२८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय अकरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवान श्रीरामांनी वसिष्ठांची आपले आचार्य म्हणून नेमणूक करून उत्तम सामग्रीने संपन्न यज्ञांनी आपणच आपल्या सर्वदेवस्वरूप स्वयंप्रकाश आत्म्याचे पूजन केले. त्यांनी होत्याला पूर्व, ब्रह्मदेवाला दक्षिण, अध्वर्यूला पश्चिम आणि उद्गात्याला उत्तर दिशा दक्षिणा म्हणून दिली. त्यातून जेवढी भूमी शिल्लक राहिली होती, ती त्यांनी आचार्यांना दिली. त्यांना माहीत होते की, संपूर्ण भूमीचा अधिकारी केवळ नि:स्पृह ब्राह्मणच आहे. अशा प्रकारे सगळ्या भूमंडळाचे दान करून त्यांनी आपल्या शरीरावरील वस्त्रे आणि अलंकार एवढेच आपल्याजवळ ठेवले. तसेच महाराणी सीतादेवींजवळ सुद्धा फक्त मंगल वस्त्रे आणि सौभाग्यालंकारच शिल्लक राहिले.

            जेव्हा आचार्यादी ब्राह्मणांनी पाहिले की, भगवान श्रीराम ब्राह्मणांनाच आपले इष्टदेव मानतात, त्यांच्या अंत:करणात ब्राह्मणांबद्दल अत्यंत स्नेह आहे, तेव्हा त्यांचे हृदय प्रेमाने द्रवले. त्यांनी प्रसन्न होऊन सगळी पृथ्वी भगवंतांना परत दिली आणि म्हटले. " प्रभु ! आपण सर्व लोकांचे एकमेव स्वामी आहात. आपण आमच्या हृदयात राहून आपल्या तेजाने आमच्या अज्ञानांधकाराचा नाश करीत आहात. अशा स्थितीत आपण आम्हांला काय दिले नाहीत बरे ? आपले ज्ञान अनंत आहे. पवित्र कीर्ती असणाऱ्या पुरुषांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. जे कोणाला कोणत्याही प्रकारे दुःख देत नाहीत, अशा महात्म्यांना आपण आपले चरणकमल दिले आहेत. असे असूनही आपण ब्राह्मणांना आपले इष्ट दैवत मानता. भगवान ! अशा आपल्या या रामरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - ५

श्री गणेशाय नमः श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भारताचे हृदय आणि डोळे भरून आले. अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. त्याने प्रभूंच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहात होत्या. श्रीरामांनी आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंनी त्याला न्हाऊ घातले. त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी ब्राह्मण आणि पूजनीय गुरुजनांना नमस्कार केला. आणि प्रजेने श्रीरामांना भक्तीभावाने नमस्कार केला. त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने, आपले स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्पवर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली. भरताने हातात पादुका घेतल्या. बिभीषणाने उत्कृष्ट चौवऱ्या, सुग्रीवाने पंखा आणि श्रीहनुमंतांनी पांढरे छत्र धरले. परीक्षिता, शत्रुघ्नाने धनुष्य व भाता, सीतादेवींनी तीर्थाने भरलेला कमंडलू, अंगदाने सोन्याचे खड्ग आणि जांबवानाने ढाल घेतली. या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले. योग्य स्थानांवर स्त्रिया बसल्या. भाट स्तुती करू लागले. राजा ! ग्रह-ताऱ्यांनी चंद्र शोभावा, तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते.

            अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या आयोध्यानगरीत प्रवेश केला. त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौशल्या, अन्य माता, गुरुजन, बरोबरीचे मित्र आणि लहान यांच्या यथायोग्य सन्मान केला. तसेच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. श्रीसीतादेवी आणि लक्ष्मणसुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटले. प्राण्यांच्या संचाराने मृतशरीरे उठावी, त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या. त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसून घेतले आणि नेत्रांतील अश्रुंनी त्यांना अभिषेक केला. त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला. त्यानंतर वसिष्ठांनी इतर गुरुजनांसह विधीपूर्वक भगवंतांच्या जटा उतरविल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला, त्याचप्रमाणे त्यांना चारही समुद्रांच्या पाण्याने व इतर द्रव्यांनी अभिषेक केला. अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्रीरामांनी सुंदर वस्त्रे, पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले. सर्व बंधू आणि श्रीजानकीदेवींनी सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले. त्यांच्यासह भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते. भारताने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली. तेव्हा भगवान श्रीरामांनी राजसिंहासनाचा स्वीकार केला. त्यानंतर ते, आपापल्या धर्मामध्ये तत्पर व वर्णाश्रमानुसार आचार करणाऱ्या आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले. त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती. जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजा झाले, तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते, परंतु ते सत्ययुगच आहे असे वाटत होते. परीक्षिता ! त्यावेळी वने, नद्या, पर्वत, वर्षे, द्वीपे आणि समुद्र हे सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करीत. इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग होत नसत. वृद्धावस्था, दुर्बलता, दुःख, शोक, भय आणि थकवा, नाममात्रसुद्धा नव्हते. एवढेच काय, ज्यांना मरण नको असे, त्यांचा मृत्यूही होत नसे. भगवान श्रीरामांनी एकपत्नीव्रत घेतले होते. त्यांचे चरित्र राजर्षीसारखे पवित्र होते. गृहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करीत होते. पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम, सेवा, शील, नम्रता, बुद्धी, लज्जा इत्यादी गुनांनी पतीचे चित्त वेधून घेत असत.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - ४

श्री गणेशाय नमः त्यावेळी हजारो राक्षसिणी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालांतून बाहेर पडून रणभूमीवर आल्या. लक्ष्मणांच्या बाणांनी छिन्न-वीच्छिन्न होऊन पडलेल्या आपल्या आप्तांना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या. हाय ! हाय ! लोकांना दहशत बसविणारे रावणमहाराज ! आज आमचा घात झाला ! आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे. आता तिचे रक्षण कोण करणार ? महाराज ! आपण कामवश झाल्याने सीतादेवींचा प्रभाव जाणला नाही. त्यामुळे आपली ही दशा झाली ! आपण राक्षस कुळाला आनंद देत होता. पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली. आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनला.

            श्रीशुक म्हणतात - श्रीरामचंद्राच्या आज्ञेने बिभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टीकर्म केले. नंतर भगवान श्रीरामांनी अशोकवाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्रीसीतादेवींना पाहिले. त्या आपल्या विरहाने दु:खी आणि कृश झाल्या होत्या. आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामांचे हृदय करूणेने व्याकूळ झाले. इकडे भगवंतांचे दर्शन झाल्याने सीतादेवींचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्हासित झाले. भगवंतांनी बिभीषणाला राक्षसांचे अधिपत्य, लंकेचे राज्य आणि एक कल्पाचे आयुष्य दिले. त्यानंतर आगोदर सीतादेवींना विमानात बसविले. नंतर लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत यांसह आपण बसले. अशा प्रकारे चौदा वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले. त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते.

            इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंतांच्या लीलांचे गायन करीत होते. जेव्हा भगवंतांना समजले की, भरत फक्त गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या कण्या खातो, वल्कले नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो. तसेच त्याने जटा वाढविल्या आहेत. तेव्हा करूणेने भगवंतांचे हृदय भरून आले. जेव्हा भरताला समजले की, आपले जेष्ठ बंधू श्रीराम येत आहेत, तेव्हा तो नागरिक, मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला. जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदिग्राम येथून निघाला, तेव्हा लोक त्याच्याबरोबर मंगलगीते गात व वाद्ये वाजवीत चालू लागले. वेदवेत्ते ब्राह्मण वारंवार वेदमंत्रांचे पठण करीत होते. सर्वत्र सोनेरी पताका फडकत होत्या. रंगी-बेरंगी ध्वजांनी सजविलेले सुवर्णरथ, सोन्याचे खोगीर घातलेले सुंदर घोडे, तसेच सोन्याची चिलखते घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले. शेठ-सावकार, श्रेष्ठ वारांगना आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान-मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्या बरोबर निघाले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२५ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला. जेव्हा मोठ-मोठे वानर आपल्या हातांनी पर्वत उचलून आणीत, तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठ-मोठे शिलाखंड थरथर कापत असत. यानंतर भगवंतांनी बिभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव,नील, हनुमान इत्यादी प्रमुख असणाऱ्या वानरसेनेच्या बरोबर लंकेत प्रवेश केला. हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती. त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरफटका मारण्याची ठिकाणे, खेळाची मैदाने, धान्याची गोदामे, खजिने, दरवाजे, फटाके, सभागृहे, सज्जे आणि पक्ष्यांची घरटीसुद्धा वेढली. त्यांनी तेथील आसने,ध्वज, सोन्याचे कळस आणि चौक तोडून-फोडून टाकले. हत्तींच्या झुंडींनी नदीचे पाणी खळबळून टाकावे त्याप्रमाणे. हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मुख, सुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती, पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठविले. राक्षसांची ती विशाल सेना तलवारी, त्रिशूळ, धनुष्ये, प्रास, ऋष्टी, शक्ती, बाण, भाले, खड्गे इत्यादी शस्त्रास्त्रांमुळें अजिंक्य होती. भगवान श्रीरामांनी सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, गंधमादन, नील,अंगद, जांबवान, पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला. श्रीरामांचे अंगदादी सर्व सेनापती, राक्षसांच्या हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करून त्यांना वृक्ष, पर्वतशिखरे, गदा आणि बाणांनी मारू लागले. वास्तविक श्रीसीतादेवीना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते, त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते.

            राक्षसराज रावणाने जेव्हा पाहिले की, आपली सेना नष्ट होऊ लागली आहे, तेव्हा तो चिडून पुष्पक विमानात बसून, श्रीरामांच्यावर चालून आला. त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला. श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले, तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला. श्रीराम त्याला म्हणाले, "नीच राक्षसा ! कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचे हरण केलेस. तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण असू शकेल ? ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्वसंपन्नसुद्धा टाळू शकत नाही, त्याचप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो. " अशा प्रकारे रावणाची निर्भर्त्सना करीत श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर चढविलेला बाण त्याच्यावर सोडला. त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदार्ण केले. जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातुन खाली पडतात, त्याप्रमाणे तो आपल्या दहाही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला. त्यावेळी त्याचे बांधव "हाय हाय" करून ओरडू लागले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - २

श्री गणेशाय नमः परीक्षिता ! रावणाने जेव्हा सीतेच्या रूप-गुणांविषयी ऐकले, तेव्हा त्याचे हृदय कामवासनेने आतुर झाले. त्याने मारीचाला अद्भुत हरणाच्या रूपात तिच्या पूर्णकुटीजवळ पाठविले. तो श्रीरामांना दूरवर घेऊन गेला. जसे दक्षप्रजापतीला वीरभद्राने मारले होते, तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तात्काळ मारून टाकले. नीच राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे श्रीरामलक्ष्मणांच्या अनुपस्थितीत विदेहनंदनी श्रीसीतादेवींचे अपहरण केले त्यानंतर ते आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने, भाऊ लक्ष्मणासह, जंगलामध्ये दीनवाणे होऊन फिरू लागले.जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात, त्यांची अशीच गती होते, हेच जणू त्यांनी दाखविले. यानंतर, ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत्सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती, त्या जटायूवर श्रीरामांनी अग्निसंस्कार केला. पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्यापाठोपाठ सुग्रीव इत्यादी वानरांशी मैत्री करून वालीचा वध केला. त्यानंतर वानरांच्या द्वारा आपल्या प्रियेचा शोध लावला. ब्रह्मदेव आणि शंकर ज्याच्या चरणांची पूजा करतात, तेच मनुष्यरुप भगवान श्रीराम वानरसेनेसह समुद्रतटावर पोहोचले.( तेथे तीन रात्री उपवास करूनही समुद्र भेटायला आला नाही, तेव्हा) भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली, त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले. भ्याल्यामुळे समुद्राची गर्जना शांत झाली, तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्यादि वस्तू घेऊन समुद्र भगवंतांच्या चरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला. "अनंता ! आम्ही मूढ असल्याकारणाने जगाचे एकमेव स्वामी, आदीकारण आणि अविनाशी अशा आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही. आपण सर्व गुणांचे स्वामी आहात. म्हणून जेव्हा आपण सत्त्वगुणाचा स्वीकार करता, तेव्हा दैवतांची, रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा स्वीकार करता, तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होते. हे वीरशिरोमणे ! आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रिलोक्याला रडवणाऱ्या विश्रवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या. येथे माझ्यावर एक सेतू बांधा. त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठ-मोठे नरपती दिग्विजय करीत येथे येतील, तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील. "

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२३ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघू झाला. रघूचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला. देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती.
            परीक्षिता ! सीतापती भगवान श्रीरामांचे चरित्र तत्त्वज्ञानी ऋषींनी पुष्कळसे वर्णन केले आहे आणि तू ते अनेक वेळा ऐकलेही आहेस.

            भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी राना-वनांत फिरत राहिले. त्यांचे चरण इतके कोमल होते की, प्रियेच्या हातांचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता. तीच पावले जेव्हा वनात चालून चालून थकून जात, तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांच्या थकवा दूर करीत. शूर्पणखेला विद्रूप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला. या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भुवया चढवल्या, त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला. त्यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकले. ते अयोध्याधिपती आमचे रक्षण करोत.

