अध्याय सातवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय सातवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - २

श्री गणेशाय नमः तो जी जी वेळ सांगे, त्याची वरूण वाट पाहात असत. रोहिताला जेव्हा समजले की, वडील आपले बलिदान करू इच्छितात. तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी हातात धनुष्य घेऊन तो वनात निघून गेला. काही दिवसांनंतर त्याला समजले की, वरूण देवतेने आपल्या पित्याला ग्रासले आहे. यामुळे त्याला जलोदर झाला आहे. तेव्हा रोहित आपल्या नगराकडे यावयास निघाला. परंतु इंद्रांनी येऊन त्याला अडविले.ते रोहिताला म्हणाले, " पवित्र तीर्थक्षेत्रांचे सेवन करीत पृथ्वीवर विहार करणेच चांगले." इंद्रांचे म्हणणे मानून तो आणखी एक वर्षभर मनातच राहिला. अशा प्रकारे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षीसुद्धा रोहिताने आपल्या वडीलांकडे जाण्याचा विचार केला. परंतु वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण करून प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवीत. अशाप्रकारे सहा वर्षे रोहित मनातच राहिला. सातव्या वर्षी तो जेव्हा आपल्या नगराकडे जाऊ लागला, तेव्हा त्याने अजीगर्ताकडून त्याचा मधला मुलगा शुनःशेप याला विकत घेतले आणि त्याला यज्ञपशु बनविण्यासाठी आपल्या पित्याकडे सोपवून त्यांच्या चरणांना वंदन केले. तेव्हा परम यशस्वी, श्रेष्ठ चरित्राच्या राजा हरिश्चंद्राची जलोदर रोगापासून सुटका होऊन त्याने पुरुषमेध यज्ञाने वरूण इत्यादी देवतांचे यजन केले. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र होता झाले. संयमी जमदग्नी अध्वर्यू झाले. वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी सामगान करणारे उद्गगाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरीचंद्राला एक सोन्याचा रथ दिला.

            शुन: शेपाचे माहात्म्य मी नंतर वर्णन करीन. सत्यव्रताचे दृढतेने पत्नीसह पालन करणाऱ्या हरीश्र्चंद्राला पाहून विश्वामित्र अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यानुसार राजा हरिश्चंद्राने आपल्या मनाला पृथ्वीमध्ये, पृथ्वीला जलामध्ये, जलाला तेजामध्ये, तेजाला वायूमध्ये आणि वायूला आकाशात स्थिर करुन, आकाशाला अहंकारामध्ये विलीन केले. नंतर अहंकाराला महत्तत्त्वामध्ये विलीन करून त्यामध्ये ज्ञानकलेचे ध्यान केले आणि त्याद्वारे अज्ञान भस्म केले. त्यानंतर निर्वाणसुखाच्या अनुभूतीने त्या ज्ञानकलेचा सुद्धा त्याने त्याग केला आणि सर्व बंधनातून मुक्त होऊन जे स्वरूप कोणत्याही प्रकारे सांगता येत नाही, आणि ज्याच्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे अनुमान केले जाऊ शकत नाही, त्या आपल्या स्वरूपात तो स्थिर झाला .

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - मांधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीष होता, असे मी पूर्वी सांगितले. त्याचा आजोबा युवनाश्र्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचा पुत्र यौवनाश्र्व आणि यौवनाश्र्वाचा पुत्र हारीत झाला. मांधांत्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्कत झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा पुरूकुत्साला दिली. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन, वध करण्यायोग्य गंधर्वांना, पुरूकुत्साने मारले. यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की, जो या प्रसंगाचे स्मरण करील, त्याला सापांपासून भीती राहणार नाही. पूरुकुत्साचा पुत्र त्रसद्दस्यू होता. त्याचा पुत्र अनरण्य झाला. अनरण्याचा हर्यश्र्व. त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत. हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता, तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला. परंतु विश्वमित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले. तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो.

