श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्यसेनापती रसातळाला निघून गेले. हे गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षिराज गरुडाने वरुणाच्या पाशांणी बलीला बांधले. त्यादिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते. जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले, तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व देशांमध्ये हाहाकार उडाला. जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता, जरी त्याची संपत्ती गेली होती, तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळी भगवान बलीला म्हणाले, "हे असुरा, तू मला तीन पावले जमीन दिली होतीस. दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले, आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर. जीथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात, जीथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात, आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात, तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या अधिपत्याखाली होती. तुझ्यादेखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश व दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वर्लोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे. तू जी प्रतिज्ञा केली होतीस, ती पूरी केल्याकारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल. तुझ्या गुरुची तर या बाबतीत संमती आहेच. म्हणून आता तू नरकात प्रवेश कर.
जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशाप्रकारे त्याला फसवतो, त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात. स्वर्गाची गोष्ट तर दूरच; पण त्याला नरकात पडावे लागते. मी मोठा संपत्तीमान आहे, या गोष्टीचा तुला फार गर्व होता. तू मला 'देतो' म्हणून सांगून फसवलेस. असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षपर्यंत नरकयातना भोग.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा