१८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय आठवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - रोहिताचा पुत्र हरित होता. हरिताचा पुत्र चंप झाला. त्यानेच चंपापुरी वसविली होती. चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय झाला. विजयाचा भरूक, भरूकाचा वृक आणि वृकाचा पुत्र बाहुक झाला. शत्रूंनी बाहुकाकडून राज्य हिरावून घेतले, तेव्हा तो आपल्या पत्नीसह वनात निघून गेला.वनात गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा बाहुकाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याची पत्नीसुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली. परंतु ती गर्भवती आहे, हे महर्षी और्व यांना माहीत असल्याने त्यांनी तिला थांबविले. जेव्हा तिच्या सवतींना हे माहित झाले, तेव्हा त्यांनी तिला जेवणातून विष दिले. पण त्या विषाला घेऊनच एका बालकाचा जन्म झाला. विषासह (गर) जन्म झाल्याकारणाने 'सगर' नाव पडले. हा अतिशय किर्तीमान होता.

सगर चक्रवर्ती होता. त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता. सगराने आपले गुरुदेव और्व यांची आज्ञा मानून तालजंघ, यवन, शक, हैहय आणि बर्बर जातीच्या लोकांचा वध केला नाही, परंतु त्यांना विद्रूप केले. त्यांपैकी काहींच्या डोक्यांचे मुंडन केले, काहींना दाढी-मिशा ठेवण्यास सांगितले, काहींना केस मोकळे सोडावयास सांगितले, तर काहींचे अर्धे मुंडन केले. सगराने काही लोकांना फक्त वस्त्र अंगावर पांघरण्याची आज्ञा केली, नेसण्याची नाही; आणि काहींना फक्त लंगोटी नेसण्यासच सांगितले, वस्र पांघरण्यास नव्हे. यानंतर राजा सगराने और्व ऋषींच्या उपदेशानुसार अश्वमेध यज्ञाच्या द्वारा संपूर्ण वेद व देवतामय, आत्मस्वरूप सर्वशक्तिमान भगवंतांची आराधना केली. त्याच्या यज्ञात जो घोडा सोडला होता, तो इंद्राने चोरून नेला. त्यावेळी सुमवतीपासून जन्मलेल्या सगराच्या गर्विष्ट मुलांनी पित्याच्या आज्ञेनुसार घोड्यासाठी पृथ्वी धुंडाळली. पण जेव्हा घोडा सापडला नाही, तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पृथ्वी खोदली, खोदता-खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल-मुनींजवळ आपला घोडा दिसला. घोड्याला पाहून ते साठ हजार राजकुमार शस्त्रे हातात घेऊन "हाच आमचा घोडा चोरणारा चोर आहे, आणि वर डोळे मिटून बसला आहे. मारा, मारा ह्या नीचाला," असे म्हणत त्यांच्याकडे धावले. त्याचवेळी कपिल मुनींनी आपल्या पापण्या उघडल्या. इंद्राने राजकुमारांची बुद्धी हिरावून घेतली होती. म्हणूनच त्यांनी त्या महापुरुषाचा तिरस्कार केला. यामुळे त्यांच्या शरीरातच आग उत्पन्न होऊन, तिच्यामुळे क्षणार्धात ते सर्व जळून खाक झाले. सगराचे पुत्र कपिलमुनींच्या क्रोधामुळे जळून गेले. हे म्हणणे योग्य नाही. कारण ते तर शुद्ध सत्त्वगुणाचे आश्रय आहेत. त्यांचे शरीर जगाला पवित्र करीत असते. क्रोधरुपी तमोगुण त्यांच्यामध्ये असणे कसे शक्य आहे बरे ? पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते काय ? हा संसार-सागर एक मृत्यूकडे नेणारा मार्गच आहे. याला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे. परंतु कपिल मुनींनी या जगात सांख्यशास्त्ररुपी एक अशी भक्कम नाव बनविली आहे की,मुक्तीची इच्छा करणारी कोणतीही व्यक्ती तिच्याद्वारे तो समुद्र पार करू शकते. ते केवळ परम ज्ञानीच नव्हेत, तर स्वतः परमात्मा आहेत. हा शत्रू हा मित्र अशी भेदबुद्धी त्यांचे ठिकाणी कशी असेल बरे ?

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...