१५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी असे म्हटल्यावर बळीराजाला हसू आले. तो म्हणाला, "ठीक आहे. तुझी इच्छा असेल, तेवढेच घे." असे म्हणून वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्यांनी झारी हातात घेतली. ज्ञानी शुक्राचार्यांना सर्वकाही कळले होते. भगवंतांची ही लीला जाणून त्यांना जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले.
शुक्राचार्य म्हणाले- विरोचनकुमारा, हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत. देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी अदितीपासून अवतीर्ण झाले आहेत. आपले सर्वस्व जाईल, हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. हे तर दैत्यांवर मोठे संकट आले आहे. हे मला योग्य वाटत नाही. स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचाऱ्याचे रूप घेतले आहे. हे तुझे राज्य, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज आणि किर्ती, तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील. हे विश्वरूप आहेत. तीन पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील. मुर्खा, सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल? हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील. यांच्या विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल. तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे राहील? प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल; कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील. जे दान दिल्यानंतर जीवननिर्वाहासाठी काही उरत नाही, ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाहीत. ज्यांचा जीवन निर्वाह योग्य तऱ्हेने चालतो, तोच या संसारात दान, यज्ञ, तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो. जो मनुष्य आपले धन धर्मासाठी, यशासाठी, धनाची वाढ करण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी, अशा पाच कारणांसाठी विभागतो, तोच इह-परलोकी सुख मिळवितो. हे असुरश्रेष्ठा, मी तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो, ऐक. श्रुती म्हणते, होय म्हणणे, हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे. हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फुल, फळ आहे. परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फुल, फळ कसे राहणार? असते हेच शरीररुपी वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तत्काळ नष्ट होईल, यात शंका नाही. "हां, मी देईन" हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते, म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजेच धनापासून वंचित करणारा होय. याच कारणास्तव, जो पुरुष "हां, मी देईन" असे म्हणतो, त्याचे धन संपून जाते. तो मागणाऱ्याला सर्वकाही देण्याचे मान्य करतो, तो आपल्या भोगासाठी काहीच शिल्लक ठेवू शकत नाही. याच्या उलट, "मी देणार नाही" हे जे अस्वीकारात्मक असत्य आहे, ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे. परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही. जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकीर्ती होते. तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. स्त्रियांना वश करण्यासाठी, हास्यविनोदामध्ये, विवाहाच्या वेळी, आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, प्राण संकट उपस्थित झाल्यावर, गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी, तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...