श्री गणेशाय नमः यावेळी एक मोठी अद्भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुनात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशू, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह, त्या समस्त ऐश्वर्याचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंत:करण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंजऱ्यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्ण, वस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी सात समुद्र आणि वक्ष:स्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्ष:स्थळावर हातात कमळ घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादी समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यांत सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरूण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हस्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषिगण पाहिले. अशा रीतीने वीर बलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले.
परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांच्यामध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शार्ड्धनुष्य, ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार शंभर चिन्हे असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते त्याचप्रमाणे लोकपालांसहीत सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले. त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुकुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्नजडित कमरपट्ट्यसह पितांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. दुसऱ्या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बलीची थोडीशीही कोणतीच वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर्लोक, आणि तपोलोकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा