३१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पहिला

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - भगवन ! सर्व मन्वन्तरे आणि त्यांत अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण केलेले वर्णन मी ऐकले. मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंतांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तोच या प्रकल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्या पुत्रांचे सुद्धा वर्णन केलेत. ब्रह्मण ! आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्र वेगवेगळी वर्णन करा. महाभाग ! हे ऐकण्याची आम्हांला नेहमीच उत्सुकता असते. वैवस्वत मनुच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्रकीर्ती पुरुषांच्या पराक्रमाचे वर्णन करा.
सूत म्हणतात - वेद जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा धर्माचे परम मर्मज्ञ असणारे भगवान श्रीशुकदेव म्हणाले.
            श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता ! मनुवंशाचे वर्णन तू थोडक्यात ऐक. शेकडो वर्षांमध्येसुद्धा त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही. जे परमपुरुष परमात्मा लहान-मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते. त्यावेळी हे विश्व किंवा हा आणखी काहीही नव्हते. महाराज ! त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमलकळी प्रगट झाली. त्यातच चतुर्मुख ब्रह्मदेवांचा अविर्भाव झाला. ब्रह्मदेवांच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप. त्यांना दक्षकन्या आदितीपासून विवस्वान (सूर्य) हा पुत्र झाला. विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्धदेव मनूचा जन्म झाला. परीक्षिता ! संयमी राजा श्राध्ददेवाला श्रध्देपासून दहा पुत्र झाले. इक्ष्वाकू,नृग, शर्याती, दिष्ट, करूष,नरिष्यंत,पृषध्र,नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती.
            प्रथम वैवस्वत मनूला पुत्र नव्हता. म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वशिष्ठांनी संतानप्राप्तीसाठी त्यांच्याकडून मित्रावरूण देवतेचा यज्ञ करविला होता. फक्त दूध पिऊन राहणाऱ्या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्धेने, होत्याकडे जाऊन "मला कन्या व्हावी" अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली. तेव्हा अध्वर्युच्या प्रेरणेने 'होता' बनलेल्या ब्राह्मणाने , श्रद्धेने जे सांगितले होते, त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषट्काराचा उच्चार करीत कन्या व्हावी, यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. 'होती' अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली. तिला पाहून मनूला वाईट वाटले आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला. "भगवन ! आपण मन्त्रवेत्ते आहात. आपले कर्म असे विपरीत फळ देणारे कसे झाले ? आहो, हे फार वाईट झाले. वैदिक मंत्रांचे असे विपरीत फळ असता कामा नये. आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे. आपण जितेंद्रिय सुद्धा आहात. त्याचबरोबर तपश्चर्येने निष्पाप झालेले आहात. देवांनी असत्य बोलावे, त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला ?"
            आमचे वृध्द प्रपितामह महर्षी वसिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले की, होत्याने विपरीत संकल्प केला. म्हणून ते वैवस्वत मनूला म्हणाले, "राजन ! तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पूरा झाला नाही. तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईल. "
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...