श्री गणेशाय नमः राजा, त्यावेळी रंगी-बेरंगी ध्वज, शुभ्र छत्रे, रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चवऱ्या आणि वार्याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चकाकणारी कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यांमुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे, अशा शोभत होत्या. परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळीराजा मय दानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तेथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला. युद्धाची सर्व सामुग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आच्श्रर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमानसुद्धा करता येत नव्हते, तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे ? त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतीस बसला होता. त्याच्यावर ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र यांमुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमूची, शंभर,बाण, विप्रचित्ती, अयोमुख,द्विमूर्धा, कालनाभ, प्रहेती, हेती,इल्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रदंष्ट्, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुभी, तारक, चंक्राक्ष, शुभ, निशुभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिषटनेमी, त्रिपुराधिपती मय,पौलोम,कालेय आणि निवातकवच वगैरे सेनाविभागप्रमुख होते. हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते. परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले.
या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवू लागले. तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरुढ झाला. तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरुढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने,ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगन तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरून इत्यादी लोकपाल येऊन उभे टाकले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा