अध्याय सहावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय सहावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मे २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संकट येईल, या भीतीने ते मनोमन भगवंतांना शरण गेले. पूतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती. लहान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते. कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्त्यांमध्ये लहान मुले मारण्यासाठी फिरत असे. जेथील लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण इत्यादी करीत नाहीत, तेथेच राक्षसांचे फावते. आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पुतना इच्छेनुसार रूपे धारण करीत होती. एके दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वत:ला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळात शिरली. तिने अबाड्यावर मोगर्‍याची वेणी माळली होती. सुंदर वस्त्रे परिधान केली होती. जेव्हा तिची कर्णफुले हलत असत, तेव्हा त्यांच्या चमकन्याने तोंडावर आलेले तिचे कुरूळे केस शोभिवंत दिसत होते. तिचे नितंब आणि स्तन उभार होते, तर कंबर बारीक होती. आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती. हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रुपवती रमणीला पाहून गोपींना वाटते की, जणू स्वत: लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली आहे.
            बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधीत सहजपणे नंदांच्या घरात शिरली. तेथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले. परंतु राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो, त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवले होते. चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे, हे जाणून आपले डोळे बंद केले. जसे एखाद्याने नकळत, झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पुतनेने उचलून मांडीवर घेतले.
            मखमली म्यानात लपवलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पुतनेचे हृदय क्रूर होते. परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती. रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले, पण तिच्या सौंदर्यप्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहातच राहिल्या. इकडे तिने त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला. त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष लावलेले होते. तेव्हा भगवंतांनी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणसह तिचे दूध प्राशन केले. तिची सर्व मर्मस्थाने खिळखिळी झाली. "अरे सोड ! सोड ! पुरे कर ! "असे ओरडत वारंवार आपले हात-पाय आपटीत ती रडू लागली. तिने डोळे फिरवले आणि तिचे शरीर घामाने थबथबले. तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरांसह पृथ्वी आणि ग्रहांसह अंतरिक्ष डगमगू लागले. सातही पाताळे आणि दिशा दुमदुमून गेल्या. विजा कोसळतात की काय, या शंकेने पुष्कळसे लोक जमिनीवर कोसळले. परीक्षिता ! अशा प्रकारे पुतनेच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की, ती गतप्राण झाली. ती मूळ रूपाने प्रकट झाली. केस विस्कटले. इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन वृत्रासूर जसा पडला होता, तशीच ती सुद्धा (बाहेर) गोठ्यात हातपाय पसरून पडली.

पूतनेच्या शरीराने खाली पडता पडता सुद्धा सहा कोस अंतरातील झाडे उन्मळून पडली. ही तर मोठीच अद्भुत घटना घडली. पूतनेचे शरीर अत्यंत भयानक होते. तिचे तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते. तिच्या नाकपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते. लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरले होते. डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे खोल, नितंब नदीच्या उंच किनाऱ्याप्रमाणे भयंकर, हात, जांघा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते. तसेच पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होते. पूतनेचे ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले. तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय, कान आणि डोके अगोदरच फुटल्यासारखे झाले होते. जेव्हा गोपींनी पाहिले की, बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत, तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले.
            यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचे शेपूट अंगावरून फिरविणे इत्यादी उपायांनी त्या बाळाचे सर्वप्रकारे (दुष्ट शक्तींपासून) रक्षण केले. त्यांनी प्रथम त्याला गोमुत्राने स्नान घातले. नंतर सर्व अंगाला गायीच्या अंगावरील धूळ लावली आणि त्यानंतर बाराही अंगांना भगवंतांच्या नामांनी शेण लावून पीडाशमन केले. त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करन्यास केले. तसेच बालकाच्या अंगावर बिजन्यास केले.