            त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी यांच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले. हरिष्चंद्राला संतान नव्हते. म्हणून तो अतिशय उदास असे. नारदाच्या उपदेशानुसार तो वरूणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की, 'प्रभो ! मला पुत्रप्राप्ती व्हावी. महाराज ! जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन. वरून म्हणाले - "ठीक आहे." तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिष्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. पुत्र होताच वरूण येऊन म्हणाले, " हरीचंद्रा ! तुला पुत्रप्राप्ति झाली आहे. आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला - "हा यज्ञपशु दहा दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल. " दहा दिवसांनंतर वरूण पुन्हा येऊन म्हणाले, " आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला- " जेव्हा या यज्ञपशूच्या तोंडात दात येतील, तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल. " दात आल्यानंतर वरूण म्हणाले, "आता याला दात आले आहेत, माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील, तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल. " दुधाचे दात पडल्यानंतर वरूण म्हणाले, " आता या यज्ञपशुचे दात पडले आहेत; माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, " जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील, तेव्हा हा पशू यज्ञासाठी योग्य होईल. " दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, " आता माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, " वरूण महाराज ! क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो. तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो. " अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सत्व, रज, तम हे आपले तीन नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आहात. हे गिरीशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्त्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल, एवढेच काय परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रीपुरासुर, कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत, असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यांतून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. जीवन्मुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहातात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहाता. म्हणून जे लोक आपल्याला असक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठूर आहात असे म्हणतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत ! या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासूनही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादीकांनाही होत नाही; तर ते स्तुती कशी करू शकतील ? आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार ? तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगाण केले आहे. आम्ही तर केवळ आपले हे लीलाविहारी रूप पाहात आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या, तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणिमात्रांचे सुहृद भगवान शंकर करूणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले.
श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पाहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. आपल्या शरण अभंग प्राण्यांना सज्जन दुसऱ्याच्या प्राण्याचे क्षणभंगुर प्राण्यांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्यांच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणून मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो.
श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून विष पिण्याची तयारी केली.देवांना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणिमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वत:च ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे.
सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवाधिदेव शंकराचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप,अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - २

श्री गणेशाय नमः अशा रीतीने देव आणि असुर यांनी समुद्रमंथन करूनसुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही, तेव्हा स्वत: भगवान समुद्रमंथन करू लागले.
मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर, कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडले, कपाळावर झुलणारे कुरळे केस, डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती. संपूर्ण जगाला अभय देणाऱ्या आपल्या विश्वविजयी भुजांनी वासुकीनागाला पकडून तसेच कूर्मरूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवान मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले, त्यावेळी ते दुसऱ्या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले. अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरवातीला हालाहल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले. त्यामुळे समुद्रातून मासे, मगरी, साप व कासवे भयभीत होऊन वर आली आणि तिमी, तिमिंगिल इत्यादी मासे, समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकुळ झाल्या. ते अत्यंत उग्र विष दिशा-दिशांना, वरखाली, सगळीकडे उडू आणि पसरू लागले. या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता. संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांयांना शरण गेले. भगवान शंकर पार्वतीसह कैलासपर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते. ते तेथे मुनींना संमत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते. प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रमाण केला.
प्रजापति म्हणाले - हे देवाधिदेवा महादेवा, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. त्रैलोक्याला भस्म करणाऱ्या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे. साऱ्या जगताला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात. म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात; कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे जगद्गुरु आहात. हे प्रभो, आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय जेव्हा करता, तेव्हा स्वतःसिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा, विष्णू, शिव अशी नावे धारण करता. आपण स्वयंप्रकाश आहात. कारण आपण परम रहस्यमय ब्रम्हतत्व आहात. सर्व प्रकारच्या उच्च-निच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात. आपणच सर्वांचे आत्मा आहात. अनेक शक्तींच्याद्वारे आपणच जगद्रुपाने प्रतीत होता. आपणच जगाचे ईश्वर आहात. सर्व वेद आपल्यापासून प्रगट झाली आहेत; आपणच जगताचे आदिकारण महत्त्व आणि त्रिविध अहंकार आहात. तसेच प्राण, इंद्रिये, पंचमहाभूते, शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात. आपणच काळ, यज्ञ, सत्य,ऋत, आणि धर्म आहात. आपणच 'अ-उ-म' या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात, असे वेदवेत्ते म्हणतात. सर्वदेवस्वरूप अग्नी आपले मुख आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणाऱ्या हे देवा, ही पृथ्वी आपले चरणकमल आहे. आपण अखिल देवस्वरूप आहात. हा काळ आपली गती आहे. दिशा कान आहेत आणि वरून रसनेंद्रिय आहे. आकाश नाभी आहे,वायू श्वास आहे, सूर्य नेत्र आहे, आणि पाणी वीर्य आहे. आपला अहंकार उच्च-नीच सर्व जीवांचा आश्रय आहे. चंद्र मन आहे आणि हे प्रभो, स्वर्ग आपले मस्तक आहे. हे वेदस्वरूप भगवन, समुद्र आपले पोट आहे, पर्वत हाडे आहेत, सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत. गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे. हे स्वामी, पाच उपनिषदेच आपली पाच मुखे आहेत. त्यांच्याच पदच्छेदापासून अडतीस कलात्मक मंत्र निघाले आहेत. हे देवा, आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले 'शिव'नावाचे स्वयंप्रकाश परमार्थतत्व आहे. दंभ,लोभ, इत्यादी अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. परंतु भगवंतांचे हे कृत्य दैत्यसेनापतींना पसंत पडले नाही. ते म्हणाले, शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे. आम्ही ते पकडणार नाही. आम्ही वेदशास्त्रांचे विधिपूर्वक अध्ययन केले आहे, उच्च कुळात आमचा जन्म झाला आहे. आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहेत. असे म्हणून ते गुपचूपपणे एका बाजूला जाऊन उभे राहीले. ते पाहून, भगवंतांनी स्मित हास्य करून, वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले. अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृतप्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले.
परीक्षिता, जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले, तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला. अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळत आहेत, असे पाहून त्यांचे मन खट्ट झाले सर्वांच्या चेहऱ्यावर उदासिनता पसरली. त्यावेळी भगवंतांनी ओळखले की, ही विघ्नराजाची करामत आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या निवारण्याचा उपाय शोधून अत्यंत विशाल व विस्मयकार कुर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले. भगवंतांची शक्ती अपार असून ते सत्यसंकल्प आहेत. त्यांना अशक्य ते काय ? देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेल्या पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले. त्यावेळी भगवंतांनी जंबूदीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केले होते. परीक्षिता, मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरवण्यास सुरुवात केली. तेव्हा तो भगवंतांच्या पाठीवर फिरू लागला. अनंत शक्तिशाली आदिकच्छप भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खाजविणे वाटत होते. त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढवीत आसुरी शक्तिरूपात त्यांच्यात प्रवेश केला. त्याचप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकीनागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला. इकडे पर्वताच्या वर दुसऱ्या पर्वतासारखे होऊन सहस्रबाहू भगवंतांनी आपल्या हातांनी त्याला दाबून धरले. त्यावेळी आकाशात ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, वगैरे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून, खाली त्याला कच्छपाच्या रूपाने आधार देऊन, देव आणि असुरांच्या शरीरांमध्ये शक्तीच्या व पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्तिसंपन्न केले. आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले. त्यावेळी समुद्र आणि त्यात राहाणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली. नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र, मुख आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडू लागली. तिच्या धुरामुळे पौलोम,कालेय, बली, इल्वल इत्यादी असुर निस्तेज झाले. ते असे वाटू लागले की, वणव्याने होरपळून गेलेले जणू सागवान. वासुकीच्या श्वासांच्या फुत्काराने देवांचेसुद्धा तेज फिके पडले. त्यांची वस्त्रे, माळा, श्रेष्ठ कवचे आणि मुखे धुरकट झाली. त्यांची ही दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यावर वर्षाव करू लागले आणि समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...