अध्याय चोविसावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय चोविसावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२२ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चोविसावा

श्री गणेशाय नमः रोमपादाचा पुत्र बभ्रू, बभ्रूचा कृती, कृतीचा उशिक आणि उशिकाचा चेदी. राजन! या चेदीच्या वंशातच शिशुपाल इत्यादी झाले. क्रथाचा पुत्र झाला कुंती. कुंतीचा धृष्टी. धृष्टीचा निवृत्ती. निवृत्तीचा दशार्ह आणि दशार्हाचा व्योम.

            व्योमाचा जीमूत, जीमूताचा विकृती, विकृतीचा भीमरथ, भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ झाला. दशरथापासून शकुनी, शकुनीपासून करंभी, करभीपासून देवराज, देवरातापासून देवक्षत्र, देवक्षत्रापासून मधू, मधूपासून कुरुवश आणि कुरूवशापासून अनू झाला. अनूपासून पुरुहोत्र, पुरूहोत्रापासून आयू आणि आयूपासून सात्वताचा जन्म झाला. परीक्षिता ! सात्वताला भजमान, भजी, दिव्य,वृण्णी,देवावृध,अंधक आणि महाभोज असे सात पुत्र झाले. भजमानाच्या दोन पत्न्या होत्या. एकीपासून निम्लोची,किंकिण आणि दृष्टी असे तीन पुत्र झाले. दुसऱ्या पत्नीपासूनसुद्धा अजित सहजासहजी आणि आयुक्त शताजित,सहस्त्राजित आणि अयुताजित असे तीन पुत्र झाले. "

            देवावृधाच्या पुत्राचे नाव बभ्रू होते. देवावृध आणि बभ्रू यांच्यासंबंधी असे म्हटले जाते की, " आम्ही लांबून जसे ऐकले होते, तसेच आता जवळून पाहात आहोत. " बभ्रू मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृध देवांच्या समान आहे. कारण बभ्रू आणि देवावृधाकडून उपदेश घेऊन चौदा हजार पासष्ट माणसांनी परमपद प्राप्त करून घेतले आहे. सात्वताच्या पुत्रांमध्ये महाभोजसुद्धा मोठा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले. परीक्षिता ! वृण्णीचे सुमित्र आणि युधाजित असे दोन पुत्र झाले. युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे दोन पुत्र होते. अनमित्रापासून निम्न जन्मला.

            याच सत्यकाचा युयुधान नावाचा पुत्र होता, तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला. सात्यकीचा जय, जयाचा कुणी आणि कुणीचा पुत्र युगंधर झाला. अनमित्राच्या तिसऱ्या पुत्राचे नाव वृण्णी होते. वृण्णीचे श्र्वफल्क आणि चित्ररथ हे दोन पुत्र होते. श्र्वफल्काच्या पत्नीचे नाव गांदिनी होते. तिला सर्वांत जेष्ठ अक्रूराव्यतिरिक्त आसंग, सारमेय, मृदुर,मृदुविद, गिरी, धर्मवृश्र्द, सुकर्मा, क्षेत्रोपेक्ष,अरिमर्दन, शत्रुघ्न, गंधमादन आणि प्रतिबाहू असे बारा पुत्र झाले. त्यांना सुचीरा नावाची एक बहीणसुद्धा होती. अक्रूराचे देवावान आणि उपदेव असे दोन पुत्र होते.श्र्वफल्काचा भाऊ चित्ररथ याला पृथू, विदूरथ इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. ते वृण्णिवंशीय होते.

            सात्वताचा पुत्र अंधक याचे कुकुर, भजमान, शुची आणि कंबलबर्ही असे चार पुत्र होते. त्यांमध्ये कुकुराचा पुत्र वह्ली, वह्लीचा विलोमा, विलोमाचा कपोतरोमा आणि कपोतरोमाचा अनू होता. अनूचा मित्र तुंबुरु. अनूचा पुत्र अंधक.अंधकाचा दुंदुभी, दुंदुभीचा अरिद्योत,अरिद्योताचा पुनर्वसु आणि पुनर्वसूचा आहुक नावाचा एक पुत्र आणि आहुकी नावाची एक कन्या होती. आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे चार पुत्र झाले.

            यांच्या धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवीकी अशा सात बहिणी होत्या. वसुदेवांनी या सर्वांशी विवाह केला होता.

            उग्रसेनाचे कंस, सुनामा, न्यग्रोध,कंक, शंकू,सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि सृष्टीमान असे नऊ पुत्र होते आणि कंसा, कंसावती, कंका,शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा पाच कन्या होत्या. त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवांच्या लहान भावांशी झाला होता.

            विदुरथापासून शूर, शूरापासून भजमान, भजमानापासून शीनी, शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून हृदीक झाले. हृदीकाला देवबाहू, शतधन्यवा आणि कृतवर्मा असे तीन पुत्र झाले. देवमीढाचा पुत्र शूर. याच्या पत्नीचे नाव मारिषा होते. शुराला तिच्यापासून वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आणक, सृंजय, श्यामक,कंक, शमीक, वत्सक आणि वृक असे दहा पुण्यवान पुत्र झाले. वसुदेवांच्या जन्माच्यावेळी देवतांचे नगारे आणि नौबती आपोआप वाजू लागल्या होत्या. म्हणून त्यांचे आनकदुंदुभी असे नाव पडले. तेच भगवान श्रीकृष्णांचे वडील. वसुदेव इत्यादींच्या पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी अशा पाच बहिणी होत्या. वसुदेवाचे वडील शूरसेन. यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता. कुंतिभोज निपुत्रिक होता, म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली.( म्हणून तिचे नाव कुंती.)

            कुंतीने दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली. एके दिवशी त्या विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासाठी तिने पवित्र होऊन (सूर्यमंत्राने) सूर्याचे आवाहन केले. त्याचवेळी सूर्यदेव तेथे आले. त्यांना पाहून कुंतीचे हृदय आश्चर्याने भरून गेले. ती म्हणाली, "भगवन ! मला क्षमा करा. मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता. आता आपण परत जावे. " सूर्यदेव म्हणाले- "देवी ! माझे दर्शन निष्फळ होऊ शकत नाही. म्हणून हे सुंदरी ! आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल. पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही, असे मी करीन. "

            असे म्हणून तिच्या उदरात गर्भ स्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेले. त्याचवेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. कुंतीने लोकनिंदेच्या भीतीने जड अंत:करणाने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडले. तिचा विवाह तुझे पणजोबा पराक्रमी पांडू यांच्याशी झाला.

            श्रुतदेवेचा विवाह करुष देशाचा राजा वृद्धशर्मा याच्याशी झाला. तिला दंतवक्र नावाचा मुलगा झाला. हाच पूर्वजन्मी सनकादिक ऋषींच्या शापामुळे हिरण्याक्ष झाला होता.केकय देशाचा राजा धृष्टकेतू याने श्रुतकीर्तीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला संतर्दन इत्यादी पाच कैकय राजकुमार झाले. राजाधिदेवीचा विवाह जयसेनाशी झाला. त्याला विंद आणि अनुविंद असे दोन पुत्र झाले. ते दोघेही अवंती नगरीचे राजे झाले. चेदिराज दमघोष याने श्रुतश्रवेचे पाणिग्रहण केले. त्याचा पुत्र होता शिशुपाल. याचे वर्णन पूर्वीच केलेले आहे. देवभागाची पत्नी कंसा. हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्वल असे दोन पुत्र झाले. देवश्रवाची पत्नी कंसवती. हिच्यापासून सुधीर आणि इषुमान नावाचे दोन पुत्र झाले. आनकाची पत्नी कंका. हिच्यापासून शत्रुजित आणि पुरुजित असे दोन पुत्र झाले. सृंजयाला पत्नी राष्ट्रपालीपासून वृष, दुर्मर्षण इत्यादी अनेक पुत्र झाले. श्यामकाला शूरभूमी नावाच्या पत्नीपासून हरिकेश आणि हिरण्याक्ष नावाचे दोन पुत्र झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. वृकाला दुर्वार्क्षीपासून तक्ष, पुष्कर, शाल इत्यादी अनेक पुत्र झाले. शमीकाला सुदामिनीपासून सुमित्र, अर्जुनपाल इत्यादी अनेक पुत्र झाले. कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे दोन पुत्र झाले.

            वसुदेवांच्या पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला, देवकी इत्यादी पत्न्या होत्या. त्यांत देवकी मुख्य होती. रोहिणीपासून वसुदेवांना बलराम,गद, सारण, दुर्मद, विपुल,ध्रुव,कृत इत्यादी पुत्र झाले होते.

            पौरवीपासून त्यांना भूत, सुभद्र, भद्रवाह, दूर्मद, भद्र इत्यादी बारा पुत्र झाले. मदिरेपासून नंद, उपनंद, कृतक, शूर इत्यादी पुत्र झाले. कौशल्येला वंशाचा दिवा असा केशी नावाचा एकच पुत्र झाला होता. त्यांना रोचनेपासून हस्त, हेमांगद इत्यादी आणि इलेपासून उरूवल्क इत्यादी प्रधान यदुवंशी पुत्र झाले. परीक्षिता ! धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतिदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत इत्यादी अनेक पुत्र झाले. उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष इत्यादी दहा राजे झाले आणि श्रीदेवेचे वसू, हंस,सुवंश इत्यादी सहा पुत्र झाले. हे राजा ! देवरक्षितेपासून गद इत्यादी नऊ पुत्र झाले. धर्माने जसा आठ वसूंना जन्म दिला, तसा वसुदेवांनी सहदेवेपासून पुरुविश्रुत इत्यादी आठ पुत्रांना जन्म दिला. वसुदेवांना देवकीपासून आठ पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेन, भद्रसेन,ऋजू, संमर्दन, भद्र, शेषावतार श्रीबलराम आणि आठवा पुत्र म्हणजे स्वत: श्रीभगवानच होते. तसेच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा हीसुद्धा वसुदेवांचीच कन्या होती.

            जगात जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि पापाची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. परिक्षिता ! भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेतः त्यांच्या आत्मस्वरूपिणी योगमायेव्यतिरिक्त त्यांचा जन्म किंवा कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही. त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म, स्थिती आणि मृत्यूला कारण आहे; आणि त्यांची कृपाच मायेचा निरास करून आत्मस्वरुप प्राप्त करून देणारी आहे. जेव्हा राजांच्या रूपांतील असूर कित्येक अक्षौहिणी सेना एकत्र करून सगळ्या पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागले, तेव्हा पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामांसह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पनासुद्धा करता येणार नाही, अशी कार्ये केली.

            त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख, शोक आणि अज्ञान नाहीसे करणाऱ्या परम पवित्र यशाचा विस्तार केला. त्यांचे यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आहे. एकदा जरी कानांच्या ओंजळींनी त्याचे आचमन केले, तरी कर्माच्या वासना समूळ नष्ट होतात. भोज,वृष्णी, अंधक, मधु, शुरसेन, दशार्ह, कुरु, सृंजय आणि पांडव नेहमी भगवंताच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करीत असत. त्यांनी आपल्या सर्वांगसुंदर शरीराने, तसेच आपल्या प्रेमळ हास्य, मधुन अंत:करण प्रसादपूर्ण वचन आणि पराक्रमपूर्ण लीलांच्या द्वारा सर्व भूलोकाला आनंदविभोर केले होते. सुंदर कानातील मकराकृती कुंडलांनी चमकणाऱ्या गालांनी शोभणारे आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाला उधाण आणणारे त्यांचे मुख्यकमल कितीही पाहून स्त्रीपुरुष तृप्त होत नसत. ते आनंदित तर होतच, परंतु पापण्यांच्या लवण्यावरही रागावत, भगवान मथुरेमध्ये वासुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले.तेथील कार्य पूर्ण केले. नंतर अनेक शत्रूंचा संहार केला. अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला. त्याचबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या वेदांची लोकांत स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतःच स्वतःचे पूजन केले. त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भाग हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली. तसेच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेनेच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजविला. नंतर उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून ते परम धामाला गेले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हा जीव अज्ञानी आहे. आपल्याच कर्मांनी बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्यांचे हे अज्ञान नष्ट होते, तेच माझे परम गुरु आपण, माझ्या हृदयाची अज्ञानरूप गाठ तोडून टाका. असे अग्नीमध्ये तापविल्याने सोन्याचांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्यांचे खरे स्वरूप दिसू लागते, त्याचप्रमाणे यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुऊन टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्वशक्तीमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परम गुरू आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरू व्हा. सर्व देव, गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली, तरीसुद्धा ती आपल्या कृपेच्या दहा हजाराव्या अंशाइतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलो आहे. जसा एखादा अंधळा अंधळ्याला आपला मार्गदर्शक बनवितो, त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अज्ञानी माणसालाच आपला गुरु बनवितो. आपण सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आणि सर्व इंद्रयांचे प्रेरक आहात. आत्मतत्त्वाचे जिज्ञासू असलेल्या आम्ही आपल्यालाच गुरु केले आहे. अज्ञानी मनुष्य, अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो, ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसाररुपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. परंतु आपण मात्र त्या अविनाशी आणि अमोघ ज्ञानाचा उपदेश करता, त्यामुळे मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरू, त्यांचे द्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हेसुद्धा आपलेच स्वरूप आहे. असे असताही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झाले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असताना या गोष्टीचा त्यांना पत्ताच नाही. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलो आहे. भगवन, परमार्थ प्रकाशित करणार्‍या आपल्या वाणीने आपण माझ्या हृदयातील अज्ञानग्रंथी तोडून टाका आणि आपले स्वरूप प्रगट करा.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशी प्रार्थना करणार्‍या राजाला मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्त्वाचा उपदेश केला. भगवंतांनी राजर्षीला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करीत असताना ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्याला 'मत्स्यपुराण' म्हणतात. ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंतांच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलयकाळ संपून ब्रह्मदेव उठले, तेव्हा भगवंतांनी हायव्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. भगवंतांच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपल्या योगमायेने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि राजर्षी सत्यव्रत यांचा हा संवाद व हे मोठे आख्यान ऐकल्याने मनुष्य पापांतून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. प्रलयकालीन समुद्रामध्ये जेव्हा ब्रह्मदेव निद्रीस्त झाले होते, त्यांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती लोप पावली होती, त्यावेळी त्यांच्या मुखातून निघालेल्या श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात
घेऊन केला होता. भगवंतांनी त्याला मारून त्या श्रुती ब्रह्मदेवांना परत दिल्या आणि सत्यव्रत तसेच सप्तर्षींना ब्रह्मतत्त्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीलामत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - २

श्री गणेशाय नमः मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळुन गेला. तो म्हणाला, "मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात ?" आपण एकाच दिवसात चारशे कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकले. एवढी शक्ती असणारा जलचर जीव मी आजपर्यंत कधी पाहिला नाही की कधी ऐकला नाही. आपण निश्चितच साक्षात सर्वशक्तिमान सर्वांतर्यामी अविनाशी श्रीहरी आहात. जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. हे पुरुशोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात, तरीसुद्धा मी हे जाणू इच्छितो की, आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे ? हे कमलनयन प्रभो, जसे देहादी अनात्मपदार्थांमध्ये मीपणाचा अभिमान धरणाऱ्या संसारी पुरुषांचा आश्रय व्यर्थ ठरतो, त्याप्रमाणे आपल्या चरणांना शरण जाणे व्यर्थ होईल होऊ शकत नाही. कारण आपण सर्वांचे अहेतुक प्रेमी, परम प्रियतम आणि आत्मा आहात. आपण यावेळी जे रूप धारण करून आम्हांला दर्शन दिले आहे, ते अतिशय अद्भुत आहे.
            श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपति मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली, तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी आणि त्याचबरोबर काल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी त्याला म्हटले.
            श्रीभगवान म्हणाले - सत्यव्रता, आजपासून सातव्या दिवशी भू, भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. जेव्हा तिन्ही लोक प्रलयकालाच्या अथांग पाण्यात बुडू लागतील, तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सुक्षम शरीरे घेऊन सप्तर्षीसह त्या नौकेवर चढावेस. तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि लहानमोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानेच तू न भिता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल, तेव्हा मी याच रूपात तेथे येईन. यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध. सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करीन. त्यावेळी जेव्हा तू प्रश्न विचारशील, तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्या कृपेने, ज्याचे नाव 'परब्रम्ह' आहे, तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसला आणि मत्स्यरुप भगवंतांच्या चरणांचे चिंतन करू लागला. एके दिवशी राजाने पाहिले की, प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहेत. पाहाता-पाहाता सर्व पृथ्वी बुडू लागली. तेव्हा राजाला भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण झाले आणि नावसुद्धा आलेली दिसली, तेव्हा तो धान्य आणि इतर बीजे घेऊन सप्तर्षीसह तीत बसला. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणाले, "राजा, तू भगवंतांचे ध्यान कर. तेच आम्हांला या संकटातून वाचवतील आणि आमचे कल्याण करतील." त्यांच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांचे ध्यान केले. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला चार लक्ष कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रगट झाला. भगवंतांच्या सांगण्यानुसार ती नाव वासुकी नागाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंतांची स्तुती करू लागला.
            सत्यव्रत म्हणाला - जगातील जीवांचे आत्मज्ञान अनादि अविद्येमुळे झाकले गेले आहे. याचमुळे ते संसारातील अनंत दुःखांच्या भाराने त्रस्त होत आहेत. जेव्हा आपल्या इच्छेने ते आपल्याला शरण येतात, तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. म्हणून आम्हांला मुक्ती देणारे परम गुरु आपणच आहात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चोविसावा भाग - १

श्री गणेशाय नमः राजाने विचारले - मुनिवर्य, अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरींनी योगमायेने मत्स्यावतार धारण करून जी लीला केली होती, त्यांच्या त्या आदिअवताराची कथा मी ऐकू इच्छितो. भगवंतांनी कर्माने बांधलेल्या जीवाप्रमाणे तमोगुणी, लोकांना न आवडणारे, असाह्य असे हे माशाचे रूप का धारण केले ? भगवन, महात्म्यांना किर्तनीय अशा भगवंतांचे चरित्र सर्व प्राण्यांना सुख देणारे आहे. आपण कृपा करून त्यांची ती सर्व लीला आम्हांला सांगावी.
सुत म्हणतात - जेव्हा परिक्षिताने भगवान श्रीशुकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी, भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! गाई, ब्राह्मण, देव, साधू,वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. ते सर्वशक्तिमान प्रभू वायुप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धीगत गुणांनी ते लहान-मोठे होत नाहीत. कारण ते निर्गुण आहेत. परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्रह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रणयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहाणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला.
परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत्परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राध्ददेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनु बनविले. तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडणे. अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, "राजन, आपण दिनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहित आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडीत आहात ? " स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रुपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती, तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. त्या मासळीचे दिनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्या वेळी मासळी राजाला म्हणाली. आता मोठ्या कष्टानेसुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ. तेथे मी आरामात राहू शकेन. राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवले. परंतु तेथे सोडल्यावर ती मासोळी दोन घटकात तीन हात मोठी झाली. " राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे. म्हणून मला राहाण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे. "परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले. परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले. आणि म्हणाली- "राजन, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहाण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याचा खोल डोहात ठेवावे. " त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयांत सोडले. परंतु जलाशय जेवढा मोठा असे, तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणले. समुद्रात सोडीत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला," हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहातात, त्या मला खाऊन टाकतील. म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये."
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...