२३ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय पहिला

श्री गणेशाय नमः राजा परीक्षिताने विचारले - भगवन ! आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशांच्या राजांची अत्यंत अद्भुत चरित्रे, तसेच धर्मप्रेमी यदूंचेसुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात, आपला अंश असलेल्या श्रीबलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आम्हांला ऐकवावे. प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या, त्या विस्ताराने आम्हांला सांगा. अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात,जे भवरोगावरील औषध आहे, जे कानाला आणि मनाला परम आह्लाद देणारे आहे अशा भगवंतांच्या गुणवर्णनाला, आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल ? युद्धात देवांनासुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिरथीरुपी प्रचंड मासे ज्यात होते, असा कौरसेनेचा अपार सागर, माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने, वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलांडावे, तसा पार केला. कौरव आणि पांडव या दोन्ही वंशांचे बीज, असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते, त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली. तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले. हे विद्वन ! सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आत आत्मरूपाने राहून अमृतत्वाचे आणि बाहेर कालरुपाने राहून मृत्यूचे दान करणार्‍या आणि मनुष्यरूपाने प्रगट होणार्‍या त्यांच्या लीलांचे आपण वर्णन करावे.

            आपण आताच सांगितले की, बलराम रोहिणीचे पुत्र होते. त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्येसुद्धा आपण त्यांची गणना केलीत. दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसे शक्य आहे ? भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून वज्रभूमीकडे का गेले ? तसेच भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कोठे कोठे निवास केला ? केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या ? तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले ? मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्षे निवास केला ? आणि त्यांना किती पत्न्या होत्या ? हे सर्वज्ञ मुनिवर ! श्रीकृष्णांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्या या व इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात. आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या, भगवंतांच्या अमृतकथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणाऱ्या मला असह्य अशी ही तहानभूक मुळीच सतावीत नाही.

            सुत म्हणतात - शौनका ! भगवंतांच्या भक्तात आग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवांनी परिक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले आणि कलीमलांना नाहीसे करणाऱ्या श्रीकृष्णचरित्राचे वर्णन करण्यास प्रारंभ केला. श्रीशुकाचार्य म्हणाले- हे श्रेष्ठ राजर्षें ! तू जो काही निश्चय केला आहेस, तो अतिशय सुंदर आहे ; कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो.

            त्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती ब्रह्मदेवांना शरण गेली. त्यावेळी तिने गाईचे रूप धारण केले होते. तिच्या डोळ्यांतून आसवे वाहात होती. ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती. ब्रह्मदेवांच्याकडे जाऊन तिने त्यांना आपले संकट सांगितले. ब्रह्मदेवांनी ते ऐकून तिला बरोबर घेतले आणि ते भगवान शंकर व अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुषसुक्ताने जगत्पालक, सर्वांतर्यामी, देवाधिदेव श्रीविष्णूंची स्तुती केली. त्यांनी समाधी-अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली. त्यानंतर ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवांनो ! भगवंतांची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा. वेळ लावू नका. पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर रहातील, तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरुपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनानीही जन्म घ्यावा.

            स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा, जे भगवंताची कला असल्याकारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्र मुखे आहेत, ते भगवंतांचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील. जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे, ती भगवंतांची ऐश्वर्यशालिनी योगमायासुद्धा, त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीलाकार्य संपन्न करण्यासाठी, अंशरूपाने अवतार घेईल.

            श्रीशुक म्हणतात- प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवांनी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परम धामाकडे गेले. पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरानगरीत राहून माथुर आणि शूरसेन या देशांवर राज्य करीत होता. त्या वेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती. भगवान श्रीहरी नेहमी तेथे विराजमान असतात. एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणीत पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत बहीण देवकी हिला खूष करण्यासाठी शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाच्या घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले. देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते, म्हणून तिला सासरी पाठवितेवेळी त्याने तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले चारशे हत्ती, पंधरा हजार घोडे, अठराशे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित दोनशे सुकुमार दासी हुंड्याचा रुपाने दिल्या. निघण्याच्या वेळी वर-वधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदंग आणि दुंदुभी वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवत होता, त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की, अरे मुर्खा! जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेस, तिचा आठवा पुत्र तुला मारील.

            कंस अत्यंत पापी व दुष्ट होता, तो भोजवंशाला कलंकच होता. आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर, निर्लज्जपणे निंद्यकर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाले.

            वसुदेव म्हणाले- तू भोजवंशाची कीर्ती वाढविणारा आहेस. अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात. असे असता एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभसमयी मारायला तू कसा तयार झालास? हे वीरा! जे जन्म घेतात, त्यांच्या शरीराबरोबर मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा शंभर वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे. जेव्हा शरीराचा अंत होतो, तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरे शरीर ग्रहण करतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असे करावेच लागते. ज्याप्रमाणे चालतेवेळी माणूस एक पाय जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो, किंवा जशी अळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून आणि इंद्रादिकांचे ऐश्वर्य ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्यांच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्ये स्वतः राजा किंवा इंद्र बनतो. त्याचबरोबर आपले मूळ रूप विसरतो. देहांताच्यावेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पांचभौतिक शरीरांकडे धावता-धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते, तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे सूर्य-चंद्रादी वस्तू पाणी, तेल इत्यादी द्रव पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने दवपदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलताना दिसतात, त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर प्रेम करून ते आपणच आहे, असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या-जाण्याला आपले येणे-जाणे मानू लागतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते, त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नये. कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील, त्याला या जीवनात शत्रुकडून आणि जीवनानंतर परलोकापासून भय असतेच. ही तुझी धाकटी बहिण अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी झाली आहे. म्हणून तुझ्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने ह्या बिचारीचा वध करणे बरे नव्हे!

श्रीशुक म्हणतात-परीक्षिता! वसुदेवांनी अशाप्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजाविले. परंतु तो क्रूर, राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनी विचार केला की, कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टाळली पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरविले की, "जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे, तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही जर तो टळला नाही, तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काही दोष नाही. म्हणून या मृत्युरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे. जर मला पुत्र झाले, आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर (निदान ही तरी वाचेल.) न जाणो, उलटेही होईल. कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेलासुद्धा परत येतो. ज्या वेळी जंगलात आग लागते, त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही, या गोष्टीला अदृष्टाशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही. त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण कळणे अत्यंत अवघड आहे." आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवांनी अत्यंत सन्मानपूर्वक त्या दुष्ट कंसाची अतिशय प्रशंसा केली. कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता, म्हणून असे करतेवेळी वसुदेवांच्या मनाला अत्यंत क्लेश होत होते, तरीसुद्धा त्यांनी वर-वर आपला चेहरा प्रफुल्लित करीत, हसत हसत ते म्हणाले.
            वसुदेव म्हणाले- हे सौम्य! आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही. भय तर पुत्रापासून आहे, म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवीन.

श्रीशुक म्हणतात- वसुदेव खोटे बोलणार नाही, हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा वसुदेवांनी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले. योग्य वेळी सर्वदेवतास्वरूप देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे आठ पुत्रांना आणि एका कन्येला जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवांनी त्याला मोठ्या कष्टाने कंसकडे आणून दिले. कारण त्याला असत्याचे अधिक भय वाटत होते. सज्जनांना असह्य असे काय असते ? ज्ञानी पुरुषांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा असते ? नीच पुरुषांना न करण्याजोगे काय असते ? आणि जितेंद्रियांना त्याग न करण्यासारखे काय असते ? हे राजा ! वसुदेवांचा जीवन-मृत्युमधील समान भाव आणि सत्याशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला. आपण या बालकाला परत घेऊन जा. याच्यापासून मला काहीही भीती नाही; कारण तुमच्या आठव्या मुलाकडून माझा मृत्यू नेमलेला आहे. " ठीक आहे" असे म्हणून वसुदेव त्या बालकाला घेऊन परत आले परंतु कंस दुष्ट आणि चंचल स्वभावाचा असल्यामुळे त्यांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही.
            परीक्षिता ! इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले आणि त्याला म्हणाली की, "अरे कंसा ! गोकुळात राहाणारे नंद इत्यादी गोप, त्यांच्या पत्न्या, वसुदेव इत्यादी वृष्णिवंशी यादव, देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद, वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत. यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत, तेसुद्धा देवच आहेत. त्यांनी असेही सांगितले की, दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत. "असे म्हणून नारद जेव्हा निघून गेले, तेव्हा कंसाचा नीश्र्चयच झाला की, हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूच मला मारण्यासाठी जन्म घेणार आहे; म्हणून त्याने देवकीला आणि वसुदेवांना बेड्या घालून कैदेत टाकले आणि त्या दोघांना जे जे पुत्र होते गेले, त्यांना विष्णू समजून मारून टाकले. पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता-पिता, बंधू किंवा इष्ट-मित्र यांचीही हत्या करतात. कंसाला हे माहीत होते की, आपण पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुरू होतो आणि विष्णूने आपल्याला मारले होते. म्हणूनच त्याने यादवांशी वैर मांडले होते. बलवान कंसाने यदु, भोज आणि अंधक वंशांचे राजे असलेल्या आपल्या पित्याच्या-उग्रसेनाला कैद केले आणि तो स्वत: शूरसेनदेशाचे राज्य करू लागला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

२२ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय चोविसावा

श्री गणेशाय नमः रोमपादाचा पुत्र बभ्रू, बभ्रूचा कृती, कृतीचा उशिक आणि उशिकाचा चेदी. राजन! या चेदीच्या वंशातच शिशुपाल इत्यादी झाले. क्रथाचा पुत्र झाला कुंती. कुंतीचा धृष्टी. धृष्टीचा निवृत्ती. निवृत्तीचा दशार्ह आणि दशार्हाचा व्योम.

            व्योमाचा जीमूत, जीमूताचा विकृती, विकृतीचा भीमरथ, भीमरथाचा नवरथ आणि नवरथाला दशरथ झाला. दशरथापासून शकुनी, शकुनीपासून करंभी, करभीपासून देवराज, देवरातापासून देवक्षत्र, देवक्षत्रापासून मधू, मधूपासून कुरुवश आणि कुरूवशापासून अनू झाला. अनूपासून पुरुहोत्र, पुरूहोत्रापासून आयू आणि आयूपासून सात्वताचा जन्म झाला. परीक्षिता ! सात्वताला भजमान, भजी, दिव्य,वृण्णी,देवावृध,अंधक आणि महाभोज असे सात पुत्र झाले. भजमानाच्या दोन पत्न्या होत्या. एकीपासून निम्लोची,किंकिण आणि दृष्टी असे तीन पुत्र झाले. दुसऱ्या पत्नीपासूनसुद्धा अजित सहजासहजी आणि आयुक्त शताजित,सहस्त्राजित आणि अयुताजित असे तीन पुत्र झाले. "

            देवावृधाच्या पुत्राचे नाव बभ्रू होते. देवावृध आणि बभ्रू यांच्यासंबंधी असे म्हटले जाते की, " आम्ही लांबून जसे ऐकले होते, तसेच आता जवळून पाहात आहोत. " बभ्रू मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवावृध देवांच्या समान आहे. कारण बभ्रू आणि देवावृधाकडून उपदेश घेऊन चौदा हजार पासष्ट माणसांनी परमपद प्राप्त करून घेतले आहे. सात्वताच्या पुत्रांमध्ये महाभोजसुद्धा मोठा धर्मात्मा होता. त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले. परीक्षिता ! वृण्णीचे सुमित्र आणि युधाजित असे दोन पुत्र झाले. युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे दोन पुत्र होते. अनमित्रापासून निम्न जन्मला.

            याच सत्यकाचा युयुधान नावाचा पुत्र होता, तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला. सात्यकीचा जय, जयाचा कुणी आणि कुणीचा पुत्र युगंधर झाला. अनमित्राच्या तिसऱ्या पुत्राचे नाव वृण्णी होते. वृण्णीचे श्र्वफल्क आणि चित्ररथ हे दोन पुत्र होते. श्र्वफल्काच्या पत्नीचे नाव गांदिनी होते. तिला सर्वांत जेष्ठ अक्रूराव्यतिरिक्त आसंग, सारमेय, मृदुर,मृदुविद, गिरी, धर्मवृश्र्द, सुकर्मा, क्षेत्रोपेक्ष,अरिमर्दन, शत्रुघ्न, गंधमादन आणि प्रतिबाहू असे बारा पुत्र झाले. त्यांना सुचीरा नावाची एक बहीणसुद्धा होती. अक्रूराचे देवावान आणि उपदेव असे दोन पुत्र होते.श्र्वफल्काचा भाऊ चित्ररथ याला पृथू, विदूरथ इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. ते वृण्णिवंशीय होते.

            सात्वताचा पुत्र अंधक याचे कुकुर, भजमान, शुची आणि कंबलबर्ही असे चार पुत्र होते. त्यांमध्ये कुकुराचा पुत्र वह्ली, वह्लीचा विलोमा, विलोमाचा कपोतरोमा आणि कपोतरोमाचा अनू होता. अनूचा मित्र तुंबुरु. अनूचा पुत्र अंधक.अंधकाचा दुंदुभी, दुंदुभीचा अरिद्योत,अरिद्योताचा पुनर्वसु आणि पुनर्वसूचा आहुक नावाचा एक पुत्र आणि आहुकी नावाची एक कन्या होती. आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते. देवकाला देववान, उपदेव, सुदेव आणि देववर्धन असे चार पुत्र झाले.

            यांच्या धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा आणि देवीकी अशा सात बहिणी होत्या. वसुदेवांनी या सर्वांशी विवाह केला होता.

            उग्रसेनाचे कंस, सुनामा, न्यग्रोध,कंक, शंकू,सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी आणि सृष्टीमान असे नऊ पुत्र होते आणि कंसा, कंसावती, कंका,शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा पाच कन्या होत्या. त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवांच्या लहान भावांशी झाला होता.

            विदुरथापासून शूर, शूरापासून भजमान, भजमानापासून शीनी, शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून हृदीक झाले. हृदीकाला देवबाहू, शतधन्यवा आणि कृतवर्मा असे तीन पुत्र झाले. देवमीढाचा पुत्र शूर. याच्या पत्नीचे नाव मारिषा होते. शुराला तिच्यापासून वसुदेव, देवभाग, देवश्रवा, आणक, सृंजय, श्यामक,कंक, शमीक, वत्सक आणि वृक असे दहा पुण्यवान पुत्र झाले. वसुदेवांच्या जन्माच्यावेळी देवतांचे नगारे आणि नौबती आपोआप वाजू लागल्या होत्या. म्हणून त्यांचे आनकदुंदुभी असे नाव पडले. तेच भगवान श्रीकृष्णांचे वडील. वसुदेव इत्यादींच्या पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी अशा पाच बहिणी होत्या. वसुदेवाचे वडील शूरसेन. यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता. कुंतिभोज निपुत्रिक होता, म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली.( म्हणून तिचे नाव कुंती.)

            कुंतीने दुर्वास ऋषींना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली. एके दिवशी त्या विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासाठी तिने पवित्र होऊन (सूर्यमंत्राने) सूर्याचे आवाहन केले. त्याचवेळी सूर्यदेव तेथे आले. त्यांना पाहून कुंतीचे हृदय आश्चर्याने भरून गेले. ती म्हणाली, "भगवन ! मला क्षमा करा. मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता. आता आपण परत जावे. " सूर्यदेव म्हणाले- "देवी ! माझे दर्शन निष्फळ होऊ शकत नाही. म्हणून हे सुंदरी ! आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल. पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही, असे मी करीन. "

            असे म्हणून तिच्या उदरात गर्भ स्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेले. त्याचवेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला. कुंतीने लोकनिंदेच्या भीतीने जड अंत:करणाने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडले. तिचा विवाह तुझे पणजोबा पराक्रमी पांडू यांच्याशी झाला.

            श्रुतदेवेचा विवाह करुष देशाचा राजा वृद्धशर्मा याच्याशी झाला. तिला दंतवक्र नावाचा मुलगा झाला. हाच पूर्वजन्मी सनकादिक ऋषींच्या शापामुळे हिरण्याक्ष झाला होता.केकय देशाचा राजा धृष्टकेतू याने श्रुतकीर्तीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला संतर्दन इत्यादी पाच कैकय राजकुमार झाले. राजाधिदेवीचा विवाह जयसेनाशी झाला. त्याला विंद आणि अनुविंद असे दोन पुत्र झाले. ते दोघेही अवंती नगरीचे राजे झाले. चेदिराज दमघोष याने श्रुतश्रवेचे पाणिग्रहण केले. त्याचा पुत्र होता शिशुपाल. याचे वर्णन पूर्वीच केलेले आहे. देवभागाची पत्नी कंसा. हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्वल असे दोन पुत्र झाले. देवश्रवाची पत्नी कंसवती. हिच्यापासून सुधीर आणि इषुमान नावाचे दोन पुत्र झाले. आनकाची पत्नी कंका. हिच्यापासून शत्रुजित आणि पुरुजित असे दोन पुत्र झाले. सृंजयाला पत्नी राष्ट्रपालीपासून वृष, दुर्मर्षण इत्यादी अनेक पुत्र झाले. श्यामकाला शूरभूमी नावाच्या पत्नीपासून हरिकेश आणि हिरण्याक्ष नावाचे दोन पुत्र झाले. मिश्रकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक इत्यादी पुष्कळ पुत्र झाले. वृकाला दुर्वार्क्षीपासून तक्ष, पुष्कर, शाल इत्यादी अनेक पुत्र झाले. शमीकाला सुदामिनीपासून सुमित्र, अर्जुनपाल इत्यादी अनेक पुत्र झाले. कंकाला कर्णिकेपासून ऋतधाम आणि जय असे दोन पुत्र झाले.

            वसुदेवांच्या पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला, देवकी इत्यादी पत्न्या होत्या. त्यांत देवकी मुख्य होती. रोहिणीपासून वसुदेवांना बलराम,गद, सारण, दुर्मद, विपुल,ध्रुव,कृत इत्यादी पुत्र झाले होते.

            पौरवीपासून त्यांना भूत, सुभद्र, भद्रवाह, दूर्मद, भद्र इत्यादी बारा पुत्र झाले. मदिरेपासून नंद, उपनंद, कृतक, शूर इत्यादी पुत्र झाले. कौशल्येला वंशाचा दिवा असा केशी नावाचा एकच पुत्र झाला होता. त्यांना रोचनेपासून हस्त, हेमांगद इत्यादी आणि इलेपासून उरूवल्क इत्यादी प्रधान यदुवंशी पुत्र झाले. परीक्षिता ! धृतदेवेपासून वसुदेवांना विपृष्ठ नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतिदेवेपासून श्रम आणि प्रतिश्रुत इत्यादी अनेक पुत्र झाले. उपदेवेचे पुत्र कल्पवर्ष इत्यादी दहा राजे झाले आणि श्रीदेवेचे वसू, हंस,सुवंश इत्यादी सहा पुत्र झाले. हे राजा ! देवरक्षितेपासून गद इत्यादी नऊ पुत्र झाले. धर्माने जसा आठ वसूंना जन्म दिला, तसा वसुदेवांनी सहदेवेपासून पुरुविश्रुत इत्यादी आठ पुत्रांना जन्म दिला. वसुदेवांना देवकीपासून आठ पुत्र झाले. कीर्तिमान, सुषेन, भद्रसेन,ऋजू, संमर्दन, भद्र, शेषावतार श्रीबलराम आणि आठवा पुत्र म्हणजे स्वत: श्रीभगवानच होते. तसेच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा हीसुद्धा वसुदेवांचीच कन्या होती.

            जगात जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि पापाची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा सर्वशक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात. परिक्षिता ! भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेतः त्यांच्या आत्मस्वरूपिणी योगमायेव्यतिरिक्त त्यांचा जन्म किंवा कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही. त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म, स्थिती आणि मृत्यूला कारण आहे; आणि त्यांची कृपाच मायेचा निरास करून आत्मस्वरुप प्राप्त करून देणारी आहे. जेव्हा राजांच्या रूपांतील असूर कित्येक अक्षौहिणी सेना एकत्र करून सगळ्या पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागले, तेव्हा पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान मधुसूदन बलरामांसह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पनासुद्धा करता येणार नाही, अशी कार्ये केली.

            त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख, शोक आणि अज्ञान नाहीसे करणाऱ्या परम पवित्र यशाचा विस्तार केला. त्यांचे यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आहे. संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आहे. एकदा जरी कानांच्या ओंजळींनी त्याचे आचमन केले, तरी कर्माच्या वासना समूळ नष्ट होतात. भोज,वृष्णी, अंधक, मधु, शुरसेन, दशार्ह, कुरु, सृंजय आणि पांडव नेहमी भगवंताच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करीत असत. त्यांनी आपल्या सर्वांगसुंदर शरीराने, तसेच आपल्या प्रेमळ हास्य, मधुन अंत:करण प्रसादपूर्ण वचन आणि पराक्रमपूर्ण लीलांच्या द्वारा सर्व भूलोकाला आनंदविभोर केले होते. सुंदर कानातील मकराकृती कुंडलांनी चमकणाऱ्या गालांनी शोभणारे आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाला उधाण आणणारे त्यांचे मुख्यकमल कितीही पाहून स्त्रीपुरुष तृप्त होत नसत. ते आनंदित तर होतच, परंतु पापण्यांच्या लवण्यावरही रागावत, भगवान मथुरेमध्ये वासुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले.तेथील कार्य पूर्ण केले. नंतर अनेक शत्रूंचा संहार केला. अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला. त्याचबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या वेदांची लोकांत स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतःच स्वतःचे पूजन केले. त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भाग हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली. तसेच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेनेच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजविला. नंतर उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून ते परम धामाला गेले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

१९ एप्रिल २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेविसावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात -अनुला सभानर, चक्षु आणि परोक्ष असे तीन पुत्र झाले. सभानगराचा कालनर, कालनगराचा सृजन, सृजनाचा जनमेजय, जनमेजयाचा महाशील, महाशीलाचा पुत्र महामना. महामनाला उशीनर आणि तितीक्षू असे दोन पुत्र झाले. उशीनरला शिबी, वन, शमी आणि दक्ष असे चार पुत्र झाले. शिबीला वृषादर्भ, सुवीर, मद्र आणि कैकेय असे चार पुत्र झाले. तितिक्षूला रुशद्रथ, रूशद्रथाचा हेम, हेमाचा सुतपा आणि सुतपाचा बली नावाचा पुत्र होता.

            राजा बलीच्या पत्नीच्या ठिकाणी दीर्घतमा मुनींनी अंग, वंग, कलिंग, सुह्य, पुंड्र आणि अंध्र असे सहा पुत्र उत्पन्न केले. यांनी आपापल्या नावाने पूर्व दिशेकडे सहा देश वसविले. अंगाचा पुत्र झाला खनपान. खनपानाचा दिविरथ, दिविरथाचा धर्मरथ आणि धर्मरथाचा चित्ररथ. हा चित्ररथच रोमपाद या नावाने प्रसिद्ध होता. त्याचा मित्र दशरथ याने आपली शांता नावाची कन्या त्याला दत्तक दिली. शांतेचा विवाह ऋष्यशृंग मुनीबरोबर झाला. विभांडक ऋषींना हरणीपासून झालेला मुलगा ऋष्यशृंग. रोमपादाच्या राज्यात कित्येक दिवस पाऊस झाला नाही, तेव्हा गणिकांकरवी नृत्य, संगीत, वाद्ये, हाव-भाव, आलिंगन आणि विविध भेटवस्तूंनी ऋष्यशृंगाला रोमपादाने आणविले, तेव्हा पाऊस पडला. जेव्हा त्यानेच इंद्र-देवतेला उद्देशून यज्ञ केला, तेव्हा संतानहीन राजा रोमपादाला पुत्र झाला आणि पुत्रहीन दशरथानेसुद्धा त्याच्याचकरवी यज्ञ करवून चार पुत्र प्राप्त करून घेतले. रोमपादाला चतुरंग नावाचा पुत्र झाला आणि चतुरंगाला पृथुलाक्ष.

            पृथुलाक्षाचे बृहद्रथ, बृहत्कर्मा आणि बृहद्भानू असे तीन पुत्र झाले. बृहद्रथाचा पुत्र बृहन्मना झाला आणि बृहन्माचा जयद्रथ. जयद्रथाच्या पत्नीचे नाव संभूती होते. तिच्यापासून विजय झाला. विजयाचा धृती, वृत्तीचा धृतव्रत, धृतव्रताचा सत्कर्मा आणि सत्कर्माला अधिरथ झाला.

            अधीरथाला संतान नव्हते. एके दिवशी तो गंगातटाकी विहार करीत असता त्याने कुंतीने एका पेटीत ठेवून सोडलेला मुलगा पाहिला. कुंतीला तो कुमारी अवस्थेत झाला होता. अधीरथाने त्यालाच आपला पुत्र मानले. त्याच राजा कर्णाच्या पुत्राचे नाव वृषसेन होते. ययातीचा पुत्र द्रुह्यूपासून बभ्रूचा जन्म झाला. बभ्रुचा सेतू, सेतूचा आरब्ध, आरब्धाचा गांधार, गांधाराचा धर्म, धर्माचा धृत,धृताचा दुर्मना आणि दुर्मनाचा पुत्र प्रचेता होय. प्रचेताला शंभर पुत्र झाले. ते उत्तर दिशेला म्लेंच्छांचे राजे झाले. तुर्वसूचा वह्नी, वह्नीचा भर्ग, भर्गाचा भानुमान, भानुमानाचा त्रिभानू, त्रिभानूचा उदारबुद्धी करंधम आणि करंधमाचा पुत्र मरुत्त होता. मरुत्त निपुत्रिक होता, म्हणून त्याने पुरुवंशातील दुष्यंताला आपला पुत्र मानले होते. परंतू दुष्यंत आपल्याला राज्य मिळावे या इच्छेने आपल्याच वंशात परत आला. परीक्षिता! आता मी ययातीचा जेष्ठ पुत्र यदू याच्या वंशाचे वर्णन करतो.

            यदूचा वंश परम पवित्र आणि मनुष्यांची सर्व पापे नाहीशी करणारा आहे. जो मनुष्य याचे श्रवण करेल, तू सर्व पापांपासून मुक्त होईल. या वंशात स्वतः भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी मनुष्याच्या रूपाने अवतार घेतला होता. यदूला सहस्त्रजित, क्रोष्टा, नल आणि रिपू असे चार पुत्र होते. सहस्त्रजितापासून शतजित याचा जन्म झाला. शतजिताचे महाहय, वेणुहय आणि हैहय असे तीन पुत्र होते. हैहयाचा धर्म, धर्माचा नेत्र, नेत्राचा कुंती, कुंतीचा सोहंजी, सोहंजीचा महिष्मान आणि महिष्मानाचा भद्रसेन पुत्र होता. भद्रसेनाचे दुर्मद आणि धनक असे दोन पुत्र होते. धनकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतवर्मा आणि कृतौजा असे चार पुत्र झाले. कृतवीर्याचा पुत्र अर्जुन सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता. त्याने भगवंतांचे अंशावतार श्रीदत्तात्रेय यांचेकडून योगविद्या आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. स्पोर्ट टीव्ही वरील कोणताही सम्राट यज्ञ, दान, तपश्चर्या, योग, शास्त्रज्ञान, पराक्रम, विजय, इत्यादी गुणांच्या बाबतीत कार्तवीर्य अर्जुनाची मुळीच बरोबरी करू शकणार नाही. सहस्त्रबाहू अर्जुन पंचाऐंशी हजार वर्षेपर्यंत सहाही इंद्रियांमार्फत विषयांचा अक्षयपणे भोग घेत राहिला. या कालावधीत त्याच्या शरीरातील बळ कमी झाले नाही. त्याचे स्मरण करताच हरवलेले धन सापडते. त्याच्या हजारो पुत्रांपैकी फक्त पाचच जिवंत राहिले. जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधु आणि उर्जित.

            जयध्वजाच्या पुत्राचे नाव तालजंघ होते. तालजंघाला शंभर पुत्र झाले. त्या तालजंघ नावाच्या क्षत्रियांचा सगराने संहार केला. त्या शंभर पुत्रांमध्ये वितीहोत्र सर्वात थोरला होता. वितिहोत्राचा पुत्र मधू. मधूचे शंभर पुत्र होते. त्यातील सर्वात थोरला वृष्णी होता. राजा! ह्याच मधू, वृष्णी आणि यदू यांच्यामुळे हा वंश माधव, वार्ष्णेय आणि यादव या नावांनी प्रसिद्ध झाला. यदुनंदन क्रोष्टूच्या पुत्राचे नाव वृजिनवान होते. वृजिनवानाचा पुत्र श्वाही, श्र्वाहीचा रुशेकू, रुशेकूचा चित्ररथ आणि चित्ररथाच्या पुत्राचे नाव शशबिंदू होते. तो परम योगी, महान भोगैश्वर्यसंपन्न आणि अत्यंत पराक्रमी होता. तो चौदा रत्नांचा स्वामी चक्रवर्ती आणि युद्धामध्ये अजिंक्य होता. परम यशस्वी शशबिंदूच्या दहा हजार पत्न्या होत्या. त्यांपैकी प्रत्येकीला एक एक लाख मुले झाली होती. अशी त्याची शंभर कोटी मुले होती. त्यांपैकी पृथुश्रवा इत्यादी सहा पुत्र मुख्य होते. पृथुश्रवाच्या पुत्राचे नाव धर्म होते. धर्माचा पुत्र उशना. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले होते. उशनाचा पुत्र रुचक. रुचकाला पाच पुत्र झाले. त्यांची नावे ऐक. पुरुजीत, रुक्म, रुक्मेषू, पृथू आणि ज्यामघ. ज्यामघाच्या पतीचे नाव शैब्या असे होते. ज्यामघाला पुष्कळ दिवसपर्यंत काहीच संतान झाले नाही. परंतु त्याने आपल्या पत्नीच्या भीतीने दुसरा विवाहही केला नाही. एकदा त्याने आपल्या शत्रूच्या घरून भोज्या नावाच्या कन्येचे अपहरण केले. जेव्हा शैब्याने पतीच्या रथावर त्या कन्येला पाहिले, तेव्हा ती चिडून आपल्या पतीला म्हणाली- "कपट्या! माझ्या बसण्याच्या जागेवर आज कुणाला बसवून आणले आहेस?" ज्यामघ म्हणाला- "ही तुझी सून आहे." शैब्या हसून पतीला म्हणाली,

            "मी तर पहिल्यापासूनच वांझ आहे आणि मला कोणी सवतही नाही. तर मग मी माझी सून कशी होईल?" ज्यामघ म्हणाला, "राणी! तुला जो पुत्र होईल, त्याची ही पत्नी होईल." राजा ज्यामेघाच्या या म्हणण्याला विश्वेदेव आणि पितरांनी दुजोरा दिला. योग्यवेळी शैब्याला गर्भ राहिला आणि तिने अतिशय सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचे नाव विदर्भ ठेवले. त्याने साध्वी भोज्या हिच्याशी विवाह केला.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...