            गोपी म्हणू लागल्या- "अजन्मा भगवान तुझ्या पायांचे मणिमान गुडघ्यांचे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, हयग्रीव पोटाचे, केशव हृदयाचे, ईश वक्ष:स्थळाचे, सूर्य कंठाचे, विष्णू हातांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करोत. तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहात, गदाधारी श्रीहरी पाठीमागे, धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूंना, शंखधारी उरुगाय चारी कोपऱ्यांमध्ये उपेंद्र वर, गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूंनी रक्षणासाठी राहोत. हृषीकेश इंद्रियाचे आणि नारायण प्राण्यांचे रक्षण करोत. श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत. पृश्निगर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत. खेळताना गोविंद रक्षण करोत, निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत. चालताना वैकुंठ आणि बसलेल्यावेळी श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाचे वेळी तुझे रक्षण करोत. डाकिनी, राक्षसी, कूष्मांडा इत्यादी बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच्च, यक्ष, राक्षस आणि विनायक, कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका इत्यादी, शरीर, प्राण तसेच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद अपस्मार इत्यादी रोग, स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्धग्रह आणि बालग्रह इत्यादी सर्व अनिष्ठ घटक, भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावोत.

श्रीशुकाचार्य म्हणतात- अशा प्रकारे प्रेम करणाऱ्या गोपींनी रक्षामंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दुध पाजून पाळण्यात निजविले. त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुरेहून गोकुळात पोहोचले. तेव्हा पूतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले. ते म्हणू लागले, वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल. किंवा हेही शक्य आहे की, वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील. कारण ते असे म्हणाले होते, तसेच संकट येथे दिसून आले. तोपर्यंत वज्रवासींनी कुर्‍हाडींनी पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेउन एकेक अवयव चितेवर ठेवून जाळून टाकले. कृष्णाने दूध प्याल्यामुळे ज्याची सर्व पापे तात्काळ नष्ट झाली, असा तो तिचा देह जळत असता, त्यातुन धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला. पूतना एक राक्षसी होती. लोकांच्या लहान मुलांना मारणे आणि त्यांचे रक्त पिणे हेच तिचे काम होते. श्रीकृष्णांनासुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेनेच स्तनपान करविले होते. तरीसुद्धा तिला सद्गगती मिळाली. तर मग जे परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात, त्यांच्यासंबंधी काय बोलावे ? सर्वांना वंदनीय असणाऱ्या, ब्रह्मदेवादी देवांनासुद्धा वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणाऱ्या चरणांनी पुतणीचे शरीर दबून, भगवंतांनी तिचे स्तनपान केले होते. जरी ती राक्षसी होती, तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळाली. तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत (ब्रह्मदेवाने वासरे व गोपबालक यांना लपवून ठेवलेल्या वेळी) प्रेमाने प्याले, त्या गाई आणि मातांची गोष्ट काय सांगावी ? पुत्रप्रेमाने आपणहून पाझरणारे ज्यांचे दूध भगवंत भरपूर प्याले, त्यांना भगवान देवकीनंदनांनी मोक्षापर्यंत सर्व काही दिले. राजन ! ज्या गोपी व गाई नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहात होत्या, त्या अज्ञानजनित संसारचक्रात कधीही अडकू शकत नाहीत.
            नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला, तेव्हा, " हे काय आहे ? हा सुगंध कोठून येत आहे ?" असे म्हणत ते व्रजामध्ये पोहोचले. तिथे गोपांनी त्यांना पूतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितला. पूतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे, हे ऐकून ते लोक अतिशय आच्श्रर्यचकित झाले. परीक्षिता ! मृत्युच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला, उदार नंदांनी उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगून ते अतिशय आनंदित झाले. हा 'पूतनामोक्ष' भगवान श्रीकृष्णांची अद्भुत बाल-लीला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे श्रवण करतो, त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः अंत:पुरातील रखवालदाराने कन्यांच्या सजविलेल्या महालात सौभरी मुनींना नेऊन सोडले. तेव्हा त्या पन्नासही राजकन्यांनी एका सौभरीलाच आपला पती म्हणून वरले. त्या कन्यांचे मन सौभरींमध्ये अशा प्रकारे आशक्त झाले की, त्या त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशी कलह करू लागल्या आणि एकमेकींना म्हणू लागल्या, " हे तुला योग्य नाही, मलाच योग्य आहेत. " ऋग्वेदी सौभरींनी त्या सर्वांचे पाणिग्रहण केले. ते आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामुग्रींनी सुसज्य अनेक उपवने आणि निर्मल जलांनी भरलेल्या सरोवरांनी युक्त, तसेच सुगंधी फुलांच्या बगीच्यांनी घेरलेल्या महालांमध्ये बहुमूल्य शय्या, असने, वस्त्रे, अलंकार, स्नान, सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागले. उत्तमोउत्तम वस्त्रे, अलंकार इत्यादी धारण केलेले स्त्रि-पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत असत. कुठे पक्षी चिवचिवाट करीत, तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत. काही ठिकाणी भाट त्यांच्या किर्तीची प्रशंसा करीत असत. सात द्विपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मांधाता, सौभरींचे हे गृहस्थाश्रमाचे सुख पाहून आश्र्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम या संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून गेला. अशाप्रकारे सौभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थसुखात रममाण झालेले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबानी आग तृप्त होत नाही, त्याप्रमाणे तृप्त झाले नाहीत.

            ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्थ चित्ताने बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की, माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशारीतीने आपली तपश्चर्या आणि स्वत्वसुद्धा घालवून बसलो. ते पुढे विचार करू लागले - " अरे ! मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो. माझे झालेले हे अध:पतन तर पहा ! मी दीर्घकालपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणाऱ्या माशांचा संगम पाहून नष्ट झाले. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याने भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नयेत. एकट्यानेच राहावे आणि एकांतात आपले चित्त सर्वशक्तिमान भगवंतांमध्येच लावावे. संगतीच जर करावयाची असेल, तर भगवंतांच्या अनन्नप्रेमी निष्ठावान महात्म्यांशीच करावी. मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चर्येमध्ये मग्न होतो. नंतर पाण्यातील माशांचा संग झाल्याने विवाह करून पन्नास झालो आणि पुन्हा संतानांच्या रूपाने पाच हजार झालो. विषयांमध्ये सत्वबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. आता तर लोक आणि परलोक यासंबंधी माझे मन इतक्या विविध लालसांनी भरले आहे की, त्यांना अंतच नाही. अशा प्रकारे विचार करीत काही दिवस ते घरीच राहिले. नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. आपल्या पतीलाच सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या. परम संयमी सौभरींनी तेथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली, शरीर कृश केले आणि आहवनीय इत्यादी अग्नीसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केले. आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्निमध्ये लीन होऊन जातात, त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्येच लीन झाल्या.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - १
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - २

१४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - २

श्री गणेशाय नमः पुरंजयाचा पुत्र अनेना होता. त्याचा पुत्र पृथू झाला. पृथूचा विश्वरन्धी, त्याचा चंद्र आणि चंद्राचा युवनाश्र्व. युवनाश्र्वाचा पुत्र झाला शाबस्त. त्याने शाबस्तुतीपुरी वसविली. शाबस्ताचा पुत्र बृहदश्र्व आणि त्याचा पुत्र कुवलयाश्र्व झाला. हा अत्यंत बलशाली होता. त्याने उत्तंक ऋषींना प्रसन्न करण्यासाठी आपली एकवीस हजार पुत्र बरोबर घेऊन धुंधू नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणूनच त्याचे नाव 'धुंधुमार' असे पडले. धुंधू दैत्याच्या मुखातील आगीमुळे त्याचे सर्व पुत्र जळाले. फक्त तीनच जिवंत राहिले. परीक्षिचा ! जिवंत राहिलेल्या पुत्रांची नावे दृढाश्व, कपिलाश्र्व आणि भद्राश्र्व अशी होती. दृढाश्र्वापासून हर्यश्र्व आणि त्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला.

            निकुंभाचा बर्हणाश्र्व, त्याचा कृशाश्र्व, सेनजित आणि सेनजिताचा युवनाश्र्व नावाचा पुत्र झाला. युवनाश्र्वाला संतान नव्हते. म्हणून तो दुःखी होऊन आपल्या शंभर पत्न्यासह वनामध्ये निघून गेला. तेथे दयाळू ऋषींनी युवनाश्वाकडून एकाग्रतेने इंद्रदेवतेचा यज्ञ करविला. रात्रीच्या वेळी युवनाश्र्वाला तहान लागली. तो यज्ञशाळेत गेला. परंतु ऋषी झोपलेले आहेत, असे पाहून अभिमंत्रित केलेले पाणीच तो प्याला. परीक्षिता ! जेव्हा ऋषी उठले, तेव्हा कलशात पाणी नाही, असे पाहून त्यांनी विचारले की, " हे कोणाचे काम आहे ? पुत्र उत्पन्न करणारे पाणी कोण प्याले ?" भगवंतांच्या प्रेरणेने राजा युवनाश्र्वच ते पाणी प्याला, असे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा भगवंतांना नमस्कार करून त्यांनी म्हटले, " धन्य आहे ! दैवाचे सामर्थ्यच खरे सामर्थ्य होय. "यानंतर प्रसवसमय आल्यावर युवनाश्र्वाचे उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला. त्याला रडताना पाहून कृषी म्हणाले - "हे बालक दुधासाठी फार रडत आहे. तर मग आता हे कोणाचे दूध पिणार ? " तेव्हा इंद्र म्हणाला, "(मां धाता) माझे पिणार ? " "पुत्रा ! तू रडू नकोस. " असे म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली. (कारण तो इंद्र योगा इंद्रयागावातून जन्मला होता.) ब्राह्मण आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्र्व यालासुद्धा मृत्यू आला नाही. तो तिथेच तपश्चर्या करून मुक्त झाला. इंद्राने त्याचे नाव त्रसद्दस्यू असे ठेवले. कारण रावण इत्यादी दस्यू (लूटमार करणारे) त्याला भीत असत. युवनाश्र्वाचा पुत्र मांधाता (त्रसद्दस्यू) चक्रवर्ती राजा झाला. भगवंतांकडून मिळालेल्या तेजामुळे त्याने एकट्यानेच सात द्विपे असलेल्या पृथ्वीचे पालन केले. तो जरी आत्मज्ञानी होता, तरीसुद्धा त्याने मोठ-मोठ्या दक्षिणायुक्त यज्ञांनी स्वयंप्रकाश, सर्वदेवस्वरुप, सर्वात्मा तसेच इंद्रियातीत अशा यज्ञस्वरुप प्रभूंची आराधना केली. यज्ञाची सामग्री, मंत्र, विधीविधान, यज्ञ, यजमान, ऋत्विज,धर्म, देश आणि काल, हे सर्व तर भगवंतांचेच स्वरूप आहे. जेथून सूर्याचा उदय होतो, तो सगळा भूभाग युवनाश्र्वाचा पुत्र मांधाता याचाच होता.

            मांधात्याची पत्नी शशीबिंदूचि कन्या बिंदुमती ही होती. तिच्यापासून पुरूकुत्स, अंबरीश आणि योगी मुचकुंद असे तीन पुत्र झाले. त्यांना पन्नास बहिणी होत्या. त्या पन्नास-जणींनी एकट्या सौभरी ऋषींना पती म्हणून वरले. परम तपस्वी सौभरी एकदा यमुनेच्या पाण्यात बुडी मारून तपश्‍चर्या करीत होते. तेथे त्यांनी पाहिले की, एक मत्स्यराज आपल्या पत्नीस सुख उपभोगीत आहे. त्याचे ते सुख पाहून ब्राह्मण सौभरींच्या मनामध्येसुद्धा विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि राजा मांधात्याकडे येऊन त्यांनी त्याच्याकडे पन्नास कन्यांपैकी एक कन्या मागितली. राजा म्हणाला, " ब्रह्मन ! स्वयंवरात कन्येने आपल्याला वरले, तर आपण तिला घेऊन जा." सौभरी ऋषींना राजा मांधात्याचे मनोगत समजले. त्यांनी विचार केला की, राजाने अशासाठी हे रूक्ष उत्तर दिले की, " आता मी वृद्ध झालो आहे, माझ्या त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत. केस पिकले आहेत आणि माण हलू लागली आहे. आता कोणतीही स्त्री मला पसंत करणार नाही. ठीक आहे ! मी आता स्वत:ला असा सुंदर बनवीन की, राजकन्याच काय पण देवांगनासुद्धा माझ्यासाठी इच्छुक असतील. " असा विचार करून समर्थ सौभरीने तसेच केले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - विरूप, केतुमान आणि शंभू असे अंबरीषाचे तीन पुत्र होते. विरूपाचा पृषदश्र्व आणि त्याचा पुत्र रथीतर होता. रथीतराला संतान नव्हते. वंश-परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्राह्मतेज आणि संपन्न असे अनेक पुत्र उत्पन्न केले. ते जरी रथीतराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते, म्हणून रथीतराचे जे गोत्र होते तेच यांचे असावयास पाहिजे होते, तरीसुद्धा ते आंगिरसच म्हणविले गेले. हे रथीतर वंशाचे श्रेष्ठ पुरुष होते. कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णांशी त्यांचा संबंध होता.

            एकदा मनूच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. इक्ष्वाकूचे शंभर पुत्र होते. विकुक्षी, निमी आणि दंडक हे त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांच्याहून धाकटे पंचवीस पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे आणि पंचवीस पश्चिम भागाचे तसेच वरील तिघेजण मध्य भागाचे अधिपती झाले. उरलेले सत्तेचाळीस दक्षिण इत्यादी अन्य प्रांतांचे अधिपती झाले. एकदा इक्ष्वाकूने अष्टका श्रद्धाचे वेळी थोरल्या पुत्राला आज्ञा केली की, "विकुक्षे ! लगेच जाऊन श्राध्दाला योग्य पवित्र पशूचे मांस आण. " " ठीक आहे" असे म्हणून वीर विकुक्षी वनात गेला. तेथे त्याने श्राद्धासाठी योग्य अशा पुष्कळ पशूंची शिकार केली. तो थकला होता आणि त्याला भूकही लागली होती. म्हणून श्रद्धासाठी मारलेला पशु आपण खाऊ नये, हे विसरून त्याने एक ससा खाल्ला. विकक्षीने उरलेले मांस आणून आपल्या पित्याला दिले.इक्ष्वाकूने त्यावर प्रोक्षण करायला आपल्या गुरूंना सांगितले. तेव्हा गुरुजींनी सांगितले की, हे मांस दूषित आणि श्राद्धासाठी अयोग्य आहे. गुरुजींच्या सांगण्यावरून इक्ष्वाकूला आपल्या पुत्राने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला. शास्त्रीय विधीचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या पुत्राला रागाने त्याने आपल्या देशातून बाहेर घालविले. त्यानंतर इक्ष्वाकूने आपले गुरुदेव वशिष्ट यांच्याबरोबर ज्ञानविषयक चर्चा केली आणि योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतले. पित्याचा देहांत झाल्यानंतर विकुक्षी आपल्या राजधानीत परत आला आणि तो या पृथ्वीचे राज्य करू लागला. त्याने मोठमोठ्या यज्ञांनी भगवंतांची आराधना केली आणि जगात तो शशाद नावाने प्रसिद्ध झाला. इकुक्षीच्या पुत्राचे नाव पुरंजय होते. त्याला कोणी 'इंद्रवाह' तर कोणी 'ककुत्स्थ' म्हणतात. ज्या कर्मामुळे त्याला ही नावे पडली, ते ऐक.

            सत्ययुगाच्या शेवटी देवांचे दानवांशी घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये देवांचा दैत्यांकडून पराभव झाला. तेव्हा त्यांनी आपल्याला साहाय्य करण्यासाठी विर पुरं ज्याला आपला मित्र बनवले. पुरंजयाला आपला मित्र बनविले पुरंजय म्हणाला की, "जर देवराज इंद्र माझे वाहन होतील, तर मी युद्ध करीन. " प्रथम इंद्राने हे मानले नाही. परंतु देवाधिदेव सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवंतांच्या सांगण्यावरून शेवटी तो एक अतिशय मोठा बैल झाला. सर्वांतर्यामी भगवान विष्णूंनी आपल्या शक्तीने पुरंजयाला सिद्ध केले. त्याने कवच धारण करून दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेतले. त्यानंतर बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला. जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला, तेव्हा देव त्याची स्तुती करू लागले. देवांना बरोबर घेऊन त्याने पश्चिमेकडे असलेल्या दैत्यांच्या नगराला घेतले. वीर पुरंजयाचा दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचकारी घोर संग्राम झाला. युद्धामध्ये जे जे दैत्य त्याच्यासमोर आले, त्यांना पुरंजयाने बाणांनी यमाच्या हवाली केले. त्या प्रणयकालीन धगधगत्या आगीप्रमाणे होणाऱ्या बाणांच्या वर्षावाने छिन्नभिन्न झालेले दैत्य रणभूमी सोडून आपापल्या स्थानी पळून गेले. पूरंजयाने त्यांचे नगर, धन आणि ऐश्वर्य, सर्व काही जिंकून इंद्राला दिले. म्हणूनच त्या राजर्षीला 'पूर' जिंकल्याकारणाने 'पुरंजय' , इंद्राला वाहान बनविल्याने इंद्रवाह' आणि बैलाच्या ककुदावर (वशिंडावर) बसल्याकारणाने 'ककुत्स्थ' म्हटले जाते.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२७ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सहावा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेव, शंकर आणि देवांनो, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका. यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे. म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. देवांनो, एखादे मोठे कार्य करावयाचे असेल, तर शत्रूंशी सुद्धा सख्य केले पाहिजे. परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करावे. वेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा. ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होतो. क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत,वेली, औषधी वनस्पती टाका. नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या साहाय्याने समुद्राचे मंथन करा. या कामात दैत्यांना श्रम आणि फळ मात्र तुम्हांला मिळेल. देवांनो, तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा. सामोपचाराने जशी सर्व कामे होतात, तशी क्रोधाने होत नाहीत. समुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका. कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नका. इच्छाही धरु नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, देवांना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्यापुढेच अंतर्धान पावले. नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर इंद्रादी देव बलिराजाकडे गेले. शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्यसेनापती खवळले. परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणाऱ्या पुण्यश्लोक दैत्यराज बळीने दैत्यांना थांबविले. बळीने तिन्ही लोक जिंकले होते. सर्व संपत्तीनी युक्त आणि असूरसेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता. तेथे देव गेले. बुद्धिमान इंद्राने, स्वत: भगवंतांनी त्याला जे शिकविले होते, ते सर्व मधूर शब्दांत सामोपचाराने बळीला सांगितले. ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली. तेथे बसलेल्या शंबर, अरिष्टमी आणि त्रिपुरनिवासी असुरराजांनासुद्धा आवडली. तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली. आणि परीक्षिता, ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले. त्यानंतर त्यांनी आपली ताकत लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्रातटाकडे घेऊन चालले. त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते. शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता. परंतु तो मंदर पर्वत एक तर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता. त्यामुळे इंद्र, बळी वगैरे सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला. तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता. जमिनीवर पडतेवेळी त्याने पुष्कळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला.
त्या देव आणि असुरांचे हात, पाय आणि खांदे तुटून गेलेच, मनसुद्धा निराश झाले. त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंन तेथे प्रगट झाले. पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली. नंतर त्यांनी पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्यासह ते समुद्रतटकडे गेले. पक्षिराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला. नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुति केली, तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रकट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत, असे वाटावे. त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी, किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमळ, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नूपुर शोभून दिसत होते. वक्ष:स्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाला शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत कोणापासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सुक्ष्माहूनही सुक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप अनंत आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. हे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही हे आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटीसुद्धा हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्य-करण्यापलिकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याचप्रमाणे. आपल्या आश्रयाने राहणाऱ्या आपल्या मायेने, आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपने आपले मन एकाग्र करून या गुणांच्या, विषयांच्या गर्दीमध्येसुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात. तसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गाईपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. हे कमलनाभा, ज्याप्रमाणे वणव्याने व्याकूळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार ? प्रभो ! मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हाला कोठून कळणार ? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे, त्याची आज्ञा आपणच करावी.
श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे ब्रह्मदेवादी देवतांनी इंद्रियनिग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली. त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघगंभीर वाणीने त्यांना म्हणाले. सर्व देवतांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते, तरीसुद्धा समुद्रमंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...