भाग - ४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाग - ४ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - ४

श्री गणेशाय नमः त्यावेळी हजारो राक्षसिणी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालांतून बाहेर पडून रणभूमीवर आल्या. लक्ष्मणांच्या बाणांनी छिन्न-वीच्छिन्न होऊन पडलेल्या आपल्या आप्तांना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या. हाय ! हाय ! लोकांना दहशत बसविणारे रावणमहाराज ! आज आमचा घात झाला ! आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे. आता तिचे रक्षण कोण करणार ? महाराज ! आपण कामवश झाल्याने सीतादेवींचा प्रभाव जाणला नाही. त्यामुळे आपली ही दशा झाली ! आपण राक्षस कुळाला आनंद देत होता. पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली. आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनला.

            श्रीशुक म्हणतात - श्रीरामचंद्राच्या आज्ञेने बिभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टीकर्म केले. नंतर भगवान श्रीरामांनी अशोकवाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्रीसीतादेवींना पाहिले. त्या आपल्या विरहाने दु:खी आणि कृश झाल्या होत्या. आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामांचे हृदय करूणेने व्याकूळ झाले. इकडे भगवंतांचे दर्शन झाल्याने सीतादेवींचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्हासित झाले. भगवंतांनी बिभीषणाला राक्षसांचे अधिपत्य, लंकेचे राज्य आणि एक कल्पाचे आयुष्य दिले. त्यानंतर आगोदर सीतादेवींना विमानात बसविले. नंतर लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत यांसह आपण बसले. अशा प्रकारे चौदा वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले. त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते.

            इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंतांच्या लीलांचे गायन करीत होते. जेव्हा भगवंतांना समजले की, भरत फक्त गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या कण्या खातो, वल्कले नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो. तसेच त्याने जटा वाढविल्या आहेत. तेव्हा करूणेने भगवंतांचे हृदय भरून आले. जेव्हा भरताला समजले की, आपले जेष्ठ बंधू श्रीराम येत आहेत, तेव्हा तो नागरिक, मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला. जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदिग्राम येथून निघाला, तेव्हा लोक त्याच्याबरोबर मंगलगीते गात व वाद्ये वाजवीत चालू लागले. वेदवेत्ते ब्राह्मण वारंवार वेदमंत्रांचे पठण करीत होते. सर्वत्र सोनेरी पताका फडकत होत्या. रंगी-बेरंगी ध्वजांनी सजविलेले सुवर्णरथ, सोन्याचे खोगीर घातलेले सुंदर घोडे, तसेच सोन्याची चिलखते घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले. शेठ-सावकार, श्रेष्ठ वारांगना आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान-मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्या बरोबर निघाले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०९ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ४

श्री गणेशाय नमः मी, भगवान शंकर, भृगु इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनविलेल्या नियमांची बंध्द आहोत. तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो. (त्यांच्या भक्तांचा द्रोह करणाऱ्याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत.) ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले, तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलासनिवासी भगवान शंकरांना शरण गेले.
            श्रीमहादेव म्हणाले - ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे, योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात. ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहातात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही.
            मी, सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिलदेव,अपांतरतम,देवल,धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर-असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही. कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हांला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जावे. ते भगवंतच तुमचे कल्याण करतील. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेले, तेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले. ते म्हणाले,"हे अच्युता ! अनंता ! संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो ! विश्वाचे जीवनदाता ! मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपला परम प्रभाव न जाणल्याकारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो ! आपण मला त्यापासून वाचवा ! आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्धा मुक्त होतो.
            श्रीभगवंत म्हणाले - हे ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्तांच्या आधीन आहे. मला जराही स्वतंत्रता नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्रह्मण ! माझ्या भक्तांच्या एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधूस्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक, हे सर्व सोडून फक्त मलाच शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वत:ला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य-सारूप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात, तेव्हा ते त्यांच्यासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत ? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, एक. मी तुला उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे, त्यांच्याकडेच तू जा. निरापराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगल होते.
            तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा ! तुझे कल्याण असो नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीषाकडे जा आणि त्यांची क्षमा माग,तरच तुला शांती मिळेल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ४

श्री गणेशाय नमः ब्रह्मदेव म्हणाले - समस्त प्राण्यांना जीवन देणारे, त्यांचे स्वामी आणि जगत्स्वरूप देवाधिदेवा, आता आपण याला सोडून द्यावे. आपण याचे सर्वस्व हरण केले आहे. म्हणून आता ह्याला बांधणे योग्य नाही. याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळवलेले स्वर्ग इत्यादी लोक, आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय, असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली. प्रभो, जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्ध्य देतो आणि फक्त दुर्वादलानेसुद्धा आपली खरीखुरी पूजा करतो, त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त होते. असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने, धैर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे. मग ह्याला दुःख का व्हावे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - ४

श्री गणेशाय नमः राजा बलीने दहा इंद्रावर, तीन ऐरावत हत्तीवर, चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत-हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीव पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडुन आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली. परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. यानंतर बलीने एकापाठोपाठएक शुल,भाला,तोमर आणि शक्ती हातात घेतली. परंतु तो जे जे शस्त्र हातात घेई, त्याचे इंद्र तुकडे करून टाकी.
परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या. त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन "मारा, तोडा" असे ओरडत शेकडो नागड्या-उगड्या राक्षसिणी आणि राक्षससुद्धा तेथे प्रगट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाले. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरु होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वाऱ्याच्या सहाय्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असूरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रकट झाले. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांच्या आठ हातात आठ आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभ मणी, मस्तकावर अमूल्य मुगुट तसेच कानांमध्ये कुंडले झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात, त्याचप्रमाणे परमात्मा प्रगट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते, हे योग्यच आहे. हे राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडवाहन भगवंतांना आलेले पाहिले, तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला मारले. माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडविली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला, परंतु त्याचक्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतानी चक्राने तोडणे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ४

श्री गणेशाय नमः वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर व निवृत्तीपर. प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चतुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्यदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना 'इष्ट' म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहिरी बांधणे, पानपोई घालने यांसारखी लोकोपयोगी कामे ही 'पूर्तकर्मे' होत.ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा, मेल्यानंतर प्रवृत्तिमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सुक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धुमाभिमानी दैवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सुक्षम देह अनुक्रमे वनस्पती,अन्न आणि वीर्य यांच्या रूपांत परिणत होऊन पितृयानमार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकांत जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तीमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्यांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादीसंकल्परूप मनामध्ये, मनाला परा वाणीमध्ये आणि परावाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्ण समुदायाला 'अ उ म' या तीन स्वरांच्या रूपात राहाणाऱ्या ॐकारामध्ये, ॐकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राण्यामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्याहृ, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्याजवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले 'विश्व' शरीर सुक्ष्मामध्ये विलीन करून सुक्षम उपाधियुक्त 'तैजस' होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारणशरीरामध्ये लय करून कारणोपाधिक 'प्राज्ञ' होतो. नंतर त्या शरीराचा लय करून 'तुरीय' रूपात राहातो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहातो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात ब्राह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही.
            पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो, तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारुपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तू़च्या रूपामध्ये सर्व काही हा तत्त्ववेत्ताच असतो. (म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही.) आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणार्‍या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खाऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही, की परिणामही नाही; ते आपल्याला अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून - सुक्ष्मभुतांपासून वेगळी नाहीत; पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवाचे अस्तित्व सापडत नाही. म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत, हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्त्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की, ज्या वस्तू अगोदर होत्या, त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधी-निषेधाचे शास्त्र असते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...