            श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणादेखतच मारीच इत्यादी राक्षसश्रेष्ठांना ठार केले. परीक्षिता ! सीतेच्या स्वयंवरमंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते. श्रीरामांनी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले. तोच मधोमध त्याचे दोन तुकडे झाले. हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणे. वक्ष:स्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकले. त्या गुण, शील, वय, शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत श्रीरामांना सोभत होत्या. अयोध्येला परत येताना वाटेत, ज्यांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती, त्या परशुरामांचा गर्व त्यांनी नष्ट केला. जरी महाराज दशरथांनी पत्नीच्या अधीन होऊन तिला तसे वचन दिले होते, तरीसुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते. म्हणून श्रीरामांनी त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो, तसे राज्य, लक्ष्मी, मित्र, हितचिंतक आणि महाल सोडून पत्नीबरोबर वनवास पत्करला. वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केले. कारण ती कामुक विचारांची होती. तिच्या खर, दूषण, त्रिशिरा या भावांना व अन्य चौदा हजार राक्षसांना, हातात महान धनुष्य घेऊन श्रीरामांनी ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय नववा भाग - ३

श्री गणेशाय नमः बारा वर्षांनंतर राजा शापातून मुक्त झाला. जेव्हा तो संग करण्यासाठी पत्नीजवळ गेला, तेव्हा तिने त्यांना अडविले. कारण तिला त्या ब्राह्मणपत्नीने दिलेला शाप ठाऊक होता. यानंतर त्याने स्त्रीसुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. नंतर त्याच्या सांगण्यावरून वैशिष्ठांनी मदयन्तीच्या ठिकाणी गर्भाधान केले. मदयंतीने सात वर्षंपर्यंत गर्भ धारण केला. परंतु तो जन्माला आला नाही. तेव्हा वसिष्ठांनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला, त्यामुळे तो जन्माला आला. तोच अश्मा (दगडा) च्या आघाताने उत्पन्न झाल्यामुळे त्याचे 'अश्मक' नाव ठेवले. अश्मकापासून मुलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला नि:क्षत्रिय करीत होते, तेव्हा स्त्रियांनी याला लपून ठेवले होते. म्हणून त्याचे एक नाव 'नारीकवच' असे पडले. त्याला मूलक यासाठी म्हणतात की, पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवृर्तक बनला. मूलकाचा पुत्र दशरथ. दशरथाचा ऐडविड आणि ऐडविडाचा विश्वसह. विश्वसहाचा पुत्रच चक्रवर्ती खट्वांग झाला. युद्धामध्ये त्याला कोणी जिंकू शकत नव्हता. देवतांनी प्रार्थना केल्यावरून त्याने दैत्यांचा वध केला होता. देवतांकडून त्याला जेव्हा समजले कि, आपले आयुष्य फक्त दोन घटकाच शिल्लक आहे. तेव्हा तो आपल्या राजधानीकडे परत आला आणि आपले मन त्याने भगवंतांचे ठिकाणी स्थिर केले. तो मनातल्या मनात विचार करू लागला की, "माझ्या कुलाची इष्ट देवता ब्रह्मण आहे. त्यांच्यापेक्षा अधिक माझे माझ्या प्राणावरही प्रेम नाही. पत्नी, पुत्र, लक्ष्मी, राज्य आणि पृथ्वीसुद्धा मला त्यांच्याइतकी प्रिय वाटत नाही. लहानपणीसुद्धा माझे मन अधर्माकडे कधी गेले नाही. पवित्रकीर्ती भगवंतांच्या व्यतिरिक्त मी आणखी कोणतीही वस्तू कुठे पाहिली नाही.तिन्ही लोकांचे स्वामी असलेल्या देवतांनी मला कोणताही वर मागण्यास सांगितले. परंतु मी त्या भोगांची अजिबात लालसा धरली नाही; कारण सर्व प्राण्यांचे जीवनदाते श्रीहरी यांच्या भक्तीमध्येच मी मग्न होऊन राहिलो होतो. ज्या देवतांची इंद्रिये आणि मने विषयांमध्ये भटकत असतात, त्या देवता सत्वगुणप्रधान असूनसुद्धा आपल्या हृदयात विराजमान, सदैव प्रियतमाच्या रूपाने राहाणाऱ्या आपल्या आत्मस्वरूप भगवंतांना ओळखत नाहीत. तर मग जे रजोगुणी आणि तमोगुणी आहेत, ते कसे जाणू शकतील ? ईश्वराच्या मायेचा खेळ असणाऱ्या, गंधर्वनगरांसारख्या या विषयांना मी सोडून देत आहे. कारण अज्ञानानेच हे चित्तात जाऊन बसले होते. आता जग उत्पन्न करणाऱ्या भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन होऊन मी त्यांनाच शरण जात आहे. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. म्हणूनच त्याने असा निश्चय केला. आता त्याने अनात्म वस्तूंमध्ये जो अज्ञानमूलक आत्मभाव होता, त्याचा त्याग केला आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला.ते स्वरुप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म, सुन्यासमानच आहे. परंतु ते शून्य नाही, परम सत्य आहे. भक्तजन त्यास वस्तूचे "भगवान वासुदेव" या नावाने वर्णन करतात.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...