श्री गणेशाय नमः देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमूची,बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले. आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात, त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केली. पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली. नमुचीने, सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात, त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. इंद्र कुठेच दिसत नाही, हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे, समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली. परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे,रथ,ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्राप्त:काळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश आणि पृथ्वी उजळून शोकतो, त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. परीक्षिता, त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली.
परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करू लागला. "इंद्रा, आता तू वाचत नाहीस ! "अशी आरोळी ठोकीत सैन्याच्या घंटा असलेल्या एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूल त्याने इंद्रावर फेकला. परीक्षिता, तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता, तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते, त्या वज्राला नमूचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे, ही मोठीच आच्श्रर्यकारक घटना घडली. वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही, हे पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की, " सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का ?" पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्याफिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत, तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या प्रर्वतांचे पंख तोडून टाकले होते. त्वष्ट्याच्या तपश्र्चर्येचे सार वृत्रासुररूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खरचटतही नसे, अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठविले होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा