०५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत; तर मग त्यांनी दरिद्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली ? शिवाय ती मिळाल्यावरसुद्धा त्यांनी बलीला का बांधले ? माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहल आहे. पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले, ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
            श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळविण्याची इच्छा करणार्‍या बलीला त्यांनी महाभिषेकविधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजीत नावाचा यज्ञ करविला. हविर्द्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामुग्री मिळवून त्यांच्याचकरवी स्वस्तिवाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदिक्षणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला. नंतर तो बली, भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून, धनुष्य, तलवार, बाणांचे बाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा, तसा शोभला. त्याच्याबरोबर त्याच्यासारखे ऐश्वर्य,बल आणि सामर्थ्य असणारे दैत्यसेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली.
            अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती. त्यांमध्ये पक्षांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत. कोवळी पालवी आणि फळा-फुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असत. तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत. देवांना प्रिय अशा देवांगणा तेथेच जलक्रीडा करीत असत. ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत. तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिकमण्यांची गोपुरे आहेत. ती मोठमोठे, वेगवेगळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्माने त्या नगरीची निर्मिती केली आहे. संभास्थाने, ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे. दहा कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मढविलेले मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत. तेथील स्त्रिया नेहमी षोडषवर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते. त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळांनी देदीप्यमान दिसतो, तशा दिसतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...