श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! गंगेला आणण्याच्या इच्छेने अंशुमानाने पुष्कळ वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. परंतु त्यात त्याला यश आले नाही. कालांतराने त्याला मृत्यू आला. अंशुमानाचा पुत्र दिलीप यानेसुद्धा तशीच तपश्चर्या केली. परंतु तोही असफल झाला. पुढे त्यालाही मृत्यू आला. दिलीपाचा पुत्र भगीरथ. त्याने दीर्घ कालपर्यंत तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगेने त्याला दर्शन दिले आणि म्हटले - "मी तुला वर देण्यासाठी आले आहे. " तेव्हा राजा भगीरथाने अतिशय नम्रतेने आपले मनोगत प्रगट केले की, " आपण मृत्युलोकात चलावे."
गंगा म्हणाली, "ज्यावेळी मी स्वर्गातून पृथ्वीवर पडेन, त्यावेळी माझा वेग धारण करणारा कोणीतरी असला पाहिजे. भगीरथा ! असे न झाल्यास मी पृथ्वी फोडून रसातळात पोचेन. याखेरीज, लोक आपली पापे माझ्यामध्ये धुतील, यासाठीसुद्धा मी पृथ्वीवर येणार नाही. कारण मग मी ती पापे कुठे धुणार ? भगिरथा ! याविषयीही तू विचार कर."
भगीरथ म्हणाला - "सत्पुरुष, संन्यासी, शांत, ब्रह्मनिष्ठ आणि लोकांना पवित्र करणारे सज्जन आपल्या अंगस्पर्शाने तुझी पापे नष्ट करतील. कारण त्यांच्यामध्ये पाप नाहीसे करणारे भगवान निवास करतात. सर्व प्राण्यांचा आत्मा असणारे रुद्रदेव तुझा वेग धारण करतील. कारण ज्याप्रमाणे वस्त्र सुताने ओतप्रोत भरलेले असते, त्याचप्रमाणे हे सर्व विश्व भगवान रूद्रांमध्येच ओतप्रोत आहे." परीक्षिता ! गंगेला असे सांगून भगीरथाने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. थोड्याच दिवसात महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. संपूर्ण विश्वाचे कल्याण करणाऱ्या शंकरांनी 'तथास्तु' असे म्हणून राज्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. नंतर भगवंतांच्या चरणांच्या स्पर्शाने जिचे पाणी पवित्र आहे, अशा गंगेला दक्ष राहून मस्तकावर धारण केले. यानंतर राजर्षी भगीरथ, जेथे त्यांच्या पितरांची शरीर राखेचे ढीग होऊन पडली होती, तेथे जगाला पवित्र करणाऱ्या गंगेला घेऊन गेला. वायूप्रमाणे वेगाने चालणाऱ्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता आणि त्याच्या मागे मागे, मार्गात असणाऱ्या देशांना पवित्र करीत, गंगा वेगाने जात होती. शेवटी तिने सगरांच्या जळालेल्या पुत्रांना आपल्या पाण्यात बुडविले. जरी सगराचे पुत्र ऋषींच्या शापाने भस्म झाले होते, तरीसुद्धा केवळ शरीराच्या राखेशी गंगाजलाचा स्पर्श होताच स्वर्गात गेले. जर गंगाजलाचा शरीराच्या राखीशी स्पर्श झाल्यानेही सगरांच्या पुत्रांना स्वर्गाची प्राप्ती झाली, तर मग जे लोक श्रद्धेने नियमपूर्वक गंगामातेचे सेवन करतात, त्यांच्यासंबंधी काय सांगावे ? मी गंगेच्या महिम्यासंबंधी जे काही येथे सांगितले, त्यामध्ये आश्र्चर्य करण्यासारखे काही नाही. कारण ती भगवंतांच्या चरणकमलांपासून निघाली आहे. ज्या चरणांचे श्रद्धेने चिंतन करून मुनी पवित्र होऊन तिन्ही गुणांचे कठीण बंधन तोडून ताबडतोब भगवत्स्वरूप होतात; तर मग गंगा संसारबंधन तोडून टाकील, यात काय आश्र्चर्य आहे ?
भगीरथाचा पुत्र होता श्रुत. श्रुताचा नाभ. पूर्वी कथन केलेल्या नाभापेक्षा हा वेगळा आहे. नाभाचा पुत्र सिंधुद्वीप होता आणि सिंधूद्वीपाचा अयुतायू. अयुतायूच्या पुत्राचे नाव होते ऋतुपर्ण. तो नलाचा मित्र होता. त्याने नलाला फासा फेकण्याच्या विद्येचे रहस्य सांगितले होते आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून विश्वविद्या शिकून घेतली होती. ऋतुपर्णाचा पुत्र सर्वकाम. परीक्षिता ! सर्वकामाच्या पुत्राचे नाव होते सुदास. सुदासाचा पुत्र होता सौदास आणि त्याच्या पत्नीचे नाव मदयंती होते. सौदासालाच काहीजण मित्रसह म्हणतात आणि काही काही ठिकाणी त्याला कल्माषपाद असेही म्हटले गेले आहे. वसिष्ठांच्या शापाने तो राक्षस झाला होता आणि पुन्हा आपल्या कर्मामुळे तो निपुत्रिक झाला.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
खूपच सुंदर विश्लेषण.
उत्तर द्याहटवा🙏🏻
हटवा