अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वन्तरांचे वर्णन ऐकविले. आता भगवंतांच्या शक्तिने युक्त अशा पुढे होणार्या सात मन्वन्तरांचे वर्णन करतो.
परीक्षिता, मी तुला यापूर्वीच (सहाव्या स्कंधामध्ये) सांगितले होते कि, संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्नी होत्या. काही लोक म्हणतात की, त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम,यमी आणि श्राध्ददेव अशी तीन संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनैश्र्चर आणि उपती नावाची कन्या, अशी तीन संताने झाली. तपती संवरणाची पत्नी झाली. वडवेचे पुत्र अश्विनीकुमार झाले. आठव्या मन्वन्तरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगन होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल.
तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते, त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचासुद्धा त्याग करून परम सिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्र्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वन्तरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहात आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सर्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील.
हे राजा, वरुणाचा पुत्र दक्षसावर्णी नववा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार,मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वन्तरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।