श्री गणेशाय नमः भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला. जेव्हा मोठ-मोठे वानर आपल्या हातांनी पर्वत उचलून आणीत, तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठ-मोठे शिलाखंड थरथर कापत असत. यानंतर भगवंतांनी बिभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव,नील, हनुमान इत्यादी प्रमुख असणाऱ्या वानरसेनेच्या बरोबर लंकेत प्रवेश केला. हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती. त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरफटका मारण्याची ठिकाणे, खेळाची मैदाने, धान्याची गोदामे, खजिने, दरवाजे, फटाके, सभागृहे, सज्जे आणि पक्ष्यांची घरटीसुद्धा वेढली. त्यांनी तेथील आसने,ध्वज, सोन्याचे कळस आणि चौक तोडून-फोडून टाकले. हत्तींच्या झुंडींनी नदीचे पाणी खळबळून टाकावे त्याप्रमाणे. हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मुख, सुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती, पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठविले. राक्षसांची ती विशाल सेना तलवारी, त्रिशूळ, धनुष्ये, प्रास, ऋष्टी, शक्ती, बाण, भाले, खड्गे इत्यादी शस्त्रास्त्रांमुळें अजिंक्य होती. भगवान श्रीरामांनी सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, गंधमादन, नील,अंगद, जांबवान, पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला. श्रीरामांचे अंगदादी सर्व सेनापती, राक्षसांच्या हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करून त्यांना वृक्ष, पर्वतशिखरे, गदा आणि बाणांनी मारू लागले. वास्तविक श्रीसीतादेवीना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते, त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते.
राक्षसराज रावणाने जेव्हा पाहिले की, आपली सेना नष्ट होऊ लागली आहे, तेव्हा तो चिडून पुष्पक विमानात बसून, श्रीरामांच्यावर चालून आला. त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला. श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले, तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला. श्रीराम त्याला म्हणाले, "नीच राक्षसा ! कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचे हरण केलेस. तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण असू शकेल ? ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्वसंपन्नसुद्धा टाळू शकत नाही, त्याचप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो. " अशा प्रकारे रावणाची निर्भर्त्सना करीत श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर चढविलेला बाण त्याच्यावर सोडला. त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदार्ण केले. जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातुन खाली पडतात, त्याप्रमाणे तो आपल्या दहाही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला. त्यावेळी त्याचे बांधव "हाय हाय" करून ओरडू लागले.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा