अध्याय नववा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय नववा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - ३

श्री गणेशाय नमः बारा वर्षांनंतर राजा शापातून मुक्त झाला. जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला, तेव्हा तिने त्यांना अडविले. कारण तिला त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप ठाऊक होता. यानंतर त्याने स्त्रीसुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. नंतर त्याच्या सांगण्यावरून वैशिष्ठांनी मदयन्तीच्या ठिकाणी गर्भाधान केले. मदयंतीने सात वर्षंपर्यंत गर्भ धारण केला. परंतु तो जन्माला आला नाही. तेव्हा वसिष्ठांनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला, त्यामुळे तो जन्माला आला. तोच अश्मा (दगडा) च्या आघाताने उत्पन्न झाल्यामुळे त्याचे 'अश्मक' नाव ठेवले. अश्मकापासून मुलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला नि:क्षत्रिय करीत होते, तेव्हा स्त्रियांनी याला लपून ठेवले होते. म्हणून त्याचे एक नाव 'नारीकवच' असे पडले. त्याला मूलक यासाठी म्हणतात की, पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवृर्तक बनला. मूलकाचा पुत्र दशरथ. दशरथाचा ऐडविड आणि ऐडविडाचा विश्वसह. विश्वसहाचा पुत्रच चक्रवर्ती खट्वांग झाला. युद्धामध्ये त्याला कोणी जिंकू शकत नव्हता. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्याने दैत्यांचा वध केला होता. देवतांकडून त्याला जेव्हा समजले कि, आपले आयुष्य फक्त दोन घटकाच शिल्लक आहे. तेव्हा तो आपल्या राजधानीकडे परत आला आणि आपले मन त्याने भगवंतांचे ठिकाणी स्थिर केले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की, "माझ्या कुलाची इष्ट देवता ब्रह्मण आहे. त्यांच्यापेक्षा अधिक माझे माझ्या प्राणावरही प्रेम नाही. पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य आणि पृथ्वीसुद्धा मला त्यांच्याइतकी प्रिय वाटत नाही. लहानपणीसुद्धा माझे मन अधर्माकडे कधी गेले नाही. पवित्रकीर्ती भगवंतांच्या व्यतिरिक्त मी आणखी कोणतीही वस्तू कुठे पाहिली नाही.तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या देवतांनी मला कोणताही वर मागण्यास सांगितले. परंतु मी त्या भोगांची अजिबात लालसा धरली नाही; कारण सर्व प्राण्यांचे जीवनदाते श्रीहरी यांच्या भक्तीमध्येच मी मग्न होऊन राहिलो होतो. ज्या देवतांची इंद्रिये आणि मने विषयांमध्ये भटकत असतात, त्या देवता सत्वगुणप्रधान असूनसुद्धा आपल्या हृदयात विराजमान, सदैव प्रियतमाच्या रूपाने राहाणाऱ्या आपल्या आत्मस्वरूप भगवंतांना ओळखत नाहीत. तर मग जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत, ते कसे जाणू शकतील ? ईश्वराच्या मायेचा खेळ असणाऱ्या, गंधर्वनगरांसारख्या या विषयांना मी सोडून देत आहे. कारण अज्ञानानेच हे चित्तात जाऊन बसले होते. आता जग उत्पन्न करणाऱ्या भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन मी त्यांनाच शरण जात आहे. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. म्हणूनच त्याने असा निश्चय केला. आता त्याने अनात्म वस्तूंमध्ये जो अज्ञानमूलक आत्मभाव होता, त्याचा त्याग केला आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला.ते स्वरुप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सुन्यासमानच आहे. परंतु ते शून्य नाही, परम सत्य आहे. भक्तजन त्यास वस्तूचे "भगवान वासुदेव" या नावाने वर्णन करतात.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवन ! आम्ही हे जाणू इच्छितो की, महात्मा सौदासाला गुरु वशिष्ठांनी शाप का दिला ? जर यात काही गुप्त नसेल तर सांगावे.

            श्रीशुक म्हणाले - सौदास एकदा शिकारीसाठी गेला होता. तेथे त्याने एका राक्षसाला मारले आणि त्याच्या भावाला सोडून दिले. त्याने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आचाऱ्याचे रुप घेऊन तो त्याच्या घरी आला. एक दिवस भोजनासाठी जेव्हा गुरु वशिष्ठ राजाच्या घरी आले, तेव्हा त्याने मनुष्याचे मांस शिजवून त्यांना वाढले. भगवान वसिष्ठांनी अभक्ष्य मांस वाढताना पाहून रागावून राजाला झटकन शाप दिला की, " या कृत्यामुळे तू राक्षस होशील. " हे राक्षसाचे काम आहे, असे त्यांना समजले, तेव्हा त्यांनी तो शाप फक्त बारा वर्षाच्यापुरताच ठेवला. त्यावेळी सौदाससुद्धा आपल्या ओंजळीत पाणी घेऊन गुरु वशिष्ठांना शाप देण्यासाठी उद्युक्त झाला. परंतु मदयंतीने त्याला अडविले. तेव्हा सौदासाने दिशा, आकाश आणि पृथ्वी ही सर्व जीवमय आहेत, असा विचार करून ते शापजल आपल्या पायांवर टाकले. ( म्हणूनच त्याचे नाव 'मित्रासह' असे पडले.) त्या पाण्यामुळे त्याचे पाय काळे झाले होते, म्हणून त्याचे नाव 'कल्माषपाद'असेही पडले. आता तो राक्षस झाला होता. राक्षस झालेल्या कल्माषपादाने एके दिवशी एका वनवाशी ब्राह्मण दांपत्याला एकांतात असताना पाहिले. कल्माषपादाला भूक लागली होती (म्हणून) त्याने ब्राह्मणाला पकडले. ब्राह्मणपत्नीची कामना पूर्ण झाली नव्हती. ती म्हणाली "राजा ! तू राक्षस नाहीस. महाराणी मदयंतीचा पती आणि इश्वाकुवंशाचा वीर महारथी आहेस. असा अधर्म करू नकोस. मला संतानाची इच्छा आहे आणि या ब्राह्मणाची सुद्धा कामना अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून मला हा माझा पती परत दे. हे मनुष्यशरीर जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे. म्हणून हे वीरा ! शरीराची हत्या म्हणजे सर्व पुरुषार्थांची हत्या, असे म्हटले जाते. शिवाय, हा ब्राह्मण विद्वान आहे. तपश्चर्या, शील इत्यादी गुणांनी संपन्न आहे. जो सर्व पदार्थामध्ये असूनही त्यांच्या वेगवेगळ्या गुणांमुळे लपून राहिलेला आहे, त्या पुरुषोत्तम परब्रह्याची, सर्व प्राण्यांच्या आतम्याच्या रूपामध्ये हा आराधना करू इच्छितो. हे धर्म जाणणाऱ्या राजा ! जसा पित्याच्या हातून पुत्राचा मृत्यू होणे योग्य नाही, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या श्रेष्ठ राजर्षीच्या हातून श्रेष्ठ ब्रह्मर्षीचा वध होणे कसे योग्य आहे ? तू सन्माननीय आहेस. असे असता तू परोपकारी, निरपराध, वैदिक आणि ब्राह्मवादी ब्राह्मणाचा, गाईचा वध करावा तसा वध करणे कसे योग्य आहे ? असे असताही जर तू याला खाणार असशील, तर अगोदर मला खा; कारण याच्याशिवाय मी मेल्यासारखीच असून एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. " असे काकुळतीने बोलून ती अनाथ असल्यासारखी रडू लागली. परंतु शापाने मूढ झाल्यामुळे सौदासाने, वाघाने एखाद्या पशूला खावे, त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. ब्राह्मणपत्नीने गर्भाधानास उद्युक्त झालेल्या पतीला राक्षसाने खाल्लेले पाहून तिला अतिशय शोक झाला. तिने संतापून राजाला शाप दिला. "अरे पाप्या ! मी कामपीडित असताना तू माझ्या पतीला खाल्लेस. म्हणून मुर्खा ! तू जेव्हा स्त्रीबरोबर संग करण्यास जाशील, तेव्हा तुझाही मृत्यू होईल, ही गोष्ट मी तुझ्या निदर्शनाला आणते. " अशा प्रकारे मित्रसहाला शाप देऊन पतिलोकात जाऊ इच्छिणारी ब्राह्मणपत्नी, आपल्या पतीच्या अस्थींनी धगधगनाऱ्या चितेत उडी घेऊन स्वतः सती गेली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. परंतु त्यात त्याला यश आले नाही. कालांतराने त्याला मृत्यू आला. अंशुमानाचा पुत्र दिलीप यानेसुद्धा तशीच तपश्चर्या केली. परंतु तोही असफल झाला. पुढे त्यालाही मृत्यू आला. दिलीपाचा पुत्र भगीरथ. त्याने दीर्घ कालपर्यंत तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगेने त्याला दर्शन दिले आणि म्हटले - "मी तुला वर देण्यासाठी आले आहे. " तेव्हा राजा भगीरथाने अतिशय नम्रतेने आपले मनोगत प्रगट केले की, " आपण मृत्युलोकात चलावे."

            गंगा म्हणाली, "ज्यावेळी मी स्वर्गातून पृथ्वीवर पडेन, त्यावेळी माझा वेग धारण करणारा कोणीतरी असला पाहिजे. भगीरथा ! असे न झाल्यास मी पृथ्वी फोडून रसातळात पोचेन. याखेरीज, लोक आपली पापे माझ्यामध्ये धुतील, यासाठीसुद्धा मी पृथ्वीवर येणार नाही. कारण मग मी ती पापे कुठे धुणार ? भगिरथा ! याविषयीही तू विचार कर."

            भगीरथ म्हणाला - "सत्पुरुष, संन्यासी, शांत, ब्रह्मनिष्ठ आणि लोकांना पवित्र करणारे सज्जन आपल्या अंगस्पर्शाने तुझी पापे नष्ट करतील. कारण त्यांच्यामध्ये पाप नाहीसे करणारे भगवान निवास करतात. सर्व प्राण्यांचा आत्मा असणारे रुद्रदेव तुझा वेग धारण करतील. कारण ज्याप्रमाणे वस्त्र सुताने ओतप्रोत भरलेले असते, त्याचप्रमाणे हे सर्व विश्व भगवान रूद्रांमध्येच ओतप्रोत आहे." परीक्षिता ! गंगेला असे सांगून भगीरथाने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. थोड्याच दिवसात महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या शंकरांनी 'तथास्तु' असे म्हणून राज्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर भगवंतांच्या चरणांच्या स्पर्शाने जिचे पाणी पवित्र आहे, अशा गंगेला दक्ष राहून मस्तकावर धारण केले. यानंतर राजर्षी भगीरथ, जेथे त्यांच्या पितरांची शरीर राखेचे ढीग होऊन पडली होती, तेथे जगाला पवित्र करणाऱ्या गंगेला घेऊन गेला. वायूप्रमाणे वेगाने चालणाऱ्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता आणि त्याच्या मागे मागे, मार्गात असणाऱ्या देशांना पवित्र करीत, गंगा वेगाने जात होती. शेवटी तिने सगरांच्या जळालेल्या पुत्रांना आपल्या पाण्यात बुडविले. जरी सगराचे पुत्र ऋषींच्या शापाने भस्म झाले होते, तरीसुद्धा केवळ शरीराच्या राखेशी गंगाजलाचा स्पर्श होताच स्वर्गात गेले. जर गंगाजलाचा शरीराच्या राखीशी स्पर्श झाल्यानेही सगरांच्या पुत्रांना स्वर्गाची प्राप्ती झाली, तर मग जे लोक श्रद्धेने नियमपूर्वक गंगामातेचे सेवन करतात, त्यांच्यासंबंधी काय सांगावे ? मी गंगेच्या महिम्यासंबंधी जे काही येथे सांगितले, त्यामध्ये आश्र्चर्य करण्यासारखे काही नाही. कारण ती भगवंतांच्या चरणकमलांपासून निघाली आहे. ज्या चरणांचे श्रद्धेने चिंतन करून मुनी पवित्र होऊन तिन्ही गुणांचे कठीण बंधन तोडून ताबडतोब भगवत्स्वरूप होतात; तर मग गंगा संसारबंधन तोडून टाकील, यात काय आश्र्चर्य आहे ?

            भगीरथाचा पुत्र होता श्रुत. श्रुताचा नाभ. पूर्वी कथन केलेल्या नाभापेक्षा हा वेगळा आहे. नाभाचा पुत्र सिंधुद्वीप होता आणि सिंधूद्वीपाचा अयुतायू. अयुतायूच्या पुत्राचे नाव होते ऋतुपर्ण. तो नलाचा मित्र होता. त्याने नलाला फासा फेकण्याच्या विद्येचे रहस्य सांगितले होते आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून विश्वविद्या शिकून घेतली होती. ऋतुपर्णाचा पुत्र सर्वकाम. परीक्षिता ! सर्वकामाच्या पुत्राचे नाव होते सुदास. सुदासाचा पुत्र होता सौदास आणि त्याच्या पत्नीचे नाव मदयंती होते. सौदासालाच काहीजण मित्रसह म्हणतात आणि काही काही ठिकाणी त्याला कल्माषपाद असेही म्हटले गेले आहे. वसिष्ठांच्या शापाने तो राक्षस झाला होता आणि पुन्हा आपल्या कर्मामुळे तो निपुत्रिक झाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय नववा भाग - २

श्री गणेशाय नमः नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हविर्द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गाई, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. तेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या, पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या, भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृतकलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्णनूपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मूख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मीदेवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. जन्मत:च क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे. म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसविले. यानंतर अमृतकलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेमही होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. म्हणून ते गप्प बसून राहिले. मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिऊन होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता. त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत.
            त्याचवेळी राहू दैत्य देवांचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवाबरोबर तोही अमृत प्याला. परंतु त्याचक्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले. अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला 'ग्रह' बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्याला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले, तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. परीक्षिता, पहा ना ! देव आणि दैत्य दोघांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूनी, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने, एकच कर्म केले होते. परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यांपैकी दैवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलरजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यांपासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण,धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर,पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो, ते व्यर्थ होते. कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करणारे ते सर्वांना मिळते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय नववा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूंप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृतकलश हिसकावून घेत होते. एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली. ते विचार करू लागले, " किती अनुपम सौंदर्य हे ! किती हे तेज ! काय हे हिचे नवतारुण्य ! "असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले. काममोहित होऊन त्यांनी तिला विचारले. " हे कमलनयने, तू कोण आहेस ? कोठून आलीस ? काय करू इच्छितेस ? हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस ? तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे. आम्ही असे समजतो की, आतापर्यंत देव, दैत्य सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपालांनीसुद्धा तुला स्पर्श केला नसेल. तर मग माणूस तुला कोठून स्पर्श करीत ? हे सुंदरी, विधात्याने दया घेऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठविले आहे काय ? हे मानिनी, आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे. म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव, आम्ही सर्वजण कष्यापाचे पुत्र असल्याकारणाने सख्खे भाऊ आहोत. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. म्हणून तू नि:पक्षपातीपणे हे आम्हांला असे वाटून दे की, ज्यामुळे आमच्यांत भांडण होणार नाही, " असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्रीवेषधारी भगवान किंचितसे हसले आणि सुंदर नेत्रकटाक्ष टाकीत त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज कुलटेच्या मागे कसे लागलात ? कारण विवेकी मनुष्य स्त्रायांवर कधी विश्वास ठेवीत नाही. दैत्यांनो, लांडगे आणि व्याभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही. कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, मोहिणीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहनीच्या हातात दिला. नंतर अमृतकलश घेऊन किंचित स्मित हास्य करीत भगवान म्हणाले, "उचित असो वा अनुचित, मी जे काही करीन, ते तुम्हांला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटीन. " मोहिनीचे हे बोलणे ऐकूण मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातील खुबी समजली नाही. म्हणून सर्वांनी 'ठीक आहे' असे म्हणून ते मान्य केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...