भाग - १ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाग - १ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०९ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात- परीक्षिता ! उर्वशीपासून आयू, श्रुतायू, सत्यायू,रय, विजय आणि जय असे पुरूरव्याला सहा पुत्र झाले.

            श्रुतायूचा पुत्र वसुमान, सत्यायूचा श्रुतंजय,रयाचा एक आणि जयाचा अमित. विजयाचा भीम, भीमाचा कांचन, कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जहृ होता. ज्याने गंगेला आपल्या ओंजळीत घेऊन पिऊन टाकले, तोच हा जहृ होय. जहृचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा पुत्र पूरू होता, पूरूचा बलाक आणि बलाकाचा अजक.अजकाचा पुत्र कुश. कुशांबू,तनय,वसू आणि कुशनाभ हे कुशाचे चार पुत्र होते. यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता.

            गाधीच्या कन्येचे नाव सत्यवती होते. ऋचीक ऋषींनी तिला मागणी घातली. हा वर कन्येसाठी योग्य नाही, असे वाटून गाधी ऋचीकाला म्हणाला.

            "मुनेश्वर ! आम्ही कुशिक आहोत. आमच्या कन्येसाठी आपण मला एक हजार घोडे शिल्करुपाने द्या. त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा. " गाधी असे म्हणाला, तेव्हा ऋचीक मुनींना त्याच्या आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला. एकदा महर्षी ऋचीकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली. महर्षी ऋचीकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघीसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजविला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले. सत्यवतीच्या आईला वाटले की, ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजविला असेल, म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला. तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वत: खाल्ला मुनींना ही गोष्ट समजली, तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले, " तू मोठा अनर्थ केलास ! आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल. " सत्यवतीने ऋचीक मुनींना प्रसन्ना करून प्रार्थना केली की, " असे होऊ नये. " तेव्हा ते म्हणाले- "ठीक आहे. पुत्राऐवजी तुझा नातू तसा होईल. " नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला. सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी 'कौशिकी' नदी झाली. रेणू ऋषींची कन्या रेणुका होती. जमदग्नींनी तिचे पाणिग्रहण केले. जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान परशुराम होते. त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात कि, हैहयवंशाचा नाश करण्यासाठी स्वत: भगवंतांनीच हा अशावतार ग्रहण केला होता. त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षेत्रीयहीन केले. क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता, तरीसुद्धा ते क्षेत्रिय दुष्ट, ब्राह्मणांचे द्वेष्टे,रज-तमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते. म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरविला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! आता मी तुला चंद्राच्या पावन वंशासंबंधी सांगतो. या वंशामध्ये पुरुरवा इत्यादी मोठ-मोठ्या पवित्रकीर्ती राजांचे वर्णन आहे.

हजारो मस्तके असणाऱ्या विराटपुरुष नारायणांच्या नाभिसरोवरातील कमळापासून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांचे पुत्र अत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते. त्याच अत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनविले. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवून राजसूय यज्ञ केला. यामुळे तो गर्विष्ठ झाला आणि त्याने बळजबरीने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. देवगुरु बृहस्पतींनी आपली पत्‍नी परत देण्याविषयी त्याला वारंवार विनंती केली. परंतु तो इतका मस्तवाल झाला होता की, त्याने तिला मुळीच परत दिले नाही. याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झाले. बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरू अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली. देवराज इंद्रानेसुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली. अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा संग्राम झाला.

त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली. यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भर्त्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले. तेव्हा तारा गर्भवती आहे, असे जाणून बृहस्पती तिला म्हणाले. " दष्टे ! माझ्या अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भ तू ताबडतोब बाहेर टाक. हे स्त्रिये, मी तुला जाळून टाकणार नाही. कारण एक तर तू स्त्री आहेस आणि दुसरे म्हणजे मला संतानप्राप्तिची इच्छा आहे. पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली. तिने सोन्यासारख्या चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला. त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनीही वाटू लागले की, हा आपल्याला मिळावा. आता ते एकमेकांशी "हा तुझा नाही, माझा आहे. " असे म्हणत जोरजोराने भांडू लागले. ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारले असता, लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही. आपल्या मातेच्या दिखाऊ लज्जेने रागावून बोलक म्हणाला, "दुराचारिणी ! तू बोलत का नाहीस ! मला लवकर सांग तुझे कुकर्म. " त्याचवेळी ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलावून तिची समजूत घालून विचारले. तेव्हा तारा हळूच म्हणाली 'चंद्राचा.' म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतले. परीक्षिता ! ब्रह्मदेवांनी त्या बालकाचे नाव 'बुध' असे ठेवले. कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला.

परीक्षिता ! बुधापासून इलेला पुरूरवा झाला. याचे वर्णन मी यापूर्वीच केले आहे. एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये देवर्षी नारद पुरूरव्याचे रूप, गुण, उदारता, शील, संपत्ती आणि पराक्रमाचे वर्णन करीत होते. ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगना पुरूरव्याकडे आली. उर्वशीला जरी मित्रावरूणांच्या शापामुळेच मृत्युलोकात यावे लागले होते, तरीसुद्धा पुरुषश्रेष्ठ पुरुरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणेच सुंदर आहे, असे ऐकून उर्वशी धैर्य धरून त्याच्याकडे आली. देवांगना उर्वशीला पाहून पुरूरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले. त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. गोड शब्दांत तो म्हणाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - १

श्रीशुकाचार्य म्हणतात - इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वशिष्ठ म्हणाले की, "राजा ! इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पाहा. " हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वशिष्ठमुनीही इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेले. विचारी निमिने 'जीवन क्षणभंगुर आहे ' , असे समजून गुरु वशिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या ऋत्विजांकरवी यज्ञाला आरंभ केला. जेव्हा गुरु वशिष्ठ परत आले, तेव्हा त्यांनी मिनीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला कि, "स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो. " निमीनेही धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की, "लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडो. " असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पणजोबा वशिष्ठांनीसुद्धा आपल्या शरीराचा त्याग करुन मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमिराजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला, तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली. " हे देवांनो ! जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल, तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे. " देव म्हणाले - 'तथास्तु. ' त्यावेळी निमी म्हणाला "मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्रीभगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार, या भीतीने ते या शरीराशी कधीही संबंध इच्छित नाहीत. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीरालासुद्धा सगळीकडे मृत्यूच मृत्यू आहे. "

            देव म्हणाले - निमीराजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या इच्छेनुसार राहिल. तो तेथे राहून सूक्ष्मशरीराने भगवंतांचे चिंतन करील. पापण्यांच्या उघडझापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल, असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव 'जनक' झाले.देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे 'वैदेह' आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव 'मिथिल' असे पडले. त्यानेच 'मिथिलापुरी' बसविली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवान श्रीरामांनी वसिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्वदेवस्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले. त्यांनी होत्याला पूर्व, ब्रह्मदेवाला दक्षिण, अध्वर्यूला पश्चिम आणि उद्गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली. त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती, ती त्यांनी आचार्यांना दिली. त्यांना माहीत होते की, संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ नि:स्पृह ब्राह्मणच आहे. अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्याजवळ ठेवले. तसेच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्यालंकारच शिल्लक राहिले.

            जेव्हा आचार्यादी ब्राह्मणांनी पाहिले की, भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात, त्यांच्या अंत:करणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे, तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले. त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले. " प्रभु ! आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात. आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञानांधकाराचा नाश करीत आहात. अशा स्थितीत आपण आम्हांला काय दिले नाहीत बरे ? आपले ज्ञान अनंत आहे. पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. जे कोणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत, अशा महात्म्यांना आपण आपले चरणकमल दिले आहेत. असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्ट दैवत मानता. भगवान ! अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघू झाला. रघूचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला. देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती.
            परीक्षिता ! सीतापती भगवान श्रीरामांचे चरित्र तत्त्वज्ञानी ऋषींनी पुष्कळसे वर्णन केले आहे आणि तू ते अनेक वेळा ऐकलेही आहेस.

            भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी राना-वनांत फिरत राहिले. त्यांचे चरण इतके कोमल होते की, प्रियेच्या हातांचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता. तीच पावले जेव्हा वनात चालून चालून थकून जात, तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांच्या थकवा दूर करीत. शूर्पणखेला विद्रूप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला. या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भुवया चढवल्या, त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला. त्यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकले. ते अयोध्याधिपती आमचे रक्षण करोत.

            श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणादेखतच मारीच इत्यादी राक्षसश्रेष्ठांना ठार केले. परीक्षिता ! सीतेच्या स्वयंवरमंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते. श्रीरामांनी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले. तोच मधोमध त्याचे दोन तुकडे झाले. हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणे. वक्ष:स्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकले. त्या गुण, शील, वय, शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत श्रीरामांना सोभत होत्या. अयोध्येला परत येताना वाटेत, ज्यांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती, त्या परशुरामांचा गर्व त्यांनी नष्ट केला. जरी महाराज दशरथांनी पत्नीच्या अधीन होऊन तिला तसे वचन दिले होते, तरीसुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते. म्हणून श्रीरामांनी त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो, तसे राज्य, लक्ष्मी, मित्र, हितचिंतक आणि महाल सोडून पत्नीबरोबर वनवास पत्करला. वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केले. कारण ती कामुक विचारांची होती. तिच्या खर, दूषण, त्रिशिरा या भावांना व अन्य चौदा हजार राक्षसांना, हातात महान धनुष्य घेऊन श्रीरामांनी ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. परंतु त्यात त्याला यश आले नाही. कालांतराने त्याला मृत्यू आला. अंशुमानाचा पुत्र दिलीप यानेसुद्धा तशीच तपश्चर्या केली. परंतु तोही असफल झाला. पुढे त्यालाही मृत्यू आला. दिलीपाचा पुत्र भगीरथ. त्याने दीर्घ कालपर्यंत तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगेने त्याला दर्शन दिले आणि म्हटले - "मी तुला वर देण्यासाठी आले आहे. " तेव्हा राजा भगीरथाने अतिशय नम्रतेने आपले मनोगत प्रगट केले की, " आपण मृत्युलोकात चलावे."

            गंगा म्हणाली, "ज्यावेळी मी स्वर्गातून पृथ्वीवर पडेन, त्यावेळी माझा वेग धारण करणारा कोणीतरी असला पाहिजे. भगीरथा ! असे न झाल्यास मी पृथ्वी फोडून रसातळात पोचेन. याखेरीज, लोक आपली पापे माझ्यामध्ये धुतील, यासाठीसुद्धा मी पृथ्वीवर येणार नाही. कारण मग मी ती पापे कुठे धुणार ? भगिरथा ! याविषयीही तू विचार कर."

            भगीरथ म्हणाला - "सत्पुरुष, संन्यासी, शांत, ब्रह्मनिष्ठ आणि लोकांना पवित्र करणारे सज्जन आपल्या अंगस्पर्शाने तुझी पापे नष्ट करतील. कारण त्यांच्यामध्ये पाप नाहीसे करणारे भगवान निवास करतात. सर्व प्राण्यांचा आत्मा असणारे रुद्रदेव तुझा वेग धारण करतील. कारण ज्याप्रमाणे वस्त्र सुताने ओतप्रोत भरलेले असते, त्याचप्रमाणे हे सर्व विश्व भगवान रूद्रांमध्येच ओतप्रोत आहे." परीक्षिता ! गंगेला असे सांगून भगीरथाने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. थोड्याच दिवसात महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या शंकरांनी 'तथास्तु' असे म्हणून राज्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर भगवंतांच्या चरणांच्या स्पर्शाने जिचे पाणी पवित्र आहे, अशा गंगेला दक्ष राहून मस्तकावर धारण केले. यानंतर राजर्षी भगीरथ, जेथे त्यांच्या पितरांची शरीर राखेचे ढीग होऊन पडली होती, तेथे जगाला पवित्र करणाऱ्या गंगेला घेऊन गेला. वायूप्रमाणे वेगाने चालणाऱ्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता आणि त्याच्या मागे मागे, मार्गात असणाऱ्या देशांना पवित्र करीत, गंगा वेगाने जात होती. शेवटी तिने सगरांच्या जळालेल्या पुत्रांना आपल्या पाण्यात बुडविले. जरी सगराचे पुत्र ऋषींच्या शापाने भस्म झाले होते, तरीसुद्धा केवळ शरीराच्या राखेशी गंगाजलाचा स्पर्श होताच स्वर्गात गेले. जर गंगाजलाचा शरीराच्या राखीशी स्पर्श झाल्यानेही सगरांच्या पुत्रांना स्वर्गाची प्राप्ती झाली, तर मग जे लोक श्रद्धेने नियमपूर्वक गंगामातेचे सेवन करतात, त्यांच्यासंबंधी काय सांगावे ? मी गंगेच्या महिम्यासंबंधी जे काही येथे सांगितले, त्यामध्ये आश्र्चर्य करण्यासारखे काही नाही. कारण ती भगवंतांच्या चरणकमलांपासून निघाली आहे. ज्या चरणांचे श्रद्धेने चिंतन करून मुनी पवित्र होऊन तिन्ही गुणांचे कठीण बंधन तोडून ताबडतोब भगवत्स्वरूप होतात; तर मग गंगा संसारबंधन तोडून टाकील, यात काय आश्र्चर्य आहे ?

            भगीरथाचा पुत्र होता श्रुत. श्रुताचा नाभ. पूर्वी कथन केलेल्या नाभापेक्षा हा वेगळा आहे. नाभाचा पुत्र सिंधुद्वीप होता आणि सिंधूद्वीपाचा अयुतायू. अयुतायूच्या पुत्राचे नाव होते ऋतुपर्ण. तो नलाचा मित्र होता. त्याने नलाला फासा फेकण्याच्या विद्येचे रहस्य सांगितले होते आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून विश्वविद्या शिकून घेतली होती. ऋतुपर्णाचा पुत्र सर्वकाम. परीक्षिता ! सर्वकामाच्या पुत्राचे नाव होते सुदास. सुदासाचा पुत्र होता सौदास आणि त्याच्या पत्नीचे नाव मदयंती होते. सौदासालाच काहीजण मित्रसह म्हणतात आणि काही काही ठिकाणी त्याला कल्माषपाद असेही म्हटले गेले आहे. वसिष्ठांच्या शापाने तो राक्षस झाला होता आणि पुन्हा आपल्या कर्मामुळे तो निपुत्रिक झाला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय आठवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - रोहिताचा पुत्र हरित होता. हरिताचा पुत्र चंप झाला. त्यानेच चंपापुरी वसविली होती. चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय झाला. विजयाचा भरूक, भरूकाचा वृक आणि वृकाचा पुत्र बाहुक झाला. शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतले, तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला.वनात गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा बाहुकाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याची पत्नीसुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली. परंतु ती गर्भवती आहे, हे महर्षी और्व यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबविले. जेव्हा तिच्या सवतींना हे माहित झाले, तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिले. पण त्या विषाला घेऊनच एका बालकाचा जन्म झाला. विषासह (गर) जन्म झाल्याकारणाने 'सगर' नाव पडले. हा अतिशय किर्तीमान होता.

सगर चक्रवर्ती होता. त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता. सगराने आपले गुरुदेव और्व यांची आज्ञा मानून तालजंघ, यवन, शक, हैहय आणि बर्बर जातीच्या लोकांचा वध केला नाही, परंतु त्यांना विद्रूप केले. त्यांपैकी काहींच्या डोक्यांचे मुंडन केले, काहींना दाढी-मिशा ठेवण्यास सांगितले, काहींना केस मोकळे सोडावयास सांगितले, तर काहींचे अर्धे मुंडन केले. सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली, नेसण्याची नाही; आणि काहींना फक्त लंगोटी नेसण्यासच सांगितले, वस्र पांघरण्यास नव्हे. यानंतर राजा सगराने और्व ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञाच्या द्वारा संपूर्ण वेद व देवतामय, आत्मस्वरूप सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना केली. त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला होता, तो इंद्राने चोरून नेला. त्यावेळी सुमवतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्विष्ट मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यासाठी पृथ्वी धुंडाळली. पण जेव्हा घोडा सापडला नाही, तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पृथ्वी खोदली, खोदता-खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल-मुनींजवळ आपला घोडा दिसला. घोड्याला पाहून ते साठ हजार राजकुमार शस्त्रे हातात घेऊन "हाच आमचा घोडा चोरणारा चोर आहे, आणि वर डोळे मिटून बसला आहे. मारा, मारा ह्या नीचाला," असे म्हणत त्यांच्याकडे धावले. त्याचवेळी कपिल मुनींनी आपल्या पापण्या उघडल्या. इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतली होती. म्हणूनच त्यांनी त्या महापुरुषाचा तिरस्कार केला. यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन, तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्व जळून खाक झाले. सगराचे पुत्र कपिलमुनींच्या क्रोधामुळे जळून गेले. हे म्हणणे योग्य नाही. कारण ते तर शुद्ध सत्त्वगुणाचे आश्रय आहेत. त्यांचे शरीर जगाला पवित्र करीत असते. क्रोधरुपी तमोगुण त्यांच्यामध्ये असणे कसे शक्य आहे बरे ? पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते काय ? हा संसार-सागर एक मृत्यूकडे नेणारा मार्गच आहे. याला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे. परंतु कपिल मुनींनी या जगात सांख्यशास्त्ररुपी एक अशी भक्कम नाव बनविली आहे की,मुक्तीची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती तिच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते. ते केवळ परम ज्ञानीच नव्हेत, तर स्वतः परमात्मा आहेत. हा शत्रू हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांचे ठिकाणी कशी असेल बरे ?

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - मांधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीष होता, असे मी पूर्वी सांगितले. त्याचा आजोबा युवनाश्र्व याने त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. त्याचा पुत्र यौवनाश्र्व आणि यौवनाश्र्वाचा पुत्र हारीत झाला. मांधांत्याच्या वंशामध्ये हे तिघे वेगवेगळ्या गोत्रांचे प्रवर्कत झाले. नागांनी आपली बहीण नर्मदा पुरूकुत्साला दिली. नागराज वासुकीच्या आज्ञेने नर्मदा आपल्या पतीला रसातळात घेऊन गेली. तेथे भगवंतांच्या शक्तीने संपन्न होऊन, वध करण्यायोग्य गंधर्वांना, पुरूकुत्साने मारले. यावर नागराजाने प्रसन्न होऊन पुरुकुत्साला वर दिला की, जो या प्रसंगाचे स्मरण करील, त्याला सापांपासून भीती राहणार नाही. पूरुकुत्साचा पुत्र त्रसद्दस्यू होता. त्याचा पुत्र अनरण्य झाला. अनरण्याचा हर्यश्र्व. त्याचा अरुण आणि अरुणाचा त्रिबंधन पुत्र झाला. त्रिबंधनाचा पुत्र सत्यव्रत. हाच सत्यव्रत त्रिशंकू नावाने विख्यात झाला. त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू जरी चांडाळ झाला होता, तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गात गेला. देवांनी त्याला तेथून ढकलून दिले तेव्हा तो खाली डोके करून पडला. परंतु विश्वमित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशातच स्थिर केले. तो अजूनही आकाशात लटकत असलेला दिसतो.

            त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी यांच्यासाठी एकमेकांना शाप देऊन ते पक्षी झाले आणि कित्येक वर्षेपर्यंत लढत राहिले. हरिष्चंद्राला संतान नव्हते. म्हणून तो अतिशय उदास असे. नारदाच्या उपदेशानुसार तो वरूणांना शरण गेला आणि त्याने प्रार्थना केली की, 'प्रभो ! मला पुत्रप्राप्ती व्हावी. महाराज ! जर मला शूर पुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन. वरून म्हणाले - "ठीक आहे." तेव्हा वरुणांच्या कृपेने हरिष्चंद्राला रोहित नावाचा पुत्र झाला. पुत्र होताच वरूण येऊन म्हणाले, " हरीचंद्रा ! तुला पुत्रप्राप्ति झाली आहे. आता याच्याद्वारा माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला - "हा यज्ञपशु दहा दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल. " दहा दिवसांनंतर वरूण पुन्हा येऊन म्हणाले, " आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाला- " जेव्हा या यज्ञपशूच्या तोंडात दात येतील, तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल. " दात आल्यानंतर वरूण म्हणाले, "आता याला दात आले आहेत, माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, जेव्हा याचे दुधाचे दात पडून जातील, तेव्हा हा यज्ञासाठी योग्य होईल. " दुधाचे दात पडल्यानंतर वरूण म्हणाले, " आता या यज्ञपशुचे दात पडले आहेत; माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, " जेव्हा याला दुसऱ्यांदा दात येतील, तेव्हा हा पशू यज्ञासाठी योग्य होईल. " दात पुन्हा उगवल्यावर वरुण म्हणाले, " आता माझा यज्ञ कर. " हरिश्चंद्र म्हणाला, " वरूण महाराज ! क्षत्रिय पशु जेव्हा कवच धारण करू लागतो. तेव्हा यज्ञासाठी योग्य होतो. " अशा प्रकारे पुत्रप्रेमात मन गुंतल्यामुळे हरिश्चंद्र पुढील वायदा करून वेळ टाळू लागला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - विरूप, केतुमान आणि शंभू असे अंबरीषाचे तीन पुत्र होते. विरूपाचा पृषदश्र्व आणि त्याचा पुत्र रथीतर होता. रथीतराला संतान नव्हते. वंश-परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्राह्मतेज आणि संपन्न असे अनेक पुत्र उत्पन्न केले. ते जरी रथीतराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते, म्हणून रथीतराचे जे गोत्र होते तेच यांचे असावयास पाहिजे होते, तरीसुद्धा ते आंगिरसच म्हणविले गेले. हे रथीतर वंशाचे श्रेष्ठ पुरुष होते. कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णांशी त्यांचा संबंध होता.

            एकदा मनूच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. इक्ष्वाकूचे शंभर पुत्र होते. विकुक्षी, निमी आणि दंडक हे त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांच्याहून धाकटे पंचवीस पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे आणि पंचवीस पश्चिम भागाचे तसेच वरील तिघेजण मध्य भागाचे अधिपती झाले. उरलेले सत्तेचाळीस दक्षिण इत्यादी अन्य प्रांतांचे अधिपती झाले. एकदा इक्ष्वाकूने अष्टका श्रद्धाचे वेळी थोरल्या पुत्राला आज्ञा केली की, "विकुक्षे ! लगेच जाऊन श्राध्दाला योग्य पवित्र पशूचे मांस आण. " " ठीक आहे" असे म्हणून वीर विकुक्षी वनात गेला. तेथे त्याने श्राद्धासाठी योग्य अशा पुष्कळ पशूंची शिकार केली. तो थकला होता आणि त्याला भूकही लागली होती. म्हणून श्रद्धासाठी मारलेला पशु आपण खाऊ नये, हे विसरून त्याने एक ससा खाल्ला. विकक्षीने उरलेले मांस आणून आपल्या पित्याला दिले.इक्ष्वाकूने त्यावर प्रोक्षण करायला आपल्या गुरूंना सांगितले. तेव्हा गुरुजींनी सांगितले की, हे मांस दूषित आणि श्राद्धासाठी अयोग्य आहे. गुरुजींच्या सांगण्यावरून इक्ष्वाकूला आपल्या पुत्राने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला. शास्त्रीय विधीचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या पुत्राला रागाने त्याने आपल्या देशातून बाहेर घालविले. त्यानंतर इक्ष्वाकूने आपले गुरुदेव वशिष्ट यांच्याबरोबर ज्ञानविषयक चर्चा केली आणि योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतले. पित्याचा देहांत झाल्यानंतर विकुक्षी आपल्या राजधानीत परत आला आणि तो या पृथ्वीचे राज्य करू लागला. त्याने मोठमोठ्या यज्ञांनी भगवंतांची आराधना केली आणि जगात तो शशाद नावाने प्रसिद्ध झाला. इकुक्षीच्या पुत्राचे नाव पुरंजय होते. त्याला कोणी 'इंद्रवाह' तर कोणी 'ककुत्स्थ' म्हणतात. ज्या कर्मामुळे त्याला ही नावे पडली, ते ऐक.

            सत्ययुगाच्या शेवटी देवांचे दानवांशी घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये देवांचा दैत्यांकडून पराभव झाला. तेव्हा त्यांनी आपल्याला साहाय्य करण्यासाठी विर पुरं ज्याला आपला मित्र बनवले. पुरंजयाला आपला मित्र बनविले पुरंजय म्हणाला की, "जर देवराज इंद्र माझे वाहन होतील, तर मी युद्ध करीन. " प्रथम इंद्राने हे मानले नाही. परंतु देवाधिदेव सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवंतांच्या सांगण्यावरून शेवटी तो एक अतिशय मोठा बैल झाला. सर्वांतर्यामी भगवान विष्णूंनी आपल्या शक्तीने पुरंजयाला सिद्ध केले. त्याने कवच धारण करून दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेतले. त्यानंतर बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला. जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला, तेव्हा देव त्याची स्तुती करू लागले. देवांना बरोबर घेऊन त्याने पश्चिमेकडे असलेल्या दैत्यांच्या नगराला घेतले. वीर पुरंजयाचा दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचकारी घोर संग्राम झाला. युद्धामध्ये जे जे दैत्य त्याच्यासमोर आले, त्यांना पुरंजयाने बाणांनी यमाच्या हवाली केले. त्या प्रणयकालीन धगधगत्या आगीप्रमाणे होणाऱ्या बाणांच्या वर्षावाने छिन्नभिन्न झालेले दैत्य रणभूमी सोडून आपापल्या स्थानी पळून गेले. पूरंजयाने त्यांचे नगर, धन आणि ऐश्वर्य, सर्व काही जिंकून इंद्राला दिले. म्हणूनच त्या राजर्षीला 'पूर' जिंकल्याकारणाने 'पुरंजय' , इंद्राला वाहान बनविल्याने इंद्रवाह' आणि बैलाच्या ककुदावर (वशिंडावर) बसल्याकारणाने 'ककुत्स्थ' म्हटले जाते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - १

श्री गणेशाय नमःश्रीशुक म्हणतात - भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीषाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. दुर्वासांचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीषाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली.

               अंबरीष म्हणाला - हे सुदर्शना ! तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्रमंडळाचा अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रियेसुद्धा तूच आहेस. भगवंतांना प्रिय,एक हजार दात असणाऱ्या, हे सुदर्शना ! मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा ! तू या ब्राह्मणाचे रक्षण कर. तूच धर्म, मधुर आणि सत्य वाणी, सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञसुद्धा आहेस. तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्वलोकस्वरुपसुद्धा आहेस. परम पुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस. हे सुनाभा, तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षणकर्ता आणि अधर्माचे आचरण करणाऱ्या असुरांचे भस्म करणारा अग्नि आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भूत कर्मे करणारा आहेस. तुला नमस्कार असो. मी तुझी स्तुती करतो. हे वेदवाणीच्या आधीश्वरा ! तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते. तुझा महिमा जाणणे कठीण आहे. लहान-मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे. हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ! ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात, तेव्हा तू दैत्य- दानवाच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांचा भुजा, पोट, जांघा, पाय, मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस. हे विश्वरक्षका ! सर्वांचे प्रहार सहन करणाऱ्या तुला गदाधारी भगवंतांनी दुष्टांच्या नाशासाठीच नेमले आहे. तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर. आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल. मी जर काही दान केले असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांनाच आपले दैवत समजत असतील, तर दुर्वासांचा त्रास नाहीसा होवो. सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आतम्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील, तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर होवो.    

            श्रीशुक म्हणतात - दुर्वासांचा सगळ्या बाजूंनी दाह करणाऱ्या भगवंतांच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले. जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा ते त्या राजाला उत्तम आशीर्वाद देते त्याची प्रशंसा करू लागले.     

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - मुनिवर्य, अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती, त्यांच्या त्या आदिअवताराची कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी, लोकांना न आवडणारे, असाह्य असे हे माशाचे रूप का धारण केले ? भगवन, महात्म्यांना किर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हांला सांगावी.
सुत म्हणतात - जेव्हा परिक्षिताने भगवान श्रीशुकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी, भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! गाई, ब्राह्मण, देव, साधू,वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. ते सर्वशक्तिमान प्रभू वायुप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धीगत गुणांनी ते लहान-मोठे होत नाहीत. कारण ते निर्गुण आहेत. परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्रह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रणयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहाणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला.
परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत्परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राध्ददेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनु बनविले. तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडणे. अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, "राजन, आपण दिनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहित आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडीत आहात ? " स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रुपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती, तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. त्या मासळीचे दिनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्या वेळी मासळी राजाला म्हणाली. आता मोठ्या कष्टानेसुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ. तेथे मी आरामात राहू शकेन. राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवले. परंतु तेथे सोडल्यावर ती मासोळी दोन घटकात तीन हात मोठी झाली. " राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे. म्हणून मला राहाण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे. "परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले. परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले. आणि म्हणाली- "राजन, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहाण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याचा खोल डोहात ठेवावे. " त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयांत सोडले. परंतु जलाशय जेवढा मोठा असे, तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणले. समुद्रात सोडीत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला," हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहातात, त्या मला खाऊन टाकतील. म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये."
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले, तेव्हा सांधूना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला. हात जोडून गद्गगद वाणीने तो भगवंतांना म्हणू लागला.
            बली म्हणाला - प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला, तेव्हा तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते, तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही, ती माझ्यासारख्या असुरावर केलीत.
            श्रीशुक म्हणतात - वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला. अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले; अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वत: उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की, माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली.
            प्रल्हाद म्हणाले - प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्ष्मी आणि शंकरांनासुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला ? अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात, तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. हे शरणागतवत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मत:च दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्णदृष्टी कशी काय वळली ? आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळताखेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता !
            श्रीभगवान म्हणाले - बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जातिबांधवांना सुखी कर. तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहील्याकारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील.
श्रीशुक म्हणतात - राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्धबुद्धी प्रल्हादांनी 'ठीक' असे म्हणून हात जोडून, भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले. ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल, ती आपण पूर्ण करावी. कारण कर्म करण्यात जी उणीव राहाते, ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने तो म्हणाला.
बली म्हणाला - हे पवित्रकीर्ती देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवितो, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही. दारिद्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही. जितका मी माझ्या अपकीर्तीला भितो. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे. कारण तसा दंड माता, पिता, भाऊ आणि सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परम गुरु आहात. कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता,बल, इत्यादींच्या मदाने आंधळे होतो, तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यांत अंजन घालता. आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात, तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणार्‍या पुष्‍कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे. अशा ज्यांच्या आनंद लीला आहेत, त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरूनपाशाने बांधले. याबद्दल मला लज्जा वाटत नाही की, कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. प्रभो, माझे आजोबा प्रल्हाद यांची किर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्यकशिपू याने त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले. परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली. त्यांनी विचार केला की, हे शरीर घेऊन काय करावयाचे आहे ? हे तर एक-ना-एक दिवस आपली साथ सोडणारच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत, त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे ? पत्नीपासून सुद्धा कोणता लाभ ? ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे. मरणार तर आहोतच; मग घराचा मोह कशाला ? या सर्व वस्तुत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणेच होय. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी, संत श्रेष्ठ प्रल्हाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरणकमलांना शरण गेले. खरे तर, आपण लौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात, हे ते जाणत होते. तसे पाहू गेले असता आपण माझेसुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राजलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले आहे, हे त्याला समजत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रिय भक्त प्रल्हाद तिथे येऊन पोहोचले. बलीने पाहीले की, आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकर्ण आणि हात लांबसडक आहेत. ते सुंदर आणि उंच आहेत. तसेच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पीतांबर धारण केला आहे. बली यावेळी वरूणापाशीमध्ये बांधलेला होता; म्हणून प्रल्हाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे, तशी पूजा करू शकला नाही, म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. लाजून त्याने मान खाली घातली. केवळ मस्तक लववून त्याने त्यांना नमस्कार केला. प्रल्हादांनी पाहिले की, भक्तवत्सल भगवान तेथेच उभे आहेत आणि सुनंद, नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत. प्रल्हादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलंकित झाले, डोळ्यात अश्रू उभे राहिले. आनंदपूर्ण हृदयाने, मस्तक हलवून, ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून, त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. वेद, उपवेद, नियम,यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराणसंहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्मफळ भस्म करून टाकला, ते महात्मे,याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकात पोहोचले होते ते, अशा सर्वांनी भगवंताची चरणांना वंदन केले. भगवंतांच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तीभावाने त्यांची स्तुती केली. परीक्षिता, ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय. जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या. त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाला, दिव्य सुगंधयुक्‍त उटी, सुगंधित धूप, दीप,लाह्या, अक्षता, फळे, अंकुर, भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जयजयकार, मृत्य, वाद्ये, गाणी, शंखनाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. त्यावेळी ऋक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व देशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली.
            दैत्यांनी पाहिले की, तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणार्‍या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली. त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले." अरे हा सामान्य ब्राह्मण नाही. हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णु आहे. ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले, तेव्हा या शत्रूने ब्रह्मचाऱ्याचा वेष धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर (मात्र) आमचे सर्वस्व हिरावून घेतले. आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत. शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसेच ते ब्राह्मणभक्त असून दयाळू आहेत. म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे, हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे." असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली. परीक्षिता, बलीची इच्छा नसतानासुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल, पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय विसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - राजन, कुलगुरु शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले, तेव्हा आदर्श गृहस्थ, राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला.
बली म्हणाला - भगवन, आपले म्हणणे खरे आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्यांचा तोच धर्म आहे की, ज्यामुळे अर्थ, काम, यश आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. परंतु गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे. म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे "मी तुला देणार नाही" असे या ब्राह्मणाला कसे सांगू ? या पृथ्वीने म्हटले आहे की, " असत्याहून मोठा असा कोणताच धर्म नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय एकोणिसावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते. ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचे अभिनंदन करून म्हटले.
श्रीभगवान म्हणाले - राजन, आपण जे काही म्हणालात, ते आपल्या कुलपरंपरेला अनुरुप, धर्मपूर्ण, यश वाढविणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलोकी हितकर असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रमाण मानता. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परम शांत प्रल्हाद त्यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण म्हणता. आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजूष पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली, असाही कोणी झाला नाही. याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. आपल्या कुळातच हिरण्याक्षासारख्या वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही. जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढीत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळविला. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकूनसुद्धा आपला विजय झाला, असे ते समजत नव्हते.हिरण्यकशिपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. हिरण्यकशिपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे, असे पाहून वेळकाळ जाणणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यु, त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जाईन, तेथे तेथे हा माझा पिच्छा पुरवील. म्हणून आपण ह्याच्या हृदयात प्रवेश करावा. त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही. कारण तो बहिर्मुख आहे. हे असुरशिरोमणे, ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांच्यावर झडप घालीत होता, त्याच वेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनविले आणि ते त्याच्या श्वासांत लपून नाकातून हृदयात जाऊन बसले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्यूरहित पीतांबरधारी भगवान अदीतीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्षण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीच झळकत होती. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिहृ, हातांमध्ये कडी, भुजांमध्ये बाजूबंद, मस्तकावर किरीट, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतु एकाच वेळी आपापले गुण प्रकट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पवित्र या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला.
            ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. परीक्षिता, ज्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला होता, तिला "विजयाद्वादशी" असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळी शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुताऱ्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनू, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू-गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्यांच्याबरोबर त्यांनी अदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला.
जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनीसुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून, आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला. भगवान स्वत: अव्यक्त आणि चित्स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते,त्या शरीराने, कश्यप आणि अदितींच्या समोरच जसा नट आपला वेष बदलतो, त्याप्रमाणे बटुवेषधारी ब्रह्मचाऱ्याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे.
            त्या वामन ब्राह्मचाऱ्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार करविले. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला, तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. पृथ्वीने कृष्णाजिन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता अदितीने कौपीन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तऋर्षीनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली. अशा रितीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला, तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती, जगज्जननी, साक्षात भगवती पार्वतीदेवींनी भिक्षा घातली. अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटूवेषधारी भगवंतांचा सन्मान केला, तेव्हा ते ब्रह्मर्षिनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. यानंतर भगवंतांनी, स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सतरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरुप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्णरूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रकट झाले. परीक्षिता, त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांना चार हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून अदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेम विवाहृळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. नंतर उठून, हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापु लागले, त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती, लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहात होती. नंतर मोठ्या प्रेमाने, गद्गगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करु लागली.
अदिती म्हणाली - आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तनाचे श्रवणसुद्धा संसार तरुण नेणारे आहे. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो, त्याची सर्व संकटे आपण दूर करता. भगवन, आपण दीनांचे स्वामी आहात. आपण आमचे कल्याण करावे. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात. तसेच विश्वरूपसुद्धा आपणच आहात. अनंत असूनसुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता. आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता. नित्यनिरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहाता. भगवन, मी आपल्याला नमस्कार करते. हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता, तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्यांच्याचसारखे दिव्य शरीर, प्रत्येक इच्छित वस्तू, पुष्कळ धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, योगाच्या सर्व सिद्धि, धर्म, अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते. असे असता शत्रूंवर विजय मिळविणे यासारख्या ज्या लहासहान कामना आहेत, त्यासंबंधी काय सांगावे ?
श्रीशुक म्हणतात - राजन, अदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली. तेव्हा, सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सोळावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला, त्यावेळी देवमाता अदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. पुष्कळ दिवसांनंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली, तेव्हा ते अदितिच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की, तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. परीक्षिता, जेव्हा ते तिथे जाऊन आसनावर बसले, तेव्हा अदितिने विधिपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरील उदासीनता पाहून पत्नीला ते म्हणाले. "कल्याणी, या वेळी जगात ब्राह्मणांवर काही संकट तर आलेले नाही ना ? धर्म बुडाला नाही ना ? स्वच्छंद वागणाऱ्या मृत्यूचे लोकांना भय नाही ना ? प्रिय, जे लोक योगसाधना करू शकत नाहीत, त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणार आहे. त्या गृहस्थाश्रमींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना ? (किंवा) तू कुटुंबाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करता ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील, म्हणून तर तू उदास नाहीस ना ? आलेल्या अतिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊनसुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात, ती घरी निश्चितच कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे आहेत. प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल, म्हणून तू वेळेवर हविष्याने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का ? ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंतांचे मूख आहेत. गृहस्थाने जर या दोन्हींचे पूजन केले, तर सर्व कामना पूर्ण करणाऱ्या लोकांची त्याला प्राप्ती होते. हे मानिनी, तुझ्या बर्‍याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना ?
आदिती म्हणाली - हे गृहस्थाश्रमी ब्रह्मण ! ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तिस्थान आहे. हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे आग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात, तेव्हा माझ्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही ? हे मरीचीपुत्र ! सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने, तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता. तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहाण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे, अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढली आहे. त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की, माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील.
श्रीशुक म्हणतात - अदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली, तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य ! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यानी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा ? कोणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही ही बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्ताचे दुःख दूर करणाऱ्या, जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ती कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - श्रीहरी स्वतःच सर्वांचे स्वामी आहेत; तर मग त्यांनी दरिद्याप्रमाणे बलीकडे तीन पावले जमीन का मागितली ? शिवाय ती मिळाल्यावरसुद्धा त्यांनी बलीला का बांधले ? माझ्या मनात या गोष्टीचे मोठे कुतूहल आहे. पूर्णकाम भगवंतांच्याकडून याचना आणि निरपराध्याला बंधन हे का घडले, ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
            श्रीशुक म्हणाले - परीक्षिता, जेव्हा इंद्राने बलीला पराभूत करून त्याची संपत्ती हिरावून घेतली आणि त्याचे प्राणही घेतले, तेव्हा भृगुवंशातील शुक्राचार्यादिकांनी त्याला जिवंत केले. तेव्हा महात्मा बलीने भृगूंचा शिष्य होऊन आपले द्रव्य त्यांना अर्पण केले आणि तो सर्व प्रकारे त्यांची सेवा करू लागला. यामुळे प्रभावशाली भृगुवंशी ब्राह्मण त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले. स्वर्गावर विजय मिळविण्याची इच्छा करणार्‍या बलीला त्यांनी महाभिषेकविधीने अभिषेक करून त्याच्याकडून विश्वजीत नावाचा यज्ञ करविला. हविर्द्रव्यांनी जेव्हा अग्नीला संतुष्ट केले, तेव्हा यज्ञकुंडातून सोनेरी पत्र्याने मढविलेला रथ, इंद्राच्या रथाच्या घोड्यासारखे हिरव्या रंगाचे घोडे आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा निघाली. त्याचबरोबर सोन्याच्या पत्र्याने मढविलेले दिव्य धनुष्य, कधीही रिकामे न होणारे दोन अक्षय बाणांचे भाते आणि दिव्य कवच सुद्धा प्रगट झाले. त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी त्याला न कोमेजणाऱ्या फुलांची माळ व शुक्राचार्यांनी शंख दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांच्या कृपेने युद्धाची सामुग्री मिळवून त्यांच्याचकरवी स्वस्तिवाचन झाल्यावर बलीने त्यांना प्रदिक्षणा करून नमस्कार केला. नंतर त्याने प्रल्हादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार केला. नंतर तो बली, भृगूंनी मिळवून दिलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. जेव्हा महारथी बली कवच धारण करून, धनुष्य, तलवार, बाणांचे बाते इत्यादी शस्त्रे घेऊन, सुंदर माळा घालून भुजांमध्ये सोन्याचे बाजूबंद आणि कानात मकराकृती कुंडले घालून रथावर बसला, तेव्हा अग्निकुंडात प्रज्वलित अग्नी शोभावा, तसा शोभला. त्याच्याबरोबर त्याच्यासारखे ऐश्वर्य,बल आणि सामर्थ्य असणारे दैत्यसेनापती सेना घेऊन आले होते. त्यावेळी असे वाटत होते की जणू ते आकाशाला आणि दिशांना प्रज्वलित नेत्रांनी पिऊन टाकत आहेत. अशा प्रकारे विशाल राक्षसी सेना घेऊन राजा बलीने आकाश व पृथ्वी यांचा थरकाप उडवीत सकल ऐश्वर्याने परिपूर्ण अशा इंद्रपुरी अमरावतीवर चढाई केली.
            अमरावती सुंदर नंदन इत्यादी उद्याने आणि उपवने यांनी शोभत होती. त्यांमध्ये पक्षांच्या जोड्या चिवचिवाट करीत असत आणि धुंद भ्रमर गुणगुणत असत. कोवळी पालवी आणि फळा-फुलांनी कल्पवृक्षाच्या फांद्या लहडलेल्या असत. तेथील सरोवरांमध्ये हंस, सारस, चकवे आणि बदकांचे थवेच्या थवे असत. देवांना प्रिय अशा देवांगणा तेथेच जलक्रीडा करीत असत. ज्योतिर्मय आकाशगंगेने खंदकाप्रमाणे अमरावतीला चारी बाजूंनी वेढलेले असून तेथे उंच असा सोन्याचा तट आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या माड्या आहेत. तेथील दारे सोन्याची असून तेथे स्फटिकमण्यांची गोपुरे आहेत. ती मोठमोठे, वेगवेगळे राजमार्ग आहेत. स्वतः विश्वकर्माने त्या नगरीची निर्मिती केली आहे. संभास्थाने, ओटे आणि मार्ग यांनी ती शोभायमान झाली आहे. दहा कोटी विमाने तेथे नेहमी तयार असतात आणि मण्यांनी मढविलेले मोठमोठे चौक आणि हिरे माणकांचे चबुतरे आहेत. तेथील स्त्रिया नेहमी षोडषवर्षा असल्याप्रमाणे असून त्यांचे तारुण्य आणि सौंदर्य एकसारखे असते. त्या सुंदर स्त्रिया निर्मल वस्त्रे परिधान करतात, तेव्हा अग्नी आपल्या ज्वाळांनी देदीप्यमान दिसतो, तशा दिसतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...