अध्याय सतरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्याय सतरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सतरावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - पुरूरव्याचा आयू नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले. राजा, आता क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे तीन पुत्र झाले घरात समुदायाचा एक पुत्र झाले.गृत्समदाचा शुनक पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनिवर शौनक झाले.
काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वन्तरी. हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोक्ते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वन्तरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ.
भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्यांचे एक नाव प्रतर्दन असेसुद्धा आहे. हाच द्युमान शत्रूजित,वत्स, ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानाचेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता ! अलर्काखेरीज दुसऱ्या कोणत्याही राज्याने सहासष्ट हजार वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती. संततीचा सुनीथ. सुनीथाचा सुकेतन. सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू.
सत्यकेतूपासून धृष्टकेतू, धृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वीतिहोत्र, वीतिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला.

हे सर्व क्षेत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रंभस, त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून प्रक्रिया चा जन्म झाला अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मणवंश चालू झाला. आता अनेना याचा वंश ऐक. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते.

देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्ह रजीचा मृत्यू झाला, तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार-विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रति, प्रतिपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला. जयापासून कृत, कृतापासून राजा हर्यवन, हर्यवनापासून सहदेव, सहदेवापासून हीन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला. जयसेनाचा संस्कृती, संस्कृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले. आता नहुषवंशाचे वर्णन ऐक.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१० जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सतरावा भाग - २

श्रीभगवान म्हणाले - हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे. तुझी अशी इच्छा आहे की. आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे. तुझी अशीसुद्धा इच्छा आहे की, तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील, तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे. अदिती, तुला असेही वाटते की, तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत. त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. परंतु देवी, त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही, असे मला निश्चितपणे वाटते. कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही. तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे, म्हणून मला यासंबंधी काही-ना-काही विचार करावाच लागेल. कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधीपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुति केली आहेस. म्हणून मी अंशरूपाने कश्यपच्या तपश्र्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानाचे रक्षण करीन. कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पाहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नकोस. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील, तितके ते अधिक सफल होते.
श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत. ही दुर्मिळ गोष्ट जाणुन कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्यदृष्टी कश्यपांनी समाधियोगाने जाणले की, भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायु जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठविलेले तेज अदितीमध्ये स्थापन केले. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत. तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तींच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्राह्मण्यदेवा, त्रिगुणांच्या नियामका, आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो. प्रश्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या, वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभो, आपणच सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे. जीवांच्या अंत:करणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो. प्रभो, आपणच संसाराचे आदि अंत आणि मध्य आहात. म्हणूनच वेद अनंतशक्ती पुरूषाच्या रूपात आपले वर्णन करतात. जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो, त्याप्रमाणे आपणसुद्धा कालरुपाने हे विश्व स्वतः बरोबर वाहून नेता. आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींनासुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवाधिदेवा, जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या दैवतांना केवळ आपलाच आधार आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सतरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरुप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्णरूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रकट झाले. परीक्षिता, त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांना चार हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून अदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेम विवाहृळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. नंतर उठून, हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापु लागले, त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती, लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहात होती. नंतर मोठ्या प्रेमाने, गद्गगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करु लागली.
अदिती म्हणाली - आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तनाचे श्रवणसुद्धा संसार तरुण नेणारे आहे. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो, त्याची सर्व संकटे आपण दूर करता. भगवन, आपण दीनांचे स्वामी आहात. आपण आमचे कल्याण करावे. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात. तसेच विश्वरूपसुद्धा आपणच आहात. अनंत असूनसुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता. आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता. नित्यनिरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहाता. भगवन, मी आपल्याला नमस्कार करते. हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता, तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्यांच्याचसारखे दिव्य शरीर, प्रत्येक इच्छित वस्तू, पुष्कळ धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, योगाच्या सर्व सिद्धि, धर्म, अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते. असे असता शत्रूंवर विजय मिळविणे यासारख्या ज्या लहासहान कामना आहेत, त्यासंबंधी काय सांगावे ?
श्रीशुक म्हणतात - राजन, अदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली. तेव्हा, सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...