कश्यप म्हणाले - संतान असावे असे मला जेव्हा वाटले, तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले, तेच मी तुला सांगतो. फाल्गुन महिन्याच्या शुक्लपक्षात बारा दिवसापर्यंत फक्त दूध पिऊन राहावे आणि परम भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावास्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. "हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो ! तू माझी पापे नष्ट कर. " यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्त्ती, पूजास्थल, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरु यांच्या ठिकाणी पूजा स्थल सूर्य किंवा गुरु यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. (प्रथम पुढील नऊ मंत्रांनी आवाहन करावे.) हे प्रभो, आपण सर्वशक्तीमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात; म्हणूनच आपणास "वासुदेव" म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. आपण अव्यक्त आणि सुक्षम आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण चोवीस गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्याची प्रायणीय आणि उदयनीय करणे ही दोन कर्मे ही मस्तके आहेत. प्राप्त:काळ मध्याहृकाळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत. चार वेद शिंगे आहेत. गायत्री इत्यादी सात छंद सात हात आहेत, असे तिन्ही वेदांनी सांगितलेले, फल देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्वशक्तिसंपन, सर्व विद्यांचे अधिपती आणि भुतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार. आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार. आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नर-नारायण ऋषीच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात, आपणास माझा नमस्कार. आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पितांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. आपण सर्व वर देणारे आहात; वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीवमात्राला वरणीय आहात. म्हणूनच विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होवोत.भगवान हृषीकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध,धूप इत्यादी अर्पण करून व्दादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी. ऐपत असेल तर दुधात शिजविलेल्या आणि तूप-गूळ घातलेल्या साळीच्या तांदळांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे. तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वत: खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंतांचे स्तवन करावे. प्रदक्षिना घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंताचे पूजन करावे.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा