. कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता, म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला अत्यंत क्लेश होत होते, तरीसुद्धा त्यांनी वर-वर आपला चेहरा प्रफुल्लित करीत, हसत हसत ते म्हणाले.
            वसुदेव म्हणाले- हे सौम्य! आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही. भय तर पुत्रापासून आहे, म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन.

श्रीशुक म्हणतात- वसुदेव खोटे बोलणार नाही, हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले. योग्य वेळी सर्वदेवतास्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टाने कंसकडे आणून दिले. कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. सज्जनांना असह्य असे काय असते ? ज्ञानी पुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते ? नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते ? आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते ? हे राजा ! वसुदेवांचा जीवन-मृत्युमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला. आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भीती नाही; कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. " ठीक आहे" असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही.
            परीक्षिता ! इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाली की, "अरे कंसा ! गोकुळात राहाणारे नंद इत्यादी गोप, त्यांच्या पत्न्या, वसुदेव इत्यादी वृष्णिवंशी यादव, देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद, वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत. यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत, तेसुद्धा देवच आहेत. त्यांनी असेही सांगितले की, दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत. "असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले, तेव्हा कंसाचा नीश्र्चयच झाला की, हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे; म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे जे पुत्र होते गेले, त्यांना विष्णू समजून मारून टाकले. पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता-पिता, बंधू किंवा इष्ट-मित्र यांचीही हत्या करतात. कंसाला हे माहीत होते की, आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुरू होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते. म्हणूनच त्याने यादवांशी वैर मांडले होते. बलवान कंसाने यदु, भोज आणि अंधक वंशांचे राजे असलेल्या आपल्या पित्याच्या-उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वत: शूरसेनदेशाचे राज्य करू लागला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...