०३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी दहावा मनू होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील. भूरिषेण इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान, सुकृती, सत्व, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवाचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल. विश्र्वसृजाची पत्नी विषूचीपासून भगवान विष्वक्सेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील.
अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी अकरावे मनू होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील. विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील.
परीक्षिता, रुद्रसावर्णी बारावा मनू होईल. देववान, उपदेव, देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्या मन्वन्तरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, आग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. सत्यसहाची पत्नी सुनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मन्वन्तराचे पालन करतील.
परम जितेंद्रिय देवसावर्णी तेरावा मनू होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. सुकर्म, सुत्राम नावाचे देवगन होतील. तसेच इंद्राचे नाव दिवस्पती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील. देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवस्पतीला इंद्रपद देतील.
इंद्रसावर्णी चौदावा मनू होईल. उरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी पवित्र, चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. त्या वेळी सत्रायणाची पत्नी वितानापासून बृहध्दानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील.
परीक्षिता, ही चौदा मन्वन्तरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीन्ही कालात चालू असतात. यांच्याच द्वारे एक सहस्त्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...