१५ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - ३

श्री गणेशाय नमः अंत:पुरातील रखवालदाराने कन्यांच्या सजविलेल्या महालात सौभरी मुनींना नेऊन सोडले. तेव्हा त्या पन्नासही राजकन्यांनी एका सौभरीलाच आपला पती म्हणून वरले. त्या कन्यांचे मन सौभरींमध्ये अशा प्रकारे आशक्त झाले की, त्या त्याच्यासाठी आपापसातील प्रेमभाव सोडून देऊन एकमेकींशी कलह करू लागल्या आणि एकमेकींना म्हणू लागल्या, " हे तुला योग्य नाही, मलाच योग्य आहेत. " ऋग्वेदी सौभरींनी त्या सर्वांचे पाणिग्रहण केले. ते आपल्या अपरंपार तपश्चर्येच्या प्रभावाने बहुमूल्य सामुग्रींनी सुसज्य अनेक उपवने आणि निर्मल जलांनी भरलेल्या सरोवरांनी युक्त, तसेच सुगंधी फुलांच्या बगीच्यांनी घेरलेल्या महालांमध्ये बहुमूल्य शय्या, असने, वस्त्रे, अलंकार, स्नान, सुगंधी उटणी, स्वादिष्ट भोजन आणि पुष्पमालांच्या योगाने आपल्या पत्नींसह विहार करू लागले. उत्तमोउत्तम वस्त्रे, अलंकार इत्यादी धारण केलेले स्त्रि-पुरुष नेहमी त्यांच्या सेवेत असत. कुठे पक्षी चिवचिवाट करीत, तर कुठे भुंगे गुंजारव करीत असत. काही ठिकाणी भाट त्यांच्या किर्तीची प्रशंसा करीत असत. सात द्विपांनी वेढलेल्या पृथ्वीचा स्वामी मांधाता, सौभरींचे हे गृहस्थाश्रमाचे सुख पाहून आश्र्चर्यचकित झाला आणि त्याचा सार्वभौम या संपत्तीचा आपण स्वामी असल्याचा गर्व गळून गेला. अशाप्रकारे सौभरी अनेक विषयांचे सेवन करीत गृहस्थसुखात रममाण झालेले असले तरी ज्याप्रमाणे तुपाच्या थेंबानी आग तृप्त होत नाही, त्याप्रमाणे तृप्त झाले नाहीत.

            ऋग्वेदाचार्य सौभरी एक दिवस स्वस्थ चित्ताने बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की, माशांच्या संगमाच्या दृश्याने आपण कशारीतीने आपली तपश्चर्या आणि स्वत्वसुद्धा घालवून बसलो. ते पुढे विचार करू लागले - " अरे ! मी तर तपस्वी आणि सदाचरणाचे निष्ठेने पालन करीत होतो. माझे झालेले हे अध:पतन तर पहा ! मी दीर्घकालपर्यंत केलेले तप पाण्यात विहार करणाऱ्या माशांचा संगम पाहून नष्ट झाले. म्हणून ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याने भोगात रमलेल्या प्राण्यांच्या जवळही जाता कामा नये आणि एका क्षणासाठी सुद्धा आपली इंद्रिये बहिर्मुख होऊ देऊ नयेत. एकट्यानेच राहावे आणि एकांतात आपले चित्त सर्वशक्तिमान भगवंतांमध्येच लावावे. संगतीच जर करावयाची असेल, तर भगवंतांच्या अनन्नप्रेमी निष्ठावान महात्म्यांशीच करावी. मी अगोदर एकांतात एकटाच तपश्चर्येमध्ये मग्न होतो. नंतर पाण्यातील माशांचा संग झाल्याने विवाह करून पन्नास झालो आणि पुन्हा संतानांच्या रूपाने पाच हजार झालो. विषयांमध्ये सत्वबुद्धी ठेवल्याने मायेच्या गुणांनी माझी बुद्धी भ्रष्ट केली. आता तर लोक आणि परलोक यासंबंधी माझे मन इतक्या विविध लालसांनी भरले आहे की, त्यांना अंतच नाही. अशा प्रकारे विचार करीत काही दिवस ते घरीच राहिले. नंतर विरक्त होऊन त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. आपल्या पतीलाच सर्वस्व मानणाऱ्या त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर वनात गेल्या. परम संयमी सौभरींनी तेथे जाऊन अतिशय घोर तपश्चर्या केली, शरीर कृश केले आणि आहवनीय इत्यादी अग्नीसह स्वतःला परमात्म्यामध्ये लीन केले. आपल्या पतीची ती आध्यात्मिक गती पाहून ज्वाळा जशा अग्निमध्ये लीन होऊन जातात, त्याचप्रमाणे त्या पतीच्या प्रभावाने सती होऊन त्यांच्यामध्येच लीन झाल्या.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सातवा भाग - १
श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सहावा भाग - २

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...