श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले- त्यावेळेच्या संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की, ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला ?
श्रीशुक सांगू लागले - त्यावेळी हैहयवंशाचा अधिपती अर्जुन होता. तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता. त्याने अनेक प्रकारे सेवाशुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीर्ती आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतले. तो योगेश्वर झाला होता. आणिमादी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या. जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे. एकदा गळ्यात वैजयंती माळ घालून सहस्त्रबाहु अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता. त्या वेळी मदोन्मत्त होऊन सहस्त्रबाहुने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडविला सहस्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले, ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही. जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली, तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि माहिष्मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर पुलस्त्याच्या सांगण्यावरून सोडून दिले.
एके दिवशी सहस्त्रबाहु अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. दैववंशात तो जमदग्नीच्या आश्रमात जाऊन पोहोचला. तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनुच्या प्रतापाने सेना, मंत्री आणि वाहनांसह हैहयाधिपतीचे आतिथ्य केले. जमदग्नी मुनींचे ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे असल्याचे पाहून त्याने त्यांच्या आदरसत्काराचा मान न ठेवता कामधेनूच घेऊन जाण्याचे ठरविले. त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बळेच नेण्याची सेवकांना आज्ञा केली. तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनुला वासरासह बळजबरीने माहिष्मतीपुरीला नेले. तो तेथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीगत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले. ते आपला भयंकर परशू, बाणांचा भाता, ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमानणारा सिंह हत्तीच्या राजाच्या मागे धावतो, त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले.
अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता, तेवढ्यात त्याने पाहिले की, परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहेत. त्यांनी हातात धनुष्य-बाण आणि परशु घेतला होता, शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणाप्रमाणे चमकत होत्या. त्यांना पाहाताच त्याने गदा, खड्ग, बाण, ऋष्टी, तोफा, शक्ती इत्यादी अयुधांनी सुसज्ज हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षौहिणी फौज पाठविली. भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू यांप्रमाणे होता.बस्स ! ते शत्रूच्या सेनेचा निःपात करीत जात होते. जेथे जेथे ते आपल्या परशुचा प्रहार करीत तेथे तेथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात, मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा