श्री गणेशाय नमः बिछान्यावर उर्वशी नाही, असे पाहून राजा खिन्न झाला. त्याचे चित्त उर्वशीकडेच लागले होते. तो तिच्यासाठी शोकविहृल झाला आणि वेड्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला. एके दिवशी कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्याने उर्वशी आणि तिच्या पाच प्रसन्नमुक मैत्रिणींना पाहिले आणि गोड शब्दात म्हटले. "प्रिये ! थांब, थांब. हे निष्ठुरे ! निदान आज तरी मला सुखी केल्यावाचून तू जाऊ नकोस. ये. आपण दोघे काही वार्तालाप करू. देवी ! आता या शरीरावर तुझा कृपाप्रसाद राहिलेला नाही, म्हणून तू याला आता लांब फेकून दिले आहेस. म्हणून माझे हे सुंदर शरीर आता येथे पडेल आणि लांडगे व गिधाडे यांना खाऊन टाकतील."
उर्वशी म्हणाली- "तू पुरुष आहेस. असा मरू नकोस. या लांडग्यांनी तुला खाऊ नये. स्त्रियांची कोणाशीही मैत्री नसते. स्त्रिया आणि लांडगे या दोघांचे ह्रदय अगदी एकसारखे असते. स्त्रिया निर्दय, क्रूर, असहनशील आणि धाडसी कामे आवडणाऱ्या असतात. थोड्याशा स्वार्थासाठीही त्या विश्वास संपादन करुन आपल्या पतीला आणि भावालासुद्धा मारतात. सौजन्य यांच्या हृदयात बिलकुल नसते. भोळ्याभाबड्यांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवतात आणि नवनवीन पुरुषांच्या आकर्षणाने कुलटा आणि स्वैर बनतात. हे राजा, प्रत्येक एक वर्षानंतर एक रात्र तू माझ्या संगतीत राहाशील. तेव्हा तुला आणखीही मुले होतील. "
उर्वशी गर्भवती आहे, हे जाणून राजा राजधानीकडे परत आला. एक वर्षानंतर पुन्हा तिकडे गेला. तोपर्यंत उर्वशी एका वीर-पुत्राची माता झाली होती. उर्वशीबरोबर राहिल्याने त्याला अतिशय सुख मिळाले आणि तो एक रात्र तिच्याबरोबर राहिला. पुन्हा विरहदुःखाने अत्यंत दिन झालेल्या त्याला उर्वशी म्हणाली. "तू या गंधर्वाची स्तुती कर. हे मला तुझ्याकडे सोपवतील. "तेव्हा पुरूरव्याने गंधर्वाची स्तुती केली. परीक्षिता ! पुरूरव्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिले. ही उर्वशी आहे, असे वाटून ते हृदयाशी धरून तो एका वनातून दुसर्या वनात फिरू लागला.
जेव्हा तो सावध झाला, तेव्हा ते पात्र वनातच टाकून आपल्या महालात परतला आणि रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करीत राहिला. अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले, तेव्हा त्याच्या हृदयात तीन्ही वेद प्रगट झाले. नंतर जेथे त्याने अग्नीपात्र टाकले होते, तेथे तो गेला. आता त्या ठिकाणी शमीवृक्षातून एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता, तो पाहून त्याने त्यापासून दोन अरणी (मंथन करण्याची लाकडे) तयार केल्या. नंतर त्याने उर्वशीलोकांची प्राप्ती व्हावी, या इच्छेने खालील अरणीला उर्वशी, वरच्या अरणीला पुरुरवा आणि मधल्या लाकडाचे पुत्ररूपाने चिंतन करीत अग्नी प्रज्वलित करणाऱ्या मंत्र्यांनी मंथन केले. त्या मंथनामुळे 'जातवेदा' नावाचा अग्नी प्रगट झाला. राजा पुराव्याने अग्नीदेवतेची तीन वेदांनी संस्कार करून आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी अशा तीन भागात विभागणी केली व त्याचा पुत्ररूपाने स्वीकार केला. नंतर उर्वशीलोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने पुरूरव्याने त्या तीन अग्नींच्या द्वारे सर्वदेवस्वरूप, इंद्रियातीत, यज्ञपती भगवान श्रीहरींना उद्देशून यज्ञ केला.
त्रेतायुगापूर्वी सत्ययुगामध्ये ॐकार हाच वेद होता. सर्व वेद-शास्त्रे त्याच्यात अंतर्भूत होती. देव फक्त नारायणच होता. आणखी कोणी नव्हते. अग्नी एकच होता आणि 'हंस' हा एकच वर्ण होता.
परीक्षिता ! त्रेतायुगाच्या सुरुवातीला पुरूरव्यापासूनच तीन वेद आणि तीन अग्नी यांचा आविर्भाव झाला. पुराव्याने अग्नीचा संतानरूपाने स्वीकार करून गंधर्वलोकांची प्राप्ती करून घेतली.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा