श्रीभगवान म्हणाले - राजन, आपण जे काही म्हणालात, ते आपल्या कुलपरंपरेला अनुरुप, धर्मपूर्ण, यश वाढविणारे आणि अत्यंत मधुर आहे. परलोकी हितकर असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रमाण मानता. त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा परम शांत प्रल्हाद त्यांची आज्ञासुद्धा आपण प्रमाण म्हणता. आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजूष पुरुष कधी झाला नाही. तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली, असाही कोणी झाला नाही. याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही. आपल्या कुलातच जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे. आपल्या कुळातच हिरण्याक्षासारख्या वीराचा जन्म झाला. तो वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला, तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही. जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढीत होते, तेव्हा तो त्यांच्या समोर आला. तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळविला. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्याक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकूनसुद्धा आपला विजय झाला, असे ते समजत नव्हते.हिरण्यकशिपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला, तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म्हणून संतापून भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचला. हिरण्यकशिपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे, असे पाहून वेळकाळ जाणणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला. ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यु, त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जाईन, तेथे तेथे हा माझा पिच्छा पुरवील. म्हणून आपण ह्याच्या हृदयात प्रवेश करावा. त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही. कारण तो बहिर्मुख आहे. हे असुरशिरोमणे, ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांच्यावर झडप घालीत होता, त्याच वेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनविले आणि ते त्याच्या श्वासांत लपून नाकातून हृदयात जाऊन बसले.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा