१० फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - १

श्री गणेशाय नमःश्रीशुक म्हणतात - भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीषाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. दुर्वासांचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीषाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली.

               अंबरीष म्हणाला - हे सुदर्शना ! तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्रमंडळाचा अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रियेसुद्धा तूच आहेस. भगवंतांना प्रिय,एक हजार दात असणाऱ्या, हे सुदर्शना ! मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा ! तू या ब्राह्मणाचे रक्षण कर. तूच धर्म, मधुर आणि सत्य वाणी, सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञसुद्धा आहेस. तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्वलोकस्वरुपसुद्धा आहेस. परम पुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस. हे सुनाभा, तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षणकर्ता आणि अधर्माचे आचरण करणाऱ्या असुरांचे भस्म करणारा अग्नि आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भूत कर्मे करणारा आहेस. तुला नमस्कार असो. मी तुझी स्तुती करतो. हे वेदवाणीच्या आधीश्वरा ! तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते. तुझा महिमा जाणणे कठीण आहे. लहान-मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे. हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ! ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात, तेव्हा तू दैत्य- दानवाच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांचा भुजा, पोट, जांघा, पाय, मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस. हे विश्वरक्षका ! सर्वांचे प्रहार सहन करणाऱ्या तुला गदाधारी भगवंतांनी दुष्टांच्या नाशासाठीच नेमले आहे. तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर. आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल. मी जर काही दान केले असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांनाच आपले दैवत समजत असतील, तर दुर्वासांचा त्रास नाहीसा होवो. सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आतम्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील, तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर होवो.    

            श्रीशुक म्हणतात - दुर्वासांचा सगळ्या बाजूंनी दाह करणाऱ्या भगवंतांच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले. जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा ते त्या राजाला उत्तम आशीर्वाद देते त्याची प्रशंसा करू लागले.     

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०९ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ४

श्री गणेशाय नमः मी, भगवान शंकर, भृगु इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनविलेल्या नियमांची बंध्द आहोत. तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचे हित करतो. (त्यांच्या भक्तांचा द्रोह करणाऱ्याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत.) ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले, तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलासनिवासी भगवान शंकरांना शरण गेले.
            श्रीमहादेव म्हणाले - ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे, योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात. ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहातात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही.
            मी, सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिलदेव,अपांतरतम,देवल,धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर-असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही. कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हांला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जावे. ते भगवंतच तुमचे कल्याण करतील. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेले, तेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंतांच्या चक्राच्या आगीने होरपळलेले दुर्वास थरथर कापत भगवंतांच्या चरणांवर पडले. ते म्हणाले,"हे अच्युता ! अनंता ! संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो ! विश्वाचे जीवनदाता ! मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपला परम प्रभाव न जाणल्याकारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो ! आपण मला त्यापासून वाचवा ! आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्धा मुक्त होतो.
            श्रीभगवंत म्हणाले - हे ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्तांच्या आधीन आहे. मला जराही स्वतंत्रता नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्रह्मण ! माझ्या भक्तांच्या एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधूस्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक, हे सर्व सोडून फक्त मलाच शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ? ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वत:ला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य-सारूप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात, तेव्हा ते त्यांच्यासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची काय किंमत ? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, एक. मी तुला उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे, त्यांच्याकडेच तू जा. निरापराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगल होते.
            तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा ! तुझे कल्याण असो नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीषाकडे जा आणि त्यांची क्षमा माग,तरच तुला शांती मिळेल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०८ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - ३

श्री गणेशाय नमः त्यांना पाहाताच राजा उठून उभा राहीला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वासमुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी म्हणून ते नदीवर गेले. ते परब्रह्याचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकटात पडल्याकारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचार-विनिमय केला.तो म्हणाला," ब्राह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही, असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मण हो ! फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो." असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि हे परीक्षिता ! तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहात राहिला. आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे, हे ओळखले. त्यावेळी दुर्वासमुनींना भूक लागली होती. रागाने ते थरथर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले. "राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणाऱ्या याचा नीचपणा तर पहा ! हा कसला विष्णुभक्त ! मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला ! तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो !" असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. तो प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायाच्या आदळआपटीने पृथ्वी थरथर कापत होती. परंतु अंबरीष मात्र तिला पाहुन एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शनचक्राने क्रोधाने फूत्कारणाऱ्या सापाला आग जशी जाळून टाकते, त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दूर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे, असे पाहिले, तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंचच उंच भडकणाऱ्या ज्वाळा असणाऱ्या वणव्याने जसा सापाचा पाठलाग करावा, त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्यामागे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले, तेव्हा मेरुपर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वासमुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपाताळे, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक, इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही, तेव्हा तर ते अधिकच घाबरले आता शोधत ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा.
            ब्रह्मदेव म्हणाले - दोन परार्धाच्या कालखंडानंतर कालस्वरुप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील, त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०७ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणाले - भाग्यवान अंबरीषाला सप्तव्दीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या, तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानीत असे. कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो, हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे (तुच्छ) वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये, वाणी भगवद़ॖणानुवर्णनामध्ये, हात हरीमंदिराच्या सेवाकार्यांमध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे, अंगप्रत्यंग भगवभ्दक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादसेवनात संलग्न केले होते. त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे. अंबरीषाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. अशा प्रकारे, भगवंतांना सर्वांत्मा तसेच सर्वस्वरूप समजून, त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष, इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवद्भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्याने 'धन्व' नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ, असित, गौतमी इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती. त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत असत, तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रुपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत. त्याची प्रजा महात्म्यांनी गायिलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्यामुळे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणार्‍या त्या प्रजेला सिद्धांनासुद्धा दुर्लभ अशी भोगसामुग्री आनंदित करू शकत नव्हती.तिला होणार्‍या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळू हळू त्याने सर्व प्रकारच्या आशक्तींचा त्याग केला. घर, स्त्रि, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती,रथ, घोडे तसेच पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहे, असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रुंना भयभीत करणारे आणि भगवदक्तांचे रक्षण करणारे सुदर्शनचक्र दिले होते.
            एकदा त्याने आपल्यासारखाच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशीव्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंत:करणापासून तन्मय होऊन वस्त्रे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती, तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गाई पाठविल्या. त्या गाईची शिंदे सोन्याने आणि खूर चांदीने मढविलेले होते. सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती. त्या गाई गरीब, तरुण, दिसावयास सुंदर, वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रहसमर्थ दुर्वासमुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०६ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चौथा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, " बंधूंनो ! आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे ?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले की,"आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला देत आहोत. " तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला "तात ! माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. " वडील म्हणाले, " मुला ! तु त्यांचे म्हणणे ऐकू नकोस." अंगिरस-गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत. परंतु माझ्या विद्वान पुत्रा ! त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्र्वदेवसूक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील, तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा." आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरसगोत्राच्या ब्राह्मणांनीसुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले.
            नाभाग ते धन घेऊ लागला, तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला- "या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे, ते सर्व धन माझे आहे."
             नाभाग म्हणाला, "ऋषींनी हे धन मला दिले आहे; म्हणून माझेच आहे. " यावर तो पुरुष म्हणाला, "आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे !" तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, "दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की, यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील, तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल. म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे." नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, " प्रभू ! यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत, असे माझ्या वडिलांनी सांगितले. ब्रह्मण ! मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो. "( तेव्हा भगवान रुद्र म्हणाले), " तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तूसुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोसच. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे, हे धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर. " एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो, तो प्रतीभावत, वेदाचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपालासुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीष नावाचा पुत्र झाला. तो भगवंतांचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशापसुद्धा अंबरीषाला स्पर्श करू शकला नाही.
            राजाने विचारले - भगवन ! परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही ?
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०४ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तिसरा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - मनुपुत्र राजा शर्याती वेदपारंगत होता. त्याने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते. त्याची एक कमललोचना सुकन्या नावाची कन्या होती. एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता च्यवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. सुकन्या आपल्या मैत्रिणीसह वनात फिरत-फिरत झाडांचे सौंदर्य पाहात होती. तिने एके ठिकाणी वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती पाहिल्या. दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले. त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागले. त्याचवेळी राजा शर्यातीच्या सैनिकांचे मल-मूत्र थांबले. हे पाहून शर्यातीला अत्यंत आश्चर्य वाटले. तो आपल्या सैनिकांना म्हणाला. "अरे ! तुम्ही महर्षी च्यवनांच्याबाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना ? आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावे. " तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली, " माझ्याकडूनच काही चूक घडली आहे. अजाणतेपणाने मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे. " आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्याती घाबरला. त्याने स्तुती करून वारुळात असलेल्या च्यवन-मुनींना कसेबसे शांत केले. त्यानंतर च्यवन-मुनींचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला.
            इकडे सुकन्या अतिशय रागीट च्यवनमुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून व त्याप्रमाणेच वागून त्यांची सेवा करीत त्यांना प्रसन्न करू लागली. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनीकुमार आले. च्यवन मुनींनी त्यांचे यथोचित्त स्वागत करून म्हटले, " आपण दोघेजण समर्थ आहात; म्हणून मला तारुण्यावस्था प्रधान करा. तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या. आपण सोमपान करण्याचे अधिकार नाहीत, हे मी जाणतो. तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरसपानाचा अधिकार मिळवून देईन. " वैद्यशिरोमणी अश्विनीकुमारांनी महर्षी च्यवनांना धन्यवाद देऊन म्हटले, " ठीक आहे. " आणि त्यांना सांगितले की " हे सिद्धांनी बनविलेले कुंड आहे. आपण याच्यामध्ये स्नान करावे. "च्यवन मुनींचे शरीर म्हातारपणाने व्यापले होते. सर्व अंगावर शिरा दिसत होत्या. सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते. आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनीकुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला. नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले. त्या तिघांच्याही गळ्यांत कमळांच्या माळा, कानांत कुंडले होती. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. तिघेही एकसारखे दिसत होते. ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील, असे होते. साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सुर्यासारखे तेजस्वी आहेत, असे पाहिले, तेव्हा त्यांतून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनीकुमारांना शरण गेली. तिचे पातिव्रत्य पाहून अश्विनीकुमार संतुष्ट झाले. त्यांनी तिला तिचा पती दाखविला आणि नंतर च्यवन मुनींची आज्ञा घेऊन विमानातून ते स्वर्गाकडे गेले.

            एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरता शर्याती च्ववन मुनींच्या आश्रमात आला. तेथे त्याने पाहिले की, आपल्या सुकन्याजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे. सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केले. शर्यातीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले, " कुलटे ! हे तू काय केलेस ? सर्वांना वंदनीय अशा च्यवन मुनींना तू फसवलेस ! तू त्यांना म्हातारा आणि नावडता समजून सोडून दिलेस आणि एका वाटेने निघालेल्या जार पुरुषाबरोबर राहू लागलीस. तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता. ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली ? तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे. तू निर्लज्जपणे जाराची सेवा करू लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस ! " राजा शर्यातीने असे म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्येने स्मित हास्य करीत म्हटले, " बाबा ! हे आपले जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहेत." यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी च्यवनांच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून शर्याती आश्चर्यचकित झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले.
            महर्षी च्यवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि सोमपानाचा अधिकार नसूनसुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनीकुमारांना सोमपान करविले. शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यातीला मारण्यासाठी वज्र उचलले. महर्षी च्यवनांनी वज्र घेतलेला त्याचा हात तेथेच थांबवला. तेव्हा सर्व देवांनी अश्विनीकुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केले. वैद्य असल्याकारणाने त्यांनी अगोदर अश्विनीकुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते.
परीक्षिता ! शर्यातीला उत्तानबर्ही, आनर्थ आणि भूरिषेण असे तीन पुत्र होते. आनर्तापासून रेवत झाला. महाराज ! रेवताने समुद्राच्या आत कुशस्थली नावाची एक नगरी वसविली होती. तेथेच राहून तो आनर्त इत्यादी देशांवर राज्य करीत होता. त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत थोरला ककुद्मी होता. ककुद्मी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकांमध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव हसून त्याला म्हणाले.
            राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्धा शिल्लक नाहीत. मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू जा. यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. राजा ! त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर. ज्यांचे नाम, लीला इत्यादींचे श्रवण- किर्तन अतिशय पवित्र आहे, तेच प्राण्यांचे जीवनसर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत.ककुद्मीने ब्रह्मदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणांना वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला. यक्षांच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते. ककुद्मीने आपली सर्वांगसुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्रीनारायणांच्या बद्रीकाआश्रमाकडे निघून गेला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०३ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दुसरा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा सुद्युम्न वनात गेला, तेव्हा व्यवस्वत मनूने पुत्रासाठी यमुनेच्या काठी शंभर वर्षेपर्यंत तपश्चर्या केली. त्यानंतर त्याने संतानप्राप्तीसाठी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची प्रार्थना केली आणि आपल्याचसारखे दहा पुत्र प्राप्त केले. त्यांपैकी सर्वांत मोठा इक्ष्वाकू होता.
            त्या मनुपुत्रांपैकी एकाचे नाव पृषध्र होते. त्याला गुरु वसिष्ठांनी गाईंचे रक्षण करण्यासाठी नेमले. म्हणून तो रात्रीच्या वेळी अत्यंत सावधगिरीने वीरासनात बसून गाईंचे रक्षण करीत असे. एके दिवशी रात्री पाऊस पडत होता. त्यावेळी गाईंच्या गोठ्यात एक वाघ घुसला. त्याला भिऊन झोपलेल्या गाई उठून उभ्या राहिल्या. त्या गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावू लागल्या. बलवान वाघाने एका गाईला पकडले. ती अत्यंत भयभीत होऊन हंबरू लागली. तिचा तो आक्रोश ऐकून पृषध्र गायीजवळ धावत केला. रात्रीची वेळ आणि त्यात ढगांनी आच्छादिल्यामुळे तारेसुद्धा दिसत नव्हते. त्याने हातात तलवार घेऊन अजाणतेपणेच वाघ समजून वेगाने गाईची शिर उडविले. तलवारीच्या टोकाने वाघाचासुद्धा कान तुटला. रस्त्यात रक्त गळत असलेल्या अवस्थेत तो अत्यंत भयभीत होऊन तेथून निघून गेला. शत्रुदमन पृषध्राला वाटले, वाघ मेला. परंतु सकाळी त्याने जेव्हा गाईलाच मारलेले पाहिले, तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले.पृषध्राने जाणून-बुजून जरी अपराध केला नव्हता, तरीसुद्धा कुलपुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला की "या कर्मामुळे तू क्षेत्रिय राहाणार नाहीस. शूद्र होशील." गुरुदेवांचा शाप पृषध्राने हात जोडून स्वीकारला आणि यानंतर त्याने मुनींना प्रिय असणारे नैष्ठिक ब्रह्मचर्यव्रत धारण केले. सर्व प्राण्यांच्या हेतूरहित हितैषी आणि सर्वांच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परम विशुद्ध भगवान वसुदेवाचा अनन्य भक्त झाला. त्याची सर्वांविषयीची आसक्ती नाहीशी झाली. सर्व वृत्ती शांत झाल्या. इंद्रिये वश झाली. तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता. दैववशात जे काही प्राप्त होत असे, त्यावरच तो आपला जीवननिर्वाह करीत असे. तो आत्मज्ञानाने संतुष्ट होता आणि आपले चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधिस्थच रहात असे. तो वेडा, आंधळा अगर बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करीत असे. अशा प्रकारे राहाणाऱ्या त्याने एकदा वनात भडकलेला वणवा पाहिला. मननशील पृषध्राने आपला देह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रह्याला प्राप्त झाला.
            मनूचा सर्वांत लहान पुत्र कवी नावाचा होता. विषय-भोगांबाबत तो अत्यंत नि:स्पृह होता. राज्य सोडून तो आपल्या बंधूबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान करून किशोर अवस्थेतच तो परम पदाला प्राप्त झाला.

            मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले. ते मोठे ब्राह्मणभक्त, धर्मप्रेमी व उत्तरभागाचे रक्षण करणारे होते. धृष्टाचे धार्ष्ट नावाचे क्षेत्रीय झाले. या शरीरानेच शेवटी ते ब्राह्मण झाले. नृगाचा पुत्र सुमती, त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसू होता. वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान. ओघवानाच्या पुत्राचे नावसुद्धा ओघवानच होते. ओघवती नावाची त्यांना एक कन्या होती. तिचा विवाह सुदर्शनाशी झाला. मनुपुत्र नरिष्यन्तापासून चित्रसेन, त्याच्यापासून ऋक्ष, ऋक्षापासून मीढ्वान्, मीढ्वानापासून कूर्च आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली. इंद्रसेनापासून वीतिहोत्र, त्यापासून सत्यश्रवा, सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली.
            देवदत्ताचा अग्निवेश्य नावाचा पुत्र झाला. तो स्वत: भगवान अग्नीदेवच होता. तोच पुढे कानीन आणि महर्षी जातूकर्ण्य नावाने प्रसिद्ध झाला. परीक्षिता ! ब्राह्मणांचे अग्निवेश्यायन नावाचे गोत्र त्याच्यापासूनच चालत आले. अशा प्रकारे नरिष्यन्ताच्या वंशाचे मी वर्णन केले. आता दिष्ठाचा वंश ऐक.
            दिष्टाच्या पुत्राचे नाव नाभाग होते. हा नाभाग दुसरा आहे. आपल्या कर्मांमुळे तो वैश्य झाला. त्याचा पुत्र झाला भलंदन आणि त्याचा वत्सप्रीती. वत्सप्रीतीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला. प्रमतीचा खनित्र,खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविंशती. विविंशतीचा पुत्र रंभ आणि रंभाचा पुत्र खनिनेत्र. हे दोघेही धार्मिक होते. त्याचा पुत्र करंधम आणि करंधमाचा आवीक्षित. परीक्षिता ! आवीक्षिताचा पुत्र चक्रवर्ती राजा झाला. अंगिराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करविला होता. मरूत्ताचा यज्ञ जसा झाला, तसा आणखी कोणाचाही झाला नाही. त्या यज्ञातील सर्व काही सोन्याचे असून जे काही होते ते अत्यंत सुंदर होते. त्या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने ब्राह्मण तृप्त झाले होते. त्यात मरुद्रण अन्न वाढणारे आणि विश्वेदेव सभासद होते.
            मरुत्ताच्या पुत्राचे नाव दम होते. दमाचा राज्यवर्धन, त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नर नावाचा पुत्र झाला. नरापासून केवल, केवलापासून बंधूमान, बंधुमानापासून वेगवान, वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला. तृणबिंदू आदर्श गुणांचे भंडार होता. अप्सारांमधील श्रेष्ठ अलंबुषा देवीने त्याला वरले. तिच्यापासून त्याला अनेक पुत्र आणि इडविडा नावाची एक कन्या झाली. मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्त्य यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन इडविडेपासून कुबेराला जन्म दिला. तृणबिंदूला विशाल, शून्यबंधू आणि धूमकेतू असे तीन पुत्र झाले. त्यांपैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्याने वैशाली नावाची नगरी वसविली. विशालाचा हेमचंद्र, हेमचंद्राचा धूम्राक्ष, धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे कृशाश्व व देवज असे दोन पुत्र झाले. कृशाश्वाच्या पुत्राचे नाव सोमदत्त होते. त्याने अश्वमेध यज्ञाने यज्ञपती भगवंतांची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेतली. सोमदत्ताचा पुत्र सुमती आणि सुमतीचा जनमेजय झाला. हे सर्व तृणबिंदूची कीर्ती वाढवणारे विशालवंशातील राजे झाले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...