अध्याय पाचवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय पाचवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मे २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय पाचवा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - उदार नंदमहाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले. नंतर वेदवेत्त्या ब्राह्मणांना बोलावून पुण्यावाचन करून आपल्या पुत्राचा जातकर्म-संस्कार केला. त्याजबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली. त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गाई दान दिल्या. तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे सात ढीग दान दिले. कालगतीने (नवीन पाणी, अशुद्ध भूमी इ.) स्नानाने (शरीर इ. ), धुण्याने (वस्त्रे इ.), संस्कारांनी (गर्भ इ.), तपश्चर्येने (इंद्रिये इ.),यज्ञाने ( ब्राह्मण इ.), दानाने (धन, धान्य इ.) आणि संतोषाने (मन इ.)द्रव्ये शुद्ध होतात. आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. त्यावेळी ब्राह्मण, मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक, वंशाचे वर्णन करणारे व स्तुतिपाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले. त्यामध्ये सुगंधित द्रव्ये शिंपडली गेली. त्यांना रंगी-बेरंगी ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानाच्या तोरणांनी सजविले गेले. गाई, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद-तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गेरूने रंगविले. तसेच मोरपंख, फुलांचे हार, तऱ्हेतऱ्हेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. राजा ! सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदांच्या घरी आले.

यशोदेला पुत्र झाला, हे ऐकून गोपींनासुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्रे अलंकार आणि डोळ्यांत काजळ वगैरे घालून त्या नटल्या. गोपींची मूखकमले नुकत्याच लावलेल्या कुंकूरुपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती. मोठमोठे नितंब असलेल्या त्या भेटवस्तू घेऊन लगबगीने यशोदेकडे गेल्या. त्यामुळे त्यावेळी त्यांची वक्ष:स्थळे हलत होती. गोपींच्या कानांमध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडले झगमगत होती. गळ्यामध्ये सुवर्णहार चमचम करीत होते. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुले वाटेत ओघळून पडत होती. हातामध्ये बांगड्या चमकत होत्या. लगबगीमुळे त्यांच्या कानातील कुंडले, वक्ष:स्थळे आणि हार हलत होते. अशा प्रकारे नंदांच्या घरी जाताना त्यांची आगळीच शोभा दिसत होती. त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की, " भगवान याचे दीर्घकाळ रक्षण करो. " असे म्हणून हळद-तेल मिश्रित पाणी आजुबाजुच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या.
            सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजाच्या व्रजामध्ये प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी निरनिराळी मंगल वाद्ये वाजविण्यात येऊ लागली. आनंदाने बेहोष होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गाई दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य इत्यादी कलांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना नंदांनी आनंदाने त्यांनी त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे, असे त्यांना वाटत होते. नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्रे, हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती. परिक्षिता ! त्याच दिवसापासून नंदाच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे तसेच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थळ बनले.
            परीक्षिता ! काही दिवसांनंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या गोपांवर सोपवून नंद कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले. आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे, असे जेव्हा वसुदेवांना समजले, तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वसतिस्थानावर ते गेले. वसुदेवांना पाहाताच नंद ताबडतोब उठून उभे राहिले. जणू काही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले. हे राजा ! नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर-सत्कार केला. ते आरामात बसले, त्यावेळी वासुदेवांचे चित्त आपल्या पुत्रांकडे लागले होते. नंदांनी खुशाली विचारून ते म्हणाले.

(वसुदेव म्हणाले)- " बंधो ! तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झाले नव्हते. एवढेच काय, आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती. पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपली भेट झाली, ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पुनर्जन्मच समजले पाहिजे. जसे नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांचेसुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहाणे संभवत नाही. हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांसह ज्या महावनात राहातोस, तेथे पाणी, गवत आणि झाडे वेली भरपूर आहेत ना ? ते जनावरांना अंनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहे ना ? बंधो ! माझा मुलगा त्याच्या (रोहिणी) आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहात आहे. त्याचे पालन-पोषण तू आणि यशोदा करीत आहात. म्हणून तो तुम्हांलाच आपले माता-पिता मानीत असेल, तो सुखरूप आहे ना ? ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते, तोच धर्म, अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो, तो धर्म, अर्थ आणि काम हितकारक नाही.
            नंद म्हणाले - कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. शेवटी एक मुलगी वाचली होती, तीसुद्धा स्वर्गाकडे गेली. प्राण्यांचे सुख-दुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते यात काहीही संशय नाही.भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे. जीवनाच्या सुख-दुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो, ते ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही.
            वसुदेव म्हणाले - बंधो ! तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास. आपली भेटही झाली. आता तू येथे अधिक दिवस राहू नकोस. कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत.
            श्रीशुक म्हणतात - वसुदेव जेव्हा असे म्हणाले, तेव्हा नंदादी गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या छकड्यावर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - ३

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राज्याच्या गुणांची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मलोकाकडे ते आकाशमार्गाने गेले. दुर्वास परत येईपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटला. इतके दिवसपर्यंत राजा त्यांच्या दर्शनाची इच्छा मनात धरून फक्त पाणी पिऊनच राहिला.

            जेव्हा दुर्वास निघून गेले, तेव्हा त्यांनी भोजन करून उरलेले अत्यंत पवित्र अन्न स्वतः खाल्ले. आपल्यामुळे दुर्वासांना दुःख भोगावे लागले आणि नंतर आपणच केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली. या दोन्ही गोष्टी स्वतःमुळे होऊनही त्यांनी तो भगवंतांचाच महिमा मानला. अशा अनेक गुणांनी संपन्न राजा आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा परब्रह्म परमात्मा श्रीभगवंतांविषयी भक्ती वाढवित होता. त्यामुळे त्याला ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग नरकासमान वाटत होते.

            त्यानंतर अंबरीषाने आपल्यासारखेच गुण असलेल्या पुत्रांवर राज्याचा भार सोपविला आणि तो स्वत: वनात निघून गेला. तेथे त्याने धैर्याने आत्मस्वरूप भगवंतांमध्ये आपले मन लावून गुणांच्या प्रवाहरूप संसारातून तो मुक्त झाला. महाराज अंबरीषाचे हे परम पवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचे स्मरण करतो, तो भगवंतांचा भक्त होतो.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - २

श्री गणेशाय नमः दुर्वास म्हणाले-धन्य आहे! आज मी भगवंतांच्या भक्तांचे महत्व पाहिले. राजन! मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत आहेस. ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे,‌ त्या साधुपुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे? आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे? ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो, या भगवंताच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते? महाराज! आपले हृदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले. कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राणांचे रक्षण केलेत.

            राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पाहात होता. आता त्याने दूर्वासांचे चरण धरून आणि त्यांना प्रसन्न करवून भोजन घातले. राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झाले. आणि राजाला आदराने म्हणाले, "राजन! आता आपणही भोजन करावे." भगवंतांचे भक्त असणाऱ्या आपले दर्शन, स्पर्श, संवादाने मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणाऱ्या आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्न आणि उपकृत झालो आहे. स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील. ही पृथ्वीसुद्धा आपल्या परम पुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - १

श्री गणेशाय नमःश्रीशुक म्हणतात - भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीषाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. दुर्वासांचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीषाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली.

               अंबरीष म्हणाला - हे सुदर्शना ! तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्रमंडळाचा अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रियेसुद्धा तूच आहेस. भगवंतांना प्रिय,एक हजार दात असणाऱ्या, हे सुदर्शना ! मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा ! तू या ब्राह्मणाचे रक्षण कर. तूच धर्म, मधुर आणि सत्य वाणी, सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञसुद्धा आहेस. तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्वलोकस्वरुपसुद्धा आहेस. परम पुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस. हे सुनाभा, तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षणकर्ता आणि अधर्माचे आचरण करणाऱ्या असुरांचे भस्म करणारा अग्नि आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भूत कर्मे करणारा आहेस. तुला नमस्कार असो. मी तुझी स्तुती करतो. हे वेदवाणीच्या आधीश्वरा ! तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते. तुझा महिमा जाणणे कठीण आहे. लहान-मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे. हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ! ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात, तेव्हा तू दैत्य- दानवाच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांचा भुजा, पोट, जांघा, पाय, मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस. हे विश्वरक्षका ! सर्वांचे प्रहार सहन करणाऱ्या तुला गदाधारी भगवंतांनी दुष्टांच्या नाशासाठीच नेमले आहे. तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर. आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल. मी जर काही दान केले असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांनाच आपले दैवत समजत असतील, तर दुर्वासांचा त्रास नाहीसा होवो. सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आतम्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील, तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर होवो.    

            श्रीशुक म्हणतात - दुर्वासांचा सगळ्या बाजूंनी दाह करणाऱ्या भगवंतांच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले. जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा ते त्या राजाला उत्तम आशीर्वाद देते त्याची प्रशंसा करू लागले.     

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - ३

श्री गणेशाय नमः स्वत: उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत. या पृथ्वीवर जरायुज,अंडज, स्वेदज, आणि उद्धिज्ज, असे चार प्रकारचे प्राणी राहातात. ते परम स्वतंत्र परम ऐश्वर्यशाली, पुरुषोत्तम परब्रम्ह आमच्यावर प्रसन्न होवोत. हे परम शक्तिशाली पाणी त्यांचे वीर्य आहे. यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात, वाढतात आणि जिवंत राहतात. ते परम ऐश्वर्यशाली परब्रम्ह आमच्यावर प्रसन्न होवो. श्रुती सांगतात देवांचे अन्न,बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे. तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृध्दि करणारा आहे. अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होवोत. सर्वज्ञ अग्नी प्रभूंचे मुक आहे. यज्ञ-यागादी कर्मकांडासाठी याचा जन्म झाला आहे. हा अग्नीच शरीरात जठराग्निरूपाने आणि समुद्रात वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न, पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो. असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्याच्या द्वारे जीव देवयानमार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो, जो वेदांची साक्षात मूर्ती आणि भगवंतांचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे, जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे, असा सूर्य ज्यांचा नेत्र आहे, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या प्राणापासूनच चराचराचा प्राण तसेच मानसिक, शरीरिक आणि इंद्रियसंबंधी बळ देणारा वायू प्रगट झाला आहे. ते चक्रवर्ती सम्राट आहेत, तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत, असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या कानापासून दिशा, हृदयापासून इंद्रियगोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे, जे प्राण, इंद्रिये, मन, उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या बलापासुन इंद्र, प्रसन्नतेपासून सर्व देवगन, क्रोधापासून शंकर, बुद्धीपासून ब्रह्मदेव, इंद्रयांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या वक्ष:स्थळापासून लक्ष्मी, सावलीपासून पितृगण, स्तनापासून धर्म, पाठीपासून अधर्म, डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेतून अप्सरा प्रकट झाल्या आहेत. ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद, ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय, वैश्य हे जांघा आणि वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती, नाकापासून कांती, स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम, भुवयांपासून यम आणि डोळ्याच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. शास्त्र असे सांगते की, पंचमहाभूते, काल, कर्म, स्वत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत, जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान 'नेति नेति' शब्दांनी ज्यांचे वर्णन करतात, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ते मातेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृतीमध्ये आसक्त होत नाहीत, जे वायूप्रमाणे समान व असंग असतात, ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत, त्या आपल्या आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असोत.
प्रभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावे असे आम्ही इच्छितो. तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हांस दाखवावे.प्रभो, आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हांला कठीण असणारी कामे सहज करता. विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत, त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते, किंवा मिळतही नाही. परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात,ती मात्र आनंददायक आणि सफल असतात. भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही. कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्मा आहेत. झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्याच्या फांद्या आणि डहाळ्यांनाही पाणी देणे होय. त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंतांची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याचीसुद्धा आराधना होय. ज्यांच्या लीलांचे रहस्य तार्काच्या पलीकडचे आहे, जे स्वतः गुणांच्या पलीकडे राहूनसुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत, तसेच सध्या सत्त्वगुणामध्ये स्थित आहेत, अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंतांचे स्मरण केले. नंतर प्रफुल्लित चेहऱ्याने देवांना ते म्हणाले. मी, शंकर, तुम्ही, असुर, दैत्य, मनुष्य, पशु-पक्षी, स्वेदज, वृक्ष, इत्यादी सर्व प्राणी ज्या विराग स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झालो आहोत, त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ. त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला, कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला, तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात. यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी सत्त्वगुणाचा स्वीकार केला आहे. हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्याचा आहे. म्हणून आपण सर्वजण त्या जगद्गुरु परमात्म्याला शरण जाऊ. ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत. म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ते आमचे कल्याण करतील.
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, देवांना असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंतांचे निजधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेले. हे राजा, भगवंतांविषयी आगोदर देवांनी ऐकले होते, परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते. म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने वेदवाणीने भगवंतांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - भगवन, आपण निर्विकार, सत्य, अनंत, आदिपुरुष, सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान, अखंड तसेच अतर्क्य आहात.मनाच्याही पुढे आपण जाता. वाणी आपले वर्णन करू शकत नाही. सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. आपण प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात. आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत. आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात. सत्य, त्रेता आणि द्वापार यांमध्ये आपण अवतार घेता, म्हणून त्रियुग आहात. आम्ही आपणास शरण आहोत. हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे. दहा इंद्रिये आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आरे आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून याचा परीघ आहे. स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे. स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा. तेच एकमेव सत्य आहेत. आम्ही त्यांना शरण आहोत. जे एकमात्र ज्ञानस्वरूप, प्रकृतीच्या पलीकडचे तसेच आदृश्य आहेत, जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश, काल किंवा वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही, तेच प्रभू या जिवाच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असतात. विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात. ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे, तिला कोण तरुण जाऊ शकणार ? परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात, त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो. आम्ही व ऋषी ज्यांच्या प्रिय सत्त्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत, तरीसुद्धा त्यांच्या आतबाहेर व्यापून असणाऱ्या सुक्ष्म स्वरूपाला जाणत नाही. तर मग रजोगुण आणि तमोगुणप्रधान असूरादी त्यांना कसे जाणू शकतील ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्रमोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे. ही मी तुला सांगितली. आता रैवत मन्वन्तराची कथा ऐक. पाचव्या मनूचे नाव रैवत होते. चौथा मनूचे नाव रैवत होते. चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता. अर्जुन, बली,विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते. राजा, त्या मन्वन्तरात इंद्राचे नाव विभू होते; आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते. त्या वेळी हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू इत्यादी सप्तर्षी होते. त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषींच्या पत्नीचे नाव विकुंठा होते. त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वत: भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मीदेवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले. सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे. त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी (तिसऱ्या स्कंधात) केले आहे. ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केले असेल, तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल.
साहवा मनू चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता. पूरु, पूरुष, सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आपल्या इत्यादी देवगन होते. त्या मन्वन्तरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगत्पती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला.
राजाने विचारले - मुनिवर्य, भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले ? कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले ? त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळविले ? आणखी कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या ? भगवंतांची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांगा. आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता, तसतसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचे तर नावच नाही. कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे.
सूत म्हणाले - शौनकादी ऋषींनो, श्रीशुकदेवांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले.
श्रीशुकाचार्य म्हणतात - ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले, त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले. ते पुन्हा उठू शकले नाहीत. दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते. यज्ञ-यागादी कर्मेही लोप पावली होती. हे पाहून इंद्र, वरूण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला. परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले. ब्रह्मदेवांनी पाहिले की, इंद्र, वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून हा असूर आनंदात आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...