धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, अक्षय तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र,जसे चित्रा, विशाखा, जेष्ठा इतक्यादिंनी युक्त असेल ती पौर्णिमा; मग त्यादिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्मनक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत. तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वतःचे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्माच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा