श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणाले - भाग्यवान अंबरीषाला सप्तव्दीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या, तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानीत असे. कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो, हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते. ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे (तुच्छ) वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये, वाणी भगवद़ॖणानुवर्णनामध्ये, हात हरीमंदिराच्या सेवाकार्यांमध्ये आणि कान अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे, अंगप्रत्यंग भगवभ्दक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादसेवनात संलग्न केले होते. त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे. अंबरीषाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या सेवेसाठी समर्पित केली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. अशा प्रकारे, भगवंतांना सर्वांत्मा तसेच सर्वस्वरूप समजून, त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष, इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवद्भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्याने 'धन्व' नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ, असित, गौतमी इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती. त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत असत, तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रुपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत. त्याची प्रजा महात्म्यांनी गायिलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्यामुळे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणार्या त्या प्रजेला सिद्धांनासुद्धा दुर्लभ अशी भोगसामुग्री आनंदित करू शकत नव्हती.तिला होणार्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळू हळू त्याने सर्व प्रकारच्या आशक्तींचा त्याग केला. घर, स्त्रि, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती,रथ, घोडे तसेच पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहे, असा त्याचा निश्चय होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रुंना भयभीत करणारे आणि भगवदक्तांचे रक्षण करणारे सुदर्शनचक्र दिले होते.
एकदा त्याने आपल्यासारखाच असणाऱ्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशीव्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंत:करणापासून तन्मय होऊन वस्त्रे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजेची इच्छा नव्हती, तरीसुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गाई पाठविल्या. त्या गाईची शिंदे सोन्याने आणि खूर चांदीने मढविलेले होते. सुंदर वस्त्रे त्यांना घातली होती. त्या गाई गरीब, तरुण, दिसावयास सुंदर, वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली. त्याच वेळी शापानुग्रहसमर्थ दुर्वासमुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा