३१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - ४

श्री गणेशाय नमः राजा बलीने दहा इंद्रावर, तीन ऐरावत हत्तीवर, चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत-हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीव पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडुन आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली. परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. यानंतर बलीने एकापाठोपाठएक शुल,भाला,तोमर आणि शक्ती हातात घेतली. परंतु तो जे जे शस्त्र हातात घेई, त्याचे इंद्र तुकडे करून टाकी.
परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या. त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन "मारा, तोडा" असे ओरडत शेकडो नागड्या-उगड्या राक्षसिणी आणि राक्षससुद्धा तेथे प्रगट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाले. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरु होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वाऱ्याच्या सहाय्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असूरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रकट झाले. त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पितांबर परिधान केला होता. त्यांच्या आठ हातात आठ आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभ मणी, मस्तकावर अमूल्य मुगुट तसेच कानांमध्ये कुंडले झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात, त्याचप्रमाणे परमात्मा प्रगट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते, हे योग्यच आहे. हे राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडवाहन भगवंतांना आलेले पाहिले, तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला मारले. माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडविली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला, परंतु त्याचक्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतानी चक्राने तोडणे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करत होता. बली इंद्राशी, कार्तिकस्वामी तारकासुराशी, वरून हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंभरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. नमुची अपराजिताशी, अश्‍विनीकुमार वर्षपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले. राहूबरोबर चंद्राचे आणि पुलोमाबरोबर वायुचे युद्ध झाले. भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. परीक्षिता, जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्नीदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली. दुर्मर्षाची कामदेवाशी,उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची ब्रहस्पतीशी आणि नरकासुराची शनैश्र्चराशी लढाई होऊ लागली.निवातकवचांच्या बरोबर मृरुद़णांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा पौलोमाबरोबर विश्वेदेवांचा तसेच क्रोधवशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला.
अशा प्रकारे असूर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि समुहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशू, तलवारी,मुद्गल,आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न-भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काहीजणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती कि, तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढायचे मैदान, तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रकट होत होता. काहीजणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - २

श्री गणेशाय नमः राजा, त्यावेळी रंगी-बेरंगी ध्वज, शुभ्र छत्रे, रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चवऱ्या आणि वार्‍याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चकाकणारी कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यांमुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे, अशा शोभत होत्या. परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळीराजा मय दानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तेथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला. युद्धाची सर्व सामुग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आच्श्रर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमानसुद्धा करता येत नव्हते, तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे ? त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतीस बसला होता. त्याच्यावर ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र यांमुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमूची, शंभर,बाण, विप्रचित्ती, अयोमुख,द्विमूर्धा, कालनाभ, प्रहेती, हेती,इल्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रदंष्ट्, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुभी, तारक, चंक्राक्ष, शुभ, निशुभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिषटनेमी, त्रिपुराधिपती मय,पौलोम,कालेय आणि निवातकवच वगैरे सेनाविभागप्रमुख होते. हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते. परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले.
या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवू लागले. तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरुढ झाला. तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरुढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने,ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगन तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरून इत्यादी लोकपाल येऊन उभे टाकले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, जरी दैत्यदानवांनी मोठ्या हुषारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्न केले होते, तरीसुद्धा भगवंतांशी विन्मुक असल्या-कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. हे राजन, भगवंताने समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनिशी देवांवर हल्ला चढवला. इकडे सर्व देवांनी एक तर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती. शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे तेसुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. राजा, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला. हाच देवासुरसंग्राम होय. तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. त्यावेळी शंख, तुतार्‍या, मृदंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. तसेच हत्तींचे चीत्कार, घोड्यांची खिंकाळणी, रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तेथे मोठाच हलकल्लोळ माजला. रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले. त्यांपैकी काही वीर उंटांवर, हत्तींवर आणि गाढवांवर बसून लढत होते; तर काहीजण गौरमृग, अस्वल, वाघ आणि सिंहांवर बसून लढत होते. काय सैनिक गिधाडे, कावळे, बगळे, ससाने आणि कोंबडे यांच्यावर बसले होते; तर पुष्कळसे तिमिंगिल मासे, चित्ते, रेडे, गेंडे, गौरेडे, गवे आणि रानडुक्करांवर स्वार झाले होते. काहीजण तर कोल्हा, उंदीर, सरडे, ससे, मनुष्ये, बकऱ्या, काळवीट, हंस आणि डुकरांवर चढून बसले होते. हे राजा, अशाप्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहाणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

३० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय नववा भाग - २

श्री गणेशाय नमः नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हविर्द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गाई, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले. आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. तेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या, पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या, भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृतकलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्णनूपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मूख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मीदेवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. जन्मत:च क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे. म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसविले. यानंतर अमृतकलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेमही होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. म्हणून ते गप्प बसून राहिले. मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिऊन होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता. त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत.
            त्याचवेळी राहू दैत्य देवांचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवाबरोबर तोही अमृत प्याला. परंतु त्याचक्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले. अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला 'ग्रह' बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्याला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले, तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. परीक्षिता, पहा ना ! देव आणि दैत्य दोघांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूनी, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने, एकच कर्म केले होते. परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यांपैकी दैवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलरजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यांपासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. मनुष्य आपले प्राण,धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर,पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो, ते व्यर्थ होते. कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करणारे ते सर्वांना मिळते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय नववा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूंप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृतकलश हिसकावून घेत होते. एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली. ते विचार करू लागले, " किती अनुपम सौंदर्य हे ! किती हे तेज ! काय हे हिचे नवतारुण्य ! "असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले. काममोहित होऊन त्यांनी तिला विचारले. " हे कमलनयने, तू कोण आहेस ? कोठून आलीस ? काय करू इच्छितेस ? हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस ? तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे. आम्ही असे समजतो की, आतापर्यंत देव, दैत्य सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपालांनीसुद्धा तुला स्पर्श केला नसेल. तर मग माणूस तुला कोठून स्पर्श करीत ? हे सुंदरी, विधात्याने दया घेऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठविले आहे काय ? हे मानिनी, आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे. म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव, आम्ही सर्वजण कष्यापाचे पुत्र असल्याकारणाने सख्खे भाऊ आहोत. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. म्हणून तू नि:पक्षपातीपणे हे आम्हांला असे वाटून दे की, ज्यामुळे आमच्यांत भांडण होणार नाही, " असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्रीवेषधारी भगवान किंचितसे हसले आणि सुंदर नेत्रकटाक्ष टाकीत त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज कुलटेच्या मागे कसे लागलात ? कारण विवेकी मनुष्य स्त्रायांवर कधी विश्वास ठेवीत नाही. दैत्यांनो, लांडगे आणि व्याभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही. कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, मोहिणीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहनीच्या हातात दिला. नंतर अमृतकलश घेऊन किंचित स्मित हास्य करीत भगवान म्हणाले, "उचित असो वा अनुचित, मी जे काही करीन, ते तुम्हांला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटीन. " मोहिनीचे हे बोलणे ऐकूण मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातील खुबी समजली नाही. म्हणून सर्वांनी 'ठीक आहे' असे म्हणून ते मान्य केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - ३

श्री गणेशाय नमः यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारूणीदेवी (सुरा) प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. त्यानंतर महाराज, कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातुन एक अत्यंत अलौकीक पुरुष प्रकट झाला. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यांत लालिमा होती. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानांत चमचमणारी रत्नकुंडले होती. रुद्र छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशांशावतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक 'धन्वंतरी' या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली, तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृतकलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृतकलश घेऊन निघून गेले, तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दिनवाणी दशा पाहून भक्तवांछाकल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, " देवांनो" ! तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो."
परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरु झाले. सर्वजण म्हणू लागले, " मी अगोदर पिणार, अगोदर मी; तू नाही, तू नाही. " हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता, त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की, बंधूंनो, देवांनीसुद्धा आमच्या बरोबरीनेच परिश्रम केले आहेत. म्हणून त्यांनासुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय. " एवढ्यात सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे श्यामल होता. अंगप्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणार्‍या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यांत भीती तरळत होती. आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगर्‍यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. तिच्या पायांतील नूपुर रुणझुण रुणझुण असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनीरूपधारी भगवान दैत्यसेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - २

श्री गणेशाय नमः ब्राह्मणांनी स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे, तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्यमुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरूष आढळला नाही. जो तपस्वी होता, त्याने क्रोधावर विजय मिळवलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते, परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते, परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला ईश्वर कसे म्हणायचे ? काहीजण धर्माचे आचरण करणारे होते, परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता, परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते, परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते, ते वर होणारे नव्हते. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे, परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे, परंतु त्यांच्या आयुष्याविषय सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल ज्यांच्या ठायी आहेत, ते मला इच्छित नाहीत.
असा विचार करुन श्रीलक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांना वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत. आणिमादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात; परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मीदेवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत. म्हणून तिने त्यांनाच वरले. जिच्याभोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधून गुंजारव करीत आहेत. अशी ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्ष:स्थळाकडे पाहात ती त्यांच्याजवळच उभी राहिली. त्रैलोक्यनिर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्रीलक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्ष:स्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित गाऊ-नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली, तेव्हा ते निर्बल, आळशी, निर्लज्य आणि लोभी झाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय आठवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदीत झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनु प्रगट झाली. हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामुग्री देणारी होती. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल, असे पवित्र हविर्द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. नंतर उच्चै:श्रावा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्याची बळीने इच्छा प्रगट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंतांच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील, असे त्याला शिखरांसारखे चार दात होते. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला. तूं ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणार होता. यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगत झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ती लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. तिचे सौंदर्य, तारूण्य, रूप-रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की, ही आपल्याला मिळावी. तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मुर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यांतुन पवित्र पाणी आणले. पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गाईनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतुने चैत्र-वैशाखात मिळणारी सर्व फुलेफळे आणून दिली. ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगल गान करू लागले. नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या.मेघ देह धारण करून मृदंग, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्या वेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरूणाने वैजयंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते. प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सत्व, रज, तम हे आपले तीन नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आहात. हे गिरीशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्त्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल, एवढेच काय परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रीपुरासुर, कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत, असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यांतून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. जीवन्मुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहातात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहाता. म्हणून जे लोक आपल्याला असक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठूर आहात असे म्हणतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत ! या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासूनही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादीकांनाही होत नाही; तर ते स्तुती कशी करू शकतील ? आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार ? तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगाण केले आहे. आम्ही तर केवळ आपले हे लीलाविहारी रूप पाहात आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या, तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणिमात्रांचे सुहृद भगवान शंकर करूणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले.
श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पाहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. आपल्या शरण अभंग प्राण्यांना सज्जन दुसऱ्याच्या प्राण्याचे क्षणभंगुर प्राण्यांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्यांच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणून मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो.
श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून विष पिण्याची तयारी केली.देवांना त्यांचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. प्राणिमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखवला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वत:च ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे.
सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवाधिदेव शंकराचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप,अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - २

श्री गणेशाय नमः अशा रीतीने देव आणि असुर यांनी समुद्रमंथन करूनसुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही, तेव्हा स्वत: भगवान समुद्रमंथन करू लागले.
मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर, कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडले, कपाळावर झुलणारे कुरळे केस, डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती. संपूर्ण जगाला अभय देणाऱ्या आपल्या विश्वविजयी भुजांनी वासुकीनागाला पकडून तसेच कूर्मरूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवान मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले, त्यावेळी ते दुसऱ्या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले. अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरवातीला हालाहल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले. त्यामुळे समुद्रातून मासे, मगरी, साप व कासवे भयभीत होऊन वर आली आणि तिमी, तिमिंगिल इत्यादी मासे, समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकुळ झाल्या. ते अत्यंत उग्र विष दिशा-दिशांना, वरखाली, सगळीकडे उडू आणि पसरू लागले. या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता. संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांयांना शरण गेले. भगवान शंकर पार्वतीसह कैलासपर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते. ते तेथे मुनींना संमत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते. प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रमाण केला.
प्रजापति म्हणाले - हे देवाधिदेवा महादेवा, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. त्रैलोक्याला भस्म करणाऱ्या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे. साऱ्या जगताला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात. म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात; कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे जगद्गुरु आहात. हे प्रभो, आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय जेव्हा करता, तेव्हा स्वतःसिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा, विष्णू, शिव अशी नावे धारण करता. आपण स्वयंप्रकाश आहात. कारण आपण परम रहस्यमय ब्रम्हतत्व आहात. सर्व प्रकारच्या उच्च-निच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात. आपणच सर्वांचे आत्मा आहात. अनेक शक्तींच्याद्वारे आपणच जगद्रुपाने प्रतीत होता. आपणच जगाचे ईश्वर आहात. सर्व वेद आपल्यापासून प्रगट झाली आहेत; आपणच जगताचे आदिकारण महत्त्व आणि त्रिविध अहंकार आहात. तसेच प्राण, इंद्रिये, पंचमहाभूते, शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात. आपणच काळ, यज्ञ, सत्य,ऋत, आणि धर्म आहात. आपणच 'अ-उ-म' या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात, असे वेदवेत्ते म्हणतात. सर्वदेवस्वरूप अग्नी आपले मुख आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणाऱ्या हे देवा, ही पृथ्वी आपले चरणकमल आहे. आपण अखिल देवस्वरूप आहात. हा काळ आपली गती आहे. दिशा कान आहेत आणि वरून रसनेंद्रिय आहे. आकाश नाभी आहे,वायू श्वास आहे, सूर्य नेत्र आहे, आणि पाणी वीर्य आहे. आपला अहंकार उच्च-नीच सर्व जीवांचा आश्रय आहे. चंद्र मन आहे आणि हे प्रभो, स्वर्ग आपले मस्तक आहे. हे वेदस्वरूप भगवन, समुद्र आपले पोट आहे, पर्वत हाडे आहेत, सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत. गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे. हे स्वामी, पाच उपनिषदेच आपली पाच मुखे आहेत. त्यांच्याच पदच्छेदापासून अडतीस कलात्मक मंत्र निघाले आहेत. हे देवा, आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले 'शिव'नावाचे स्वयंप्रकाश परमार्थतत्व आहे. दंभ,लोभ, इत्यादी अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सातवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. परंतु भगवंतांचे हे कृत्य दैत्यसेनापतींना पसंत पडले नाही. ते म्हणाले, शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे. आम्ही ते पकडणार नाही. आम्ही वेदशास्त्रांचे विधिपूर्वक अध्ययन केले आहे, उच्च कुळात आमचा जन्म झाला आहे. आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहेत. असे म्हणून ते गुपचूपपणे एका बाजूला जाऊन उभे राहीले. ते पाहून, भगवंतांनी स्मित हास्य करून, वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले. अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृतप्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले.
परीक्षिता, जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले, तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला. अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळत आहेत, असे पाहून त्यांचे मन खट्ट झाले सर्वांच्या चेहऱ्यावर उदासिनता पसरली. त्यावेळी भगवंतांनी ओळखले की, ही विघ्नराजाची करामत आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या निवारण्याचा उपाय शोधून अत्यंत विशाल व विस्मयकार कुर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले. भगवंतांची शक्ती अपार असून ते सत्यसंकल्प आहेत. त्यांना अशक्य ते काय ? देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेल्या पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले. त्यावेळी भगवंतांनी जंबूदीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केले होते. परीक्षिता, मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरवण्यास सुरुवात केली. तेव्हा तो भगवंतांच्या पाठीवर फिरू लागला. अनंत शक्तिशाली आदिकच्छप भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खाजविणे वाटत होते. त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढवीत आसुरी शक्तिरूपात त्यांच्यात प्रवेश केला. त्याचप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकीनागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला. इकडे पर्वताच्या वर दुसऱ्या पर्वतासारखे होऊन सहस्रबाहू भगवंतांनी आपल्या हातांनी त्याला दाबून धरले. त्यावेळी आकाशात ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, वगैरे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून, खाली त्याला कच्छपाच्या रूपाने आधार देऊन, देव आणि असुरांच्या शरीरांमध्ये शक्तीच्या व पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्तिसंपन्न केले. आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले. त्यावेळी समुद्र आणि त्यात राहाणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली. नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र, मुख आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडू लागली. तिच्या धुरामुळे पौलोम,कालेय, बली, इल्वल इत्यादी असुर निस्तेज झाले. ते असे वाटू लागले की, वणव्याने होरपळून गेलेले जणू सागवान. वासुकीच्या श्वासांच्या फुत्काराने देवांचेसुद्धा तेज फिके पडले. त्यांची वस्त्रे, माळा, श्रेष्ठ कवचे आणि मुखे धुरकट झाली. त्यांची ही दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यावर वर्षाव करू लागले आणि समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२७ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सहावा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेव, शंकर आणि देवांनो, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका. यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे. म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. देवांनो, एखादे मोठे कार्य करावयाचे असेल, तर शत्रूंशी सुद्धा सख्य केले पाहिजे. परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करावे. वेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा. ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होतो. क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत,वेली, औषधी वनस्पती टाका. नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या साहाय्याने समुद्राचे मंथन करा. या कामात दैत्यांना श्रम आणि फळ मात्र तुम्हांला मिळेल. देवांनो, तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा. सामोपचाराने जशी सर्व कामे होतात, तशी क्रोधाने होत नाहीत. समुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका. कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नका. इच्छाही धरु नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, देवांना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्यापुढेच अंतर्धान पावले. नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर इंद्रादी देव बलिराजाकडे गेले. शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्यसेनापती खवळले. परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणाऱ्या पुण्यश्लोक दैत्यराज बळीने दैत्यांना थांबविले. बळीने तिन्ही लोक जिंकले होते. सर्व संपत्तीनी युक्त आणि असूरसेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता. तेथे देव गेले. बुद्धिमान इंद्राने, स्वत: भगवंतांनी त्याला जे शिकविले होते, ते सर्व मधूर शब्दांत सामोपचाराने बळीला सांगितले. ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली. तेथे बसलेल्या शंबर, अरिष्टमी आणि त्रिपुरनिवासी असुरराजांनासुद्धा आवडली. तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली. आणि परीक्षिता, ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले. त्यानंतर त्यांनी आपली ताकत लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्रातटाकडे घेऊन चालले. त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते. शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता. परंतु तो मंदर पर्वत एक तर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता. त्यामुळे इंद्र, बळी वगैरे सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला. तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता. जमिनीवर पडतेवेळी त्याने पुष्कळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला.
त्या देव आणि असुरांचे हात, पाय आणि खांदे तुटून गेलेच, मनसुद्धा निराश झाले. त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंन तेथे प्रगट झाले. पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली. नंतर त्यांनी पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्यासह ते समुद्रतटकडे गेले. पक्षिराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला. नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय सहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुति केली, तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रकट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत, असे वाटावे. त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी, किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमळ, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नूपुर शोभून दिसत होते. वक्ष:स्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाला शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत कोणापासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सुक्ष्माहूनही सुक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप अनंत आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. हे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही हे आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटीसुद्धा हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्य-करण्यापलिकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याचप्रमाणे. आपल्या आश्रयाने राहणाऱ्या आपल्या मायेने, आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपने आपले मन एकाग्र करून या गुणांच्या, विषयांच्या गर्दीमध्येसुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात. तसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गाईपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. हे कमलनाभा, ज्याप्रमाणे वणव्याने व्याकूळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार ? प्रभो ! मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हाला कोठून कळणार ? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे, त्याची आज्ञा आपणच करावी.
श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे ब्रह्मदेवादी देवतांनी इंद्रियनिग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली. त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघगंभीर वाणीने त्यांना म्हणाले. सर्व देवतांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते, तरीसुद्धा समुद्रमंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - ३

श्री गणेशाय नमः स्वत: उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे चरण होत. या पृथ्वीवर जरायुज,अंडज, स्वेदज, आणि उद्धिज्ज, असे चार प्रकारचे प्राणी राहातात. ते परम स्वतंत्र परम ऐश्वर्यशाली, पुरुषोत्तम परब्रम्ह आमच्यावर प्रसन्न होवोत. हे परम शक्तिशाली पाणी त्यांचे वीर्य आहे. यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात, वाढतात आणि जिवंत राहतात. ते परम ऐश्वर्यशाली परब्रम्ह आमच्यावर प्रसन्न होवो. श्रुती सांगतात देवांचे अन्न,बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे. तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृध्दि करणारा आहे. अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होवोत. सर्वज्ञ अग्नी प्रभूंचे मुक आहे. यज्ञ-यागादी कर्मकांडासाठी याचा जन्म झाला आहे. हा अग्नीच शरीरात जठराग्निरूपाने आणि समुद्रात वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न, पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो. असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्याच्या द्वारे जीव देवयानमार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो, जो वेदांची साक्षात मूर्ती आणि भगवंतांचे ध्यान करण्यायोग्य स्वरूप आहे, जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यूसुद्धा आहे, असा सूर्य ज्यांचा नेत्र आहे, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या प्राणापासूनच चराचराचा प्राण तसेच मानसिक, शरीरिक आणि इंद्रियसंबंधी बळ देणारा वायू प्रगट झाला आहे. ते चक्रवर्ती सम्राट आहेत, तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत, असे परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या कानापासून दिशा, हृदयापासून इंद्रियगोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे, जे प्राण, इंद्रिये, मन, उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या बलापासुन इंद्र, प्रसन्नतेपासून सर्व देवगन, क्रोधापासून शंकर, बुद्धीपासून ब्रह्मदेव, इंद्रयांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या वक्ष:स्थळापासून लक्ष्मी, सावलीपासून पितृगण, स्तनापासून धर्म, पाठीपासून अधर्म, डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेतून अप्सरा प्रकट झाल्या आहेत. ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद, ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय, वैश्य हे जांघा आणि वेदबाह्य शूद्र हे चरण आहेत, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती, नाकापासून कांती, स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम, भुवयांपासून यम आणि डोळ्याच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. शास्त्र असे सांगते की, पंचमहाभूते, काल, कर्म, स्वत्वादी गुण आणि इतर प्रपंच हे ज्यांच्या योगमायेपासून बनले आहेत, जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान 'नेति नेति' शब्दांनी ज्यांचे वर्णन करतात, ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. ते मातेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृतीमध्ये आसक्त होत नाहीत, जे वायूप्रमाणे समान व असंग असतात, ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत, त्या आपल्या आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमचे नमस्कार असोत.
प्रभो, आम्ही आपणास शरण आलो आहोत आणि आपले मंद हास्ययुक्त मुखकमल आमच्या या नेत्रांनी पाहावे असे आम्ही इच्छितो. तर आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हांस दाखवावे.प्रभो, आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हांला कठीण असणारी कामे सहज करता. विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक दुःख भोगीत आहेत, त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते, किंवा मिळतही नाही. परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात,ती मात्र आनंददायक आणि सफल असतात. भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाही. कारण भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्मा आहेत. झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्याच्या फांद्या आणि डहाळ्यांनाही पाणी देणे होय. त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंतांची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याचीसुद्धा आराधना होय. ज्यांच्या लीलांचे रहस्य तार्काच्या पलीकडचे आहे, जे स्वतः गुणांच्या पलीकडे राहूनसुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत, तसेच सध्या सत्त्वगुणामध्ये स्थित आहेत, अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत आहोत.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रेष्ठ ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंतांचे स्मरण केले. नंतर प्रफुल्लित चेहऱ्याने देवांना ते म्हणाले. मी, शंकर, तुम्ही, असुर, दैत्य, मनुष्य, पशु-पक्षी, स्वेदज, वृक्ष, इत्यादी सर्व प्राणी ज्या विराग स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झालो आहोत, त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ. त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला, कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला, तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात. यावेळी त्यांनी प्राण्यांच्या कल्याणासाठी सत्त्वगुणाचा स्वीकार केला आहे. हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्याचा आहे. म्हणून आपण सर्वजण त्या जगद्गुरु परमात्म्याला शरण जाऊ. ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत. म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ते आमचे कल्याण करतील.
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, देवांना असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंतांचे निजधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेले. हे राजा, भगवंतांविषयी आगोदर देवांनी ऐकले होते, परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते. म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने वेदवाणीने भगवंतांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - भगवन, आपण निर्विकार, सत्य, अनंत, आदिपुरुष, सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान, अखंड तसेच अतर्क्य आहात.मनाच्याही पुढे आपण जाता. वाणी आपले वर्णन करू शकत नाही. सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. आपण प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात. आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत. आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात. सत्य, त्रेता आणि द्वापार यांमध्ये आपण अवतार घेता, म्हणून त्रियुग आहात. आम्ही आपणास शरण आहोत. हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे. दहा इंद्रिये आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आरे आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून याचा परीघ आहे. स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे. स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा. तेच एकमेव सत्य आहेत. आम्ही त्यांना शरण आहोत. जे एकमात्र ज्ञानस्वरूप, प्रकृतीच्या पलीकडचे तसेच आदृश्य आहेत, जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश, काल किंवा वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही, तेच प्रभू या जिवाच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असतात. विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात. ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे, तिला कोण तरुण जाऊ शकणार ? परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात, त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो. आम्ही व ऋषी ज्यांच्या प्रिय सत्त्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत, तरीसुद्धा त्यांच्या आतबाहेर व्यापून असणाऱ्या सुक्ष्म स्वरूपाला जाणत नाही. तर मग रजोगुण आणि तमोगुणप्रधान असूरादी त्यांना कसे जाणू शकतील ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्रमोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे. ही मी तुला सांगितली. आता रैवत मन्वन्तराची कथा ऐक. पाचव्या मनूचे नाव रैवत होते. चौथा मनूचे नाव रैवत होते. चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता. अर्जुन, बली,विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते. राजा, त्या मन्वन्तरात इंद्राचे नाव विभू होते; आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते. त्या वेळी हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू इत्यादी सप्तर्षी होते. त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषींच्या पत्नीचे नाव विकुंठा होते. त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वत: भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मीदेवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले. सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे. त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी (तिसऱ्या स्कंधात) केले आहे. ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केले असेल, तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल.
साहवा मनू चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता. पूरु, पूरुष, सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आपल्या इत्यादी देवगन होते. त्या मन्वन्तरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगत्पती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला.
राजाने विचारले - मुनिवर्य, भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले ? कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले ? त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळविले ? आणखी कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या ? भगवंतांची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांगा. आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता, तसतसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचे तर नावच नाही. कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे.
सूत म्हणाले - शौनकादी ऋषींनो, श्रीशुकदेवांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले.
श्रीशुकाचार्य म्हणतात - ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले, त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले. ते पुन्हा उठू शकले नाहीत. दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते. यज्ञ-यागादी कर्मेही लोप पावली होती. हे पाहून इंद्र, वरूण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला. परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले. ब्रह्मदेवांनी पाहिले की, इंद्र, वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून हा असूर आनंदात आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौथा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परिक्षिता ! भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यासह तेथून निघून गेले. हे आपले प्रारब्ध होते, असे इंद्रद्युम्नाने मानले. यानंतर स्वतःचे विस्मरण घडविणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपला पार्षद बनविले. गंधर्व, सिद्ध, देवता त्यांच्या या लीलेचे गायन करू लागले. नंतर पार्षदरुप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठ धामकडे गेले. हे कुरुश्रेष्ठ परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकविली. ही कथा ऐकणाऱ्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल. म्हणूनच (आपले) कल्याण इच्छिणारे द्विजगन दुःस्वप्न इत्यादीच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत होऊन याचा पाठ करतात. हे कुरूश्रेष्ठा, गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्वव्यापक तसेच सर्वभूतस्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला सांगितले.
श्रीभगवान म्हणाले - जे लोक पहाटे उठून इंद्रियनिग्रह करून, एकाग्र चित्ताने माझे, तुझे तसेच हे सरोवर, पर्वत, गुहा, वन, वेत,वेळू आणि बांबू यांची बेटे, येथील दिव्य वृक्ष, माझे, ब्रह्मदेवाचे आणि शंकराचे निवासस्थान असलेली ही शिखरे, माझे प्रिय ठिकाण सिरसागर, प्रकाशमय श्र्वेतदीप, श्रीवत्स, कौस्तूभमणी, वनमाला, माझी कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, पक्षिराज गरुड, माझा सुक्ष्म अंश असणारा शेष, माझ्या आश्रयाने राहाणारी लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रल्हाद, मत्स्य, कच्छप, वराहादी अवतारात मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला, सूर्य, चंद्र, अग्नि, ॐकार, सत्य, मूलप्रकृती, गाय, ब्राह्मण, अविनाशी सनातनधर्म, सोम, कश्यप, आणि धर्माच्या पत्न्या दक्षकन्या, गंगा, सरस्वती, अलकनंदा, यमुना, ऐरावत हत्ती, ध्रुव, सप्त ब्रह्मर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील, त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल. कारण ही सगळी माझीच रुपे आहेत. हे गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील, त्यांना मृत्युसमयी मी निर्मळ बुद्धी देईल.
श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय चौथा भाग - १

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - त्यावेळी ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव, ऋषि आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व नाचू-गाऊ लागले. ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला. हा मगर यापूर्वी "हूहू" नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न, आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे, अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला. भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहात असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला.
भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंतांचेच रूप प्राप्त झाले. तो पितांबरधारी आणि चतुर्भुज झाला. पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचे नाव इंद्रद्युम्न होते. तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा इंद्रप्रदुम्न एकदा मलयपर्वतावरील आश्रमात राहात होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्य मुनी आपल्या शिष्टमंडळींसह तेथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. त्यांनी राजाला शाप दिला की, "हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे. म्हणून याला तीच अज्ञानी-हत्तीची योनी प्राप्त होवो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तिसरा भाग - ३

श्री गणेशाय नमः ज्यांच्या अत्यंत लहानशा अंशाने अनेक नामरूपांनी युक्त अशा ब्रह्मदेवादी देव, वेद आणि चराचर लोकांची उत्पत्ती झाली, जसे धगधगणाऱ्या आगीपासून ज्वाळा आणि सूर्यापासून त्याचे अनेक किरण वारंवार उत्पन्न होतात आणि त्यातच लय पावतात, तसेच ज्या स्वयंप्रकाश परमात्म्यापासून बुद्धी,मन, इंद्रिये, शरीर, रूप इत्यादी गुणांचा प्रवाह वारंवार प्रगट होतो आणि त्यातच लय पावतो तो परमात्मा, देव नाही, असूर नाही, मनुष्य किंवा पशु-पक्षी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, नपुंसक नाही की कोणी प्राणी नाही, तो गुण नाही, कर्म नाही, कार्य नाही की कारण नाही. सर्वांचा निषेध झाल्यावर जे काही शिल्लक राहाते, तेच त्यांचे स्वरूप आहे. तसेच ते सर्व काही आहेत. तेच परमात्मा माझा उद्धार करण्यासाठी प्रगट होवोत. मी जिवंत राहू इच्छित नाही. कारण हा हत्तीचा जन्म आतून, बाहेरून, सगळीकडून अज्ञानाने झाकला गेलेला आहे. हा देह जगून काय फायदा ? आत्मप्रकाश झाकणाऱ्या त्या अज्ञानरूप आवरणातून मी सुटका करून घेऊ इच्छितो. हे आवरण कालक्रमानुसार आपले आपण नाहीसे होत नाही. ते केवळ आपल्या कृपेनेच नाहीसे होणारे आहे.जे विश्वरहित असूनही विश्वाचे निर्माते आणि विश्वस्वरूप आहेत, त्याचबरोबर जे विश्वाच्या अंतरात्म्याच्या रूपात, विश्वरूप सामुग्रीने क्रीडासुद्धा करतात, त्या परब्रम्ह परमात्म्यांना म्हणूनच मी शरण आलो आहे. त्या अजन्मा परमपदस्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. योगी लोक योग्याच्या द्वारे कर्म, कर्मवासना आणि कर्मफलाला भस्म करून आपल्या योगशुद्ध हृदयामध्ये ज्या योगेश्वर भगवंतांचा साक्षात्कार करून घेतात, त्या प्रभूंना मी नमस्कार करतो. प्रभो ! सत्त्व, रज आणि तम या आपल्या तीन शक्तींचे रागादी वेग असह्य आहेत. सर्व इंद्रिये आणि मनाच्या विषयांच्या रूपांमध्ये सुद्धा आपणच प्रतीत होत असता. म्हणून इंद्रिये ज्यांच्या ताब्यात नाहीत, त्यांना तर आपल्या प्राप्तीचा मार्गसुद्धा सापडत नाही. आपली शक्ती अनंत आहे. आपण शरणागतवत्सल आहात, आपल्याला मी वारंवार नमस्कार करतो, आपल्या मायेच्या अहंबुद्धीने आत्म्याचे स्वरूप झाकले गेले आहे. म्हणूनच हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, अशा भगवंतांना मी शरण आलो आहे.
श्रीशुक म्हणतात - गजेंद्राने नामरूपरहीत भगवंताची स्तुती केली होती. म्हणून वेगवेगळी नावे आणि रुपे यांचे अभिमानी ब्रह्मदेवादी देव याचे रक्षण करण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी सर्वात्मा असल्याकारणाने सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी स्वत: प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंतांनी, गजेंद्र संकटात असल्यामुळे स्तुती करीत आहे, असे पाहून चक्रधारी भगवान, वेदमय गरुडावर आरूढ होऊन अत्यंत वेगाने जेथे गजेंद्र होता, तेथे आले. तेव्हा त्यांची स्तुती करीत देवसुद्धा त्यांच्याबरोबर तिथे आले. शक्तिमान मगराने सरोवरात गजेंद्रला पकडून ठेवले होते, त्यामुळे तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन, हातात चक्र घेतलेल्या भगवान श्रीहरींना आकाशात पाहून त्याने आपल्या सोंडेने कमळ त्यांना समर्पण करून कसेबसे तो म्हणाला, "हे नारायणा, जगद्वुरो, भगवान, आपणास नमस्कार असो. "गजेंद्रला अत्यंत पीडा होत आहे असे जेव्हा भगवंतांनी पाहिले, तेव्हा त्यांनी गरुडावरून एकदम खाली उडी घेतली आणि करुणा येऊन गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढले. नंतर सर्व देवांच्या देखतच भगवान श्रीहरींनी चक्राने मगराचे तोंड फाडले आणि गजेंद्रला सोडविले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तिसरा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - आपल्या बुद्धीने असा निश्चय करून गजेंद्राने आपल्या मनाला हृदयात एकाग्र केले आणि नंतर पूर्वजन्मी शिकलेले श्रेष्ठ स्तोत्र म्हणून तो भगवंतांची स्तुती करू लागला.
गजेंद्र म्हणाला - जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञरूपात विराजमान आहेत, तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे हे विश्व चेतनस्वरूप आहे, त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेने प्रतीत होते, ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे, हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे, ते कधी प्रतीत होते तर कधी नाही; परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते, जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्र्वांना पाहातात, जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत, प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यावेळी लोक, लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात, त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहातो. परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात, ते प्रभू माझे रक्षण करोत. जे नटाप्रमाणे अनेक वेश धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग सामान्य प्राणी कसा जाणील ? ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे, हे प्रभु माझे रक्षण करोत. ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात, तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे, असे जाणून सर्वांचे कल्याण करतात, त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत. तेच माझी गती होत. ज्यांना जन्म-कर्म नाम-रूप नाही, की ज्यांच्यात गुण-दोष नाहीत. असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात. त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्यसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहेत. माझ्या त्यांना नमस्कार. स्वयंप्रकाश, सर्वांचे साक्षी (अशा) परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन, वाणी आणि चित्त यांना कळत नाही. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दुसरा भाग - २

श्री गणेशाय नमः तेथे एकदा त्या पर्वताच्या जंगलामध्ये अनेक हत्तीणींसह राहणारा एक गजेंद्र काट्याकुट्यांनी भरलेल्या वेळू, बांबू, वेत, मोठमोठी झुडपे, झाडे यांना तुडवीत फिरत होता. त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठमोठे सिंह, हत्ती, वाघ, गेंडे, चित्ते, मोठमोठे नाग, काळी-गोरी वानरे, वन-गाई वगैरे भिऊन पळून जात. आणि त्याच्या मर्जीने लांडगे, डुकरे, रेडे, अस्वले, साळी, वानर, कुत्री, माकडे, हरीण, ससे इत्यादी लहानसहान प्राणी निर्भयतेने वावरत असत. हत्तीची वयात येणारी पिल्ले व्याकूळ झालेल्या त्याच्या पाठोपाठ येत होती. मोठमोठे हत्ती आणि हत्तिणी सुद्धा त्याच्याभोवती कडे करून चालल्या होत्या. त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूंनी कापत होता. त्याच्या गंडस्थळातून स्रवणार्‍या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याच्या भोवती घिरट्या घालीत होते. लांबूनच कमळाच्या परागांनी सुगंधित झालेला वारा हुंगून त्याचे डोळे मदधुंद झाले होते. त्याला आणि त्याच्या कळपाला अतिशय तहान लागली होती. म्हणून तो लगबगीने सरोवराजवळ गेला. त्या सरोवराचे पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होते. सोनेरी आणि शुभ्र कमळांच्या परागांनी ते सुगंधित झाले होते. हत्ती अगोदर तेथे घुसून आपल्या सोंडेने भरपूर पाणी प्याला. नंतर त्या पाण्यात डुंबून त्याने आपला थकवा घालविला गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे मायेने तो हत्ती आपल्या सोंडेने पाण्याचे फवारे उडवीत आपल्या बरोबरच्या हत्तिणी आणि पिल्लांना न्हाऊ घालू लागला. तसेच त्यांच्या तोंडात आपली सोंड घालून त्यांना पाणी पाजू लागला. भगवंतांच्या मायेने अजाण बनलेल्या उन्मत्त गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे. याची कल्पनाही नव्हती.
परीक्षिता, त्याचवेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने रागाने त्याचा पाय पकडला. अशा तऱ्हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरे हत्ती, हत्तिणी आणि त्यांच्या पिल्लांनी पाहिले की, त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून नेत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे. त्यांना अतिशय दुःख झाले. ते चित्कार करू लागले. पुष्कळांनी त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते असमर्थ ठरले. गजेंद्र आणि मगर आपआपली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढीत होता तर कधी मगर गजेंद्रला आत ओढीत होता. परीक्षिता, अशा प्रकारे झुंज चालू असता एक हजार वर्षे निघून गेली. तरीही दोघेजण जिवंत होते, हे पाहून देवसुद्धा आश्र्चर्यचकित झाले.
पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राराचे शरीर थकले. त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की, मनामध्ये उत्साह राहिला नाही. इकडे मगर जलचरच होता. असे असल्याने त्याची शक्ती क्षीण होण्याऐवजी वाढली. अशा प्रकारे शरीरबलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राणसंकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला, तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला. शेवटी त्याने ठरविले. "हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे. याने मी कासावीस झालो आहे. हे माझे बांधव हत्तीसुद्धा जर मला या संकटातून सोडवू शकत नाहीत, तर या बिचाऱ्या हत्तिणी कोठून सोडवू शकतील ? म्हणून आता मी परमेश्वरालाच शरण जातो. अत्यंत प्रचंड वेगाने धावणाऱ्या काळरूप सर्पाला भिऊन जो कोणी शरण येतो, त्याला जो वाचवतो, तसेच ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो, तो जो कोणी जगदीश्वर असेल, त्यालाच मी शरण आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दुसरा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध, सुंदर, श्रेष्ठ पर्वत होता. तो दहा हजार योजने उंच होता. त्याची लांबी- रुंदी सुद्धा चारी बाजूंनी तेवढीच होती. त्याच्या चांदी, लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश झगमगत असत. आणखीही त्याची कितीतरी अशी शिखरे होती की जी रत्ने आणि धातूंच्या रंगीबिरंगी छटांणी सर्व दिशा प्रकाशित करीत असत. त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली आणि झुडपे होती. झऱ्यांच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याने ती निनादित होत. सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाया धूत, त्या पर्वतावरील हिरवे पाचू (रत्ने) तेथील जमीन हिरवीगार करीत. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर,नाग,किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत. जेव्हा त्यांच्या संगतीच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे, तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसऱ्या सिंहाचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत.
त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडींनी सुशोभित झालेले असत. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत. त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती. त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे. त्यांमध्ये देवांगना स्नान करीत असत. त्यांमुळे त्यांतील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाई. तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात असे.
त्रिकूटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असे त्याचे नाव होते. देवांगणा त्यात क्रीडा करीत असत. तेथे सगळीकडे नेहमी फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते. त्या उद्यानात मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग,मोह, सागवान, ताड, तमाल,असणा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष, ऊस, केळी, जांभूळ,बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, ईडलिंबू, बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते. त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते. त्यात सोनेरी कमळे उमललेली होती. याशिवाय निरनिराळ्या जातीच्या कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल, कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते. त्यांवर धुंद भुंगे गुंजारव करीत होते. पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता. तेथे हंस, कारंडव चक्रवाक आणि सारस पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबड्या आणि चातक यांचे कूजन चालू होते. मासे आणि कासव यांच्या हालचालींमुळे कमळपुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कंदबवेल, इत्यादी वृक्षांनी ते वेढलेले होते.
कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटिशेवंती,सोनजुई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तुरमोगरा, कदंब इत्यादी पुष्पवृक्ष, तसेच पटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणाऱ्या इतर वृक्षांनी ते अत्यंत शोभायमान दिसत असे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पहिला भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - एकदा स्वायंभुव मनू एकाग्रचित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते. ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकेलेले असुर आणि राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावांच्या देवांसह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या सूरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले.
स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्निपुत्र होता. द्युमान, सुषेण, रोचिष्मान इत्यादी त्यांचे पुत्र होते. त्या मन्वन्तरात इंद्राचे नाव रोचन होते.तुषित इत्यादी देवगण होते. ऊर्जस्तंभ इत्यादी वेदवेत्ते सप्तर्षी होते. त्या मन्वन्तरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभु नावाने प्रसिद्ध झाले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले.
उत्तम हा तिसरा मनू होता. तो प्रियव्रताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, सृंजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. त्या मन्वन्तरात वशिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते. त्यावेळी धर्माची पत्नी सुनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला. त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगन होते. त्यावेळचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला.
चौथ्या मनूचे नाव तामस असे होते. तिसरा मनू उत्तमाचा तो भाऊ होता. पृथू, ख्याती, नर, केतू इत्यादी त्याचे दहा पुत्र होते. सत्यक, हरी, आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिख असे होते. त्या मन्वन्तरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षि होते. परीक्षिता, त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले या मन्वन्तरातही हरीमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. याच अवतारात त्यांनी गजेंद्राराचे मगरापासून रक्षण केले होते.
परीक्षिताने विचारले - हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडविले, ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांने वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते.
सुत म्हणतात - शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्रीशुकदेवांना अशाप्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले, तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत कथा सांगू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पहिला भाग - १

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - गुरुदेव, स्वायंभुव मनूचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी, आपली वंशपरंपरा चालविली होती. आता आपण आम्हांला दुसऱ्या मनूंविषयी सांगावे. हे ब्रह्मण, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वन्तरांमध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात, ते आपण सांगावे. आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो. हे ब्रह्मण, विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वन्तरांमध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मन्वन्तरांमध्ये ज्या काही करतील, ते सर्व आम्हांस ऐकवावे.
श्रीशुक म्हणाले - या कल्पात स्वायंभुव वगैरे सहा मन्वन्तरे होऊन गेली आहेत. त्यांपैकी पहिल्या मन्वन्तराचे मी वर्णन केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. स्वायंभुव मनूची कन्या आकूतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रुपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी, भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता. परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी या आधीच (तिसऱ्या स्कंधामध्ये) केले आहे. आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले, त्याचे वर्णन करतो.
भगवान स्वायंभुव मनू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्यत्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चाऱ्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून शंभर वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंतांची अशी स्तुती करीत.
मनू म्हणत - ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही, जे, हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला जे जाणतात, तेच हे परमात्मा. हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे. म्हणुन मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचाच जीवननिर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये. भगवंत सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहात नाही. ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे, त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण जा. ज्यांचा आदी,अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही कि परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी हात नाही, तेच विश्वाचे आदी,अंत, मध्य, आपले, परके, बाहेर, आत (असे) सर्व काही आहेत, ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे, तेच सत्य परब्रम्ह आहेत. तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्वशक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराणपुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने तेच जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूपमात्र राहातात. ऋषी नैष्कर्म्यस्थितीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात. कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो. सर्वशक्तीमान भगवंतसुद्धा कर्मे करतात. परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणारेसुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात. भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंदरूपानेच कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहुन ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्याचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२१ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ५

श्री गणेशाय नमः जे विवेकी पुरुष सोनुभूतीने आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वेत आणि द्रव्याद्वेत अशा त्रिविध अद्वेताचा साक्षात्कार करून घेतात, ते जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि द्रष्टा, दर्शन दृश्य हे भेदरूप स्वप्न असल्याचे जाणून त्याचा त्याग करतात. वस्त्र जसे सूतरूपच असते, तसेच कार्यसुद्धा कारणरूप आहे, त्यांत भेद नाही, असे जाणणे म्हणजे 'भावाद्वैत'.(परमात्मा व विश्व एकरूप मानणे म्हणजे भावाद्वैत.) युधिष्ठीरा! मन, वाणी आणि शरीराने होणारी सर्व कर्मे स्वत: परमात्म्यामध्येच होत आहेत, हा भाव ठेवून सर्व कर्मे त्याला समर्पण करणे हे 'क्रियाद्वैत' होय. स्वतः स्त्री-पुत्रादी नातलग व इतर सर्व प्राणी यांचे स्वार्थ व भोग एकच आहेत आणि त्यांचा भोक्ता जीव हाच परमात्मा आहे, याच प्रकारचा विचार म्हणजे 'दद्रव्याद्वैत' होय.
            युधिष्ठीरा, ज्या पुरुषाला जे द्रव्य, ज्यावेळी, ज्या उपायाने घेणे निषिद्ध नसेल, ते द्रव्य घेऊन त्याने आपली कर्मे करावीत. आपत्तीकाल वगळता यापेक्षा वेगळे काही करू नये. महाराज, वेदांनी सांगितलेल्या या, तसेच इतर सर्व स्वकर्मांच्या अनुष्ठानाने भगवद्भक्त मनुष्य घरात राहूनसुद्धा श्रीकृष्णांना प्राप्त करतो. युधिष्ठीरा, हेच पहा ना! तुम्ही आपले स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मोठमोठ्या विपत्ती पार करून गेलात आणि त्यांच्याच चरणकमलांच्या सेवेने सर्व भूमंडळ जिंकून घेऊन राजसूयादी यज्ञ केले.
            पूर्वीच्या महाकल्पामध्ये पूर्वजन्मी, मी एक गंधर्व होतो. माझे नाव उपबर्हण होते आणि गंधर्वांमध्ये मला मोठा मान होता. सौंदर्य, कोमलता, माधुर्य आणि सुगंध यांमुळे मी अत्यंत सुंदर दिसत होतो. स्त्रिया माझ्यावर अत्यंत प्रेम करीत. मी उन्मत्त आणि अत्यंत विलासी होतो. एकदा देवांच्या ज्ञानसत्रात प्रजापती आले होते. भगवंतांच्या लीलाचे गायन करण्यासाठी गंधर्व आणि अप्सरांना बोलाविले होते. ते कळल्यावर मी स्त्रियांसह(वेड्यासारखा) गात तेथे गेलो. हे आपला अनादर करीत आहे असे प्रजापतींना वाटून यांनी आपल्या सामर्थ्याने मला शाप दिला की, "तू आमची अवहेलना केली आहेस; म्हणून तुझी सर्व संपत्ती नष्ट होऊन तू लवकरच शूद्र होशील. त्यांच्या शापाने मी दासी-पुत्र झालो; परंतु त्या शुध्द जीवनातही महात्म्यांचा सहवास आणि सेवासुश्रुषा झाल्यामुळे मी पुढच्या जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झालो. गृहस्थांचा पापनाशक धर्म मी तुला सांगितला. या धर्माच्या आचरणाने ग्रहस्थसुद्धा संन्याशांना मिळणारे परमपद अनायासे प्राप्त करून घेतो.
            या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रम्ह मनुष्यरूपात गुप्तरुपाने निवास करते. म्हणूनच साऱ्या जगाला पवित्र करणारे ऋषीमुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहीत, परम शांत, परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरु आणि स्वतः आत्मा श्रीकृष्ण आहेत. शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत!
श्रीशुक म्हणतात- देवर्षींचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिराला अत्यंत आनंद झाला आणि प्रेमभराने त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली.भगवान श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिराचा निरोप घेऊन आणि त्यांच्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद निघून गेले. भगवान श्रीकृष्णच परब्रह्म आहेत, हे ऐकून युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.अशाप्रकारे मी तुला दक्षकन्यांचा वेगवेगळ्या वंशांचे वर्णन ऐकविले. त्यांच्याच वंशामध्ये देव, असूर, मनुष्य इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२० डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ४

श्री गणेशाय नमः वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर व निवृत्तीपर. प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते. श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चतुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्यदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना 'इष्ट' म्हटले जाते आणि देवालय, बगीचे, विहिरी बांधणे, पानपोई घालने यांसारखी लोकोपयोगी कामे ही 'पूर्तकर्मे' होत.ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. आणि ती अशांतीला कारण ठरतात. हे राजा, मेल्यानंतर प्रवृत्तिमार्गी पुरुष चरू, पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सुक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धुमाभिमानी दैवतांच्या जवळ जातो. नंतर तेथून अनुक्रमे रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोकात जाऊन पोहोचतो. तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सुक्षम देह अनुक्रमे वनस्पती,अन्न आणि वीर्य यांच्या रूपांत परिणत होऊन पितृयानमार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो. अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकांत जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला निवृत्तीमार्गी द्विज सर्व द्रव्ययज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्यांमध्ये हवन करतो. इंद्रियांना दर्शनादीसंकल्परूप मनामध्ये, मनाला परा वाणीमध्ये आणि परावाणीला वर्णसमुदायांमध्ये, वर्ण समुदायाला 'अ उ म' या तीन स्वरांच्या रूपात राहाणाऱ्या ॐकारामध्ये, ॐकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला सूत्रात्मारूप प्राण्यामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी, सूर्य, दिवस, मध्याहृ, शुक्लपक्ष, पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्याजवळ जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले 'विश्व' शरीर सुक्ष्मामध्ये विलीन करून सुक्षम उपाधियुक्त 'तैजस' होतो. नंतर सूक्ष्म उपाधीचा कारणशरीरामध्ये लय करून कारणोपाधिक 'प्राज्ञ' होतो. नंतर त्या शरीराचा लय करून 'तुरीय' रूपात राहातो. अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहातो. हेच मोक्षपद होय. याला देवयान मार्ग म्हणतात. या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे जात ब्राह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो. तो पुन्हा जन्माला येत नाही.
            पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदाने सांगितलेले मार्ग आहेत. जो यांना शास्त्ररूप दृष्टीने जाणतो, तो शरीरात राहूनही मोहित होत नाही. जो उत्पन्न होणाऱ्या शरीरांच्या आधी व शेवटी असतो, जो विषयरूपाने बाहेर आणि भोक्तारुपाने आत असतो, तसेच कारण व कार्य, जाणणे आणि जाणण्याचा विषय, वाणी आणि वाणीचा विषय, अंधार आणि प्रकाश इत्यादी वस्तू़च्या रूपामध्ये सर्व काही हा तत्त्ववेत्ताच असतो. (म्हणूनच मोह त्याला स्पर्श करू शकत नाही.) आरसा इत्यादींमध्ये दिसणारे प्रतिबिंब विचार आणि युक्ती यांनी बाधित होऊनही सत्य वाटते. त्याचप्रमाणे इंद्रियांना दिसणार्‍या वस्तू सत्य नाहीत, हे विचार, युक्ती आणि आत्मानुभव यांनी सिद्ध होऊनसुद्धा खाऱ्या वाटतात. या शरीराची निर्मिती पृथ्वी वगैरे पंचमहाभूतांपासून झालेली नाही. तसेच ते त्या पंचमहाभूतांचा समूह नाही, की परिणामही नाही; ते आपल्याला अवयवांपासून वेगळे नाही की त्यांनी युक्त नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तशीच पंचमहाभूतेसुद्धा अवयवी असल्यामुळे त्यांच्या अवयवांपासून - सुक्ष्मभुतांपासून वेगळी नाहीत; पुष्कळ विचार केल्यानंतरही अवयवांव्यतिरिक्त अवयवाचे अस्तित्व सापडत नाही. म्हणून ते असत आहे असेच सिद्ध होते. तेव्हा हे अवयवसुद्धा असत्य आहेत, हे आपोआप सिद्ध होते. अज्ञानामुळे जोपर्यंत एकाच परमतत्त्वामध्ये अनेक वस्तूंचे भेद जाणवतात, तोपर्यंत सारखेपणामुळे हा भ्रम राहतो की, ज्या वस्तू अगोदर होत्या, त्याच आताही आहेत. स्वप्नात ज्याप्रमाणे जागृती, झोप इत्यादी अवस्थांचे वेगवेगळे अनुभव स्वप्न असेपर्यंत सत्य असतात, तसेच अज्ञान असेपर्यंत विधी-निषेधाचे शास्त्र असते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो, त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा. एकांतात एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेले मर्यादित भोजन करावे. राजा ! पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन अंथरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ॐकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून, पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम करावा. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित जेथे जेथे जाईल, तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळू हळू हृयात स्थिर करावे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो, तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो, त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचे चित्त शांत होते. अशा प्रकारे जेव्हा कामदी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात, तेव्हा चित्ताला ब्रह्यानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधी विकारयुक्त होत नाही.
            जो संन्यासी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो, तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो. जे आपल्या शरीराला अनात्मा, नाशिवंत आणि विष्ठा,कृमी तसेच राख समजले होते, तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात. कर्माचा त्याग केलेले गृहस्थाश्रमी, व्रत्तांचा त्याग केलेले ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रियलोलुप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मुर्खाची कीवच केली पाहिजे. आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परब्रह्मस्वरूप जाणले आहे, तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करीत ?
            उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे - शरीर रथ आहे, इंद्रिये घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. दहा प्राण धुरा आहेत, धर्म व अधर्म चाके आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ॐकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहे.( ह्या ॐकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे.) राग, द्वेष, लोभ,शोक, मोह,भय, मद, मान,अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहाणे, कपाट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद,भूक आणि निद्रा हे आणि असेच अनेक जीवांचे शत्रू आहेत. त्यांमध्ये रजोगुण आणि तमोगुणप्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत. काही वेळा सत्त्वगुणप्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात. हा मनुष्यशरीररूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहेत, तोपर्यंत श्रीगुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारदार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्यसिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा. अन्यथा, बेसावध जीवाला हे इंद्रियरुप दुष्ठ घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरुप लुटारूंच्या हातात देतील.ते चोर, सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला, मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या घोर अंधकारमय संसाराच्या विहिरीत ढकलून देतील.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१८ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - २

श्री गणेशाय नमः निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषाने शरीरनिर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्न करू नये. कारण, कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता आजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीपरायण पुरूषाची निवृत्ती त्याची उपजीविका चालविते, आत्मसुखात रममाण होणार्‍या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते,जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो, त्याला कसे बरे मिळू शकेल ? जसे पायात जोडे घालून चालणाऱ्याला काट्याकुठ्याची भीती वाटत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे, त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते. राजा ! माणूस फक्त पाण्यावरसुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का ? परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दीनवाणा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो. असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रियलोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्या-पिण्याची इच्छा संपते. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो; परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. अनेक विषयांचे जाणकार, शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अंध:पतित होतात.
            संकल्पांचा त्याग करून कामाला, कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे. आध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्याद्वारा योगसाधनेतील विघ्नांवर आणि शरीर, प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे. आधिभौतिक दु:खाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने आणि अध्यात्मिक दुःखाला योगबलाने तसेच झोपेला सात्त्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण-तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्त्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. श्रीगुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो. हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत. जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो, त्याचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय. मोठ-मोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधिश्र्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात.
            शास्त्रामध्ये जितके नेयम सांगितले आहेत, त्यांचे तात्पर्य हेच आहे की, कामादी सहा शत्रूंवर, सहा इंद्रियांवर विजय मिळवावा. एवढे करूनही जर त्या नेयमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही, तर सारा खटाटोप व्यर्थ आहे. जसे शेती, व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत्प्राप्ती, ते देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञयागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत. उलट अनर्थकारक फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१७ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय पंधरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - युधिष्ठिरा, काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची तपर्च्श्रेमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरुपणामध्ये, काहींची आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योगसाधनेत असते. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ ब्राह्मणालाच हव्य-कव्याचे दान करावे. तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे. श्राद्धाच्या वेळी देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे. धनवान असणाऱ्यानेसुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये. कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश-कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फळ देते. अन्नसमर्पण करतेवेळी देव, ऋषि, पितर, अन्य प्राणी, स्वजन आणि स्वत:ला सुद्धा परमात्मस्वरूपात पाहावे.
            धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाचेवेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतः ही खाऊ नये. कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहींसिने नाही. ज्या लोकांना सद्धर्मपानाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, कोणत्याही प्राण्याला कायावाचामनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे काही ज्ञानी लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांची हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात. जेव्हा एखादा पशूपुरोडाशादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो, तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा निर्दय मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील, या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात. म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या, मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्य-नैमित्तिक कर्मे करावीत आणि त्यात संतुष्ट असावे.
            विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत.अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा. धर्मबुद्धीने करूनसुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो, तो 'विधर्म' होय. आपल्याखेरीज अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म 'परधर्म' होय. पाखंड किंवा दंभ म्हणजे 'उपधर्म' किंवा 'उपमा' होय. शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा 'छल' होय. आपल्या आश्रमाहुन वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, तो 'आभास' होय. आपल्याला स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रमधर्म असतो, तो कोणाला शांती देणार नाही बरे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - ३

श्री गणेशाय नमः जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते, त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो. जेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात, तो सर्वांत पवित्र देश होय. ज्यांच्यामध्ये हे सर्व चराचर जग राहिले आहे, त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील, जेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील, जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे पुराणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्धपुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुलहाश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र (कन्याकुमारी), सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपासरोवर, बिंदुसरोवर, बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय इत्यादी कुलपर्वत, तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते, ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणाऱ्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात, त्यांचे माणसांना हजारपटीने फळ मिळते.
            युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणाऱ्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे, त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरवली आहे. राजा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले. असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो.त्यांनी मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव इत्यादीची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवरुपाने राहातात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. युधिष्ठीरा, भगवंत या मनुष्यदी शरीरांमध्ये त्यांच्या वेगळेपणामुळे कमी-अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत. म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्येसुद्धा ज्यांच्यामध्ये तप, योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो, ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत.
            युधिष्ठिरा, त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की, मनुष्य परस्परांचा तिरस्कार, द्वेष, अपमान करतात, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रध्देने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात. परंतू जे माणसांचा द्वेष करतात. त्यांना प्रतिमेची उपासना करूनसुद्धा फळ मिळू शकत नाही. युधिष्ठिरा, मनुष्यांमध्येसुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे. कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो. महाराज, हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधूळीने तिन्ही लोक पवित्र करतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१५ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - २

श्री गणेशाय नमः प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते. आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामुग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे. एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय. जर आपला अधिकार इत्यादी, आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या, तर मोठ मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी. राजा, सर्व यज्ञांचे भोक्ते भगवंतच आहेत. परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते, तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही. म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी. ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे.
            धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, अक्षय तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र,जसे चित्रा, विशाखा, जेष्ठा इतक्यादिंनी युक्‍त असेल ती पौर्णिमा; मग त्यादिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्मनक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत. तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्माच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१४ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय चौदावा भाग - १

श्री गणेशाय नमः युधिष्ठिराने विचारले - हे देवर्षी, माझ्यासारखा ग्रहाशक्त माणूस सहजपने कोणत्या साधनेने हे पद प्राप्त करू शकेल ?
            नारद म्हणाले ? राजा ! मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थधर्मानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पण करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी. सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे. जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहात नाही, तसेच सत्संगाने जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल, तसतशी आपोआप सुटणाऱ्या शरीर, स्त्री, पुत्र इत्यादींची आसक्ती आपणहून सोडावी. बुद्धिमान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी. अधिक नको. आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा. माता-पिता, बंधू-बांधव, पुत्र-मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील किंवा जे काही इच्छितील, त्याला आतून ममता न ठेवता होकार द्यावा.
            बुद्धिमान पुरूषाने पाऊस वगैरेमुळे उत्पन्न होणारे अन्न वगैरे, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी, तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनीच दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा. जेवढ्यावर भूक भागेल, तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे, असे मानतो, तो चोर होय. तो शिक्षेला पात्र ठरतो. हरिण,उंट, गाढव,वानर, उंदीर, सरपटणारे प्राणी, पक्षी, माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणे समजावे. तसे पाहता त्यांच्यात आणि पुत्रात काय फरक आहे ? गृहस्थाश्रमी मनुष्यानेसुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत. परंतु देश, काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. आपल्याकडील सर्व सामुग्री कुत्री, पतित, चांडाळ इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून नंतरच स्वतः उपयोगात आणावी. एवढेच काय,जिला मनुष्य आपली समजतो, त्या आपल्या पत्नीलासुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे. जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात, प्रसंगी आपले आई-बाप आणि गुरूलासुद्धा मारतात, त्या पत्नीवरचे प्रेम ज्याने काढून घेतले, त्याने नित्यविजयी भगवंतांवरसुद्धा विजय मिळविला असे समजावे. शेवटी किडे, विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि यासाठी जिच्याविषयी आसक्ती असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कोठे ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१३ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी गुणांनी युक्त तर कधी आजिबात गुण असलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो.
            सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तिमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्त्विक अहंकारात आणि सात्त्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे. असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले.
            नारद म्हणतात - मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१२ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - २

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रन्श्र केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले.

            महामुनी म्हणाले - दैत्यराज,सर्वश्रेष्ठ पुरूष तुझा सन्मान करतात.मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच, तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझ्या सन्मान अवश्य केला पाहिजे.

            इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे.ही स्वर्ग, मोक्ष,तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे.

            सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शरीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभीआणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग,भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात,त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

११ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध सातवा - अध्याय तेरावा भाग - १

श्री गणेशाय नमः नारद म्हणतात - वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषांमध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा. जर वस्र नेसावयाचे असेल, तर गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी. आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणाऱ्या वस्तूंखेरीज, त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये. संन्याशाने सर्व प्राण्यांचे हित चिंतावे, शांत राहावे, भगवत्परायण राहावे आणि कोणाचाही आश्रय न घेता स्वत:तच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा. हे संपूर्ण विश्व, कार्य आणि कारणापासून वेगळ्या असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारणस्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे. आत्म्याकडेच लक्ष असणाऱ्या संन्याशाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हींच्या संधिकालात आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि बंधन व मोक्ष ही दोन्ही केवळ माया आहेत, सत्य स्वरूपात काही नाही, असे समजावे. शरीराच्या अवश्य होणाऱ्या मृत्यूचे किंवा अनिश्र्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये. सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणाऱ्या काळाची फक्त वाट पाहात राहावे. अनात्म वस्तूंचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रांची आवड नसावी. आपल्या जीवननिर्वाहासाठी काही काम करू नये. केवळ वाद-विवाद करण्यासाठी काही तर्क करू नये किंवा कोणाचीही बाजू घेऊ नये. शिष्यसमुदाय जोडू नये, पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये, व्याख्यान देऊ नये आणि कोणतीही कामे सुरू करू नयेत. शांत, समदर्शी, महात्म्या संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचे बंधन नाही. आपल्या आश्रमाची चिन्हे त्याने धारण करावीत किंवा करू नयेत. त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह असो; परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे. त्याने अत्यंत विचारशील असावे, परंतु लोकांत वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावे. स्वतः प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की, हा मुका आहे.

            याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे. भगवंतांचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता. त्याने पाहिले की, सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत. त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले होते. त्यांचे कर्म, रूप, वाणी आणि वर्ण-आश्रम- चिन्हे यांवरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत, हे लोकांना समजू शकत नव्हते. भगवंतांचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवून नमस्कार केला आणि विधिपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला. ब्रह्मण, उद्योगी आणि भोगी पुरुषांच्याप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे. जगाचा हा नियम आहे की, उद्योग करणाऱ्यालाच धन मिळते, धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचेच शरीर धष्टपुष्ट असते. याखेरीज पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. आपण तर काही उद्योग करीत नाही, असेच पडून राहाता. म्हणून आपल्याजवळ धन नाही. मग आपल्याला भोग कोठून मिळणार ? भोगाखेरीजच आपले हे शरीर धष्टदुष्ट कसे ? हे विप्रवर, हे आम्ही ऐकण्यासारखे असेल, तर सांगावे. आपण विद्वान, समर्थ आणि चतुर आहात. आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे. असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहूनसुद्धा समभावाने पडून आहात, याचे कारण काय ?

             नारद म्हणतात - जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रन्श्र केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले.

            महामुनी म्हणाले - दैत्यराज,सर्वश्रेष्ठ पुरूष तुझा सन्मान करतात.मनुष्यांना कर्माची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच, तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. तरी सुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझ्या सन्मान अवश्य केला पाहिजे.

            इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्‍यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. कर्मामुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे.ही स्वर्ग, मोक्ष,तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे.

            सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहतो आणि दुःख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. नेहमी शरीरिक वगैरे दुःखांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? लोभीआणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दुःख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वतःलासुद्धा भीत असतात. म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग,भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात,त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा.

             अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त पाहिजे, हे मी शिकलो. मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी गुणांनी युक्त तर कधी आजिबात गुण असलेले. कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्र मिळेल ते मी अंगावर घालतो. मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो.
            सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तिमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्त्विक अहंकारात आणि सात्त्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे. असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले.
            नारद म्हणतात - मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...