श्री गणेशाय नमः परीक्षिता ! रावणाने जेव्हा सीतेच्या रूप-गुणांविषयी ऐकले, तेव्हा त्याचे हृदय कामवासनेने आतुर झाले. त्याने मारीचाला अद्भुत हरणाच्या रूपात तिच्या पूर्णकुटीजवळ पाठविले. तो श्रीरामांना दूरवर घेऊन गेला. जसे दक्षप्रजापतीला वीरभद्राने मारले होते, तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तात्काळ मारून टाकले. नीच राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे श्रीरामलक्ष्मणांच्या अनुपस्थितीत विदेहनंदनी श्रीसीतादेवींचे अपहरण केले त्यानंतर ते आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने, भाऊ लक्ष्मणासह, जंगलामध्ये दीनवाणे होऊन फिरू लागले.जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात, त्यांची अशीच गती होते, हेच जणू त्यांनी दाखविले. यानंतर, ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत्सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती, त्या जटायूवर श्रीरामांनी अग्निसंस्कार केला. पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्यापाठोपाठ सुग्रीव इत्यादी वानरांशी मैत्री करून वालीचा वध केला. त्यानंतर वानरांच्या द्वारा आपल्या प्रियेचा शोध लावला. ब्रह्मदेव आणि शंकर ज्याच्या चरणांची पूजा करतात, तेच मनुष्यरुप भगवान श्रीराम वानरसेनेसह समुद्रतटावर पोहोचले.( तेथे तीन रात्री उपवास करूनही समुद्र भेटायला आला नाही, तेव्हा) भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली, त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले. भ्याल्यामुळे समुद्राची गर्जना शांत झाली, तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्यादि वस्तू घेऊन समुद्र भगवंतांच्या चरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला. "अनंता ! आम्ही मूढ असल्याकारणाने जगाचे एकमेव स्वामी, आदीकारण आणि अविनाशी अशा आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही. आपण सर्व गुणांचे स्वामी आहात. म्हणून जेव्हा आपण सत्त्वगुणाचा स्वीकार करता, तेव्हा दैवतांची, रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा स्वीकार करता, तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होते. हे वीरशिरोमणे ! आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रिलोक्याला रडवणाऱ्या विश्रवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या. येथे माझ्यावर एक सेतू बांधा. त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठ-मोठे नरपती दिग्विजय करीत येथे येतील, तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील. "
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा